सुनिता पाटील यांची स्मशानसेवा


नाशिकच्या रामचंद्र हिरवे यांच्या चार-पाच पिढ्यातरी ‘पंचवटी स्मशानभूमी’त गेल्या आहेत. हिरवे कुटुंबाची स्मशानभूमीत वखार होती. ते लोकांना लाकडे व इंधन पुरवत. पुढे, ते काम महापालिकेने घेतले. नाशिकची महापालिका प्रेते दहन करण्याकरता विनामूल्य लाकडे पुरवते. त्यांनी त्यापुढे जाऊन सरण रचणे आणि अंतिम संस्कार सुसह्य करणे या कामी लोकांना मदत केली. त्यांची मुलगी सौ. सुनिता राजेंद्र पाटील तो वसा चालवत आहे.

सुनिता पाटील यांचा जन्म नाशिकला स्मशानातच झाला! त्या वाढल्याही त्या वातावरणात. पण त्यांची दृष्टी-मेली नाही, उलट संवेदना जागी झाली. सुनिता शिकल्या पंचवटीतील ‘गणेश विद्यालय’ आणि ‘नर्गिस दत्त कन्या विद्यालय’ या शाळांत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी प्रथम एका पुरुषाचा अंतिम संस्कार विधिवत केला आणि दहा वर्षांत बारा हजारांहून अधिक प्रेतांना तशीच स्वर्गाची वाट दाखवली. सुनिता या अंतिम सोहळ्यालाही आनंददायी करू पाहतात.

अण्णाभाऊ साठे यांच्या ‘स्मशानातील सोनं’ कथेतील संघर्ष आठवतो. माणूस जगण्यासाठी किती आणि कसा संघर्ष करतो हे अण्णाभाऊ स्मशानविधीच्या पार्श्वभूमीवर चितारतात. कालमान बदलले. माणसे बदलली आणि स्मशानही. त्याचा प्रत्यय सुनिता पाटील यांच्या कथेत येतो.  

मृत्यू ही शोककारक घटना. मत्यूची एक प्रकारची भीती अनेकांना वाटत असते. स्मशानात अखेरच्या निरोपासाठी जातानाही मनात दडपण असते. अमावस्या, पौर्णिमा, भूत या गोष्टी घर करून असतात. स्मशानात भूतं असतात अशी एक आख्यायिकाही सांगितली जाते. स्मशानात कोणी राहत असेल तर? ते सारे बदलत आहे.

स्मशानात येणारी ‘डेड बॉडी’ काही वेळा ‘पोस्ट मॉर्टेम’ केलेली असते; कधी, आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचीही असते; एवढेच काय, कुष्ठरोग-कर्करोगग्रस्त, पिसाळलेला कुत्रा चावल्याने मृत्यू झालेल्या अथवा एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह व्यक्तीचीही असू शकते. सुनिता पाटील कोणत्याही मृतदेहाची हेळसांड होऊ देत नाहीत. प्राणज्योत मालवलेला मृतदेह त्यांच्या लेखी जिवंत व्यक्तीपेक्षाही अधिक सन्मानाचा असतो. त्या बाई प्रत्येक मृतदेहाची सेवा करुणेने करतात. परंपरा पावित्र्याने पाळत दुःखी कुटुंबाला तो सोहळा पाहून दुःख क्षणभर विसरण्यास लावतात. बार्इंनी केलेला तो अंतिम संस्कार पाहून ‘जाणारी ती व्यक्ती’ही म्हणत असेल, “सप्रेम द्या निरोप, बहरुन जात आहे!” एकदा बेडच्या आजुबाजूला सांडलेल्या तुपावरून त्या घसरल्या. टणक जागेवर पडल्यामुळे पाठीचा मनका दुखावला. डॉक्टरने स्पाँडिलायटिसचे निदान केले. तरी त्या कंबरेला पट्टा लावून मृतदेहाच्या सेवेला तयार राहिल्या!

त्या स्मशानात नर्सप्रमाणे अॅप्रन घालून असतात, त्यांच्या हातात कात्री असते. अंत्यसंस्कारासाठी तिरडी बांधणे हे कुशल व्यक्तीचे काम आहे. तसेच, सरण रचणे हेसुद्धा कौशल्याचे काम आहे. प्रत्येक गावात त्या कामात तरबेज चार-दोन माणसे असतात. त्या कामात स्त्रीचा सहभाग मात्र नसतो. नाशिकच्या नदीपलिकडची स्मशानभूमी सुनिता स्वतः सरण रचण्याचे काम करतात. त्यांना मृतदेहाच्या खाली किती आणि कशी लाकडे असावी हे अनुभवाने माहीत आहे, त्या लाकडाचा अपव्यय टाळतात. मृतदेह स्मशानात आणताना तो सजवून आणला जातो. शवावर फुलांचे हारही असतात. सुनिता पाटील चितेवर मृतदेह ठेवल्यावर कात्रीने त्या देहावरील कपडे दूर सारतात, त्या देहाला तुप लावतात. मृतदेहावरील कपडे दूर होतात म्हटल्यावर आप्तेष्टांना तो त्या बाईचा अतिरेक वाटतो. पण चितेत कपडा असेल तर चितेवरील लाकडे नीट पेट घेत नाहीत. काजळी धरते. मग त्यावर मिठाचा मारा करावा लागतो. अवाजवी रॉकेल फवारणी करून चिता पेटती ठेवावी लागते. सुनिता पाटील यांना ते धोके माहीत आहेत. त्यांनी मृतदेहाच्या सर्वांगाला तूप लावले असल्याने आणि कापडांचा अडसर दूर केल्याने चिता हमखास पेटते आणि त्यासाठी कमी इंधन लागते. एक स्त्री पुरुष मृतदेहाला, त्याच्या सर्वांगाला थेट स्पर्श करते हीच गोष्ट काही लोकांना खटकते किंवा त्याबाबत आश्चर्य तरी वाटते. सुनिता पाटील यांच्या लेखी, नर्सप्रमाणे तो मृतदेह स्त्री अगर पुरुष या भेदापलिकडे गेलेला असतो.

सुनिता हिरवे यांच्या लग्नाची चित्तरकथा मजेदार आहे. राजेंद्र हरिश्चंद्र पाटील यांचे स्थळ रीतीप्रमाणे आले. पाहण्याचा कार्यक्रम मावशीकडे झाला. मुलगी गोड असल्याने मुलाला लगेच पसंत पडली. साखरपुडा वगैरेसाठी मुलीचे घर पाहण्यास मुलाचे मित्र निघाले. रिक्षा पंचवटी स्मशानभूमीत आल्यावर नवरा मुलगा म्हणाला, इकडे कोठे? मित्र म्हणाले, मुलीच्या घरी. मुलाने तेथून धूम ठोकली! त्याने स्वतःचे घर गाठले. मित्र मंडळी, नातेवाईक यांनी समजावल्यावर मुलाला वस्तुस्थिती समजली. तेच राजेंद्र पाटील पत्नीच्या स्मशानसेवेचा दुवा झालेले आहेत. सुनिता पाटील यांना दोन मुले आहेत आणि आईच्या समाजसेवेत तीही सहभागी होतात. ती सरण रचायलाही आईला मदत करतात. एक मुलगा दहावीच्या वर्गात शिकतो, तर दुसरा एफ.वाय.बी.कॉम.ला आहे.

सुनिता पाटील म्हणतात, मी अमावस्या-पुनवेलाही स्मशानसेवा करते. कधी कधी, लोक रात्री उशिरा ‘बॉडी’ घेऊन येतात. त्यावेळी मी लगेच ‘बेड’जवळ (प्रेत ठेवण्याची, सरणाची जागा) जाते. ‘डेड बॉडी’ला मसाज करते, तूप लावते. प्रेताचे डोळे उघडे असतील तर मालिश करून झाकते आणि अग्निडाग देण्याची व्यवस्था करते. व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात झाला तर तेथील ‘स्टाफ’ मृतदेह असाच ‘प्रेझेंटेबल’ करतात.

एका ‘बॉडी’ला पूर्ण दहन होण्यास तीन तास लागतात. तोवर सुनिता तीवर लक्ष ठेवून असतात. एखादी ‘बॉडी’ अर्धीकच्ची राहिली तर आणखी लाकडे चितेवर टाकावी लागतात. त्या म्हणतात, की भूत असते ते माणसाच्या मनात!

सुनिता पाटील त्यांच्या मुलाच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी ‘मराठा विद्या प्रसारक समाजा’च्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्याकडे गेल्या तेव्हा नीलिमा यांनी सुनिता यांना मिठीच मारली, त्यांचा साडी-चोळी देऊन सन्मान केला आणि मुलाच्या प्रवेशाचा तिढाही सोडवला. असे असले तरी समाजमन फारसे बदललेले नाही असाच अनुभव सुनिता यांना येतो. कधी कधी, उपेक्षाही त्यांच्या वाटयाला येते. पण त्यांना त्यांच्या विनामोबदला स्मशानसेवेबद्दल हिरकणी, गिरणा गौरव, अटलसेवा, गोदारत्न असे पुरस्कार लाभले आहेत. सुनिता पाटील यांचा ‘साई संस्थान’, ‘ऊर्जा युवा प्रतिष्ठान’ यांनी सत्कारही केला आहे. संस्कृतीच्या विकासात मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्याची पद्धत विकसित होत गेली. भारतीय समाजाने ‘बॉडी’ला अग्निडाग देण्याची पद्धत स्वीकारली. काही समाज गटातील स्त्रिया स्मशानात जात नाहीत. मात्र सुनिता पाटील यांच्यासारखी हिरकणी स्मशानातील अंतिम सोहळा आनंददायी करून, दुःखी कुटुंबाचा काही क्षण आधार ठरत असतात.

एक बाई स्मशानसेवा करते म्हटल्यावर माणसे बिचकतात. काहींचा बाईने प्रेताला हात लावण्यालाच विरोध असतो. काही जण स्त्री हे काम कसे करते म्हणून आश्चर्य व्यक्त करतात. रोज साधारण आठ-दहा प्रेते स्मशानात येतात त्यांना तूप लावणारी, प्रेताचे डोळे मालिश करून बंद करणारी ती तरुण स्त्री पाहून अचंबाही वाटतो. पुन्हा तीच बाई स्वयंपाक करत असेल तर तिच्या हातचे कोण खात असेल? दिवसातून दहा दहा वेळा तिला अंघोळ करावी लागत असेल का? असा विचार करणारी माणसे सुनिता पाटील यांना रोजच भेटतात. काही स्त्रियांनी तर तिच्या नवऱ्यालाच विचारले, तुम्ही तिला घरात ठेवताच कसे?

(दीप अमावस्येला नाशिकमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे सौ. सुनिता पाटील तसेच त्यांचे वडील रामचंद्र हिरवे यांचे घर उध्‍वस्‍त झाले. त्‍यांचे कुटुंब रस्त्यावर दिवस काढू लागले आहेत. पावसाच्या संतत धारेत घरात पाणी शिरल्याने पाटील, हिरवे कुटुंब बाहेर पडले. भरपावसात घरात सिलेंडरचा स्फोट होऊन सात खोल्यांचे चार कुटुंबांचे घर उध्वस्‍त झाले. सुनिता पाटील यांना मिळालेले पुरस्‍कार पावसाच्‍या पाण्‍यात वाहून गेले आहेत. पाटील काम करत असलेल्‍या पंचवटी स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराचे साहित्य, लाकडे वाहून गेली असून चितेसाठी बसवलेल्या बेडचेही नुकसान झाले आहे. त्‍या परिस्थितीत तेथे अंत्यसंस्कार करणे अशक्य असल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारच्या स्मशानभूमित जावे लागत आहेत. तथापी या परिस्थितीत राजकीय किंवा सरकारी पातळीवर सुनिता यांना मदत मिळालेली नाही. नाशिक शहरातील व्यापारी इंद्रजितसिंग यांनी सुनिता पाटील यांच्‍या कुटुंबाला त्वरीत वैयक्तिक मदत केली.)

- डॉ. शंकर बोऱ्हाडे

Last Updated On - 7th Jan 2017

लेखी अभिप्राय

Sau sunita tais manacha mujra

mangesh gopal …23/08/2016

कमाल आहे ताइंची. उदंड सुख, समाधान व आरोग्य लाभो.

मच्छिंद्र बाबु…05/02/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.