आमची जात


‘मराठा समाज हा वंचित वगैरे असल्याने आणि सामाजिक उतरंडीत निम्न स्तरावर असल्याने त्यांना – म्हणजे मराठा म्हणवणाऱ्या लोकांना आरक्षणाचा लाभ द्यायला हवा’ अशी मागणी होत असते. मराठा समाजाच्या रूढ प्रतिमेच्या विरूद्ध अशी ही मागणी वाटते. म्हणजे हे मतांचे राजकारण असावे का अशा विचारात असतानाच शंभर वर्षांपूर्वीचे एक पुस्तक वाचनात आले आणि आरक्षण प्रश्नाकडे बघण्याचा नवा मुद्दा मिळाला असे वाटले. ते पुस्तक आहे ‘आमची जात’. लेखक -गणपतराव भिवाजी बैताडे ऊर्फ जी.बी. नाईक. पुस्तक १९१६ साली प्रसिद्ध झाले. लेखकाचे मुंबईत ‘जी.बी. नाईक अँड सन्स’ या नावाने चष्म्यांचे प्रसिद्ध असे दुकान होते.

नाईक प्रस्तुत पुस्तक का लिहिले याचा खुलासा करताना सांगतात –“शाळेत असताना इतिहास हा माझा आवडता विषय असल्याने आपल्या जातीसंबंधी माहिती समजून घेण्याबद्धल जिज्ञासा उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे ती माझ्या मनात निर्माण झाली.”

बैताडे यांनी त्यांच्या त्या शोधाला १८७९ मध्ये सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या जातींत निरनिराळ्या प्रांतातील लोकांना पत्रे पाठवून, वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन त्यांच्या जातीसंबंधी काही माहिती देण्यास विनंती केली. त्याला प्रतिसाद त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी मिळाला. मग लेखकांनी स्वतः अनेक प्रांतांतील लोकांना भेटून, जुनी कागदपत्रे बघून, पुराणकथा/दंतकथा पडताळून अभ्यास केला. त्यांच्या त्या सगळ्या खटाटोपाला समाजाच्या चेष्टेचा विषयही व्हावे लागले.

अनेक कागदपत्रांची, रीतिरिवाजांची छाननी करून, कुलदैवते यांची माहिती तपासून लेखक असा निष्कर्ष काढतो, की - ‘‘रजपूत व मराठे या दोन जातींचे मूळ स्थान एकच आहे. त्या दोन जातींची तुलना जर केली तर त्यांच्यातील बहुतेक चालीरीतींवरून त्यांच्यात पुष्कळ साम्य असल्याचे दिसून येते.’’ पुढे त्यांनी असे प्रतिपादन केले, की “रजपूत, मराठे हे मूळचे क्षत्रिय. रजपूत लोक मुसलमानी आक्रमणानंतर दक्षिणेत (महाराष्ट्रात व गुजरातमध्ये) पसरले. त्यांच्यात व्यवसायानुसार अनेक जाती आल्या व व्यवसायांची नावे, क्वचित गावांची नावे त्यांना पडली. गुजरातमध्ये मारू, वाघेला, सोळंकी हे सारे क्षत्रिय (मूळचे) आहेत.” (आज ती सारी आडनावे धारण करणारे स्वतःला मागसलेल्या – अनुसुचित जातींचे – मानतात. बहुधा सरकार दरबारी तशाच नोंदी असाव्यात.) हे प्रतिपादन करताना लेखकाने पुराणकथांपासून सुरुवात केली आहे. – परशुरामांनी पृथ्वी एकवीस वेळा नि:क्षत्रिय केली येथपासून ते रजपूत लोकांच्या शंभर शाखा पुढे कशा झाल्या- त्यांची कुळे कोणती – त्यांना यज्ञोपवितांचा अधिकार होता की नाही इत्यादी इत्यादी तपशील दिला आहे.

पुस्तकातील विवेचनाचे मुद्दे त्याच्या अनुक्रमणिकेतून दिसतात. जगद्उत्त्पत्ति – क्षत्रिय कुळे – राज्यक्रांतीमुळे होणारे फेरफार – मुसलमान आमदानीत रजपुतांचा छळ – अत्याचाराचा परिणाम – रजपूत ही एक जात – राजकुमार – कुमार – आणि कुमावत – दक्षिणेत आलेले रजपूत – पुनश्च ऐक्य – समाजातील काही वहिवाटी-नथ का नाही – आम्ही रजपूत आहोत – कुळे, कुलदेवी व आडनावे – आमच्या चालीरीती – पांचवी/षष्ठी पूजन – सोयरीक अथवा सगाई – विवाहपद्धती (४० पृष्ठे) – ऋतुदर्शन – बारसे – पुनर्विवाह – चौधरी/पटेल/शेटे सरपंच/पांड्या – भाट –न्हावी – लोकसंख्या – जातीपंचायतीचे साधारण स्वरूप व सभा – नम्रपूर्वक विनंती.

“आपण रजपूत आहोत असे हा इतका खटाटोप करून सप्रमाण सिद्ध केले आहे. पण त्यापासून आपणास कोणते असे श्रेष्ठ पद प्राप्त होणार आहे? त्यात काळाचा, द्रव्याचा व्यर्थ व्यय आणि लेखणीला विनाकारण शीण असे उद्गार ऐकायला मिळाले.” लेखक स्वतः म्हणतात त्यात बराच तथ्यांश आहे. “पण मला इतकेच सांगायचे आहे, की आमच्या ज्ञातीबांधवांस त्यांच्या जातीचे वास्तविक खरे ज्ञान प्राप्त होऊन, त्यांना त्यांनी काळास अनुसरून सुधारणेच्या व विद्याप्रसाराच्या मार्गास लागावे यापलीकडे माझा हेतू नाही.” (पृष्ठ २२)

त्यांच्या या ‘हेतू’चे बऱ्याच नामवंतांनी कौतुक केले व पुस्तकावर अनुकूल अभिप्राय दिले. त्या नामवंतांत न.चिं. केळकर, गो.स. सरदेसाई, करवीर पीठाचे शंकराचार्य, प्रा. वामन गोविंद काळे, द.ब. पारसनीस इत्यादींचा समावेश आहे.

न.चिं. केळकर - ‘‘पुस्तकातील माहिती बरीच परिश्रमाने मिळवलेली असून लेखकाचा हेतूही आत्मोद्धाराचा, म्हणून अत्यंत स्तुत्य आहे. स्वजातीसंबंधी योग्य अभिमान बाळगणे व तिला नावारूपाला आणणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. तुमच्या प्रयत्नाबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.’’

गो.स. सरदेसाई - ‘‘निरनिराळ्या प्रांतांत पसरलेल्या एकाच जातीच्या आचारविचारांचा पूर्ण शोध करून तुम्ही जी माहिती जमवली आहे ती फारच उपयुक्त असून, प्रत्येक जातीने जर असा उपक्रम हाती घेतला तर वेगवेगळ्या लोकांबद्दल उत्तम दर्ज्याची माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि मूलतः आपण (महाराष्ट्रीय) एक आहोत याची जाणीव होऊन मतभेद बरेचसे दूर होतील..... पहिले काम विद्याप्रसाराचे आहे. त्या धोरणाची तुम्ही जी सभेची नवीन योजना दिली आहे, त्याच्यात अनुभवाने व व्यवहाराने कित्येक फेरफार करावे लागतील. पुस्तकाचे नाव ‘कुमावत क्षत्रियांचा वृत्तान्त’ असे असायला हवे होते.’’

करवीर पीठाचे शंकराचार्य - ‘‘भारतखंडात आंग्ल साम्राज्य येण्यापूर्वी सुमारे दहा शतकांचा काल जो गेला त्यात चातुर्वर्ण्याचा ऱ्हास अनेक कारणांनी झाला हे इतिहासावरून स्पष्ट झाले आहे. हा काल विशेष करून क्षत्रिय जातीला व धनिक जातींना फार आपत्तिकारक गेल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी निरनिराळे धंदे करावे लागले. त्यांची धर्मबंधने शिथिल होऊन धार्मिक संस्कार नामशेष होत चालले. कालांतराने त्यांच्या मूळच्या खऱ्या स्थानाची ओळखही बुजत जाऊन अखेर स्वीकृत धंद्यांची नावेच त्या त्या जातींना रूढ झाली. ब्राह्मणवर्ग त्यांना त्यांच्या संस्कारहीनतेमुळे शूद्रासम मानू लागला. शंकराचार्य संस्थानाचे शिष्यवृत्त क्षत्रिय व वैश्य है पूर्ण प्राचीन परंपरेने अंगभूत असून ते आज विद्यमान असे दाखले मिळतात. त्यामुळे हल्ली क्षत्रिय व वैश्य वर्ण नाहीत या भ्रामक मतांचा निरास होऊन वैदिक मतानुयायी समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था पूर्ववत रूढ होऊन संस्थानच्या ऐक्याची व सुखाची अभिवृद्धी होईल असा पूर्ण विश्वास वाटतो.’’

हे तीन अभिप्राय तीन भिन्न क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींचे आहेत. पहिले दोन कौतुकपूर्ण तर तिसरा fundamentalist स्वरूपाचा म्हणता येईल असा. शंकराचार्यांचा अभिप्राय – पहिला अर्धा भाग म्हणजे लेखकाच्या लिखाणाचा गोषवारा आहे असे म्हणता येईल. मात्र लेखकाचा सारा खटाटोप करण्याची भूमिका त्यांना स्वतःला हलक्या जातीचे – गवंडी, सुतार इत्यादी -समजणाऱ्यांनी ते मूळचे क्षत्रिय आहेत हे जाणून त्या ‘उच्च’ वर्णाला साजेसे स्थान पुन्हा मिळण्यासाठी विद्याध्ययन करावे हे प्रतिपादन करणारी आहे. ‘क्षत्रिय’ हे कळत नकळत वर्णव्यवस्थेत उच्चवर्णीय होते हे लेखक मनाशी धरून होते हेही तितकेच खरे.

प्रस्तावनेत लेखकांनी ते फारसे शिक्षित नाहीत असे म्हटले आहे, परंतु ग्रंथकर्त्याचे कुलवृत्त शार्दुल विक्रिडित वृत्तांत दिले आहे. त्यातील काही भाग :

मद्वंशी अजमीर पीठ पहिले वस्तीस जे शोभले
जेथे सांभरहून गाव अमुचे आम्हास लाभे भले
तेथोनी पाहूनी वरी आले तिथे पूर्वज
होते सोनगडी करून वसती ऐकोनी ठावे मज...
पूर्वीसुद्धा सूर्यवंश कुलही चौहान नामे असे
जाती क्षत्रिय शौर्य धैर्य असूनि आंगी क्षमाही असे
नावाने रजपूत लोक म्हणती देशानुसारे जनी

शंभराहून अधिक वर्षांपूर्वी जेव्हा दळणवळणाची – लेखनाची – संपर्क साधण्याची व वाचनाची साधने फार तुटपुंजी होती तेव्हा, पदरमोड करून स्वतःच्या जातीचा शोध घेण्याच्या या वृत्तीचे/धाडसाचे/चिकाटीचे कौतुक वाटते. लेखकाची जात हलकी नाही तर ते क्षत्रिय वर्णाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी एखाद्याने एवढे पैसे/एवढा वेळ खर्च करावे हे जात कशी मूलभूत प्रेरणांपैकी आहे ते दर्शवते.

गंमत म्हणजे वर्तमान काळातही कुलवृत्तांत प्रसिद्ध होतात आणि कुल-सदस्यांची स्नेहसंमेलने भरतात. म्हणजे एकीकडे आम्ही जातपात मानत नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे एकाच आडनावाच्या कुटुंबांची संमेलने भरवून कळत-नकळत स्वतःच्या श्रेष्ठत्वाची भावना जोपासायची. हे शंभर वर्षानंतरही चालू का राहते?

सगळ्यात महत्त्वाचे आहे की बैताडे यांनी मांडलेल्या सिद्धांताची फेरतपासणी कोणी केली की नाही? समजा, बैताडे यांनी जे प्रतिपादन केले त्याला पुष्टी मिळत असेल तर आज अनेक व्यावसायिक आडनावे अनुसुचित जमातींमध्ये समाविष्ट केली गेलेली दिसतात ती तेथून काढून टाकावी का? आणि तसे झाले तर त्यांना मिळालेल्या सवलतींचे काय करायचे ? आणि मराठे व रजपूत, दोन्ही क्षत्रिय असतील तर मराठ्यांची आरक्षणाची मागणी कितपत ग्राह्य ?

या पुस्तकातील सिद्धांतांचे पुनर्मूल्यांकन निश्चित व्हायला हवे.

- मुकुन्द वझे

लेखी अभिप्राय

अतिशय चांगला लेख

श्यामसुंदर मिरजकर07/01/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.