नईमभाई पठाण - पुरातन वस्तूंचे संग्राहक


नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला. ते त्यांचे घड्याळदुरुस्ती व विक्री हे परंपरागत दुकान सांभाळून आजुबाजूच्या गावातून, शहरांतून फेरफटका मारतात. तेथील जुने बाजार धुंडाळतात. दुर्मीळ, अनोख्या वस्तूंचा त्यांचा संग्रह पाहण्याजोगा आहे. ते त्या बाबतीत त्यांच्या बाबांच्या म्हणजे शब्बीर खान पठाण यांच्या तालमीत तयार झाले आहेत.  नईमभाई वागायला नम्र व गोड आहेत; समोरच्याला आपलेसे करणारे आहेत. त्यांचे सर्व कुटुंबच अगत्यशील व आतिथ्यशील आहे.

नईमभाई स्वतः निष्णात घड्याळजी असल्यामुळे, त्यांनी जुनी पण वैशिष्ट्यपूर्ण अशी तब्बल तीनशे घड्याळे जमा केली आहेत आणि मजा म्हणजे त्यांनी त्यांतील बहुतांश घड्याळे चालू स्थितीत ठेवली आहेत. त्या घड्याळांपैकी पन्नास भिंतीवरची असून त्यांतील दहा घड्याळे तर दुर्मीळातील दुर्मीळ अशी आहेत. जपानमेड फोल्डिंग घड्याळे, चांदीचा लंबक असणारे, चिनी मातीचे व सेकंदकाटा खालच्या बाजूला असलेले, देशोदेशीची अशी अद्भुत घड्याळे नईमभाई यांच्या संग्रहामध्ये आहेत. पान खाण्याचे डबे वेगवेगळ्या आकारातील चार आहेत. त्यांतील दोन तर मोटारीच्या आकाराचे पितळी आहेत. नऊ विविध आकारांतील अडकित्ते आहेत. त्यांतील सर्वात छोटा पितळी अडकित्ता फक्त दीड इंचाचा आहे. त्याला खाच असून त्यात लोखंडाचे धार लावलेले पाते बसवले आहे. नऊ आगळीवेगळी कुलुपे, बॉक्स कॅमेरे, जुनी वजने, भिंगे, ट्यूबलेव्हल, सिगरेट केसेस अशा विविध वस्तू आहेत. त्यांपैकी एक 1950 सालचे छोटे शिलाई-मशिन आहे. तंबाखू पाईपचे तर अनेक प्रकार! त्यांत एक आहे चक्क घडी घालून ठेवता येईल असा चांदीचा पाईप, 1912 सालचा रेझर, अनेक आकारांतील चाकू! एका चाकूत तर सतरा विविध कामांकरता उपयोगी पडणारी आयुधे आहेत. त्याशिवाय तीनशे जुन्या गाण्यांच्या व वाद्यसंगीताच्या तबकड्या म्हणजे रेकॉर्ड्स आहेत. जुन्या काळातील तब्बल एक हजार नाणी आहेत. (त्यांतील पंधरा चांदीची आहेत.) अनेक संस्थानिकांची देखील नाणी आहेत. त्यात त्रावणकोर संस्थानाचे अद्भुत नाणे फक्त एक सेंटिमीटर व्यासाचे आहे. नाण्यांप्रमाणे साठ देशांच्या चलनी नोटा आहेत. त्यामध्ये सर्वात जुनी नोट 1832 सालची सौदी रियालची आहे. एका बाजूला न छापलेली वेस्ट आफ्रिकन नोट 1941 सालातील आहे. या नाणी-नोटांच्या बहुमोल खजिन्याप्रमाणे त्यांच्याकडे पोस्टाच्या स्टॅम्पचाही प्रचंड संग्रह आहे. पोस्टल स्टॅम्पमध्ये वेळोवेळी होणारे बदल हा नईमभाईंचा आवडता विषय. त्यामुळे त्यांनी तीन हजारांपेक्षा जास्त स्टॅम्प जमा केले आहेत. त्यामध्ये 1892 सालापासून निघालेले, देशीविदेशी, ब्रिटिशकालीन, संस्थानिकांचे, भारत सरकारचे असे नानाविध रंगाचे, विषयांचे, ठिकाणांचे, पशुपक्ष्यांचे, धातूंची नक्षी असलेले स्टॅम्प तर आहेतच, पण त्याचसोबत ‘भारतरत्न’ हा किताब मिळवणा-या थोर व्यक्तींचे, तसेच विविध नृत्यप्रकार दाखवणारे, मिंटवाले म्हणजे न वापरलेले व युझ्ड म्हणजे पोस्टाचा शिक्का मारलेले स्टॅम्प व जुने रेव्हेन्यू स्टॅम्प, 1892 सालची शेअर्स सर्टिफिकेटस... अबब, नईमभाईंकडील स्टॅम्पचा तो खजिना बघून डोळे दिपतात. तशा नानाविध वस्तूंचा संग्रह करायचा म्हणजे घरच्यांचे पाठबळ लागतेच, त्याकामी त्याचे बंधू असिफ व रियाझ, तसेच, वडिल शब्बीर खान हे सुद्धा मदतीस येतात. नईमभाईंच्या मुलानेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चारशे विविधरंगी काडेपेट्या (मॅचबॉक्सेस) जमवल्या आहेत. नईमभाई यांच्या वडिलांनी त्यांच्या पणजोबांपासूनच्या रक्तचंदनाच्या बाहुल्या व हत्ती जपून ठेवलेले आहेत.

वडिल शब्बीर खान स्वतः पशु-पक्षी प्रेमी आहेत. त्यांच्याकडे नानारंगी लव्हबर्ड्स आहेत. शब्बीर खान जखमी पशु-पक्ष्यांवर उपचारही करतात. त्यांची काळजी घेतात. त्यांचा तो गुण त्यांचे दुसरे पुत्र रियाझभाई यांच्याकडे आला आहे. रियाझभाईंच्या आऊटहाऊसमधील ‘बौना’ जातीचा, पूर्ण वाढ झालेला घोडा तर फक्त अडीच ते तीन फुटाचा आहे. घोड्याची ती जात अगदी दुर्मीळ आहे व एक देवगायही (पूर्ण वाढ झालेली) तीन फूट उंचीची आहे. त्यांच्याकडील बक-याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बेंटेन जातीच्या त्या बक-यांच्या डोक्यावर माणसासारखे केस आहेत व त्याचा भांग पाडता येतो! काही बक-यांचे कान सुरळीसारखे आहेत व त्यांच्या कानातील केसांची जाळी तयार होते. त्यामुळे त्यात किटक जाऊ शकत नाहीत, कान पसरल्यावर ती जाळी सुटते! राजस्थानच्या ‘जमनापरी’ जातीचा एक बोकड हरणासारखा दिसतो. तो पाच फूट उंच आहे. त्याची वाढ अजून चालू असल्याने तो आणखी उंच होईल असे रियाझभाई सांगतात. त्यांनी अनेक जातीचे कुत्रेदेखील पाळलेले आहेत. त्यांच्याकडे सध्या तेवीस जनावरे आहेत.

नईमभाई पठाण 9209410212, naimkhan71.pathan@gmail.com

- प्रमोद शेंडे

लेखी अभिप्राय

खुपच छान बातमी आहे .ग्रंथमित्र नईमसरांच्या वस्तुसंग्रहाची नोंद घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासन व नईम सर यांचे हार्दीक अभिनंदन.

संजय द्वारकाना…15/04/2016

नईमभाई प्रथमतः खूप खूप अभिनंदन. तुमच्‍या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाने आपलेसे केलेच आहे. खूप दुर्मिळ वस्तूंचा आपला खूप मोठा संग्रह आहे. तो केवळ संग्रहच नसून त्या त्या काळच्या इतिहासाची साक्ष आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त खजिना आहे. शासनाने प्रकाशित करून त्याचा व तुमचा देखील मोठा सन्मान केलेला आहे. त्याबद्दल शासनाचे मनापासून आभार. तसेच तुमच्या या कार्याने व्यक्तीशः तुमचेच नव्हे तर आपल्या गावाचे व तालुक्याचे नाव जगात गेले आहे. तुमचा मित्र असल्याचा खूप खूप आभिमान वाटतो. तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.

उद्धव वामनराव …15/04/2016

mala abhiman ahe mi Naim sirancha mitra ahe.

Suresh Vitthal Mali22/04/2016

नईमखान पठाण यांचं नाव 'पुरातन वस्तू संग्राहक ' म्हणून अनेक वर्षांपासून जोडलं गेलं आहे. खरं तर त्यांचं घर हेच एक पुरातन वस्तू संग्रहालय आहे. पुरातन वस्तुंचा दुर्मिळ ठेवा अन् चालती बोलती मनात घर करून राहणारी साधीभोळी माणसं इथं पाहायला मिळतात. नईमभाईंनी जीवाचं रान करून दुर्मिळ वस्तू मिळविल्या आहेत, जोपासल्या आहेत. माणसं जोडण्याची कला ही सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. अनेक चांगल्या वस्तू आणि व्यक्ती त्यांनी मिळविल्या आहेत. जोडल्या आहेत. नईमखान ही व्यक्ती खरं तर एक तेजस्वी हिराच आहे. त्याच्या जितकं जवळ जावं तितके अगणित पैलू पाहायला मिळतात. त्याच्या समवेत राहणं म्हणजे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा यात हरवून जाणं. इतका आपुलकीनं वागणारा माणूस कदाचित आपल्याही पाहण्यात नसेल. नईमभाईंनी जोपासलेला हा छंद मनापासून दाद द्यावा असाच आहे. माणसानं छंद जोपासावा आणि तो जोपसताना जीवाचं रान करावं हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. नईमभाई, खरं तर तुमचं नाव खुप दुरवर गेलं आहे. 'थिंक महाराष्ट्र'च्या माध्यमातून ते अधिक दुरवर पोहोचलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मित्रा,असाच मोठे हो... तुझ्या हातात आभाळ आहेच... अजुन झेप घे... झेपावत रहा...

दत्तात्रेय मोह…09/05/2016

Wow.... He collection mala hi baghayala awdel

Suraj mokal 10/05/2016

खुप छान संग्रह आहे..पोस्ट स्टँपस् मध्ये खुप विशेष संग्रहीत स्टँप आहेत. मी ही नक्की तुमच्या सारखाच संग्रह करु इच्छित आहे. आपले अनमोल मार्गदर्शन व आशीर्वाद नेहमीच राहू द्या.. :-)

निकेतन रमेश ठाकूर 17/05/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.