आर.के. लक्ष्मण - राजकीय व्यंगचित्रकलेचे शिखर

प्रतिनिधी 08/01/2016

माझी व आर.के. लक्ष्मण यांची भेट १९९० ते २०११ या वीस वर्षांत निमित्ता निमित्ताने तीन-चार वेळा झाली, तरी आमची मैत्री होऊ शकली नाही. कारण ते अंतर्मुख स्वभावाचे होते. त्यांना स्वत:च्या कोशात राहणे आवडे. त्यामुळे त्यांना जवळचे मित्र वगैरे नव्हते; पण त्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र खरी, की ते कलाकार होते, हाडाचे व्यंगचित्रकार होते. त्यांचा कुंचला जेवढा प्रभावी होता, तितकीच त्यांची लेखणीही परिणामकारक होती. उत्तम चित्र आणि चपखल शब्दयोजना सर्वांनाच जमत नाही. लक्ष्मण यांच्याकडे त्या दोन्ही कला तितक्याच तोलामोलाने नांदत होत्या.

शंकर हे जुन्या पिढीतील व्यंगचित्रकार ‘हिंदुस्थान टाइम्स’ या दैनिकात राजकीय व्यंगचित्रे काढत असत, ती लोकप्रियही होती. भारतीय वृत्तपत्रीय क्षेत्रात राजकीय व्यंगचित्रकलेचे जनक म्हणून शंकर यांच्याकडे पाहिले जाते. अबू अब्राहम यांची व्यंगचित्रेही प्रभावी होती; पण लक्ष्मण यांच्याप्रमाणे चित्र आणि शब्द या दोन्ही अस्त्रांवर त्यांची हुकूमत नव्हती. त्यामुळेच लक्ष्मण यांचे नाव झाले. लक्ष्मण यांनी व्यंगचित्रकलेच्या प्रांतात राजकीय व्यंगचित्रे या नव्या शाखेला उत्तम दिशा देण्याचे काम केले. लक्ष्मण यांच्यापूर्वी तशी व्यंगचित्रे अधुनमधून येत असत, ती कोणत्याही पानावर येत आणि ती मोठी म्हणजे दोन-तीन-चार स्तंभी असत. लक्ष्मण यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ‘पॉकेट कार्टून’ (एक स्तंभी आणि सहा सेंमी) आकाराची राजकीय व्यंगचित्रे काढण्यास प्रारंभ केला. ती दररोज येऊ लागली आणि मुख्य म्हणजे त्यांच्या व्यंगचित्रांना नेहमी पहिल्या पानावर स्थान मिळाले! त्यांच्या या लोकप्रियतेमुळे भारतातील सर्व वृत्तपत्रांत पहिल्या पानावर व्यंगचित्रकार विराजमान झाले. ‘यू सेड इट’ या नावाने येणारी ती व्यंगचित्रे अतिशय मार्मिक असत. समकालीन घटनांवर ती लगेच भाष्य करत. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'काय म्हणालात?' किंवा 'काय म्हणता ?' अशा भाषांतरित स्वरूपात ती येत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वाचकवर्गाला लक्ष्मण हे नाव आणि व्यंगचित्रे परिचित असत; आणि त्यांतील आशयामुळे त्याला ती त्याची वाटली. त्यांचा कॉमन मॅन त्याचे प्रतिबिंब वाटला. म्हणूनच आर.के. लक्ष्मण आणि बाळ ठाकरे हे दोघेही मराठी माणसाचे आवडते व्यंगचित्रकार होते, विशेष म्हणजे त्या दोघांचे प्रेरणास्थान ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो हेच होते.

आर.के. लक्ष्मण यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. चौफेर निरीक्षणशक्ती आणि संवेदनशीलता ही त्यांची वृत्ती असल्याने त्यांची चित्रे जनमानसाचे प्रतिबिंब ठरली. त्यामुळेच ती लोकप्रियही झाली. मात्र लक्ष्मण यांना भारताच्या समृद्ध लोकशाहीतून सर्वसामान्य माणसाचे अन्न, वस्त्र आणि निवारा हे मूलभूत प्रश्न सुटले गेले नाहीत याचे दु:ख वाटत होते. त्यांच्या अनेक व्यंगचित्रांचे विषय तेच आहेत. उदाहरणादाखल 'मी उपोषण करणारा नाही हो! मी खरोखरच उपाशी आहे,' असे म्हणणारा, रस्त्यावर राहणारा गरीब हडकुळा माणूस, किंवा कापडाच्या प्रकाराविषयी जागृत असणाऱ्या मध्यमवर्गीयांचा उपहास करणारा - 'माझ्या अंगावरचा कपडा तीस टक्के सुती आहे तर सत्तर टक्के माझे शरीरच आहे,' असा दोन भिकाऱ्यांतील संवाद, किंवा ड्रेनेजच्या पाइपमध्ये राहणाऱ्या' भिकाऱ्याचे 'मी येथे लपलेलो नाही; मी येथेच राहतो' असे पोलिसाला सांगणे; अशा हृदयस्पर्शी व्यंगचित्रांमुळे सामान्य माणसाला आर.के. लक्ष्मण हे त्याचे प्रतिनिधी आहेत असे न वाटले तरच नवल!

राजकीय व्यंगचित्र हे माध्यम हाताळताना कलाकाराला त्याच्या भवतालाविषयी सूक्ष्म निरीक्षणे नोंदवावी लागतात, संवेदनशीलतेने त्या परिस्थितीवर भाष्य करावे लागते, तरल विनोदबुद्धीचा आविष्कार करावा लागतो आणि ते सारे चित्राच्या अमूर्त भाषेतून सांगावे लागते. तशा क्षमतेमुळे एक व्यंगचित्र एका लेखालाही परिणामाच्या दृष्टीने भारी पडू शकते. लेख संपूर्ण वाचल्याखेरीज त्यातील भाष्य कळत नाही; पण व्यंगचित्रावर नुसती नजर टाकली तरी त्यातील आशय मनाला भिडतो. राजकीय व्यंगचित्रे तर त्यासाठी खूपच तयारीची असावी लागतात. लक्ष्मण यांनी त्यामध्ये त्यांची स्वतंत्र वाट तयार केली - जी वाट पुढील काळात अनेक कलाकारांना प्रेरक ठरत आहे.

राजकीय व्यंगचित्रांना मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळे लोकशाही रुजण्यास मदत होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला समाजजीवनात महत्त्वाचे स्थान मिळते. उपहास आणि विडंबन ही हत्यारे व्यंगचित्रकार वापरतो. या चित्रांचे भय सत्याला नसते, तर ढोंगबाजीला आणि हुकूमशाहीला असते. विडंबनामुळे मौलिक विचार कधीही नष्ट होत नाहीत, उलट, ते उजळतात, अशा विचारांवर श्रद्धा असणारा एक प्रामाणिक, सिद्धहस्त चित्रकार आपल्यात नाही. त्याला ही भावपूर्ण श्रद्धांजली!

(शि.द. फडणीस शब्दांकन - आनन्द काटीकर)

लेखी अभिप्राय

फारच सुंदर लेख. अतिशय सुंदर तऱ्हेने आर. के. लक्ष्मण ह्यांच्या व्यंगचित्रकलेचा आढावा घेतला आहे.

मनोहर जांबोटकर…28/01/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.