राजू दाभाडे - जागतिक दर्जाच्‍या रोल बॉल खेळाचे जनक


भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकी ओळखला जातो. परंतु भारतीयांचा आवडता खेळ कोणता म्हटले तर क्रिकेट असे सहज सांगितले जाते. शिवाय बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, फूटबॉल आदी कोणतेही खेळ म्हटले तरी ते सगळेच मूलत: परदेशात जन्मलेले खेळ आहेत. पण आपला असा, आपल्या मातीतला असा कोणता खेळ का नाही, जो जगात पोचेल, त्याचाही वर्ल्ड कप होईल, त्या खेळालाही जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त होऊन ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश होईल... हे स्वप्न बघितले पुण्यातील एका शाळेचे क्रिडा शिक्षक राजू दाभाडे यांनी. स्वप्न आभाळाएवढे मोठे होते. पंखात तेवढे बळ आहे का? असा तोकडा विचारही न करता दाभाडे यांना त्याच स्वप्नाने पछाडले. आता ते केवळ स्वप्न उरलेले नसून त्या रोलबॉल खेळाचा तिसरा वर्ल्डकप पुण्यात 14 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार असून त्यात जगातील पन्नास देश सहभागी होणार आहेत.

हे गगनचुंबी स्वप्न बघणारे आणि सत्यात उतरवणारे दाभाडे आहेत तरी कोण? एका पेपर विक्रेत्यापासून ते एका जागतिक पातळीवर खेळाचा व संस्थेचा संशोधक असा वेगवेगळ्या टप्प्यातील आणि भारावलेला कष्टपूर्ण प्रवास हीच राजू दाभाडे यांची जीवन कहाणी आहे. त्या प्रवासात अनेक उतार-चढाव, वळणं त्यांनी अनुभवले. काहीनवे मित्र झाले तर काहींचे खरे रूपही समोर आले. परंतु जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी हे शिवधनुष्य एकट्याच्या खांद्यावर पेलण्याचा निश्चय केला. नंतर हळुहळू मदतीचे काही हातही पुढे सरसावले. दाभाडे हे पुण्यातील मुळशी तालुक्यातील एका छोट्याशा गावातील आहेत. घरची जबाबदारी आणि बेताचीच आर्थिक परिस्थिती. त्यामुळे स्वत:चे तसेच भावंडांच्या शिक्षणासाठी त्यांना लहानपणापासूनच काम करावे लागले. गावात त्यांनी कधी पेपर विक्री केली तर काहीकाळ भाडोत्री रिक्षा चालक म्हणूनही काम केले. त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती ‘सर्टिफि’केट ऑ’फ फि’जिकल एज्युकेशन 1985 (सीपीइडी) मि’ळाल्यानंतर. त्यानंतर त्यांनी बीए व बीएडचे शिक्षण पूर्ण केले.

रोल बॉल खेळाविषयीची कल्पना त्यांना 2001 मध्ये सुचली आणि नंतर तिचे स्वप्नात रूपांतर झाले. स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले आणि नेमका खेळ काय असावा त्याची विचार प्रकिया सुरू झाली. तसे बघितले तर कबड्डी, खो-खो यांसारखे भारतीय खेळ आहेत. परंतु ते जागतिक पातळीवर पोचलेले नाहीत. मग जगातही पोचायचे आणि तेथे लोकप्रियही व्हायचे, मग असे काय साधन असावे असा विचार करता स्केटस् आणि बॉल यांची निवड दाभाडे यांनी केली. ते म्हणाले, “मला स्वत:ला स्केटिंग फार आवडते. लहानपणी एकाला रस्त्याने स्केटींग करताना बघितले. फार कुतूहल वाटले. आपणही तसेच करूया अशी इच्छा जागी झाली. मग त्यावेळी प्रयत्नपूर्वक स्केटींग मिळवले. नंतर स्वत:च शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. कधी काठ्या घेऊन, कधी मित्राचे हात धरून तर कधी त्यांच्या सायकलीला मागे पकडून स्केटींग करायला शिकलो. मला स्केटींग, अॅथॅलॅटीक चांगले येते, क्रि‘डा शिक्षक असल्याने अनेक खेळांचेही ज्ञान आणि आवड होतीच. त्यातूनच बास्केट बॉल, हॉकी, हँड बॉल आणि स्केटींग यांचे काही नियम व पद्धती यांची योग्य ती सांगड घालून ‘रोल बॉल’ या भारतीय, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाचा जन्म झाला. जगातील हा असा एकमेव खेळ आहे जो केवळ आठ वर्षांच्या कालावधीत वर्ल्ड कपच्या स्तराला पोचला आहे, असेही दाभाडे मोठ्या अभिमानाने सांगतात.

दाभाडे यांना या खेळाची निर्मिती, संशोधन आणि नियम तयार करायला सुमारे दोन वर्षे लागले. त्यानंतर त्यांनी तो खेळ त्यांच्या सहका-यांना आणि अन्य क्रिडा शिक्षकांना दाखवण्यासाठी प्रथम स्वत:च्या शाळेत सुरू केला. तोल सांभाळणे, निग्रह आणि सहनशक्ती व वेग ही खेळाची सूत्रे आहेत. खेळ 15 बाय 28 मीटरच्या बास्केटबॉल कोर्टमध्ये खेळला जातो. त्यातील बॉल बास्केट बॉल सारखाच वापरला जातो, परंतु खेळाडू स्केटींग करत तो खेळतात. गोल पोस्टस एकाच बाजूला असते. ते खेळाच्या ज्युनिअर आणि सिनीअर लेव्हल्सनुसार अॅडजस्ट केले जाते. संघामध्ये एकूण दहा खेळाडू असतात. त्यातील सहा प्रत्यक्ष फिल्डवर असतात आणि चार राखीव खेळाडू असतात. रोलबॉल हा मुक्तपणे विस्तारित जाणारा खेळ आहे. त्यासाठी खूप स्टॅमिना आणि कसब असण्याची आवश्यकता असते. त्या खेळासाठी स्टॅपर्स नसलेले रोलर स्केटस्, सेफ्टी हेल्मेट, नी पॅड, उत्तम प्रतीचे बूट या साहित्याची आवश्यकता असते.

दाभाडे यांनी त्यांच्या मित्र मंडळी व सहका-यांच्या मदतीने ‘रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ आणि ‘द इंटरनॅशनल रोल बॉल फेडरेशन इन पुणे’ यांची नवीन खेळांना देशात व परदेशात प्रोत्साहन देण्यासाठी स्थापना केली. डिसेंबर 14 ते 20 दरम्यान होणा-या तिस-या रोल बॉल वर्ल्ड कपसाठी बेल्जियम, इटली, फ्रान्स, डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन, साऊथ अफिका, केनिया, टांझानिया, घाना आणि युगांडा सारख्या पस्तीस देशांचा प्रवेश झालेला असून अजून देश येत आहेत, अशी माहिती दाभाडे यांनी दिली. खेळाचा तिसरा वर्ल्डकप भरवला जात आहे, त्यात सुमारे पन्नास देश सहभागी होणार असल्याचे दिसत आहे. परंतु अद्याप या भारतीय खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून मात्र काहीही पाठबळ मिळालेले नाही. परंतु सुदर्शन केमिकल्स, जैन इरिगेशन आणि काही उद्योजकांनी वैयक्तीक स्तरावर त्या कामासाठी मदतीचे हात पुढे केले.

पहिला रोल बॉल वर्ल्डकप 2011 मध्ये पुण्यात झाला होता. त्यात सोळा देश सहभागी झाले होते. दर दोन वर्षांनी होणा-या वर्ल्डकपचे दुस-या वर्षाचे यजमान केनिया सरकार होते. तो वर्ल्डकप 2013 मध्ये नॉर्वेमध्ये झाला. त्यात पंचवीस देश सहभागी झाले होते. पहिल्या वर्ल्डकपचे विजेतेपद डेन्मार्कच्या संघाने पटकावले. त्यात भारतीय संघ द्वितीय स्थानावर होता. परंतु दुस-या वर्ल्डकप मध्ये भारताचे पुरूष संघ व महिला संघच विजेतापदाचे मानकरी ठरले. त्यात इराण आणि केनिया द्वितीय तर डेन्मार्क आणि नेपाळ हे तृतीय स्थानावर होते.

'रोल बॉल' सर्वप्रथम दिल्लीच्या स्पोर्टस् अॅरथोरीटी ऑफ इंडीया (एसएआय) यांच्या अधिकारी मंडळासमोर 2 फेब्रुवारी 2003 रोजी सादर करण्यात आला. त्यावेळी मुलींचा संघ व मुलांचा संघ स्वतंत्ररीत्या पस्तीस मिनीटे त्यांच्यासमोर खेळला. त्यानंतर मंडळाने त्या खेळाला मान्यता दिली. त्यावेळी त्या खेळात जागतिक खेळ होण्याची क्षमता असल्याचा शेराही त्या मंडळाने दिल्याचे दाभाडे यांनी सांगितले. त्यानंतर 2007 मध्ये मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सचीही मान्यता मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर दाभाडे यांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कार्यक्रम आखून संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा आयोजित केल्या. त्यासाठी त्यांनी अनेक शाळा व महाविद्यालयांत कार्यशाळा, चर्चासत्रांद्वारे खेळाचे प्रशिक्षक तयार केले.

त्यापूर्वी 2003 च्या सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्राबाहेरही खेळाची ओळख करून देण्यास सुरूवात केली होती. त्यांनी गोव्यात खेळाची ओळख करून दिली होती आणि आता तो तेथील लोकप्रिय खेळ झाला आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, चंदीगड, हरीयाणा, जम्मू-काश्मिर अशा ब-याच प्रदेशांत खेळाचा प्रचार-प्रसार केला. दाभाडे दिवाळीच्या सुट्टीचे पंधरा दिवस आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे पंचेचाळीस दिवस पूर्णपणे त्या खेळाच्या कार्यशाळा घेण्यासाठी आणि देशभरात प्रशिक्षक तयार करण्यात मग्न असतात.

त्यांनी 2005 मध्ये पाकिस्तानशी या खेळा संदर्भात संपर्क साधला होता. त्यानंतर पहिली भारत-पाक पाच दिवसीय जागतिक रोल बॉल स्पर्धा पुण्याच्या महेश विद्यालयात जानेवारी 2005 मध्ये झाली. त्यासाठी त्यांच्या शाळेच्या पालक संघटनेने तसेच काही उद्योजकांनी त्यांना मदत केल्याचे ते विनम्रपणे सांगतात. त्याचप्रमाणे 2004मध्ये दाभाडे श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, नेपाळ, बांग्लादेश या ठिकाणी खेळाची ओळख करून देण्यासाठी व प्रशिक्षक घडवण्यासाठी गेले होते. त्‍यांनी त्यावेळी अनेक शाळा व महाविद्यालयांत फिरून सीडी व माहितीपत्रके वाटली. दुसरी जागतिक रोल बॉल स्पर्धा 2006 मध्ये भारत आणि साऊथ आफ्रि‘केत तर तिसरी मे 2007 मध्ये पुणे आणि जयपूर यांच्यात स्पर्धा रंगली. दरम्यान भारत पाकिस्तानमध्येही स्पर्धा झाली. त्या सर्व स्पर्धा पुण्यात घेण्यात आल्या.

रोल बॉल या खेळाला जगातून मान्यता आणि ओळख मिळू लागल्यावर पहिली आशियायी रोल बॉल स्पर्धा जुलै 2010 मध्ये हाँगकाँगला झाली. त्यानंतर 2013 मध्ये आफ्रिकन रोल बॉल स्पर्धा झाली. 2014 मध्ये आफ्रिका-एशियन स्पर्धा युगांडा येथे झाली. दाभाडे म्हणतात, आम्हाला विश्वास आहे, की 2024 पर्यंत ऑलिम्पिकमध्ये पोचणारा भारतात जन्माला आलेला रोल बॉल हा असा एकमेव खेळ असेल.

राजू दाभाडे - 9423576777

- धनश्री भावसार

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.