श्री विठूरायाचे पंढरपूर

प्रतिनिधी 16/10/2015

पंढरपूर हे दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्र, महाराष्ट्रात पंढरपूरचा पांडुरंग हे प्रसिद्ध व पूज्य देवस्थान आहे. सर्व देवस्थानात प्राचीन देवस्थान आहे. त्याला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर, फागनीपूर, पौंडरिक क्षेत्र, पंडरंग, पांडरंग पल्ली अशी विविध नावे आहेत. संतजन या क्षेत्राचा भूवैकुंठ किंवा दक्षिणकाशी म्हणून उल्लेख करतात. क्षेत्र भीमा (भिवरा) नदीच्या तिरावर वसलेले आहे. ती नदी त्या ठिकाणी अर्धचंद्राकृती वाहते, म्हणून तिला चंद्रभागा असे नाव मिळाले आहे. पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचे, भागवत धर्माचे आद्यपीठ मानतात.

 

आधी रचिती पंढरी । मग वैकुंठ नगरी ।
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ।
चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥

असा पंढरीचा उल्लेख संतसाहित्यात आला आहे. चंद्रभागेच्या काठावर वसलेली पंढरी! भक्तीचे पीठ, अध्यात्माची राजधानी! सा-या मानवजातीच्या समतेचा संदेश देणारी ही नगरी अलौकिक, अद्वितीय अशाच पार्श्वभूमीवर उभी आहे.

विठोबा कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहे. वर्षभरात एक कोटीपेक्षा जास्त लोक पंढरपूरला भेट देतात. चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघी अशा चार यात्रा पंढरपुरात भरतात. आषाढी यात्रेस सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरास दाखल होतात व आषाढी पौर्णिमेचा गोपालकाला झाल्यावर त्या परत मार्गस्थ होतात.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वास्तुशिल्पाचा अद्भुत नमुना आहे. पंढरपूर शहराच्या मध्यभागी टेकडीवर बांधलेल्या त्या मंदिराची लांबी साडेतीनशे फूट व रुंदी एकशेसत्तर फूट इतकी आहे. मंदिराला आठ दरवाजे आहेत. पूर्वद्वाराला महाद्वार अथवा नामदेव दरवाजा असे म्हणतात. दरवाज्यात पहिल्या पायरीला संत नामदेवांनी समाधी घेतली. जवळच, संत श्री चोखोबांची समाधी आहे. विठ्ठल मंदिरातील गर्भागाराची दर्शनी भिंत चांदीच्या पत्र्याने मढवलेली आहे. कमानीच्या पुढे गर्भागाराचा दरवाजा आहे. विठ्ठलमूर्ती त्या दरवाज्यातून आत, भिंतीला लागून, रुपेरी प्रभावळीच्या आत, विटेवर उभी आहे. विठ्ठल मंदिराच्या पिछाडीला पूर्वाभिमुख रुक्मिणीची मूर्ती आहे. गाभारा, मध्यगृह, मुख्य मंडप व सभामंडप असे मंदिराचे चार भाग आहेत.

विठोबाचे पंढरपुरातील प्रकटन याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. सर्वश्रुत कथा ‘पुंडलीक’ ह्या मातृभक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरात आला. “आईवडिलांची सेवा करत आहे, ती पूर्ण होईपर्यंत त्या विटेवर थांब.” असे देवाला सांगून पुंडलिकाने त्याच्‍या दिशेने वीट भिरकावली. देव त्याच विटेवर कटी कर ठेऊन उभा राहिला अशी ती पुराणकथा.

पंढरपूर क्षेत्रातील प्रमुख स्थाने, मंदिरे म्हणजे पुंडलिकाचे मंदिर, विष्णुपद, गोपाळपूर, पद्मतीर्थ, दिंडीरवन, व्यास नारायण यात्राविधी व कुंडलतीर्थ. त्याशिवाय इतरही काही मंदिरे आहेत. तेथे एक हजारांपेक्षा जास्त मठ आहेत.

ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, साहित्य, सनदा आणि नाणी यांमधून पंढरपूरचे महत्त्व समजून येते. पंढरपूरची संत परंपरा, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक इतिहास खूप काही सांगून जाणारा आहे. तसेच, पंढरपूरमधील ऐतिहासिक वास्तू, धर्मशाळा, फड, विठ्ठल मंदिर, प्रमुख वा-या व पालख्या इतिहासाचे कथन, स्पष्टीकरण व सूचन करून जातात.

संगीत, लावणी, नाटक, साहित्य, नृत्य, गायन इत्यादी कलांची पंढरीला मोठी परंपरा आहे. पंढरपूर नगरी कलावंतांचे माहेरघर ठरत असले तरी कलावंतांना अनुकूलता मात्र लाभत नाही असा पक्का समज आहे.

पंढरीत श्रीविठ्ठलाच्या दर्शनाखालोखाल श्री संत कैकाडी बाबांच्या मठाचे दर्शनही तितकेच मोलाचे ठरले आहे. तो स्वर्गच भूवैकुंठीचा आहे. त्यात गजानन महाराजांच्या मठाने पंढरीच्या वैभवात भर घातली आहे. तसेच, पंढरीच्या परिवर्तनाचे साक्षीदार म्हणून संत तनपुरे, संत गाडगे महाराज यांच्या मठांची नावे घेतली जातात. पंढरीचा विठोबा कोणा एकाचा नाही, तो सर्वांभूती आहे.

- मनिषा शैलेश माने, पंढरपूर

 

लेखी अभिप्राय

'थिंक महाराष्ट्र'च्या माध्यमातून खूप छान माहिती मिळते. मी आपला आभारी आहे.

महेश अरुण भांगे17/10/2015

कृपया तरुण लेखांची येथील संख्या वाढवा.

संकेत अहंकारी26/11/2015

किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात.

लेखकाचा दूरध्वनी

9029557767

संकेत अहंकारी, तुमची प्रतिक्रिया अधिक स्‍पष्‍ट करून सांगाल काय? धन्‍यवाद.

किरण क्षीरसागर26/11/2015

अगदी सुंदर देवस्थान मन भरून जाते

संतोष सखाराम द…13/03/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.