आग्रह मराठी भाषेच्‍या शुद्धतेचा!

प्रतिनिधी 28/09/2015

शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्‍या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला आहे. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्‍यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे.

शंकर बो-हाडे मराठी मुलांना मराठी शिकवत असताना विद्यार्थ्‍यांच्‍या भाषेविषयी, शुद्धलेखनाविषयी जागरूक असतात. त्‍यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्‍या विद्यार्थ्‍याने 'अशुद्ध' मराठीत लिहिलेले वहीचे एक पान  फेसबुकवर टाकले. त्‍याखाली त्‍यांनी प्रतिक्रिया देताना त्‍या पिढीच्या विद्यार्थ्‍यांबद्दल आणि त्यांच्‍या भाषेबद्दल चिंता व्‍यक्‍त केली आहे. त्‍यावर बो-हाडे यांच्‍या भाषेबाबतच्‍या विचारांचे समर्थन करणा-या व अशा परिस्थितीला जबाबदार असणा-या गोष्‍टींकडे निर्देश करणा-या अनेक 'कमेंट' आल्‍या. पण सध्या 'शोध' या कादंबरीमुळे गाजत असलेले कादंबरीकार मुरलीधर खैरनार यांनी बो-हाडे यांच्या व एकूण शुद्धलेखनाबद्दल आग्रही असलेल्या लोकांच्या प्रतिपादनाबद्दल खणखणीत व नि:संदिग्ध भूमिका घेतली. त्यावरून 'फेसबुक' वर मराठी भाषालेखन याबद्दल मतमतांतराचा गदारोळ उठला. खैरनार हे नुकत्‍याच प्रसिद्ध झालेल्‍या 'शोध' या शिवकालिन इतिहासाच्‍या पार्श्‍वभूमीवर लिहिलेल्‍या रहस्‍यमय कादंबरीचे लेखक. त्‍यांना  बो-हाडे यांचा शुद्ध भाषेचा आग्रह पटला नाही. त्यांनी त्‍यावर प्रतिक्रिया देताना  बो-हाडे यांचे म्‍हणणे खोडून तर काढलेच, सोबत, याप्रमाणे भाषेच्‍या शुद्धतेबद्दलचा आग्रह धरण्‍याचा अट्टहास केवळ महाराष्‍ट्रात चालतो, असेही म्हटले. त्‍यांनी त्यांच्‍या 'फेसबुक वॉल'वरही ती प्रतिक्रिया शेअर केली. त्‍यानंतर अनेकांनी त्‍यावर मतप्रदर्शन केले. बहुतांश प्रतिक्रिया या खैरनार यांच्‍या मताला विरोध करणा-या आहेत. मात्र खैरनार यांनी त्यांचे म्‍हणणे योग्‍य असल्‍याचा दावा विविध मुद्दे मांडत केला. 'थिंक महाराष्‍ट्र'ने ती चर्चा मराठी भाषेबाबत काम करणा-या, त्‍याबद्दल जाणीव असलेल्या प्र.ना. परांजपे, दीपक पवार, सदानंद बोरसे, रामदास भटकळ अशा व्‍यक्‍तींच्‍या निदर्शनास आणली. त्‍यावर त्‍यांची मते जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. फेसबुकवर घडलेली ती चर्चा आणि त्‍यावर जाणकांरानी त्‍यांचे विचार व्‍यक्‍त केले ते येथे प्रसिद्ध करत आहोत.

शंकर बो-हाडे - हे माझ्या तृतीय वर्ष बी ए सामान्यस्तर मराठी शिकणा-या विद्यार्थ्याच्या वहीचे पान आहे. शैक्षणिक धोरणे कशी फोल ठरतात, हे स्पष्ट करणारे हे बोलके उदाहरण. माझ्या या मिञाला मातृभाषेतही बिनचूक लिहीता येत नाही. तो मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे. त्याचे अक्षरही धड नाही. तो बी ए ची पद्वी संपादन करणार आहे. त्याला आम्ही पास करुही. बी ए पास होऊनही त्याला शुध्द मराठी लिहीता येत नसेल तर त्या पदवीचा त्याला जीवनात कुठे उपयोग होईल.

मुलाला नापास करावे, असे मला वाटत नाही. पण शिक्षणाचे सपाटीकरण करून आम्ही काय मिळवणार आहोत? प्राथमिक शाळेत त्याची किती आबाळ झाली असेल?

आम्ही किती अपराध करणार आहोत? कधी बदलेल हे सारं?

मला आपले यावर मार्गदर्शन हवे आहे ?

कृपया गंभीरपणे उपाय सुचवा.

मुरलीधर खैरनार - बीए (मराठी) झालेल्या मुलाला शुद्ध मराठी लिहिता आले पाहिजे ही अपेक्षा अवाजवी, अनाठायी, क्रूर आणि अभिजनवादी आहे. जगाच्या पाठीवर साडेतीनशेपेक्षा जास्त देश आहेत, पण शुद्ध भाषा लिहिण्याचा आग्रह जगात अन्यत्र कुठेही नाही. फक्त भारत आणि त्यातही महाराष्ट्र या एकाच देशात शुद्ध भाषेचा हट्टाग्रह चालतो.

१८५०-६० च्या दरम्यान इंग्लंडमधून आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन येणाऱ्या अनेकांचे तत्कालीन हस्तलिखित व छापील लिखाण मी वाचले आहे. त्यात इंग्रजी शुद्धलेखनाचे जे काही तीन तेरा वाजवलेले दिसतात ते पाहिल्यावर असे वाटते की आपल्याकडचे मास्तर लोक त्यांना सातवीत सुद्धा पास करणार नाहीत. पण शुद्धलेखन येत नसल्याने त्यातल्या एकही कलेक्टरचे वा पोलिस प्रमुखाचे काही अडले नाही. त्यांनी व्यवस्थित व उत्तम राज्यकारभार केला.

आजही इंग्लंड-अमेरिकेतले अनेक व्यवसायी / धुरंधर अतिशय चुकीची भाषा लिहित असतात. पण त्याबद्दल कुणाचीच तक्रार नसते.

ज्यांना वर्तमानपत्रे व छापील पुस्तकांच्या उद्योगात 'प्रुफ-रीडर'चा किंवा फारतर संपादक किंवा लेखकाचा व्यवसाय करायचा फक्त तेवढ्या मूठभर लोकांना शुद्ध भाषा लिहिता आली तरी पुरे. बाकीच्यांना शुद्ध भाषा आली पाहिजे हा आग्रह अवास्तव आहे.

बीए झालेल्याला मराठी साहित्य, भाषा यांची कल्पना असली पाहिजे. मराठी भाषेवर प्रभाव गाजवणाऱ्या प्रवाहांची माहिती पाहिजे. ती जर कॉलेज / प्राध्यापक देऊ शकत असतील तर ठीक. पण शुद्ध भाषा लिहिण्याचा आग्रह धरणारी विद्यापीठे / महाविद्यालये/ व प्राध्यापकांवर बहिष्कार टाकायला हवा.

मुरलीधर खैरनार - (अतिशय ठामपणे एका 'कमेंट'वर उत्तर देताना) नाही. उदयजी, शुद्ध भाषा आली तर त्यात वाईट काहीच नाही. पण भाषेची शुद्धता नसेल तर त्या विद्यार्थ्याने काहीतरी घाणेरडा गुन्हा केला आहे अशा नजरेने त्याचेकडे पाहणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. भाषेच्या शुद्धीचा आग्रह हा हिटलरच्या वंशशुद्धीच्या आग्रहापेक्षा तिळमात्रही कमी हिंसक नाही.

एका व्‍यक्‍तीने 'यामुळे अर्थाचा अनर्थ होईल' या स्‍वरुपाची प्रतिक्रिया दिल्‍यानंतर खैरनार म्‍हणतात. - 'अर्थाचा अनर्थ होणे म्हणजे काय? केशवसुतांच्या एखाद्या ओळीचा वेगळा अर्थ लागणे. तसे झाले तर कुणाच्या पोटात का दुखावे? जोवर व्यवहारात लोक एकमेकांना सहज समजून घेतात तोवर शुद्धतेचा आग्रह धरणे हे हिटलरने वंशशुद्धीचा आग्रह धरण्यापेक्षा जराही कम-अस्सल नाही.'

सुहास भुसे - भाषा फक्त संदेशवहनाचे माध्यम आहे. भाव आदान प्रदान झाले की तिचे काम संपले. आधुनिक भाषाशास्त्रात शुद्ध भाषा ही संकल्पना निकालात काढली गेली आहे.

राजेंद्र जोशी - मराठी परिवारातील मराठी विषय घेऊन फर्स्ट क्लास एम.ए. झालेल्या उमेदवाराकडून शुद्ध मराठीची अपेक्षा करू नये का?

कविता महाजन - 'शुद्ध' या शब्दाने झालेले घोळ टाळून आता 'प्रमाण लेखन' हा शब्द वापरला जातो. 'प्रमाण' या शब्दातच प्रमाणलेखनामागील कारण स्पष्ट होते. प्रमाणलेखन ही सवय असली पाहिजे प्रत्येकाची, मग ती व्यक्ती मराठी साहित्याची विद्यार्थी असो-नसो. आणि इतर देशांमध्ये चुकीच्या गोष्टी चालताहेत, म्हणून त्या आपल्याकडेही चालू ठेवाव्यात हा तर्क पूर्णतः चुकीचा आहे.

सुहास भुसे - ज्या भाषा काळानुरूप बदलल्या आहेत (मागणी तसा पुरवठा) त्या टिकून राहिल्या आहेत आणि ज्या भाषांनी त्यांचे व्याकरण अत्यंत काटेकोर बनवले त्या सध्या मृत भाषा म्हणून ओळखल्या जातात. उदा. संस्कृत.

मनुष्‍य मानव - The aim of language is to convince the people and to communicate doesn't matter how your skills in language are..if you succeed in your expected thing to talk with someone then other things are secondary

मुकुंद माधव गाडगिळ - शुद्ध भाषा आली नाही तर अडते असे नाही पण त्याचा अभिमान वाटावा आणि समर्थन करणे पण चूक आहे. आपली भाषा अशुद्ध आहे आणि ती शुद्ध करण्यासाठी आपण काहीही प्रयत्न करत नाही या न्युनगंडातून भाषा अशुद्ध असली तर काही अडत नाही असे समर्थन बाहेर येते. हे म्हणजे सगळ्या गरिबांना श्रीमंत व्हायचे असते, ते जमत नाही म्हणून मग गरिबीचे गोडवे गायले जातात आणि श्रीमंतीची निर्भत्सना केली जाते तसे झाले.

हरिश्‍चंद्र थोरात - भाषा शिकून घ्यावी लागते, आत्मसात करावी लागते, हे पहिले महत्त्वाचे तथ्य आहे. ती नियमांनी आकाराला आलेली असते आणि म्हणूनच ती शिकता येते हे दुसरे तथ्य आहे. कोणत्याही भाषेला तिचे असे व्याकरण असतेच, अगदी बोलीभाषांनाही असते, हे तिसरे तथ्य आहे. परस्परांशी संवाद करायचा असेल तर दोघांना किंवा अनेकांना सामायिक असलेला नियमव्यूह अस्तित्वात असावा लागतोच. हा नियमव्यूह अर्थातच गतिशील असतो आणि तो ऐतिहासिक दृष्टिकोनातून खुला असतो. उपलब्ध नियमव्युहात प्रत्यक्षात बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या अनुषंगाने बदल करणे समजू शकते. पण व्याकरणच नको, लेखनाचे नियमच नकोत ही भूमिका भाषेच्या स्वरूपालाच न्याय देणारी नाही.

भाषा ही चिन्हांची एक व्यवस्था असते. याचा अर्थ एकमेकांपासून भिन्न असलेली अनेक चिन्हे तिच्यात एकत्र येत असतात. या चिन्हांचा परस्परांशी कोणता संबंध असावा याचे भाषक समाजाने निर्माण केलेले नियम असतात. ते वरून लादलेले नसतात. नियमांशिवाय व्यवस्था संभवत नाही. हे नियम नेमके कोणते आहेत हे समजून घेणे हे भाषाविज्ञानाचे काम असते. हे सोस्यूरएवढे जुने आहे.

सुनील कांबळे - करेक्ट. भाषक समाज भाषेला आकार देतो. ती कशी आकारली याच्या अभ्यासातून नियम सापडतात. व्याकरणाची मांडणी त्यावर होते, व्हायला हवी. वापरातली भाषा बदलत जाईल तसतसे व्याकरण बदलते, नियम बदलतात; बदलले पाहिजेत. मुरली खैरनार शुद्ध (म्हणजे व्याकरणशुद्ध असे मी समजतो) लिहिण्या-बोलण्याची अपेक्षा गैर मानतात, त्यात मला गैर दिसत नाही. ते मुद्रितशोधक, लेखक, माध्यमकर्मींना या सवलतीतून वगळताहेत. पण शिक्षक आणि मराठीच्या विद्यार्थांना का वगळत नाहीत, ते कळले नाही. शिकतो ते आले पाहिजेच. केवळ शिकायचा आळस किंवा जमत नाही म्हणून व्याकरण किंवा प्रमाण भाषा नाकारणे पटणारे नाही. प्रमाण भाषेच्या आग्रहाबाबत माझेही काही आक्षेप आहेत. ते मी वेळोवेळी मांडलेले आहेत. पण प्रमाण भाषेवर टीका करणाऱ्यांचा मुख्य आक्षेप 'आम्ही बोलतो तीच प्रमाण भाषा' असा गंड बाळगणाऱ्यांवर असतो, तो रास्त आहे. प्रमाण भाषेतही बदल झाला पाहिजे. पण त्यासाठी तिची गरज नाकारून चालणार नाही. ती अवगत करुनच योग्य प्रकारे बदलता येईल. भाषाशुद्धीचा फुकाचा अभिनिवेश भाषेला मारक ठरतो, तितकाच व्याकरण आणि प्रमाण भाषेला होणारा आडमुठा विरोधही मारकच ठरेल.

सुदाम राठोड - भाषा शुध्द किंवा अशुध्द असत नाही, मात्र तिची लिपी तशी असू शकते.

'थिंक महाराष्‍ट्र'ने मुरलीधर खैरनार आणि शंकर बो-हाडे यांच्‍यामध्‍ये सुरू असलेली ही चर्चा काही जाणकार व्‍यक्‍तींच्‍या निदर्शनास आणल्‍यानंतर त्‍यांनी त्‍यावर पुढील मते व्‍यक्‍त केली -

सदानंद बोरसे (संपादक राजहंस प्रकाशन) - बोली व्यवहारात प्रमाणभाषेच्या चौकटी खूप कडक ठेवल्या नाहीत - थोड्या ढिल्या असतील तरी चालेल, परंतु संचित ज्ञान पुढील पिढीकडे द्यायेच असेल तर प्रमाणभाषेला पर्याय नाही. त्याचबरोबर प्रमाणभाषा ही काळाबरोबर बदलत असते हे लक्षात ठेवायला हवे. गणितासारख्या विज्ञान विषयात प्रगती होत गेली त्याचे कारण प्रमाणभाषा अनुसरली म्हणूनच. ललित साहित्यात मात्र लेखक प्रमाणभाषेला त्याच्या सोयीने वाकवू शकतो.

दीपक पवार - (हे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष. मराठी भाषेला राजभाषा म्हणून महाराष्ट्रात हक्काचे स्थान मिळावे यासाठी गेले दशकभर त्यांची चळवळ चालू आहे.) - प्रमाणभाषेचा वाद मराठीमध्ये सर्वसाधारणपणे शुद्ध आणि अशुद्ध या स्‍वरूपात होतो. जी भाषा शुद्ध आहे असे म्‍हटले जाते ती उच्‍चवर्णीयांची किंवा त्‍याही पुढे जाऊन सदाशिव पेठेतील ब्राम्‍हणांची भाषा आहे. आणि अशुद्ध मानली जाणारी भाषा ही बहुजनांची आहे असे वर्गीकरण केले जाते. भाषेला जात चिकटल्‍यामुळे आणि त्‍यातून समाजाची प्रतिष्‍ठा ठरत असल्‍यामुळे मराठी भाषेचे त्रांगडे तयार झाले आहे. बहुजन समाजातील मुले जसजशी शिकू लागली किंवा शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्थेत येऊ लागली तसतसा समाजातील सुप्‍त जातीय अहंकार भाषेच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍त होऊ लागला. हे सगळे 'आनी पानी' बोलणारे लोक आहेत अशी टिका होऊ लागली. त्‍यामुळे बराच काळ 'आम्‍ही आम्‍हाला हवं तसं बोलू. तुम्‍ही कोण ठरवणारे?' असे म्‍हणण्‍यात गेला. मात्र बोलीचा दैनंदिन व्‍यवहारात वापर करतानासुद्धा तिचे प्रमाणरूप बोलणा-याच्या व ऐकणा-याच्या मनात असतेच. कोणताही व्‍यवहार समाजातील सर्व स्‍तरांपर्यंत पोचवायचा असेल तर सर्वसमावेशक अशी प्रमाणभाषा लागते, हे मराठीत वाद करणा-या लोकांकडून लक्षात घेतले जात नाही. त्‍यातूनच फक्‍त दीर्घ उकार किंवा दीर्घ वेलांटी असावी असा मूर्खपणा प्रसृत होतो आणि त्‍याला पाठिंबाही मिळतो. एक साधी गोष्‍ट लक्षात घेतली जात नाही, की इंग्रजीचा वापर करताना सर्व व्‍यवहारक्षेत्रांमध्‍ये प्रमाण इंग्रजीच वापरली जाते. तेथे खळखळ केली जात नाही. तसाच विचार मराठीच्‍या बाबतीत केला तर अधिक बरं होईल असे मला वाटते.

खैरनार यांचं मुलं शाळा-कॉलेजात शुद्ध-प्रमाण भाषा शिकण्‍यासाठी जात नाहीत हे विधान मला पटतं. पण ती तिथं अशुद्ध भाषाही शिकायला जात नाहीत. जर शुद्ध आणि अशुद्धच्‍या पलिकडे जाऊन भाषेचा विचार केला गेला तर काही प्रश्‍न मार्गी लागतील.

प्रभाकर नारायण परांजपे - (हे मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष. ते गेली तीस वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनार्थ काम करत आहेत.) मुळात बो-हाडे यांनी हे लक्षात घ्‍यायला हवे की हा मुलगा बीएपर्यंत पोचला, याला बो-हाडेसारखेच शिक्षक आणि महाराष्ट्रातील शिक्षणपद्धत जबाबदार आहे. प्रत्‍येकाला उत्‍तीर्ण करण्‍याची, पुढे ढकलण्‍याची पद्धत योग्‍य नाही. त्या प्रक्रियेत सर्वचजण आपली जबाबदारी टाळतात. परीक्षकही जबाबदारी टाळत असतात. ते विद्यार्थ्‍याने काय लिहिले आहे ते न पाहता गुण देतात. त्या सगळ्याला शिक्षण व्‍यवस्‍थेतील भोंगळपणा आणि तत्‍वशून्‍यतेसोबत सगळ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. बो-हाडे सांगतात तो मुलगा बी. ए. झाल्‍यानंतर नोकरी कशी मिळवेल? कशी टिकवेल? जर त्‍याचा बाप श्रीमंत असेल तर तो एखादा उद्योजक वगैरे होईल, यशस्‍वीही होईल. मग त्‍याला लिखापढीची गरज भासणार नाही! आणि तो प्रमाणभाषेविरुद्ध बडबड करायला लागेल. पण आर्थिक यशस्‍वीता म्‍हणजे भाषेबद्दल बोलण्‍याचा परवाना नव्‍हे. अधिकार तर नव्‍हेच नव्‍हे. बो-हाडे यांनी स्‍वतः पदवी हा शब्‍द कसा लिहिला आहे तो पाहवा!

मुरलीधर खैरनार यांचे म्‍हणणे अनाकलनीय आहे. ते 'ब्रिटिशांच्‍या काळातील आयएएस अधिकारी' असा उल्‍लेख करतात. त्‍या वेळेला आयएएस नव्‍हती एवढेही त्यांना ठाऊक नाही. तेव्‍हा आयसीएस होती आणि खैरनार यांनी त्‍यावेळच्या इंग्रजांचे लिखाण वाचले आहे का? त्‍यांनी एकाचे तरी नाव सांगावे. या सगळ्या चर्चेमध्ये शुद्धलेखन हा शब्द चुकीचा आहे. तेथे प्रमाण भाषा हाच शब्द वापरला गेला पाहिजे. प्रमाण भाषा महत्त्वाची आणि आवश्‍यक आहे. जेव्‍हा माणसे प्रत्‍यक्ष बोलत असतात तेव्‍हा चेह-यांवरील भाव, हातवारे आणि आवाजातील चढउतार यांमधून समोरच्‍या व्‍यक्‍तीला अनेक गोष्‍टी समजत असतात. पण लेखनात तसे नसते. त्यामुळे लिहिलेल्‍या शब्‍दांतून जर अर्थ व्‍यक्‍त होत नसेल तर संवादच शक्‍य होणार नाही. त्‍यामुळे प्रत्येक व्यक्तीला प्रमाणभाषा अचूक लिहिता आली पाहिजे. शिक्षणव्‍यवस्‍थेत तिचा आग्रह धरला पाहिजे. खैरनार यांनी इतर देशांत जेथे अशा प्रमाणभाषेचा, शुद्धलेखनाचा आग्रह नाही त्‍या देशांपैकी काहींची नावे सांगावीत. की हा 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' असा प्रकार आहे? त्यामध्‍ये जातीय आकस, नागरी-ग्रामीण यांतील दरी, लोकरंजनवादी राजकारण या सगळ्याचा संबंध आहे. बो-हाडेंनी उदाहरण दिलेल्‍या मुलांसारख्‍यांची बाजू घेणे म्‍हणजे आपण मोठे क्रांतिकारक आहोत असा आव आणण्‍यासारखे आहे. हे सर्व त्‍यांना कोणीतरी खडसावून सांगितले पाहिजे. खैरनार 'अवाजवी, क्रूर, अनाठायी, अवास्‍तव' असे शब्द वापरतात. त्‍यांना त्या शब्‍दांचे अर्थ कळतात का? खैरनार लेखक आहेत ना! त्‍यांनी त्या मुलाला लेखनिक म्‍हणून नोकरी द्यावी, पगार द्यावा म्‍हणजे त्‍यांना कळेल. ज्‍याला तो काय लिहीत आहे, तेच कळत नाही. त्‍याने हे लिहिणे हे मनोविनोदन आहे.

परांजपे म्‍हणाले, “ललित लेखन आणि इतर लेखन यांत फरक आहे. ललित लिहिताना लेखक कितीही स्‍वातंत्र्य घेऊ शकतो, चुका करू शकतो. मात्र वैचारिक, गंभीर लेखनात त्या करता येत नाहीत. त्या प्रकारचे लेखन करताना हस्‍तलिखितात जरी चुका असल्‍या तरी त्या छपाई करताना दुरूस्‍त करूनच छापल्‍या जातात. कुरूंदकरांचं हस्‍तलेखन अशुद्ध होतं. मात्र ते छापताना शुद्ध केले जाई. व्‍यवहार हा प्रमाणभाषेतच होऊ शकतो.

भाऊ पाध्‍ये यांचे लेखन ज्‍यावेळी प्रसिद्ध झाले त्‍यावेळी त्‍याची भाषा अशीच वेगळी होती. मात्र त्‍यामधून व्‍यक्‍त होणारा अनुभव महत्त्वाचा होता. त्याच्‍याशी ते लेखन लेखन सुसंगत होते. ‘वासूनाका’ हे पुस्‍तक झोप उडवणारे ठरले. शरणकुमार लिंबाळे यांचे ‘आठवणींचे पक्षी’ हे पुस्‍तकही तसेच एक उदाहरण. कारण ललित लिहिताना अनुभवाच्‍या पातळीवर संवाद साधला जात असतो. तेथे भाषा अनुभवाचे पारदर्शक वहन करत असते. व्‍यवहारात संवाद प्रमाण भाषेतून साधला जात असतो.

ग्रामीण लेखकांकडे कोणी प्रमाण लेखनाचा आग्रह धरत नाही. उलट ग्रामीण, दलित लेखकांच्‍या भाषेने प्रमाणभाषा समृद्ध केली. तिने प्रमाणभाषेला अनेक शब्‍द दिले. 'उपरा' हे पुस्‍तक प्रकाशित करत असताना एका मुद्रित शोधकाने (प्रुफ रिडरने) 'उपरा'ची भाषा शुद्ध करण्यास घेतली होती. त्‍याला त्‍या भाषेच्या ताकदीचा अंदाज आला नाही. त्‍यामुळे त्‍याच्‍याकडून काम काढून घ्‍यावे लागले. ललित लेखनामध्‍ये अनुभवाचा सच्‍चेपणा हाच निकष असतो. तो व्‍यावहारिक भाषेत असत नाही. ती संवादाची भाषा आहे आणि त्‍यातून जर संवाद घडला नाही तर त्‍या भाषेचा उपयोग नाही.

(मराठी भाषेबद्दल या सा-यांची मतांतरे तुम्‍हाला कशी वाटतात? यामध्‍ये तुम्‍ही एखादा नवा मुद्दा मांडू इच्छिता का? लेखाखाली तुमच्‍या प्रतिक्रिया नमूद करा. चर्चेत सहभागी व्‍हा.)

लेखी अभिप्राय

परांजप्यांच मत पटतं. आणखी काय म्हणणार. भाषा संवादासाठी असते. प्रमाणाशिवाय संवाद अशक्य होतो. प्रमाणभाषासुद्धा काळानुसारच नव्हे पण अनेक इतर कारणांसाठी वेगवेगळी रूपे घेऊ शकते. अशा त-हेने भाषा समृद्ध होते. खैरनार म्हणाले, की शुद्ध भाषेवर जगात इतर कुठेही अट्टाहास नाही. ह्या सगळ्या भाषांबद्दल माहिती असणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

दिलीप दामले28/09/2015

समारोपात एक चुक झाली आहे. आठवणींचे पक्षी हे पुस्तक प्र. ई. सोनकांबळे यांचे आहे. महारी बोलीतील निवेदनामुळे ते वाचनीय झाले आहे. बोलीला माझा विरोध नाही. पदवी परीक्षा तिही कला शाखेतून देणा-या विद्यार्थ्याला प्रमाण मराठीत लिहीता यावे असे मला वाटत होते. प्राथमिक निवेदनात मी शुध्द लिहीता येत नाही हे म्हटले, त्याऐवजी प्रमाण मराठीत असायला हवे होते. माझ्या मांडणीचे सार प्र. ना. परांजपे यांनी बरोबर हेरले. त्यांनी अधिक विस्ताराने लिहीले असते तरी चालले असते. हरिश्चंद्र थोरात यांची आणखी एक बोलकी प्रतिक्रीया या चर्चेतून कशी सुटली ते कळत नाही. खैरनारांचा आग्रह आणि भाषिक वापर यातली विसंगती त्यांनी हेरली आहे. तिचा समावेश आवश्यक होता. माझ्या सप्रमाण म्हणण्यावर मुरलीधर खैरनार यांनी भलतीच कडी केलेली आहे. आग चर्चगेटला आणि बंब सीएसटीला, असा प्रकार झाला आहे. शिक्षण व्यवस्थेतील सपाटीकरणामुळे, धोरण लकव्यामुळे पिढ्या बरबाद होत आहे. एक संवेदनाशील शिक्षक म्हणून मला ते खुपते आहे. मी सदाशिवपेठी भाषेचा आग्रही नाही. अगदी फुले परंपरेचा आहे, पण प्रमाण भाषेला नाकारणारा नाही. लिहीता लेखक असल्याने मला ते महत्वाचे वाटते. - प्रा. शंकर बो-हाडे

अज्ञात28/09/2015

मराठी ही त्याची मातृभाषा आहे, शुध्द मराठी व स्वच्छ हस्तक्षर निश्चित असावेच! मात्र त्यासाठी नापास करणे किंवा त्याला कमी ज्ञानी समजणे हे मला पटले नाही. जगाच्या पाटीवर अशी कित्येक व्‍यक्‍तींची उदाहरणे आहेत ज्यांनी शिक्षणाशिवाय प्रगती केलीय. त्याला कमी समजणे, योग्य आहे असे मला वाटत नाही.

तानाजी गोरड28/09/2015

मराठी भाषा शुध्दतेची सक्ती नसावी. मनातील भावना पोचवणं महत्वाचं. राहीला मुद्दा लेखनाचा, लेखन ज्याच्या त्याच्या सोयीने मराठीत लिहायला हरकत नसावी. मुळात आपला सुटाबुटातला हेकटपणा आपण सोडत नाही आणि पाहिजे तो आकलनी विचार द्यायचा सोडून घोकंपट्टीतील पट्टीधारक भूमिका घ्यायची. म्हणजे पूजा/पुजा चा असा वाद करून वेळ दवडायचा. बस्स!

किरण संधान28/09/2015

शुध्द आणि अशुध्द लिखाण यावर बुध्दीमत्ता ठरविली जाऊ नये. अजुनही ग्रामीण भागात बरेच जण त्यांच्या बोली भाषेतच लिखाण करतात. त्यांच्या लिखाणातील आशय महत्वाचा आहे. लिखाणाची आणि बुध्दीमत्तेची सांगड घातली जाऊ नये. महात्मा गांधी, तसेच अनेक डाॅक्टर्स, विचारवंत त्‍यांचे अक्षर खराब असूनही समाजात उच्‍च स्थानावर पोचलेले आहेत. अक्षर चांगले नाही, अशुध्द आहे अशा व्यक्ती कुचकामी आहेत, असे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही.

सोमनाथ कळमकर28/09/2015

अतिशय उपयुक्त चर्चा या निमित्ताने घडून आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या लेखनाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. जितकं काळजीपूर्वक लिहिता येईल तितकं भाषेसाठी चांगलं.

प्रशांत केंदळे28/09/2015

अनेक प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला प्रभाकर परांजपे यांची प्रतिक्रिया अधिक भावली.
मराठी भाषेचे शुद्ध लेखन किंवा प्रमाणित लेखन याबाबत मला आलेला अनुभव वाचनीय श्रवणीय आहे . मराठी शुद्ध लेखनाचा व्यायाम करणा-यांना नक्कीच नशा आणील. मी मुक्तविद्यापीठात शुद्ध लेखनाचे काम केले आहे. माझी स्वतः ची काही पुस्तके मी प्रकाशित केलेली आहेत. तसेच मी माध्यमिक, उच्च मा. ते पदवी पर्यंतच्या वर्षभराच्या प्रश्नपत्रिका मुद्रित करण्याचे काम अनेक वर्षे करतांना शिक्षकांच्या हस्तलिखिताचा अनुभव अस्मरणीय आहे. या कीबोर्डवर मला शुद्ध लिखाणाचा त्रास होत आहे. सविस्तर लेखासाठी संपर्क करा ९३७३३७११७७ धन्यवाद.

रुईकर सर29/09/2015

प्र.ना.परांजपेंच्या मुद्यांशी मी सहमत आहे. तपशीलातील एक छोटीशी चूक दुरुस्त करू इच्छितो. ' आठवणींचे पक्षी' चे लेखक प्र.ई.सोनकांबळे , हे आहेत.प्र.नां.ना बहुतेक ' अक्कर माशी'चा उल्लेख अभिप्रेत असावा.

अनिल सोनार,29/09/2015

विद्यार्थी मराठी हा विषय घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याच्या लेखनात प्रमाण भाषा असावी असा हेतू त्या प्राध्यापकांनी ठेवला यात गैर काय? विद्यार्थ्याच्या अप्रमाणित लेखनाकडे दुर्लक्ष करावे? मुलांना शाळेत भाषा विषय शिकवण्याचा उद्देश काय? तसाही विद्यार्थी स्वत:च्या घरी भाषा विषय न शिकताही स्वत:च्या बोली भाषेत पारंगत झालेला असतो. पण ती त्याची अभ्यासाची भाषा नसते. विद्यार्थांकडून प्रमाणित भाषेचा आग्रह धरणे यात गैर काय? शिक्षकाने विद्यार्थ्यांचे परिक्षण कसे करावे? शाळेत परिक्षा ठेवण्याचा उद्देश काय?

प्रभाकर मल्हार…30/09/2015

चर्चा वाचून मजा वाटली. प्रमाणभाषा हा वेगळाच मुद्दा आहे. माझा मुद्दा फक्त लिखित भाषेशी संबधित होता. म्हणजे 'सुर्य' चूक 'सूर्य' बरोबर. दिन आणि दीन. तुकारामाची तू पहिली की दुसरी? एवढ्यापुरताच.

लिहिल्या जाणाऱ्या मराठी भाषेचा इतिहास पहा. आपल्याकडे गेली साडेसातशे वर्षे मराठी जी लिहिली गेली त्यातली नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मराठी ही मोडी लिपीत लिहिली जात होती. ज्यांना काव्यरचना करायची ते काही अपवाद फक्त देवनागरी लिपीचा वापर करीत. देवनागरीतले दोन उकार, दोन वेलांट्या असे नागरकोल्ही प्रकार मोडी लिपीत नाहीत. छत्रपती शिवाजी राजांपासून ते सर्व पेशव्यांपर्यंत साऱ्यांचा कारभार मोडी (एकच उकार व एकच वेलांटी असलेल्या) लिपीतून झाला. पण त्यातल्या एकाही वाक्याचा कुणी चुकीचा अर्थ लावल्याचे इतिहासात मला कुणीही दाखवून द्यावे. अर्थ बदलण्याची घातली जाणारी भीती ही परसदारी वावरणाऱ्या भुताच्या भितीसारखी आहे.

आता आणखी एक गम्मत पहा. दोनशे वर्षांपूर्वी मराठीत पुस्तके छापायला सुरुवात झाली तेंव्हा संस्कृतच्या टायपाचे साचे आयते मिळत होते या एकाच कारणासाठी पहिलं मराठी पुस्तक कलकत्त्यात देवनागरी लिपीत छापण्यात आलं. मराठीची त्यावेळची प्रचलित लिपी मोडी असली तरी मोडीचे साचे तयार करण्याचा महाराष्ट्री वैज्ञानिकांना कंटाळा असल्याने मराठी पुस्तके देवनागरीत छापायची प्रथा पडू लागली. मुळात पुस्तके-बिस्तके हा धंदा त्या काळी मूठभर अभिजनांपुरताच मर्यादित असल्याने अन्य कुणी मराठी भाषकांनी तिकडे लक्षच दिले नाही. कारण उरलेल्या ९८ टक्के सामान्य मराठी समाजाचे अन्य व्यवहार तेंव्हाही मोडी लिपीतच निर्वेध चालू होते.

यावर कडी झाली स्वातंत्र्य मिळाल्यावर. १९५० साली मराठी भाषेतल्या काही संस्कृत व संस्कृतीप्रेमी पुढाऱ्यानी सरकारला हाताशी धरून एका भाषेसाठी दोन लिप्या वापरणे गैर ठरवले. मराठीसाठी देवनागरी ही एकच लिपी वापरावी असा वटहुकूम काढायला त्यांनी सरकारला भाग पाडले आणि मोडी लिपीचा वापर बेकायदेशीर ठरवला. त्या लोकांच्या या उनाडटप्पू उद्योगावर मी मागे फेसबुकवर तपशिलात लिहिले होते. त्याची एक लिंक सोबत देत आहे. https://www.facebook.com/notes/587050048084417/

माझा मुद्दा एवढाच की प्रुफरीडर, संपादक आणि लेखक हे छपाईच्या धंद्याशी सम्बद्धित दहा हजार लोक वगळता उरलेल्या सात कोटी नव्व्याण्णव लाख नव्वद हजार मराठी भाषिकांना शुद्धलेखन येण्याची किंवा समजण्याची अजिबात गरज नाही. तरी ज्यांना शुद्धलेखनाचा तोरा मिरवायची हौस आहे त्यांनी खुशाल "दिन दीन" च्या आरोळ्या ठोकाव्यात.

मुरलीधर खैरनार 05/10/2015

Vel ghalvinyasathi milalela ha ek juna vishay ahe. Jivanala jashi pranavayuchi tasshi bhashela praman bhashechya niyamanchi garaj he ekda manya karayla sat koti lokana laj ka vatate?

Mukund Vaze19/10/2015

आमचे मित्र प्रा. डॉ. शंकर बो-हाडे यांनी मराठी भाषेच्या शुध्दतेविषयी प्रथम फेसबुकवर ही पोस्ट टाकली आणि या पोस्टवर अनेक नामवंत, तज्ञ व्यक्‍तींनीं प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे याविषयावर सांगोपांग चर्चा घडून आली. या चर्चेत जोडले गेलेले एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रसिद्ध कादंबरीकार मुरलीधर खैरनार हे होय. लेखक मुरलीधर खैरनार आज आपल्या सोबत नाहीत परंतु त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, त्यांनी केलेले लेखन नेहमीच आपल्या सर्वांना त्यांच्या आठवणींंच्या विश्वात घेऊन जाणारे ठरणार आहे. या विषयावर अनेकांनी मांडलेली मते अभ्यासपूर्ण आहेत. सदर पोस्ट व त्यावरील प्रतिक्रिया वाचून मला असे वाटते की, भाषेच्या शुध्दतेविषयी आपण सर्वांनी खूपच आग्रही आसले पाहिजे असे नाही. परंतु प्रत्येकाने लेखन करताना सर्वांना समजेल अशा पध्दतीने केले आणि भाषाशास्राचे प्राथमिक नियम पाळले तर सर्वांना त्यापासून फायदाच होईल आणि एकाने केलेले लेखन दुस-याला वाचता आले तर ज्याने लेखन केले त्यालाही समाधान लाभेल. 'थिंक महाराष्ट्रा'ने या चर्चेला एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

शिंदे नारायण अंबू10/12/2015

सर, आपल्या मराठी भाषेतून भरपूर काही शिकायला मिळालं.

देवेंद्र डी. क…05/02/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.