तापोळा - महाराष्ट्राचे दल लेक
तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, वास्तवात ते श्रीनगरच्या 'दल लेक'च्या तोडीस तोड, डोळ्यांचे पारणे फिटवणारे आहे. तापोळा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. जलाशयाची महासागराएवढी व्याप्ती, निळे पाणी, प्रदुषणमुक्त वातावरण आणि काहीशी दमट तरीही आल्हाददायक हवा असे तापोळा परिसराचे वर्णन करता येईल.
महाबळेश्वरच्या बाजारपेठेतून पलीकडे जाणारा रस्ता पकडायचा. दिशादर्शक बोर्ड वगैरे बघण्याच्या भानगडीत पडायचे नाही, कारण दुकाने आणि माणसे यांच्या गर्दीत तो दिसत नाही! महाबळेश्वरपासून सत्तावीस किलोमीटरवर तापोळा हे ठिकाण आहे. स्वतःची गाडी, त्यात बाईक असेल तर उत्तम, नाहीतर एस.टी. महामंडळाची सेवा आहेच, कोठल्याही वाहनाने निघायचे. गजबजलेले महाबळेश्वर मागे सोडले की दाट झाडीतून जाणाऱ्या रस्त्याने किलोमीटरचा दगड बघत पुढे जात राहायचे.
गर्द झाडीमुळे महाबळेश्वरच्या उंचीपासून खाली उतरत असतानाही थंडी वाजत असते. साधारण सात किलोमीटरनंतर झाडी संपते आणि खोल दऱ्या-डोंगर ह्यांचे दर्शन होते. तेथे चहाची टपरी आहे. थंड वातावरणात चहा पिण्यासाठी थांबायचे, ते मात्र निमित्त. कारण तेथून दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या छटा ... अबब! फक्त महाबळेश्वर नाही तर आजुबाजूचा परिसर कसा हिरवागार आहे त्याचा प्रत्यय तेथे येतो. त्याच्या पुढे मात्र खाचखळग्यांमधून कसरत करत, मध्येच स्ट्रॉबेरीची शेते बघत पुढे जात असताना कोयनेचे बॅकवॉटर -शिवसागर जलाशय दिसायला लागतो. शिवसागर जलाशयाचे सुंदर दृश्य मनात साठवत पुढे जाताना वाटेत लागणारी छोटी गावे पार करत तापोळ्यात कधी पोचतो ते कळतही नाही!
कोयना धरणाच्या बांधकामाला सुरुवात 1956 मध्ये झाली. धरणात 1962 साली पाणी भरू लागले. त्यामुळे कोयना नदीच्या काठावरील काही गावे विस्थापित झाली. त्यांतील एक तापोळा गाव. इन-मीन पाच-पन्नास घरांचे ते गाव. जलाशयाच्या खाली असलेली गावे पाण्याचा फुगवठा बघून काठावर वसवण्यात आली. जलाशयाच्या काठावर गाव म्हणून गेल्या पंधरा वर्षांत तापोळा गाव पर्यटनासाठी विकसित होण्यास सुरुवात झाली.
तापोळ्यात दोन बोट क्लब आहेत. दोन्ही क्लबकडे सारख्या सुविधा आहेत. दरही सारखे आहेत. मोटर बोट (बाराजण प्रवास करू शकतात - वेग चांगला), स्पीड बोट (चार प्रवासी - वेग अधिक), स्कुटर बोट (एक प्रवासी- वेग सर्वात जास्त).
कोठलीही बोट घेतली तरी तिची फेरी पंचेचाळीस मिनिटांत संपते. साधारण सहा किलोमीटरच्या फेरीमध्ये तापोळ्यासह काठाने जाता जाता जलाशयाच्या मध्यभागी नेत अथांग जलाशयाचे दर्शन घडवले जाते. बारा किलोमीटरच्या फेरीसाठी दीड तास लागतो. कोयना, कंडकी, चोळशी अशा तीन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी जाऊन ही टूर संपते. संगमाच्या ठिकाणी किंवा जलाशयाच्या दोन्ही काठाच्या मध्ये पाण्याची खोली चारशे-साडेचारशे फुट असल्याचे बोट चालक सांगतो आणि त्या अफाट जलाशयाचे खरे रूप कळते!
वीस किलोमीटरची तिसरी सफर अडीच तासांत संपते. त्या ठिकाणी जाताना त्रिवेणी संगम पार करत काठावरील विनायकनगर नावाच्या एका गावाच्या ठिकाणी पोचता येते. त्या ठिकाणी छोटेखानी दत्त मंदिर आहे. भक्तांसाठी मठही उभारला असल्याने दत्त भक्तांची तेथे गर्दी असते. ते मंदिर प्रत्यक्षात जलाशयाच्या काठापासून थोडे आत आहे. त्या जागी उतरल्यावर आधी दिसते ते शिवमंदिर. भुयारात असलेल्या मंदिराची अनोखी रचना आहे. पोटपूजेसाठी वडापावाची टपरी आहे. शांत परिसर आणि अफाट जलाशयाचे दृश्य बघताना वेळ कसा जातो ते कळत नाही. सातारा-कास पठार- बामणोली ते विनायकनगर असा रस्ता आहे. त्यामुळे तेथून साता-यालाही जाता येते. विनायकनगर गावापासून धरणाच्या भिंतीपर्यंत कच्चा रस्ता आहे. कोयना धरणाच्या निरीक्षणासाठी तो बांधण्यात आला आहे. त्या मार्गावरही काही गावे आहेत. पावसाळ्यात कोयना धरणाच्या परिसरातील गावांचा संपर्क तुटतो, तो त्याच गावांचा!
जलाशय आणि कोकणातील खेड गाव ह्यांच्या बरोबर मध्ये सह्याद्रीच्या डोंगरावर जंगलात वासोटा किल्ला लपलेला आहे. तापोळ्यापासून तीस किलोमीटरवर असलेल्या काठावरून वासोट्याकडे मार्ग जातो. वासोटा किल्ला पालथा घालायला दोन दिवस तरी हवेत.
चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयना अभयारण्याची सफर हे एक मोठेच आकर्षण त्या परिसरात आहे. ती सफर पाच तासांत पूर्ण होते. तोच परिसर राज्यातील चौथा व्याघ्र प्रकल्प, ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ नावाने जाहीर झाला आहे.
तापोळ्यापासून कोयना धरणाची भिंत तब्बल पंच्याऐंशी किलोमीटर दूर आहे. तेवढ्या पल्ल्यासाठी मोटरबोट योग्य. तेथे जाऊन परत येण्यासाठी दहा तास लागतात. त्या फेरीचा दर पाच हजार रुपयांच्या घरात आहे. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून धरणाच्या भिंतीजवळ जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे भिंत जवळ आल्यावर जलाशयाच्या डावीकडील काठाने भिंतीपासून फक्त काही किलोमीटर अंतरावर थांबत सफर पूर्ण केली जाते.
तापोळ्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर जलाशयाच्या डावीकडे असलेला डोंगर म्हणजे महाराष्ट्राचे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ - प्रसिद्ध कास पठार. त्याच्या पायथ्याशी आणि जलाशयाच्या काठावर बामणोली गावातून त्या ठिकाणी जाता येते. तेथे जाण्याचे दिवस म्हणजे गौरी-गणपती आणि ऑक्टोबर हीट सुरू होण्याचा मधला काळ. कारण त्याच दिवसांत पठारावर अप्रतिम असा फुलोरा फुलतो. तसेच साताऱ्याहून कास पठार पार करत बामणोलीमधून लाँच करत वासोटा किल्ल्याकडे गिर्यारोहक जातात.
शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरावर अनेक गावे वसलेली आहेत. गावकऱ्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे प्रवासी बोट. त्या गावांतील लोकांसाठी ती सेवा नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध आहे. मात्र पर्यटकांकडून चांगले पैसे वसूल केले जातात. विशेष म्हणजे स्थानिक लोकांनीच पर्यटकांसाठीच्या बोटी आणि तेथील व्यवसाय यांत पैसे गुंतवले आहेत. म्हणजे परक्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न स्थानिक लोकांनी निकाली लावला आहे. तेथे येण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी. दल लेकपेक्षा उत्कृष्ठ पर्यंटन स्थळ असलेले तापोळा मनात कायमची आठण करून राहते.
- अमित जोशी
Add new comment