रंगीत लाकडी खेळण्यांची सावंतवाडीतील परंपरा

प्रतिनिधी 19/06/2015

सावंतवाडी हे साडेतीनशे वर्षांची परंपरा असणारे कोकण विभागातील एकेकाळचे लहानसे संस्थान. तेथील सावंत भोसले राजघराण्याने सदैव अध्यात्म, कला आणि शिक्षण या क्षेत्रांना राजाश्रय दिला. त्यामुळे ते संस्थान अभिजात सांस्कृतिक वारसा जोपासत जागतिक स्तरावर पोचले. तेथील कलावस्तू या केवळ सुंदर व आकर्षक नव्हत्या तर जीवनव्यवहारातही त्यांचा वापर होई. त्यामुळे त्या वस्तू सातत्याने निर्माण झाल्या व त्याबरोबर त्यांचे देखणे व आकर्षक रूप जोपासले गेले. सावंतवाडीच्या कलावंतांच्या हातात जणू जादुई कौशल्य होते. त्या कलावस्तू परंपरागत पद्धतीने उत्पादित करणारी काही नामवंत घराणी होती. सुतार, चितारी, मयपांचाळ, पुराणिक, जिनगर या कुटुंबपरंपरेतून, त्या त्या कलाकार समुहाच्या कौटुंबिक वारशाने संबंधित कला जोपासली गेली होती. त्यात काही वेळा, कौटुंबिक वारशाचा हट्ट व दुराग्रहही असे, पण त्यामुळेच त्या कलावस्तू मूळ रूपात टिकून राहिल्या.

सावंतवाडीचे राजे खेमसावंत तिसरे (राजर्षी) हे धर्मशास्त्र पारंगत (1750-55) होते. ते धर्मशास्त्रावरील चर्चासत्रांचे आयोजन करत असत. त्या कारणाने तेलंगणातून सावंतवाडीत आलेल्या ब्रह्मवृंदांनी लाखकाम कला व गंजिफा कला सावंतवाडीत आणली. राजदरबारातील सण, उत्सव व समारंभ अशा प्रसंगी सजावट करणाऱ्या चितारी, जिनगर यांच्या माध्यमातून ती तेथे रूढ झाली. पुढे, इंग्रजी राजवटीत (1840) इंग्रज अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे सावंतवाडीतील जिनगर समाजातील कलाकार घोड्याचे खोगीर, म्यान व हत्यार यांचे पॉलिश त्याचबरोबर गवताच्या करंड्या, पंखे, टोपल्या, टेबल लॅम्प, स्टँड इत्यादी कलावस्तू करू लागले. त्या इतरत्र जाऊ लागल्या. गव्याच्या शिंगांवरील नक्षीकाम, रंगीत भुंग्यांच्या पंखांचा वापर करून पडद्यावरील कलाकुसर, चांदीच्या धातूचा वापर करून केलेल्या कलावस्तू, भांड्यांवरील नक्षीकाम, मीनाकाम व कशिदा, भेंडीच्या लाकडापासून कागदी फुले, हार, वाळ्याचे पंखे व शिवण वृक्षापासून रंगीत फळे, पोळपाट, रंगीत पाट व इतर कलावस्तू असे विविध प्रकारचे काम सावंतवाडीत होत असे.

लग्न समारंभ प्रसंगी सासरी जाणाऱ्या मुलीस माहेरची भेट म्हणून त्या कलावस्तू व इतर जीवनोपयोगी वस्तू देण्याची प्रथा होती. त्यामुळे त्या कलावस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होती. ठकी बाहुल्यांना तर खूप महत्त्व होते. तसेच, दशावतारी गंजिफा, हा एकशेवीस पानांचा गोल पत्त्यांचा खेळ वरिष्ठ सामाजिक वर्गात, विशेषत: राजकुटुंबीय, सरदार व इतर उच्च वर्णियांमध्ये खेळला जाई. विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित ते पत्ते केलेले असत. त्यामुळे खेळास आध्यात्मिक अधिष्ठान लाभले होते. बावीस चितारी कुटुंबे ते कलाप्रकार 1760 च्या काळात सावंतवाडीत करत असत.

त्याच काळात सावंतवाडीतील गुडगुडी प्रसिद्धी पावली. गुडगुड्यांमध्ये चिकणमातीचा वापर केला जाई. ती चिनीमाती म्हणून प्रसिद्ध होती. ती सोळा पैशांला तीन गोळे या भावाने उपलब्ध होती. धार्मिक कार्यात पूजापाठ प्रसंगी लागणाऱ्या वस्तूही सावंतवाडीत सुबकपणे केल्या जात. त्यामध्ये तबके, पेले, निरंजने, पूजापाट, उदबत्ती, स्टँडची कमळे, ताम्हने, देव्हारे; त्याचप्रमाणे दौत व कलमदाने, गृहोपयोगी फर्निचर या वस्तूही तेथे उत्तम प्रकारे तयार होत. त्यामुळेच तशा अनेक कलावस्तूंचे माहेरघर म्हणजे सावंतवाडी असे सर्वसामान्यत: ठरून गेले. राजाश्रय व लोकाश्रय यांमुळे ती कला वैभवाच्या शिखरावर पोचली. त्यातूनच रंगीत लाकडी फळे व खेळणी यासाठी सावंतवाडीचे नाव प्रसिद्ध पावले.

ती कला बदलती सामाजिक जीवनशैली व राजाश्रय यांच्या अभावामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस हळुहळू लोप पावू लागली. परंतु पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज यांच्या कालखंडात (1924) पुनश्च तेथील कलाप्रकारांना राजाश्रय प्राप्त झाला. म्हापसेकर, केळकर यांनी त्याच काळात त्यांचे कारखाने स्वतंत्रपणे उभे केले. त्यामुळे कारखान्यातून चितारी वर्गाने तयार केलेल्या पारंपरिक कलाप्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. त्या वर्कशॉपमधून तयार झालेले गंजिफा संच ब्रिटिश अल्बर्ट म्युझियम (लंडन)पर्यंत जाऊन पोचले. रंगीत पाट, फर्निचर, बाहुल्या, रंगीत लाकडी फळे यांनाही पुनश्च बाजारपेठ उपलब्ध झाली. मात्र स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्या कलांचा ऱ्हास होत गेला, एकूणच काळ बदलला. कलावस्तूंचे अभिजात स्वरूप नष्ट होऊ लागले. कचकडी बाहुल्या स्वस्त म्हणून लोकप्रिय झाल्या. अन्य तकलादू वस्तू वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येऊ लागल्या.

राजेसाहेब शिवरामराजे भोसले व विद्यमान राजमाता हर हायनेस सत्वशिलादेवी भोसले यांचे लक्ष 1960 च्या दशकात कलेच्या दुरवस्थेकडे वेधले गेले. विशेष करून गंजिफा व तत्सम रंग व चित्रशैली यांमध्ये त्या काळात एकमेव तज्ज्ञ होते वृद्ध 'पुंडलिक चितारी'. त्यांच्याकडून उभयंतांनी ती कला आत्मसात केली आणि 1971 मध्ये 'सावंतवाडी लॅकर वेअर्स' या संस्थेच्या माध्यमातून त्या कलाप्रकारांना प्रोत्साहन दिले. राजमाता व राजेसाहेब यांनी देशातील प्रदर्शनांतून सहभाग दर्शवलाच; तसेच जर्मनी, जपान, सिंगापूर अशा देशांत प्रदर्शने व चर्चासत्रे यांद्वारे सावंतवाडीची कला सर्वदूर पुनश्च पोचवली गेली. ती कला अभिजात स्वरूपात राजवाड्यात उपलब्ध आहे. राजमातांनी संशोधनातून त्या कलाप्रकाराला नवे आकृतिबंधही दिले आहेत.

दरम्यान, लाकूड, लोखंड व इतर धातू यांची जागा प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या प्रकारांनी व प्रतींनी घेतली. प्लॅस्टिकमध्ये उत्तम सर्व वस्तू, खेळणी मिळू शकतात. स्वाभाविकच, सावंतवाडीची खेळणी त्यांची लोकप्रियता गमावून बसली.

पर्यटन व्यवसायामुळे चितारअळीतील कलाप्रकारांना बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. परंतु कलाप्रकारांचे अभिजात स्वरूप जपणे गरजेचे आहे.

- जी.ए. बुवा

लेखी अभिप्राय

केवळ अप्रतीम ! दुसरे शब्दच नाहीत !!

Madhukar Bhide19/07/2015

salute to all artist

mohan vasagadekar24/12/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.