वाळुज गावची मंदिरे


मोहोळ तालुक्यातील वाळुज येथे महादेवाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. ते वाळकेश्वर या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारात महाकाय दगडी गणपती व नंदी आहे. मंदिराशेजारी सिद्धपुरुष रामभाऊ महाराज यांची समाधी आहे.

वाळुज येथेच भोगावती व नागझरी या नद्यांचा संगम असून त्या संगमावर महादेव मंदिर भग्नावस्थेत आहे. तेही प्राचीन असावे.

देगाव रस्त्यावर वाळुजपासून दोन किलोमीटर अंतरावर श्रीहरीस्वामी व राघव स्वामी यांचे मंदिर आहे. ते काशीक्षेत्रीचे ब्राम्हण तप करण्यासाठी तेथे आले होते. श्रीहरी हे गुरू तर राघव हे शिष्य. श्रीहरी स्वामी यांची संजीवन समाधी तेथे आहे. तसेच, आणखी एका साधू पुरुषाची त्या मंदिराशेजारी समाधी आहे.

वाळुज गावातील दलित वस्तीत धर्मराज नावाच्या साधू पुरुषाची समाधी आहे.

वाळुज हे गाव प्राचीन असून गावात महादेव व मारुती, दोन्ही मंदिरांजवळ वीरगळ आहेत. ग्रामदैवत खंडोबा; त्याची दोन मंदिरे गावात आहेत. दत्त, विठ्ठल, अंबाबाई, येडेश्वरी (येरमाळा) आदी अन्य मंदिरे आहेत. नरसिंहाची तीन लहान मंदिरे (घुमट्या) आहेत.

कै. ज्ञानोबा मुरलीधर कादे तथा कादे दाजी हे 'शेतकरी कामगार पक्षा'चे जुने कार्यकर्ते वाळुज येथील होते. ते बाबुराव अण्णा पाटील अनगरकर यांचे खंदे समर्थक. कादे दाजी यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद दहा वर्षे भूषवले. त्यांनी अनेक देशांचे दौरे केले होते. ते अखेरपर्यंत भूविकास बँकेचे संचालक होते. वाळुजच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सोलापुरातील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. संदेश कादे हे त्यांचे चिरंजीव होत.

कै. धैर्यशील दादा देशमुख हेदेखील वाळुज येथील, पण ते  सोलापूरात स्थायिक झाले. कै. धैर्यशील दादा देशमुख हे महाराष्ट्रातील पहिल्या सहा बॅरिस्टरांच्या बॅचमधील होते. त्यांचा मुलगा पृथ्वीराज देशमुख सोलापुरात विधिज्ञ आहे.

गावातील भगवान कुळकर्णी यांनी 'तुफानी वादळ नियतीचे', 'प्रतिक्षा' अशी नाटके तसेच संत रामभाऊ महाराज चरित्र, सासुरे येथील श्री महंकाळेश्वर चरित्र आदी धार्मिक लेखन केलेले आहे.

'सकाळ'च्या सोलापूर आवृत्तीतील पत्रकार रजनीश जोशी हे वाळुज येथीलच. त्यांचा पर्यावरण, कला व संस्कृती या क्षेत्रांतील अभ्यास आहे. उजनी धरण व कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना याबाबत त्यांचा अभ्यास असून त्यावर त्यांचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.

बार्शीच्या श्रद्धा स्टुडिओचे शिवाजी कादे हे छायाचित्रकार आहेत. त्यांचे कलाप्रांतातही नाव आहे. त्यांनी काही मराठी चित्रपटांत सहअभिनेता म्हणून काम केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांचे स्थिर चित्रिकरणही केलेले आहे.

देगाव -

नागनाथ मंदिर - मोहोळ व वडवळ येथील सिद्ध नागेश यांच्या संप्रदायाचे एक महत्त्वाचे मंदिर देगाव येथे आहे. तेथे विजयादशमीला मोठी यात्रा भरते. 'गण' (खर्गे) निघतो. भाकणूक होते.  जिल्ह्यात वडवळ व मोहोळ याशिवाय खैराव (ता. माढा), गौडगाव ( ता. बार्शी), साखरेवाडी, कळमण, मार्डी ( ता. उत्तर सोलापूर) या ठिकाणी नागनाथ मंदिरे आहेत.

त्याशिवाय देगाव येथे कुंभमेळ्यातील आखाड्यातील प्रसिद्ध शिपलागिरी महाराजांचा मठ आहे. शिपलागिरी महाराज अलिकडेच समाधिस्थ झाले. नीळकंठ महाराज नावाचे त्यांचे उत्तराधिकारी तेथे आहेत. देगाव परिसरात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. त्यावरूनच त्या भूमीस देवगाव असे नाव पडले असावे. ते अपभ्रंश होऊन देगाव झाले असावे. देगाव येथे प्राचीन बारव (पाण्याची मोठी विहीर) आहे.

देगाव व वाळुज यांच्या मध्यभागी बुद्रुकवाडी येथील 'महादेव माळ' या नावाने प्रसिद्ध असलेल्या माळावर महादेवाची स्वयंभू पिंड आहे. श्रावणात तेथे भाविक जमतात.

सामाजिक/राजकीय -

उत्तरेकर दादा आतकरे - उत्तरेश्वर दादा आतकरे हे काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत.

अॅड. गोविंद पाटील - अॅड. गोविंद पाटील हे काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत.

विजयकुमार पाटील - विजयकुमार पाटील हे राजकीय व्यक्तिमत्त्व.

स्मिता पाटील - नाट्यक्षेत्रातील स्मिता पाटील वळसंगकर यांचे माहेर.

मोहोळ नरखेड परिसरात नागेश संप्रदायाच्या अनेक पाऊलखुणा आहेत.

आष्टी येथे पेशव्यांचे शेवटचे सेनापती बापू गोखले यांची समाधी आहे.

- अरविंद हनुमंत मोटे

Last Updated On - 14th July 2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.