अपरान्तातील प्राचीनतेला संशोधन केंद्राचे कोंदण


‘अपरान्त संशोधन केंद्रा’ची मुहूर्तमेढ चिपळुणात रोवली गेली आहे. विद्यावाचस्पती, प्राचीन मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक डॉ. गोरक्ष देगलूरकर, गड-किल्ल्यांचे अभ्यासक, लेखक प्र. के. घाणेकर, अंटार्टिका संशोधक सुहास काणे, अपरान्ताचा खराखुरा प्रवासी, नऊ ताम्रपटांचा शोध लावणारे कोकणातील नामवंत संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांनी चिपळूणमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनात या केंद्राचा संकल्प सोडला होता. अरविंद तथा अप्पा जाधव यांनी ‘अपरान्त संशोधन केंद्रा’च्या उभारणीची घोषणा केली. संशोधन केंद्र ‘लोकमान्य टिळक वाचन मंदिरा’च्या पुढाकाराने सुरू होणार आहे.

विविध विषयांवरील सुमारे पासष्ट हजार पुस्तके, दुर्मीळ हस्तलिखिते व पोथ्यांचा मौलिक संग्रह वाचन मंदिरात आहे. ‘अपरान्त संशोधन केंद्रा’मध्ये कोकणातील ऐतिहासिक दस्तऐवजांची जपणूक होणार आहे. तसेच विविध लोककला, लोकवाङ.मय, पुरातन दस्तऐवज, शिल्प, हस्तलिखिते आदी वस्तूंचा संग्रह केला जाणार आहे अशी माहिती वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली.

चिपळूण हे साधारणत: दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन शहर असल्याचा पुरावा सांगणारी ‘कोलेखाजन लेणी’ शहरालगत गुहागर बायपास मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे ‘गजान्तलक्ष्मी शिल्प’, ‘विजयस्तंभ’, भोगाळेतील ‘घोडेबाव’ हेदेखील शहराच्या प्राचीनतेचे पुरावे आहेत. चिपळुणात एक पुरातन वस्तुसंग्रहालय उभे राहणार आहे. कोकण भूमी प्राचीन आहे. ते काही संशोधनाने सिद्धही झालेले आहे. त्या संशोधनाला मध्यवर्ती ठिकाणी स्थान मिळाल्याने कोकणातील अभ्यासकांची जबाबदारी वाढणार आहे.

डॉ. गो.ब. देगलुरकर यांनी त्या शास्त्रातील अनेक संकल्पना त्या वेळी समजावून सांगितल्या. मंदिरातील अनेक प्रकारांना असलेल्या नावांचे विश्लेषण त्यांनी केले. मूर्तिशास्त्रातील अनेक हात, तोंड यामागील शास्त्रीय विवेचन, मूर्तीतील प्राणिशास्त्र, मंदिररचनेवरून त्याचा काळ कसा ओळखावा, प्रमाणबद्ध आणि सुंदरतेचे गमक, मंदिर शिखरांची रचना, किर्तिमुख व इतिहास, कर्णेश्वर मंदिरातील रंगाशीला - तिचे महत्त्व, शास्त्राला धरून येणारी मित्थके व त्यांची उपयोगिता आदी अनेक मुद्दे या अभ्यास दौ-यातून समजावून घेता आली. डॉ. देगलुरकर व अन्य प्रतिनिधींनी भेट दिलेले चिपळुणातील कर्णेश्वर शिवमंदिर इसवी सन १०० च्या सुमारास चालुक्यकालीन राजा कर्ण याने दहा हजार सुवर्णमुद्रा खर्च करून बांधले. ते त्याच्याच नावाने पुढे कर्णेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. हेमाडपंथीय शिल्पकलेचा नमुना असलेले श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे एक हजार नऊशे वर्षानंतर सुस्थितीत पाहायला मिळते. सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रात संपूर्ण काळ्या पाषाणात कोरीव काम केलेले असे हे मंदिर कसब्याचे पौराणिक महत्त्व टिकवून आहे. हेमांडपंथी वास्तुकलेतील हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेल्या दगडांनी बनवलेले आहे. सुंदर नक्षीकाम, देवतांची चित्रे, दगडात कोरून त्यांना कलात्मक रीत्या मंदिराच्या भिंतीमध्ये बसवलेले आहे. मंदिराच्या चारही दरवाजांमध्ये वर्तुळाकार नक्षी आहेत. डोक्यावर दगडात कोरलेला सुंदर झुंबर पाहायला मिळतो. प्रवेशद्वारात डोक्यावरच आठही कोनांमध्ये अष्टदिक्पालांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यानंतर तेथील खांबांचे नक्षीकाम डोळ्यात भरते. त्या खांबांची रचना कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिरातील नक्षीकामाशी जुळते. मंदिरात कलात्मक अशी नंदीची मूर्ती आहे. गाभा-यात शंकराची एक फूट उंच पिंड आहे. मंदिरातील एका खांबावर शिलालेखही आढळून येतो. तो शिलालेख प्राचीन हस्तकलेत कोरलेला आहे. मंदिराच्या खांबांवर विविधदेवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. कोरीव कामातील व हस्तकलेतील राखलेले तारतम्य आणि निर्माण केलेली कलाकृती त्या वेळच्या कलानिर्मितीचे सुंदर चित्र पाहणा-यासमोर उभे करते.

कोकणाएवढी रम्य व गूढ भूमी अन्यत्र कुठे नसावी! कोकणपट्टीत खूप गुहा आढळतात. डोंगरातील खडक खोदून तयार केलेले गुहागृह म्हणजे लेणी होय. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. पुरातन काली बौद्घ भिक्खू हे धर्मप्रसारासाठी भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्या पाळण्याचे नियम कडक असत. धर्मप्रसारासाठी फिरणा-या भिक्खूंची राहण्या-खाण्याची सोय सहज व्हावी यासाठी अशी लेणी खोदून घेतली गेली होती.

गाव तेथे देऊळ हे सूत्र कोकणाला अचूक लागू पडते. कोकणातील काही देवस्थानांची प्रचिती संपूर्ण भारतभर पसरली आहे. प्राचीन कलात्मक मंदिरे, तितकीच सुंदर आशयघन शिल्पकला, मूर्तिकला हे तेथील अनेक मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. कोकणात मंदिर स्थापत्याच्या बाबतीतील वैशिष्ट्ये इतर स्थापत्यप्रकारांतसुद्धा आढळून येतात. हे प्रकार म्हणजे बारवा (पाय-यांच्या विहिरी) आणि वीरगळ होत. त्यांची प्राचीनता महाराष्ट्रात व कोकणात आठव्या शतकापर्यंत जाते. कोकणातील काही विहिरी पाहण्यासारख्या असून त्यातून परिसरातील प्राचीनता सहज ध्यानी येते. भूगर्भ संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित निक्शित कालमापन असलेली इसवी सन १५२४ मधील केळशी - ता. दापोली - येथील वाळूची टेकडी, पालशेत सूसरोंडी येथील अश्मयुगकालीन गुहा कोकणच्या प्राचीनतेवर प्रकाश टाकतात.

जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोकणात नांदत होती याचा पुरावा ठरू पाहणारी आठ हजार वर्षापूर्वीच्या श्रीवर्धन ते विजयदुर्ग दरम्यान रस्त्याचे बांधकाम काही वर्षापूर्वी संशोधकांना कोकणच्या समुद्रात आढळले होते

- धीरज वाटेकर 

(मूळ लेख - 'दैनिक प्रहार' 30 डिसेंबर 2014)

लेखी अभिप्राय

Atee sundar lekh

Tejanand26/05/2015

मस्तच रे... कोकण म्हणजे एक अद्वितीय खजिना आहे... उत्तम कार्य.. सर्व टीम ला शुभेच्छा!!

निलेश देशपांडे26/05/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.