संत तुकामाई


श्री तुकारामचैतन्य ऊर्फ तुकामाई हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील येहळे या गावाचे रहिवासी. त्यांचे वडील काशिनाथपंत व आई पार्वतीबाई हे श्री दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांना पंधरा वर्षे होऊनही मूलबाळ नव्हते. त्यांचे पूजाअर्चा, जपजाप्य, अखंड व्रताचरण चालू असे. त्यांना यथावकाश मार्च 1813 मध्ये मुलगा झाला. तो अजानबाहू होता आणि त्याचे डोळे तेजस्वी होते. त्याचे नाव ‘तुकाराम’ असे ठेवण्यात आले. त्यांच्या येहळे या गावापासून जवळ उमरखे या गावात चिन्मयानंद नावाचे थोर पुरुष राहत होते. एकदा ते पंढरपूरहून परतीच्या मार्गावर येहळे या गावात मुक्कामाला राहिले. त्यांना ते पहाटे नदीवर स्नानाला गेलेले असताना नदीकाठावर एक युवक ध्यानस्थ बसलेला दिसला. दोघांची दृष्टादृष्ट होताच चिन्मयानंदांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून, त्याला आशीर्वाद दिला. ‘आता तू ‘तुकारामचैतन्य’ झालास. तुला इतरांना अनुग्रह देता येईल’ असे सांगितले.

श्री तुकामाय हे नाथपंथीय होते. ते लोकांना संतसेवा करावी, सतत नामस्मरण करावे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याला अनन्यभावाने शरण जावे असे सांगत असत. त्यांचे गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर कळमनुरीला राहत होते, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी शेवाळकरांना ‘आज देवाला आमरसाचा नैवेद्य कर’ असे सांगितले. दिवस आंब्याचे असूनही रावसाहेबांच्या झाडाला एकही आंबा लागला नव्हता. त्यांना आमरसाचा नैवेद्य कसा करावा अशी काळजी वाटू लागली. योगायोग असा, की ते निघून गेल्यावर एक बाई त्यांच्या दर्शनाला आली आणि तिने संत तुकामाईंपुढे आंबा ठेवला. लगेच, त्यांनी त्या बाईंना जेवढे आंबे असतील तेवढे रावसाहेबांना देण्यास सांगितले. तिनेही प्रेमाने गाडीभर आंबे पाठवले आणि संपूर्ण गावाला त्या दिवशी आमरसाचे जेवण मिळाले!

अनेक जण त्यांच्याकडे शिष्यत्व स्वीकारण्यास येत असत, मात्र ते त्यांची कठोर परीक्षा घेत. त्या परीक्षेत उतरलेले त्यांचे शिष्य शिरोमणी म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज होत. ते एका रामनवमीला गुरुशिष्य स्नानाला गेले असताना, त्यांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला, लगेच त्यांची समाधी लागली. त्यांची समाधी उतरल्यावर, संत तुकामाईंनी त्यांना ‘ब्रम्हचैतन्य’ या नावाने संबोधले आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा मंत्र दिला. त्यांनी ‘त्या मंत्राच्या साहाय्याने भक्तांना मार्गदर्शन करा व परमार्थाची आवड लोकांमध्ये निर्माण करा, लोकसेवा करा’ असा उपदेश केला. त्यानुसार ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आचरण ठेवले. देशपरदेशातील हजारो भाविकांनी गोंदवलेकर महाराजांचा तो नामजप चालवला आहे. तुकामाईंनी त्यांचा देह जून 1887 मध्ये येहेळगाव येथे ठेवला. त्यांची समाधी तेथे आहे.

(पूर्वप्रसिद्धी - मासिक 'आदिमाता')

- डॉ. सुप्रिया अत्रे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.