आनंद शिंदे - सागर-संपत्तीचा अनमोल खजिना


आनंद शिंदेपुराणकाळातील समुद्रमंथनाची कथा सर्वांना माहीत आहे. सागरातील अनमोल संपत्तीची वाटणी करून घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यात ‘समुद्रमंथन’ झाले आणि त्यातून कितीतरी मूल्यवान गोष्टी बाहेर निघाल्या! खरोखरीच, सागराच्या तळाशी अनमोल संपत्तीचा खजिना असतो! कितीतरी चमत्कारिक आणि अद्भूत गोष्टी समुद्रात सापडतात व म्हणूनच सागराच्या तळाचा ‘शोध’ घेण्याचे काम सारखे चालू असते. शंख, शिंपले, कोरल्स हा सागरी संपत्तीचाच एक भाग आहे. अशा विविध गोष्‍टी गोळा करून त्यांचा प्रचंड मोठा खजिना जवळ बाळगणारे ‘हौशी छांदिष्ट’ पुण्यात आहेत. त्यांचे नाव आनंद माधव शिंदे.

आनंद शिंदे हे मुळचे पुण्याचे. ते नारायण पेठेत राहतात. त्यांचे वडील देहूरोडच्या दारुगोळा कारखान्यात नोकरीला होते. त्यांना वृत्तपत्रातील विविध विषयांवरील कात्रणे, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पत्ते, पक्ष्यांची पिसे गोळा करण्याचा छंद होता. वडिलांचा तोच वारसा आनंद शिंदे यांनी पुढे चालवला, मात्र तो शंख-शिंपल्यांच्या स्वरूपात.

शिंदे यांचे शालेय शिक्षण रमणबागेतील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांना ट्रेकिंगची आवड होती. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन ‘सायकल टुरीस्ट’ची स्थापना केली होती. त्यांना सायकलवरून ट्रेकिंगला जाताना रानावनात वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे दगड मिळायचे. ते गोळा करण्याचा त्यांना नंतर छंद लागला. मात्र एकदा ते कोकणपट्टीच्या किनाऱ्यावर गेले असता त्यांना समुद्रकिनारी वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे शंख-शिंपले सापडले. ते गोळा करून त्यांनी घरी आणले व त्याचवेळी त्यांनी शंख-शिंपले जमा करण्याचा निर्णय घेऊन टाकला. नंतर त्यांची भटकंती सुरू झाली ती फक्त समुद्रकिनाऱ्यावर. कोकणातील अलिबाग, गुहागर, हरिहरेश्वर, तसेच गोवा, चेन्नई, कन्याकुमारी आदी ठिकाणचे समुद्रकिनारे त्यांनी पालथे घातले. तेथील काही कोळीबांधव शिंदे यांच्या ओळखीचे झाले. कोळी समुद्राच्या खोलवर भागात जातात तेव्हा त्यांना शंख-शिंपले मिळतात. शिंदे यांनी कोळ्यांना भेटून त्यांच्याकडून दुर्मीळ शंख-शिंपले मिळवले. त्यासाठी सढळ हाताने पैसा खर्च केला. शिंदे यांच्या या गोष्टीचे ‘अप्रूप’ वाटून चेन्नई येथील कोळीवस्तीत राहणाऱ्या ‘दादा’ ने खुश होऊन त्यांना मोठा ‘गंधर्व-शंख’ भेट म्हणून दिला आहे! त्‍यानंतर एका मित्राच्‍या संग्रहासाठी तो 'गंधवशंख' आपण डोनेट केला असल्‍याचे शिंदे यांनी सांगितले. 

तमिळनाडूतील नागरकोईलच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या एका कोळ्याने शिंदे यांना एकदा तेथील आदिवासींच्या विवाह समारंभास आवर्जून नेले. तेथील आदिवासींच्या विवाह समारंभात उजव्या शंखाचे महत्त्व आहे. ते अतिशय दुर्मीळ मानले जातात. शिंदे यांनी तेथेच ‘उजवे शंख’ मिळवले. बंगालच्या उपसागरात मिळणारा ‘ग्लोरी ऑफ इंडिया’ नावाचा अतिशय दुर्मीळ म्हणून ओळखला जाणारा शंख शिंदे यांना अशाच एका भेटीत मिळाला आणि त्यांना त्यांच्या छंदाचे सार्थक झाले असे वाटले.

आरंभी, शंख शिंपल्यांमुळे घरात दारिद्र्य येते या गैरसमजातून त्यांना ते गोळा करण्यास घरातून विरोध झाला. पुढे, शिंदे यांनी शंखशिंपल्यांबाबत अधिकृत माहिती त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांच्या छंदाला घरच्यांचीही साथ लाभली. एकदा शिंदे कुटुंबासह कन्याकुमारीला गेले असताना तेथे त्यांना एका माणसाकडे अतिशय वेगळ्या प्रकारचा दुर्मीळ शंख असल्याचे समजले. मात्र त्या माणसाने त्याची किंमत खूपच सांगितली. शिंदे यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते, मात्र ती संधी हुकली तर पुन्हा तसा शंख मिळणार नाही असे लक्षात येताच त्यांच्या पत्नीने स्वत:हून त्यांचे मंगळसूत्र व इतर दागदागिने तेथेच विकून पैसे उभे केले!

शिंदे यांच्या संग्रहातील अतिशय दुर्मीळ म्हणजे ‘राशी-नक्षत्रांचा वास्तू शंख’. तो नैसर्गिकरीत्या घडलेला जगातील एकमेव शंख असावा असा शिंदे यांचा दावा आहे. प्रामुख्याने कॅरैबियन समुद्रात आढळणारा तो शंख शिंदे यांना चेन्नईत मिळाला. त्या शंखावर सिंह, मिथुन, मीन या राशींची चित्रे असून त्याशिवाय बदक, मोर आदी प्राणी आणि पक्ष्यांचीही हुबेहूब चित्रे आहेत. अर्थात ती चित्रे म्हणजे ‘प्रतीके’ आहेत असे शिंदे यांनी अभ्यासाअंती सांगितले. मात्र शिंदे यांच्यात संग्रहाची शान म्हणजे सर्वात मोठा ‘गंधर्व-शंख’! त्याची किंमत सुमारे दोन ते तीन लाख रुपये आहे!

शिंदे यांचा छंद केवळ ‘आवडी’पुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांंनी सागर-संपत्तीबाबत चिकित्सक पद्धतीने शोधही घेतला. त्यानुसार त्यांनी निसर्गाचा, विज्ञानाचा, आयुर्वेदाचा अभ्यास केला. त्या अभ्यासाच्या आधारे शिंदे सांगतात, की वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ‘मोतीशंख’ परिणामकारक ठरू शकतो. ते म्हणतात, की शंख-शिंपले हे मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीनेही गुणवर्धक आहेत. आयुर्वेदात तर ‘सुवर्ण-भस्म’, ‘मौक्तिक भस्म’, ‘प्रवाळ भस्म’ ही औषधे मान्य आहेत. शंख-शिंपल्यांपासून तयार होणारी ऊर्जा शरीरातील षड्चक्राच्या दृष्टीने उपयोगी ठरते. शिंदे यांनी शंख-शिंपल्यांपासून औक्षणपात्र तयार केले आहे. त्याे औक्षणपात्राचा औक्षणासाठी वापर केल्यास ‘कॉस्मिक एनर्जी’च्या वातावरण निर्मितीमुळे वेगळाच परिणाम साधला जातो असा शिंदे यांचा दावा आहे.

आनंद शिंदे यांचा सागर-संपत्तीविषयी लेख ‘शिक्षण संक्रमण’ या मासिकात प्रसिद्ध झाला होता. तो वाचल्यानंतर शाळांकडून शिंदे यांना पर्यावरण, राष्ट्रीय संपत्ती, वैद्यकीय शास्त्र यांच्याशी सागर संपत्तीचा असलेला संबंध आणि महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचे काम दिले जाते. शिंदे यांनी शाळांमध्ये पर्यावरण कार्यशाळा घेतल्या आहेत. त्या कार्यशाळांतून शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सागर-संपत्तीपासून औषधे कशी केली जातात, सागरातील वनस्पतींचे उपयोग, खारफुटी वने-त्यांचे औषधी उपयोग, उत्पादन यांबाबत सविस्तर माहिती दिली. शिंदे अकाउंटंट म्हणून नोकरी करत असत. त्यांनी छंदासाठी नोकरी सोडली. तेव्हापासून सागर-संपत्ती हाच त्यांचा पूर्णवेळचा ध्यास झाला.

शिंदे यांनी शंखशिंपल्यांपासून दागिने, शोभेच्या वस्तू‍, दिमाखदार समया तयार केल्या आहेत. त्यांंनी शंख-शिंपल्यापासून गणेशमूर्तीही तयार केल्या आहेत. त्‍या सर्व वस्तूंना चांगली मागणी आहे. त्या‍तूनच शिंदे यांचा चरितार्थ चालतो. याव्यतिरिक्त शिंदे यांच्याकडे ‘सागरसंपत्ती’विषयक विविध प्रकारची ‘नाणी’, ‘टपाल तिकिटे’, ‘पत्रिका’, ‘खेळातील पत्ते’ ‘काड्या-पेट्या’ आणि ‘मरीन-लाईफ’चा इतिहास सांगणारा खजिनाही आहे.

आपल्याकडील या खजिन्याचे पुण्यात कायमस्वरूपी ‘संग्रहालय’ व्हावे अशी शिंदे यांची मनीषा आहे.

आनंद शिंदे
९३७२४१०४२२
142, नारायणपेठ,
न. चि. केळकर मार्ग, पुणे - 411030

- श्रीकांत ना. कुलकर्णी

(सर्व छायाचित्रे - हर्षवर्धन कुलकर्णी - harshavardhan.kulkarni@gmail.com)

लेखी अभिप्राय

खुप छान माहिती मिळाली. खूप आनंद होतोय. आपणास खुप खुप शुभेच्छा.

पांडुरंग शंकर …22/05/2016

खुपच जगावेगळा छंद आहे
असे संग्रह करतांना खुप मेहनत घ्यावी लागते हे मी जाणतो। आणि त्या बरोबरच त्या वस्तुंची जोपासना करने सांभाळणे खुपच जिकरीचे आणि खर्चिक असते संयम कमालीचे लागते
मीही पोस्ट स्टैम्प माचिस बॉक्स आणि जुन्या वस्तुंचा संग्रह करतो मला ह्या सर्व गोष्टितून जावे लागते

ग्रंथमित्र नईम…10/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.