मेळघाटातील पोषणबागांचा माळी - मनोहर खकेपोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग

 

मनोहर खकेमेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे. त्यात पुण्यातील कृषितज्ज्ञ डॉ. मनोहर खके यांचा अनोखा शेती प्रयोग उल्लेखनीय आहे.

विदर्भातील मेळघाट हा परिसर गेली कित्येक वर्षे गाजतोय तो तेथील कुपोषणाच्या समस्येमुळे. कुपोषणाचा संबंध नेहमी आरोग्य व गरीबीशी तसेच साधनांच्या अभावाशी जोडला जातो. पण मेळघाटात त्या जोडीला इतरही अनेक समस्या असल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

मेळघाट
 

विदर्भात सातपुड्याच्या पर्वतरांगांतील विविध घाटांचा मेळ! धारणी, हातरू, बैरागड, हिराबंबई, रुई पठार इत्यादी भाग मेळघाटात येतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेले चिखलदरा हे देखील मेळघाटातच आहे. घनदाट जंगलांनी वेढलेला तो परिसर व्याघ्रप्रकल्पांतर्गत अभयारण्य म्हणून घोषित झालेला आहे. ‘कोरकू’ ही तेथील वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी जमात व भाषासुद्धा. त्याशिवाय, गोंड, कोलाम यांसारख्या जमातीदेखील त्या भागात आहेत. सिपना व खंडू नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या मेळघाटातील आदिवासी लोक मुख्यत: शेती व जंगल संपत्तीवर गुजराण करतात. ते लोक त्यांची प्राचीन संस्कृती जपून आहेत.

अत्यंत विषम व तीव्र हवामान हे मेळघाटचे आणखी एक वैशिष्ट्य. थंडीत पाच अंश तर उन्हाळ्यात पंचेचाळीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान आणि पावसाळ्यात धुवांधार पर्जन्यवृष्टी व पूर असे टोकाचे निसर्गाविष्कार मेळघाटवासीयांना नित्याचे. अशा प्रतिकूल परिस्थितीच्या जोडीला दळणवळण व संपर्क साधनांचा अभाव, शैक्षणिक व आरोग्य सुविधांची कमतरता, दूर दूर अंतरावरील आदिवासी गाव/पाडे, अंधश्रद्धा व शासकीय पातळीवरील अनास्था यांमुळे मेळघाट वर्षानुवर्षे कुपोषणाच्या समस्येने ग्रस्त आहे.

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तर पावसाळ्यात नदी-नाल्यांना येणारे पूर व तुटलेला संपर्क. तशात वेळेवर तातडीचे उपचार मिळू न शकल्याने तेथे लहान बालके कुपोषणाने मोठ्या प्रामाणात मृत्युमुखी पडतात. अंधश्रद्धेचा पगडा व अडाणीपणा यांमुळे स्थानिक वैदू, भगत तसेच सावकार लोक त्यांचा कार्यभाग बेमालुमपणे साधून घेतात. त्यामुळे कुपोषणासोबत दारिद्र्य आणि त्यातून पुन्हा कुपोषण असे दुष्टचक्र सुरू राहते.

व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवरील प्रयत्न

 

कुपोषणाच्या समस्येमुळे गाजत असलेल्या मेळघाटासाठी शासनाने अनेक योजनांचा रतीब सुरू केला पण नेहमीप्रमाणेच प्रभावी अंमलबजावणीच्या अभावी त्या योजना आदिवासींपर्यंत धडपणे पोचल्या नाहीत. त्यामुळे त्यांची स्थिती किंचितही सुधारली नाही. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू या साऱ्याची माध्यमांतून सातत्याने चर्चा होत राहिल्याने अनेक स्वयंसेवी संस्था व सेवाभावी व्यक्ती मेळघाटात मदतीसाठी धावल्या. आजच्या घडीला अशा सुमारे साडेचारशे संस्था मेळघाटात कार्यरत आहेत. वानगीदाखल काही नावे सांगायची झाली तर ‘मेळघाट मित्र’, ‘संपूर्ण बांबू केंद्र’, ‘खोज’, ‘मॉरल इंडिया’ इत्यादी.  पण तरीही समस्या ‘जैसे थे’च आहे.

निसर्ग व जमिनीच्या ताकदीवर कमालीचा विश्वास बाळगून शेतीत वेगवेगळे प्रयोग यशस्वी करून दाखवणारे कृषितज्ज्ञ डॉ. मनोहर खके यांनी पोषणबागांच्या माध्यमातून कुपोषणावर मात करण्याचा आगळावेगळा प्रयोग मेळघाटात प्रथमच सुरू केला.

मेळघाटातील जमीन व पर्यावरण शेतीसाठी पोषक आहे. त्या जमिनीत जर फळझाडे व भाजीपाला यांची लागवड केली तर माणसांबरोबरच पशू-पक्ष्यांच्याही कुपोषणाचा प्रश्न सुटू शकेल या विचाराने डॉ. खके यांनी अमरावती-इंदूर मार्गावरील उतवली येथे तीन एकर परिसरात तशा प्रयोगाला सुरुवात केली. आंबा, काजू, फणस, नारळ, चिकू, पेरू, डाळिंब, सीताफळ, रामफळ, केळी यांसारखी फळझाडे, कलिंगड, खरबुजाचे वेल, गुलाब, जास्वंद यांसारखी फुलझाडे त्या परिसरात रुजवून खके यांनी तेथे जणू मिनी कोकणच उभे केले आहे. त्या भागाला त्यांनी ‘कर्मग्राम’ असे संबोधले. त्यांनी तो प्रयोग ‘महात्मा गांधी आदिवासी दवाखान्या’च्या परिसरात केला.

त्यांनी आसपासच्या आदिवासी भागात परसबागेच्या संकल्पनेचाही प्रसार केला. त्यांनी आदिवासींना टोमॅटो, वांगी, भोपळा, वाल, शेवगा, रताळी, साबुकंद व भाजीपाला यांची परसबागेत लागवड करण्याचे तंत्र शिकवून घरच्या घरीच नित्य खाण्यायोग्य अशा पोषक भाज्या मिळवण्याची सोय करून दिली. त्यासाठी खके यांनी वनस्पतींच्या स्थानिक जाती शोधून त्यांच्या प्रसारावर अधिक भर दिला. परसबागेसाठी घरातील सांडपाण्याचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे रस्त्यावर इतस्तत: पसरणारे सांडपाणी तर सत्कारणी लागले. स्वच्छताही होऊ लागली. ‘या परसबागा म्हणजे पोषणबागा आहेत. कारण आदिवासींची कुपोषणाची समस्या दूर करण्याची ती नैसर्गिक उपाययोजना आहे’ असे खके सांगतात. विशेष म्हणजे हे सारे निसर्गाच्या शक्तीनेच झालेले असून त्यासाठी वेगळी खते किंवा किटकनाशके यांपैकी काहीसुद्धा वापरलेले नाही. वनस्पती शास्त्र आणि पर्यावरण यांचा मेळ साधून मेळघाटात फुलवलेले ते नंदनवनच आहे.

मेळघाटात आज अशा परसबागांची संख्या हजारांवर पोचली आहे. ऋषीकेश खिलारे व अन्य तरुण यांचा गट ‘मॉरल इंडिया’च्या माध्यमातून खके यांचे ते काम विस्तारण्याच्या प्रयत्नांत आहेत.

मनोहर खके
 

मनोहर खके हे मूळचे विदर्भातले. अमरावतीजवळच्या  वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे त्यांचा जन्म झाला. अमरावतीला कृषी महाविद्यालयात त्यांनी शेती विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि अकोल्याच्या 'पंजाबराव कृषी विद्यापीठा'तून 'मृदा विज्ञान' या विषयातून त्यांनी एम.एस्सी. केले. वर्ध्याचे 'ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र', पनवेल येथील 'कुष्ठरोग निवारण समिती', 'युसूफ मेहेरअली सेंटर' अशा काही संस्थांच्या सोबतीने त्यांनी कामे केली.

मनोहर खके गेली अनेक वर्षे शेतीत अनोखे प्रयोग करत आहेत. त्या प्रयोगांमागे केवळ व्यावसायिक दृष्टिकोन नसतो तर त्याद्वारे सामाजिक भान जपण्याचेही त्यांचे उद्दिष्ट असते.

शेतीतील तंत्रज्ञानापेक्षा शेतीतील विज्ञान तरुणांना समाजावून द्यायला हवे असे खके यांचे मत आहे. तंत्रज्ञान म्हणजे स्थानिक साधनांच्या मदतीने स्थानिक गरजेतून स्थानिक लोकांनी, स्थानिकांसाठी निर्माण केलेले विज्ञान असे खके मानतात. फार्म आर्किटेक्ट, प्लाँट गायनॉकॉलॉजी या खके यांच्या अनोख्या संकल्पना आहेत. गांडुळाच्या मुत्रापासून बनवलेल्या ‘वर्मी वॉश’ या बुरशीनाशकाचे ते जनक आहेत. त्यांनी गायीचे शेण व गोमूत्रावर आधारित अनेक प्रयोग यशस्वीपणे साकारले आहेत.

मनोहर खके स्वत: शेतकऱ्यांना/ शेतीसंस्थांना शेतावर जाऊन शेतीसंबंधी सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करतात. ते ‘शेतीतील अंधश्रद्धा’ या विषयावर व्याख्याने देतात. जपानमधील नैसर्गिक शेतीचे प्रणेते मासानोबू फुक्नओका तसेच, ‘द्राक्षमाऊली’ म्हणून गौरवले जाणारे ‘विपुलात सृष्टी’, ‘केल्याने होत आहे रे’ यांसारख्या पुस्तकांचे लेखक प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ. श्रीपाद दाभोलकर हे खके यांचे आदर्श आहेत.

सीड बँक
 

मेळघाटात पळस, साग व बांबू हे वृक्ष विपुल संख्येने आढळतात. ऋषीकेश खिलारे व त्याचे तरुण मित्र ‘सीड बँके’च्या उपक्रमाद्वारे तेथील जंगलातील वृक्षांची विविधता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व परिचित यांना फळांच्या बिया साठवून ठेवून त्या ‘सीड बँके’त जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्या बिया मेळघाटच्या जंगलात पेरून तेथे वृक्ष विविधतेबरोबरच जैवविविधता निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. वाचकही त्यांचे योगदान या अनोख्या उपक्रमात सहजतेने देऊ शकतील. ऋषीकेश खिलारे यांच्याशी 9325665122 या क्रमांकावर किंवा डॉ. खके यांच्याशी 9423119427, 9011038065 या क्रमांकांवर किंवा manoharkhake@yahoo.co.in या इमेलवर  संपर्क साधता येईल.

मानसशास्त्र या विषयातील तज्ज्ञ असलेला ऋषीकेश खिलारे हा मूळ बीडचा तरुण मेळघाटात ‘मॉरल इंडिया’च्या माध्यमातून नशामुक्तीचे काम करत आहे. कुपोषणाच्या समस्येची मूळे व्यसने व त्याच्या खाण्यापिण्याच्या व वागण्याच्या सवयींमध्ये दडलेली आहेत हे त्याला अभ्यासाअंती कळले व त्यानुसार तो ‘नशामुक्तीकडून कुपोषण मुक्तीकडे’ हे अभियान राबवत आहे.

- दिनेश अडावदकर

लेखी अभिप्राय

Excellant & thanks to know about Manohar Khake and Rushikesh. It's admirable to work in Melghat. Salute to both of themand of course your team that you gave us opportunity to meet these type of people through thinkmaharashtra.com

SANTOSH K MORE26/02/2015

Jai Shri Krisna. Apratim. Same efforts has to be replicated. Great! Abhar. Raju Gandhi.

Raju Gandhi 29/10/2015

खुपच छान उपक्रम सुरू केला आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

संजय ठाकुर. पुणे 25/09/2016

Kaka khup chhan

Pranay yadav21/10/2016

Atishay stutya upakram Mangal.
Wish you all the best in your mission.

Dr Katoley22/10/2016

NICE YOUR MISSION

VAISHALI RAJU …25/01/2017

Good work kaka sarvansathi tumhi ek prerna ahe

manisha sarnot pune04/03/2017

सर खुप छान देशी भाजी पाला व देशी वान याचेपन सीड बाँक केली आहे काय़

सतिश सुर्यवंशी17/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.