राज ठाकरे यांची भाषणे - करमणुक की भ्रष्टाचारावर हल्ला!


डॉ. यश वेलणकर     गेले चार दिवस सर्व मराठी न्यूज चॅनेलवर पुन्हा पुन्हा दाखवले जाणारे एक प्रक्षेपण तुफान लोकप्रिय झाले आहे. ते म्हणजे राज ठाकरे यांची महाराष्ट्र दौर्‍यातील भाषणे! राज ठाकरे यांनी केलेल्या नकला, विनोद आणि त्यांच्या काकांच्या शैलीत इतरांची केलेली चेष्टा यांमुळे ती भाषणे करमणूक करणारी होती. पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटणारी होती. त्यांनी ‘पिचड’ या आडनावावरून केलेली चेष्टा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी असली तरी त्याला समोर जमलेली किंवा जमवलेली गर्दी जोरात प्रतिसाद देत होती. पण ती भाषणे - तो करमणुकीचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणार्‍या एका नेत्याचे ते विचार आहेत हे लक्षात घेऊन - ऐकली की काही गोष्टी स्पष्ट होऊ लागतात.

     राज ठाकरे आणि त्यांनी स्वतःभोवती उभा केलेला थिंक टँक (वैचारिक शिदोरी) यांनी असे धोरण ठरवलेले दिसते, की मुंबई-नाशिक परिसरात परप्रांतीयांच्या विरूद्ध ओरडा करायचा. पण तसा ओरडा मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात उपयोगी पडणारा नाही, त्यामुळे जालन्याला मराठवाड्यातील दुष्काळ आणि राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार याविरुद्ध बोलायचे.

करमणुक की भ्रष्टाकचारावर हल्ला      राज ठाकरे यांची एक खास शैली आहे. ते भाषणात त्‍यांच्‍या बोलण्याला आधार देणारे काही कागद वाचून दाखवतात. ती ‘शिदोरी’ सतत त्यांच्या बरोबर असते. यावेळी त्यांनी ‘तहलका’चे अंक वाचून दाखवले. त्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या तेरा वर्षांत कोटीच्या कोटी रुपयांचे पाणी केवळ राष्ट्रवादीच्या नव्हे तर भाजप, शिवसेनेसहित सर्वच राजकीय नेत्यांच्या शिवारात कसे मुरवले गेले याच्या कहाण्या आहेत. महाराष्ट्रभर पसरायचे तर केवळ परप्रांतीयांचा मुद्दा उपयोगी पडणार नाही हे वास्तव लक्षात घेऊन आखलेले भ्रष्टाचाराविरूद्धचे धोरण केवळ सभा गाजवण्यापुरते आहे, की राज ठाकरे खरोखरच भ्रष्टाचाराविरूद्ध लढा उभा करणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे. आणि तो लढा म्हणजे केवळ आरोप, रस्त्यावरील मोर्चे, झटापटी अशा स्वरूपात न राहता तो न्यायालयात, विधानभवनात मांडला जातो का ते पाहणे महत्त्वाचे आहे. (यापूर्वीही गो. रा. खैरनार, गोपीनाथ मुंढे, अण्णा हजारे यांनी अनेकांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध ‘ट्रकभर’ पुरावे असल्याचे दावे करून आरोपांची राळ उडवली होतीच!) तसे झाले नाही तर भ्रष्टाचाराच्या सर्व राजकीय पक्षांच्या ‘मिलीभगत’मध्ये राज ठाकरे त्‍यांचा वाटा मागत आहेत असेच जनतेला वाटेल आणि मग राज ठाकरे यांची भाषणे हा दुष्काळाचा क्षणभर विसर पाडणारा करमणुकीचा कार्यक्रम म्हणून ‘एन्जॉय’ केला जाईल.

-  डॉ. यश वेलणकर
मोबाइल – ९४२२०५४५५१
इमेल – yashwel@yahoo.co.in

 

अपेक्षा, अनुभव आणि पुढे...
-     सूर्यकांत कुलकर्णी

सूर्यकांत कुलकर्णी     कुमार केतकर टीव्हीवरील एका चर्चेत म्हणाले होते, की “ गेल्या पन्‍नास वर्षांत महाराष्ट्राला यशवंतरावांनंतर कोणी द्रष्टा नेता लाभला नाही. नव्याने येत असलेल्या नेतृत्वात राज ठाकरे यांच्‍या रूपाने तसे नेतृत्व महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे”.

     माझेही तेच मत असल्याने मी राज ठाकरे यांना पत्र लिहून त्‍यांच्‍या उदयोन्मुख नेतृत्वाकडून काय अपेक्षा आहेत हे लिहिले होते. मी त्यात विधानसभा निवडणुकीत मनसेला बारा-पंधरा जागा मिळतील असे लिहिले होते. माझा तो अंदाज खरा ठरला. (मला त्‍या पत्राची पोच मिळाली नाही.)

राज ठाकरे यांची जमेची बाजू थोड्याच कालावधीत राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेता ही आहे.      द्रष्ट्या नेतृत्वाकडून ज्‍या अपेक्षा असतात त्यातील बऱ्याच अपेक्षा राज ठाकरे पुऱ्या करू शकतात तशी क्षमतात्‍यांच्‍या अंगी जाणवते. त्यांची जमेची बाजू थोड्याच कालावधीत राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेता ही आहे. तिला लोकप्रियता म्‍हणण्‍यापेक्षा  करिश्‍मा म्‍हणू. त्‍यांनी त्‍या लोकप्रियतेचा, त्‍या ग्‍लॅमरचा फायदा करून घ्यायला हवा. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी हजारो लोक जमतात. राज्यात किती राजकीय नेत्यांना हे भाग्य आहे? मंत्र्यांसाठी गर्दी जमते ती त्यांच्‍याकडून काही हवे असणाऱ्यांची! मला काही नको - मी केवळ त्यांना बघण्यासाठी आलो आहे, असे चाहते किती पुढा-यांना लाभतात? लोक त्‍यांचा पैसा आणि वेळ खर्च राजच्‍या सभांना येतात, त्‍याची दाखल त्यांनी घ्‍यायला हवी.

     राज ठाकरे यांच्‍या राज्यातील दौ-यात त्यांच्या लोकप्रियतेची प्रचीती प्रत्येक ठिकाणी आली. त्‍या लोकप्रियतेला, त्‍या उत्‍सुकतेला त्यांनी  कॅश करायला हवे. ते काही प्रमाणात होत आहे. ते अधिक वेगाने होण्याची गरज आहे. मात्र जनतेच्‍या प्रचंड आदरभावाची घ्यावी तशी दाखल घेतली जात नाही.

     मनसे स्‍थापन होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मुंबई-ठाणे-नाशिक वगळता राज्यात त्यांच्या कामाची फारशी माहिती सामान्यांना नाही. पण राज्यात ज्या पद्धतीने त्यांनी फिल्डिंग लावायला हवी होती ती लावली नाही. लोकांकडे निवडणुकीदरम्यान जाऊन बोलणे आणि काही मागायला जाण्‍यापूर्वी बोलणे यात फरक आहे. लोकांना तो फरक कळतो. म्हणून त्यांनी जनतेचे विषय जसे, गरिबी, पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, स्त्रियांचे प्रश्न, असे काही विषय निवडून लोकांशी बोलायला हवे.

     आम्‍ही त्‍यांना द्रष्टा नेता म्हणून का पाहतो? तर आमचा असा समज आहे, की राज ठाकरे यांचा लोकांच्‍या प्रश्नांचा अभ्यास आहे – त्यांना चांगली समज आहे. स्वतःची भूमिका आहे, उद्याचा महाराष्‍ट्र कसा असेल याबाबत त्‍यांचे चिंतन आहे. त्‍यांच्‍याकडे संघटन शक्ती आहे. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

     मनसेने लोकांचे प्रश्न घेऊन बोलले पाहिजे. भांडले पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून अभ्यासपूर्ण पद्धतीने सरकारला वेठीस धरायला हवे – ते होताना दिसले नाही. मनसेने सरकारची कोंडी केल्याचे कधी ऐकले नाही. विरोधी पक्ष म्हणून ते करण्याची नितांत आवश्यकता आहे.

     विरोधी पक्षाचे सरकारची कोंडी करणे हे एकमेव काम नाही. जनतेचे प्रश्न मांडणे आणि ते लावून धरणे या गोष्‍टीही महत्‍त्वाच्‍या आहेत. विधिमंडळात मनसेच्‍या प्रतिनिधींनी अभ्यासपूर्ण भाषणे करून सर्वांचे लक्ष वेधल्याचे किती प्रसंग? दुर्दैवाने एवढे प्रश्न आणि अडचणी आहेत, की त्या मांडून सरकारचे आणि लोकांचेही लक्ष त्याकडे वेधायला हवे. उदा. राज्यातील पाण्याचा प्रश्‍न. उन्हाळा आला म्हणून त्‍या प्रश्नावर खूप बोलले जाते. मनसेने तो प्रश्न ऑगस्ट-सप्टेंबरमधेच उचलायला हवा होता. राज्यातील मराठी शाळा संपत आहेत, नवीन निर्माण होत नाहीत – तसे सरकारचे धोरण आहे. त्‍याकडे मनसेने दुर्लक्ष केले. लोकमत सकारात्मक करण्याचे हे विषय. प्रश्न केवळ विधिमंडळात मांडणे हा एकच भाग नाही – तर लोकांसोबत, मंत्र्यांसोबत, तज्ञांसोबत अशा चर्चा व्हायला हव्या होत्या.

     राज ठाकरे यांना कला-क्रीडा-संस्‍कृती यांची उत्तम जाण आहे. ते सुसंस्‍कृत व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सिनेमा, गाणे, खेळ अशा अनेक क्षेत्रांशी व लेखक, समीक्षक, नाटककार, उद्योगपती अशा मान्‍यवर व्‍यक्‍तींशी जवळचे संबंध आहेत. त्यांना ते विषय कळतात. त्यांना त्‍यावर काम करणे सहज शक्य आहे. त्‍यांनी विरोधी पक्षात असतानाही त्‍या दृष्टीने काही हालचाल करायला हवी. त्‍यांनी राज्याचे सांस्कृतिक धोरण आखण्यामध्ये भाग घ्यायला हवा होता.

     राज्य करण्यासाठी सैनिक लागतात. मनसेची त्‍या दिशेने वाटचाल मंद वाटते. राज्यात जिथे शक्य तिथे शाखा, कार्यक्रम सुरू व्हायला हवे. मनसेचा कार्यकर्ता म्हणजे काय? ते निश्चित ठरवून कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक तालुक्यात आणि पुढे गावात तयार व्हायला हवी. कार्यकर्ते झाल्याशिवाय कार्यक्रम नाही –सततच्‍या कार्यक्रमांतून संस्था उभारणी होईल. संस्‍थेकडून कार्य वाढेल.. असे हे चक्र आहे. त्‍याकडे मनसेने कमी लक्ष दिले आहे. पूर्वी भाजपने हीच चूक केली होती. संस्थात्मक बांधणी केली नाही. एकदा गोपीनाथ मुंढे म्हणाले होते, की एक सभा घ्यायची तर सारी व्यवस्था आम्हालाच करावी लागते, अगदी सतरंजीपासून जेवण-वाहन वगैरे. त्यानंतर त्यांनी एकदम दहा-बारा साखर कारखाने सुरु केले. मी त्‍यांना काही दिवसांनी भेटलो. ते म्‍हणाले, की ‘आता कसा फरक पडला! सारी व्यवस्था आपोआप होते!’

      म्हणजे मनसेने कारखाने काढावेत असे नाही, कार्यकर्त्यांची बांधणी महत्‍त्‍वाची. आम्ही सत्‍तेवर आल्‍यावर काम करू असे म्हणून उपयोगाचे नाही. ते विरोधी गटात असतानाच करायला हवे.

राज ठाकरे, कार्यकर्ते वाढवूनच तुम्ही राज्यावर येणार आहात आणि ते करणे सोपे आहे. कारण लोकांना तुम्ही हवे आहात! लोकांनी तुम्हाला मान्य केले आहे - आता फक्त त्यांना एकत्र गुंफा. तुमच्‍या समोर गर्दी होते, त्या गर्दीला कार्यकर्त्यांत कसे बदलता येईल? ते पाहा.

     राज ठाकरे यांना विकास म्हणजे काय? हे चांगले कळते. ते उद्याचा महाराष्ट्र कसा असेल ते पाहू शकतात. त्यांना काय अपेक्षित आहे हे त्यांनी लोकांसमोर मांडायला हवे. त्‍याचे दोन फायदे होतील. एक म्हणजे लोक त्यात काही सूचना देऊ शकतात, त्या घेऊन पुढे सरकले तर ‘लोकांनी मिळून पाहिलेले स्वप्न’ असा त्‍याचा अर्थ होईल. लोकांना असे काही स्वप्न दाखवणे हे महत्‍त्‍वाचे आहे. त्याचा काय उपयोग होतो याचा अ‍मेरिकेतील दाखला समोर आहे. ‘आय हॅव अ ड्रीम’ने अमेरिका बदलू शकते हे आपण पाहिलेले आहे. राज यांनी त्यांचे उद्याच्या महाराष्ट्राचे स्वप्न घेऊन लोकांकडे गेले पाहिजे.

सूर्यकांत कुलकर्णी
स्वप्नभूमी, इंदू, प्‍लॉट क्र. 8,
खेरवाडी सोसायटी, आनंदनगर,
पुणे – 51
मोबाइल - 9822008300
इमेल - suryakantkulkarni@gmail.com

सर्व छायाचित्रे ‘महाराष्‍ट्र नवनिर्माण सेने’च्‍या संकेतस्‍थळावरून साभार.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.