देवरायांनी झपाटलेला संशोधक – उमेश मुंडल्ये


देवरायांचे अभ्यासक उमेश मुंडल्येवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये विज्ञान विभागात एम.एससी. करणा-या एका विद्यार्थ्याने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेतला होता. त्‍या स्पर्धेत त्याच्या वाट्याला अभ्यास व सादरीकरण यासाठी ‘देवराई’ हा विषय आला होता. कोकणात गाव असलेल्या त्या तरूणाला देवराई (कोकणातील लोकांसाठी रहाटी किंवा देवरहाटी) हा विषय अनोळखी नव्हता. पण स्पर्धेच्या निमित्ताने त्याचे त्‍या विषयाकडे नव्याने लक्ष वेधले गेले. विषयाची तयारी करताना त्याला अंदाजही नव्हता, की हा देवराईचा विषय पुढे त्याच्या ध्यासाचा, अभ्यासाचा आणि व्यवसायाचाही महत्त्वाचा भाग होणार आहे. त्‍याच विषयावर केलेल्या संशोधनाबद्दल त्याला डॉक्टरेट मिळणार आहे. त्या तरुणाचे नाव होते उमेश मुंडल्‍ये. त्यांनी ‘भारतीय परंपरागत ज्ञानाच्या आधारे महाराष्ट्रातील देवरायांचे संवर्धन’ या विषयावर पी.एचडी. केली आहे.
 

उमेश यांचा जन्म डोंबिवलीचा असून तेथेच स्वामी विवेकानंद आणि स. वा. जोशी विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले. तेथील पेंढरकर महाविद्यालयात त्यांनी विज्ञान विषयात पदवी (बी.एससी.) मिळवली. त्‍यानंतर कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण (एम.एससी.) घेतले. त्यांनी कॉलेजमध्ये निवडलेला वनस्पतीशास्त्र (बॉटनी) हा विषय मुलींचा म्हणून गणला जाई. (त्‍या विषयात शिक्षण घेतलेल्यांना पुढे नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने कमी संधी होत्या. त्यामुळेच बहुधा ज्यांना केवळ नावापुढे पदवी जोडली जाणे महत्त्वाचे वाटे अशा बहुसंख्य मुली त्‍या विषयाकडे वळत.) त्यांनी त्‍या विषयाची निवड केल्यावर अनेकांनी त्यांना मूर्खात काढले होते. (त्या काळी बॉटनी विषयातील टिश्यु कल्चर वगैरेला वलय निर्माण झाले नव्हते.) मात्र या अडचणीच आपल्यासाठी ‘स्टेपिंग स्टोन्स’ ठरतील अशा विश्‍वासाने त्यांनी आपली आवड असलेल्या वनस्पतिशास्त्र या विषयाची निवड केली. भारतात प्राचीन काळातील ऋषीमुनींपासून प्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्यापर्यंत अनेकांनी वनस्पतिशास्त्राचा सखोल अभ्यास केला आहे. ते ज्ञान केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनातही आपण कळत-नकळत त्याच्या संपर्कात येत असतो. त्‍यामुळे उमेश मुंडल्ये यांनी विचारपूर्वक वनस्पतिशास्त्र हा विषय निवडला. शिंपी व देवधर या त्यांच्या शिक्षकांमुळे त्यांना टॅक्सॉनॉमी या झाडांची ओळख पटवण्याच्या शास्त्राची गोडी लागली. त्‍याच गोडीतून त्यांनी पुढे स्पर्धेत देवराई या विषयावरील अभ्यास केला.
 

अज्ञात वृक्षधन – ‘देवराई’एम.एससी. झाल्यावर पेंढरकर महाविद्यालयातच त्यांना प्राध्यापक म्हणून शिकवण्याची तात्पुरती संधी मिळाली. त्यांनी आठवड्याभरात करण्याचे काम त्यांच्याकडून चार दिवसांतच पूर्ण होत असे. उरलेल्या दोन दिवसांत पर्यावरणविषयक काही काम करावे असा त्यांचा विचार होता. त्यांची ती आवड व देवराई या विषयाचा त्यांचा अभ्यास याबद्दल माहिती असलेल्या प्रा. बागुल यांनी संजय देशमुख यांना त्यांच्याविषयी सांगितले. देशमुख हे पर्यावरणविषयक प्रसिद्ध संस्था बी.एन.एच.एस. (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) मध्ये प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी उमेश मुंडल्ये यांना बी.एन.एच.एस.मध्ये रिसर्च फेलो व डॉक्टरेट करण्यासाठी अर्ज करायला सांगितले. केवळ दोन-तीन जागांसाठी पन्‍नास-साठ जणांची निवड मुलाखत-परिक्षेसाठी करण्यात आली होती. वीस जणांच्या समितीने घेतलेल्या मुलाखतीनंतर मुंडल्ये यांची निवड झाली. 
 

जागतिक बँकेने दिलेल्या निधीतून महाराष्ट्रातील देवरायांची काय परिस्थिती आहे याविषयी पाहणी, अभ्यास करण्याचा प्रकल्प बी.एन.एच.एस.मध्ये करण्याचे ठरले. उमेश मुंडल्ये यांची निवड त्‍या प्रकल्पासाठी झाली. त्‍यापूर्वी प्रसिद्ध संशोधक माधव गाडगीळ व वर्तक यांनी तीस वर्षे देवरायांवर संशोधन करून पुणे -सातारा -सांगली या विभागातील चारशे देवरायांचा अभ्यास केला होता. त्यांनतर देवराई या विषयावर उमेश मुंडल्ये यांनीच सखोल अभ्यास केला आहे. मुंडल्ये यांनी सुरुवातीला सावंतवाडीमधील देवरायांना भेट देण्याचे ठरवले. त्यावेळी रेव्हेन्यू खात्यात त्यांनी चौकशी केली असता तेथे तब्बल साडेचारशे देवराया असल्याचे त्यांना कळले.
 

देवराईत याप्रकारच्या– भल्यामोठ्या वेली आढळतात.त्‍यांनी १९९७ ते २००१ या चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात ३७८३ देवराया असल्याचे दाखवून दिले. त्‍यासाठी त्यांना सरकारच्या रेव्हेन्यू खात्यातील नोंदींचा उपयोग झाला. त्यापैकी सुमारे १४५० देवरायांना त्यांनी स्वतः भेट दिली आहे. त्‍या भेटींदरम्यान त्यांनी संशोधनासाठी एक माहिती तक्ता तयार करून त्यात देवराईचे क्षेत्र, तेथे कोणती झाडे आहेत, तेथून गाव किती अंतरावर आहे, किती अंतरावर एस.टी येते. इत्‍यादी मुद्दे नोंदवले. 
 

मुंडल्‍ये यांना त्‍याच अभ्यासादरम्यान अद्भुत म्हणता येतील अशा अनेक गोष्टी दिसल्या. देवराईतील जंगलांमध्ये स्थानिक गावकरी झाडे तोडत नाहीत. काही ठिकाणी देवराईत चप्पल घालून जायला मनाई असते. (अशा घनदाट जंगलात विनाचपलेचे वावरणे बिकट असल्याने कुणी तेथे फारसे जात नाही व ते जंगल आपोआप संरक्षित राहते असा विचार कुणीतरी जुन्या जाणत्याने केला असावा असे मुंडल्ये यांना वाटते.) काही ठिकाणी विळा/कोयता नेला तर चालते, पण कुर्‍हाड मात्र नेण्यास सर्व ठिकाणी बंदी असते. (त्‍यामागे अशा ठिकाणाहून कोयत्याने तोडण्यासारख्या वाळक्या लहान फांद्या सरपणासाठी आणता याव्यात, पण कुर्‍हाडीने मोठी झाडे तोडली जाऊ नयेत असा विचार असू शकतो.) प्रत्येक देवराईमध्ये एक किंवा अनेक देव असतात. काही ठिकाणी त्यांची रीतसर देवळे असतात तर काही ठिकाणी झाडाखालीच त्यांची स्थापना असते. चंद्रपूर -गोंदिया अशा आदिवासींच्या भागातील देवरायांमध्ये हत्तिदेव, घोडेदेव, वाघदेव असे प्राण्यांवर आधारित देव आहेत. काही ठिकाणी बांबूच्या वनात असलेल्या दैवताला कळकाई, वडाच्या झाडाखाली असलेल्या देवाला वडजाई अशी देवींची नावे असतात. कोकणात ब्रह्मदेवाच्या नावाने असलेल्या दोन देवराया आहेत. कोणताच देव नसल्यास बहुतेक ठिकाणी शंकराचे देऊळ देवराईत आढळते. अशा देवळांमध्ये गावातली मंडळी महिन्यातून एका दिवशी जमतात.
 

देवराईतील वेली एवढ्या मोठ्या असतात, की त्यांच्यासमोर माणसेही खुजी भासतात.देवराईमध्ये पाण्याचे उत्तम नैसर्गिक साठे असल्याचे दिसून आले आहे. कोकणातील कुडावळे या गावाजवळील देवराईतून तर नदीचा उगम होतो. भिमाशंकर परिसरातील डोण गावातील देवराई गावापेक्षा उंचावर आहे. गावातील विहिरी जानेवारी-फेब्रुवारीमध्येच सुकतात. मात्र उंचावर असलेल्या देवराईतील विहिरीला बारमाही पाणी असते. देवरायांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती व सजीव सृष्टी दिसून येते. अनेक वनस्पतींची आगळ्या रीतीने वाढ झालेली दिसते. अनेक वर्षे वनस्पतिशास्त्र शिकवणा-या एका प्राध्यापकांनी आंब्याच्या झाडाखाली उभे राहून, ‘हे कोणते झाड आहे?’ असा प्रश्न मुंडल्ये यांना विचारला होता. अर्थात यामध्ये त्यांची विशेष चूक नसून त्यांना देवराईमध्ये होणा-या झाडांच्या वाढीबद्दल माहिती नसल्यामुळे असे झाले असल्याचे मुंडल्ये यांनी सांगितले. देवराईमध्ये झाडे एकमेकांपासून खूप जवळजवळ असतात. त्यामुळे सुर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्यांची वाढ सरळ रेषेत वरवर होत जाते. वर उल्लेख केलेल्या प्रसंगातील आंब्याचे झाड शंभराहून अधिक फूट उंचीचे आहे. त्याच्या बुंध्याला साठ-सत्‍तर फुटानंतर फांद्या फुटल्या आहेत. त्यामुळे ते झाड ओळखणे कठीण झाले आहे. अनेक देवरायांमध्ये मुंडल्ये यांनी दहा मीटर (सुमारे तेहतीस फूट) एवढा मोठा घेर असलेले वृक्ष पाहिले आहेत. एवढेच नाही तर दोन मीटर (सुमारे सहा फूट) घेर असलेल्या वेली त्यांनी बघितल्या आहेत. दातपाडी नावाचे झुडुपवजा झाड त्यांनी देवराईमध्ये वीस-पंचवीस फूट एवढे मोठे झालेले पाहिले आहे.
 

त्‍यांनी देवरायांच्या अभ्यासादरम्यान ३६६८ देवरायांची नोंद केली. १०६८ वनस्पतींची ओळख पटवली. (गंमत म्हणून आपण झाडांच्या नावांची यादी करायची म्हटली तरी ती पंचवीसच्या वर जाणार नाही, हे बघता या संशोधनामुळे थक्क व्हायला होते.) या सर्व संशोधनासाठी त्यांनी खूप भटकंती (खरेतर पायपीट) केली आहे. किर्र जंगलात एकट्याने फिरताना त्यांना कधीही भीती वाटली नाही. त्‍याला अपवाद म्हणून फक्त एका देवराईमध्ये त्यांना आत शिरताना मनामध्ये अनामिक भितीची भावना जागृत झाल्याचे त्यांनी सांगितले. पण एरवी त्यांच्या मते देवराईमध्ये अत्यंत शांत, अद्भुत वातावरण असते. आपल्याला खूप ताजेतवाने, उत्साही वाटते.
 

सुमारे शंभर फूट उंचीचे आंब्याचे झाड. याची पहिली फांदी सत्तर फुटांपासून सुरू होते.देवरायांमध्ये घनदाट वृक्षराजी असली तरी महाराष्ट्रातील बहुसंख्य देवराया या खासगी किंवा रेव्हेन्यू खात्याच्या जमिनीवर आहेत. म्हणजेच वनविभागाच्या हद्दीत त्यांचा समावेश होत नाही. त्‍यामुळे अनेक देवरायांची स्थिती गंभीर होत आहे. खासगी जमिनीवरील अनेक देवराया, तेथील जमिनमालकांनी कोळसा करण्यासाठी अक्षरशः तेथील वृक्ष तोडून जाळले आणि अगणित वर्षांपासूनची असलेली वृक्षसंपदा नष्ट झाली. चित्रपटात प्राण्यांकडून कामे करून घेण्याविरुद्ध गळे काढणा-या किंवा रस्त्यावरील भटक्या आणि धोकादायक कुत्र्यांविरुद्ध कारवाईला विरोध करणा-या ‘पेज थ्री’ पर्यावरणप्रेमींनी याविरुद्ध आवाज उठवल्याचे ऐकिवात आले नाही.
 

उमेश मुंडल्ये यांनी आपल्या या वारशाचा अभ्यास केला. त्‍यामुळे त्यांना नवीन जीवनदृष्टी मिळाली. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करून त्या जोडीने आर्थिक फायदाही कसा करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन करणारा ‘ओईकॉस’ हा व्यावसायिक संस्थासमूह त्यांनी सुरू केला असून त्याद्वारे ते अनेकांना मार्गदर्शन करत असतात. त्‍याशिवाय जलसंवर्धन व जलसंधारण या विषयावरही त्यांचा अभ्यास आहे.
 

जुने ते सारे वाईट, मागास असे समजण्याच्या सध्याच्या ‘मॉडर्न’ जमान्यात, जुन्यापैकी जे उपयुक्त आहे त्याचा अभ्यास करणे व त्यासंबधी विचार मांडणे हे गरजेचे आहे. उमेश मुंडल्ये हे चाळीशीतील धडाडीचे संशोधक हे काम करत आहेत.
 

उमेश मुंडल्‍ये
brumundlye@gmail.com
६, सुशील चिपळूणकर पथ,
रामनगर,डोबिवली पूर्व - ४२१२०१
मोबाइल - ९९६७०५४४६०
कार्यालयीन संपर्क - ०२५१ २८६०७०८

- महेश खरे

('आरोग्‍य संस्‍कार' मासिकातून साभार)

Last Updated On - 21st March 2016
 

लेखी अभिप्राय

खुप अभिमान वाटतो आहे की ते आमचे मित्र आहेत !

रजनी जोशी27/09/2015

उमेश हा माझा आभासी जगातील (फेसबुक ) मित्र आहे. ब-याच वेळा कार्यक्रमात भेट होते. पाणी या विषयावर काम करतो हे माहित होते. पण हा उमेश छुपा रुस्तम निघाला. बरेच काही करतो आणि ते सुद्धा पाणी या महत्‍त्‍वाच्या आणि जीवनावश्यक गोष्टीवर. हे वाचून अभिमान वाटला. असा मित्र सर्वांना मिळो. भविष्यात मिळणा-या डॉक्टरेट पदवीसाठी आधीपासून अभिनंदन.

चंद्रकांत जोशी 27/09/2015

आगळ्या वेगळ्या क्षेत्रात मेहनत करून, लोककला आणि लोक कल्याण साधणारी तरूणाई.

सतीश ग. कोंडकर.27/09/2015

त्रिवार वंदन सर

दिपक श्रीकृष्ण महाजन27/09/2015

Very Nice write up on such a Dedicated Man with Real Instinct to Save & Cherish "Devrai"
Good One!

Ambar 28/09/2015

Very impressive and inspiring write up. Mr. Umesh Mundley is very dedicated to his subject. I want to know about if there is any NGO which is working to save devrai.

Rajashree Gadhikar24/10/2015

मुंडले सरांचे काम तरुणांना स्फूर्ती देणारे आहे. अशा उत्तम रचनात्मक कामांना आपण प्रसिद्धी देत आहात ही स्वागतार्ह घटना आहे.

मिलिंद रानडे04/03/2017

उमेश रावांच्या देवराया आणि झाडां बाबतचे प्रेम आणि काम सचोटीचे आहे.खुपछान

संंतोष तापकीर30/01/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.