एक चळलेली चावट संध्याकाळ


श्रीमान अशोक पाटोळे,

सविनय नमस्कार.

एक चावट संध्याकाळ     तुम्‍ही लिहिलेले, दिग्दर्शित केलेले व तुमची प्रमुख भूमिका असलेले ‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक (प्रयोगापूर्वीच्या अनाऊन्समेंटनुसार दीर्घांक) नुकतेच पाहिले. ‘केवळ प्रौढ पुरुषांसाठी’ अशी त्याची सुरुवातीला केलेली जाहिरात, त्याला तथाकथित स्त्रीमुक्तीवाद्यांकडून झालेला विरोध आणि टी.व्ही.वरील चॅनेलवर (बहुधा चॅनलवाल्यांनी) घडवून आणलेले वाद हे पाहता, या दीर्घांकाला तुम्ही केलेले ‘नाटक’ असे म्हणावेसे वाटले! तरीही शक्यतो कोणतीही गोष्ट स्वतः पाहून, अनुभवून मगच त्याच्या गुणदोषांची आवश्यकतेप्रमाणे भलामण किंवा त्‍यावर टीकाटिप्पणी करावी असे वाटत असल्याने या नाटकाला आलो होतो. नाटक आवडले की प्रयोगानंतर नट-दिग्दर्शकाचे अभिनंदन करणे, लेखकाचा दूरध्वनी मिळवून त्याचे आभार मानणे मला आवश्यक वाटते. मात्र आजपर्यंत नाटक/ प्रयोग आवडला नाही तर कधी जाऊन तसे सांगण्याची वेळ आली नव्हती. तुमच्या परवाच्या नाटकानंतर ती येईल की काय असे वाटले होते. पण नाटक पाहून झाल्यावर इतका मनस्ताप झाला होता / इतकी मनस्थिती खराब होती, की भेटून त्याविषयी तुमच्याशी बोलावे असेही वाटेना. (शिवाय अशा मनस्थितीत योग्य मुद्दे मांडून शांत डोक्याने चर्चा होऊ शकली नसतीच.) त्यामुळे परत फिरलो. तरीही मनातली अस्वस्थता जाईना. त्यामुळे हा लेखनमार्ग स्विकारला.

     कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मला आदर आहे. तुमच्‍या नाटकामुळे माझ्या भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या वगैरे नाहीत. त्‍या नाटकात तेवढ्या गंभीर बाबी नाहीत. तुम्‍ही समाजातील सर्वांच्या सुसंस्कृततेच्या तथाकथित बुरख्यांवर त्‍या नाटकात टिका केली आहे. तो मुद्दा म्हणून चुकीचा नाही, पण समग्र विचार करता ते नाटक म्हणजे वैचारिक बुरखा पांघरलेली तुमची ‘धंदेवाईक’ क्लृप्ती आहे असे दिसते. माणसाच्या मनात लैंगिक संबंधांविषयी नैसर्गिक आकर्षण असते. पशू ते सुसंस्कृत व्‍यक्‍ती इथपर्यंतच्‍या प्रवासात माणसावर काही सामाजिक बंधने आली. त्यापैकी, मनात लैंगिक संबंधाची इच्छा आली, की तिची पूर्ती करण्यावर असलेले बंधन हे महत्त्वाचे आहे. त्‍यातून स्वाभाविकपणे मानसिक व शारीरिक ताण तयार होतो. त्याचा निचरा हस्तमैथुन, झोपेत वीर्य गळणे अशा प्रकारांबरोबरच चावट विनोद केल्यानेही होत असावा. समवयस्क किंवा समविचारी अशा मित्रमंडळींच्या कोंडाळ्यातील गप्पा अशा विनोदांमुळे विशेष रंगतात असा सर्वांचा अनुभव असतो. महिलांमध्‍येही असे विनोद (पुरुषांसारखे बोल्ड नसून थोडे सूचक स्वरूपाचे) सांगितले जातात असे ऐकिवात आहे. प्रसंगी अनेक विद्वान, कर्तबगार व्यक्तींकडूनसुद्धा (खासगी गप्पांमध्ये) असे विनोद ऐकायला मिळतात. पण ते सार्वजनिक ठिकाणी शिष्टसंमत मानले जात नाहीत. तुम्ही मात्र तो प्रकार केला आहे.

अशोक पाटोळे आणि अजित केळकर     नाटकाचे शीर्षक लोकांचे ‘ते’ कुतूहल चाळवणारे आहे. कथानक उघड उघड बेतलेले आहे. पात्रांची नावेही जाणीवपूर्वक अभिरुचीहीन, असे लैंगिक अर्थ सूचित करणारी आहेत. प्रा. बारलिंगे, डॉ. तलवडे आणि मंचावर न आलेली, पण जिच्यामुळे ‘नाटक’ घडते ती महिला, तिचे नाव तर ‘झाटे’! ही नावे जोशी, चौधरी, धुरू अशी असती तर चालले नसते का? चालले असते, पण मग प्रेक्षकांना चावटपणाची अनुभुती कशी मिळाली असती? तुम्ही ती तथाकथित बाई चावट विनोदांवर, शिव्यांवर प्रबंध लिहीत आहे असे नाटकात दाखवले आहे. ती त्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी प्रा. बारलिंगे यांना भेटायला येणार आहे. का? तिला प्राध्‍यापक हे त्‍या विषयातील जाणकार असल्याचे कुणाकडून कळले आहे का? मग ते प्राध्यापक महोदय (म्हणजे तुम्ही) या विषयातील गाढा अभ्यास (?) असलेल्या दुसर्‍या विद्वानाला चर्चेसाठी पाचारण करतात. ते कोण? तर ते आहेत सेक्सॉलॉजिस्ट डॉ. तलवडे. त्यांच्याकडे त्‍या विषयावरील विनोदांचा अनलिमिटेड स्टॉकच आहे जणू! मग तुम्ही पूर्ण वेळ त्यांच्या तोंडून चावट (खरे तर अनेक वेळा पातळीहीन व फडतूस शाळकरी दर्जाचे) विनोद ‘नॉनस्टॉप’ ऐकवले आहेत. इथे ‘ऐकवले आहेत’ असे म्हणायचे कारण म्हणजे त्‍या नाटकात बघण्यासारखे काही नाही. तुमच्या अभिनयाबद्दल काही लिहावे असेही नाही. तो अगदी सुमार आणि हौशी झाला आहे. दुसरे नट अजित केळकर यांनी, ते सराईत अभिनेता असल्याने त्यातल्या त्यात चांगले काम केले आहे. विशेषतः दारू चढल्यावर (का तसे ढोंग करताना?) प्राध्यापकांच्या तोंडी शिव्या येतील असे बोलतानाचा त्यांचा अभिनय हशा मिळवून गेला. पण एकूण या नाटकात काही नाही.

     चावटपणाचे दोन-तीन विनोद खूप हसवणारे होते. पण मुद्दा असा, की असे विनोद समाजातील विविध व्यक्तींनी (परस्पर परिचय नसलेल्या) एकत्रितरीत्या अनुभवणे योग्य आहे का? त्‍यातून आपण कोणती मानसिकता दाखवत आहोत? समाजमन कुठल्या दिशेने नेत आहोत? नाटकातून एखादी कथा, एखादा विचार एकाच वेळी समाजातील अनेक व्यक्‍तींपर्यंत पोचवला जातो. अनेकदा त्‍यामागे केवळ निखळ करमणूक हा उद्देश असतो. त्‍या नाटकातून तुम्‍ही कोणते कथानक, कोणता विचार, कोणती करमणूक घडवली आहे?

     डोंबिवलीला झालेल्या परवाच्या नाटकाला उपस्थित असलेली पन्‍नास-साठ माणसे पाहता तुमचे नाटक (निदान त्या दिवशी तरी) पडले आहे असे वाटते. त्‍या उपस्थितांमध्ये पाच-सहा महिलाही होत्या. त्यापैकी दोघीजणी नाटक सुरू झाल्यावर पहिल्या दहा-पंधरा मिनिटातच निघून गेल्या. इतर प्रयोगांना कसा प्रतिसाद असतो याची कल्पना नाही. पण भरघोस मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट नाही. तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहात. जीवनात ज्या गोष्टी घडतात त्यातूनच प्रेरणा घेऊन नाटक होते, हा युक्तिवाद येथे कुणी केला तर तो पटणारा नाही. आपण रोज सकाळी प्रातर्विधीला जातो म्हणून कुणी स्टेजवर टमरेल घेऊन बसलेले दाखवावे असे नाही.

     नाटक अगदीच उथळ वाटू नये म्हणून तुम्ही त्यात सेक्स एज्युकेशन धर्तीचे काही संवाद घातले आहेत. पण ते इतके थोडे आणि थातुरमातुर आहेत, की जेवणातील चटणी-कोशिंबिरीएवढेच स्थान त्यांना आहे. नाटकाचा जीव लहानसा असल्याने त्यात शेवटी शेवटी शिव्यांबद्दल काही संवाद घालून त्‍याची लांबी वाढवली आहे. तेथेही ‘शिवी ही शिवाची बहीण असते’ असे काहीच्या बाही संवाद घातले आहेत. शिवी दिल्याने मनातील संतापाचा निचरा होतो व त्यामुळे संभाव्य हिंसा टळते असा अजब कोटीक्रमही लढवला आहे. प्रत्यक्षात एकाने शिवी दिली, की दुसरा आणखी भडकतो आणि गोष्टी मुद्द्यांच्या ऐवजी गुद्द्यावर जातात असे बघायला मिळते.

     तुमचे नाटक बघून थोड्याशा विचारी असणार्‍या पुरुषांना कोणताच आनंद तर मिळणार नाही, पण बायकांनी भांडून अशा नाटकाला येण्याचा आग्रह का धरला असे मनात येते. लैंगिकतेविषयीच (पण महिलांच्या) असलेल्या ‘योनीच्या मनीच्या गोष्टी’ या प्रयोगाबद्दल कुणी थिल्लर, गल्लाभरू असे आरोप केलेले नाहीत. (कदाचित त्यांना प्रयोग गाजवण्याची ही युक्ती सुचली किंवा रुचली नसेल.) अर्थात तोही प्रयोग स्वतः बघून त्याविषयी मत व्यक्त करेन. पण तुम्ही मात्र, विविध चांगल्या नाटकांचे लेखक म्हणून असलेल्या यापूर्वीच्या प्रतिमेला तडा जाणारे काम केले आहे. अधिक काय लिहू?
 

- महेश खरे
९३२०३०४०५९

महाजालावरील इतर दुवे
सार्वजनिक असभ्यपणा
नाट्यरंग : ‘एक चावट संध्याकाळ’ : असभ्यता.. चावडीवरची!
‘चावट’पणाची उलटतपासणी

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.