‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल?

प्रतिनिधी 02/05/2011

 ‘व्यासपीठ’तर्फे आयोजित ‘शिक्षण आणि सुजाण नागरिकत्व’ या कार्यक्रमात योगेश देसाई (कारागृह अधीक्षक, ठाणे), अभय ओक (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळशैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी प्रेरणा-प्रबोधन-प्रयत्न अशी संकल्पना ठरवून, त्यासाठी शैक्षणिक घटकांचा म्हणजे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय ठरवून ‘व्यासपीठ’च्या कार्याला सुरूवात झाली. शिक्षणाविषयी चिंतन करणारे शिक्षक व प्रत्यक्ष धडपड करणारे कार्यकर्ते-शिक्षक एकत्र आले. ‘व्यासपीठ’ची पहिली बैठक एप्रिल 2008 मध्ये झाली. शिक्षकांची मानसिकता सकारात्मक करणे, त्यांची प्रयोगशीलता वाढवणे- त्यासाठी व्याख्याने, शैक्षणिक विषयांवर चर्चा, कार्यशाळा असे विविध उपक्रम योजले गेले. काही प्रबोधनात्मक मोठे कार्यक्रम व काही विषयज्ञान समृध्दीसाठी कार्यक्रम ...

सेवेमधे असलेल्या शिक्षकांसाठी ‘प्रकल्प सादरीकरण स्पर्धा’ जाहीर केली गेली. नकाशावाचन, शब्दसंपादन, गणित, शाळेमधे शून्य कचरा मोहीम, हस्ताक्षर सुधार प्रकल्प, अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रात्याक्षिकांसह सादरीकरण केले गेले. ‘माझे शिक्षणातील प्रयोग’ व ‘शिक्षणातील तीर्थक्षेत्रे’ या विषयांवर शिक्षकांसाठी ‘निबंध स्पर्धा’ आयोजित केली गेली.

एका वेगळ्या आणि नजिकच्या भविष्यकाळात ज्याची गरज भासेल अशा विषयाची म्हणजे ‘शिक्षणक्षेत्र आणि आय. एस. ओ. 9001’ ची माहिती देण्यासाठी त्या विषयातील तज्ञ्ज्ञ शामकांत दामले यांचे व्याख्यान आयोजले गेले. ‘आय. एस. ओ. 9001’ हे आंतरराष्ट्रीय मानक असून व्यवस्थापनाशी निगडित आहे. ते केवळ उद्दोगक्षेत्राला नाही तर शिक्षणक्षेत्रालाही लागू होते. संस्थेच्या क्षमतेचे प्रदर्शन, त्यात सुधारणा करणे हे मानकाचे हेतू असून दर्जामधे सातत्य राखणे हा अपेक्षित परिणाम आहे. असे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संस्थेमधे कोणती वैशिष्ट्ये आवश्यक आहेत, त्याचे परीक्षण कोण करतो अशा प्रश्नांची उत्तरे त्यांनी सोप्या भाषेत दिली.

‘प्रचलित शिक्षणपध्दती- आनंददायी की तणावपूर्ण!’ या विषयावर संवादचर्चेचा कार्यक्रम झाला. परळच्या बी.एड. कॉलेजमधील प्राध्यापक नरेंद्र पाटील हे विषयतज्ञ्ज्ञ आणि शिक्षक, पालक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यामधे ही चर्चा झाली.

रत्नागिरी येथील चिखली विद्यालयाच्या मुख्याध्यापक रेणू दंडेकर व वांद्रे येथील महात्मा फुले विद्यालयाचे विश्वस्त मिलिंद चिंदरकर यांच्या अनुभवकथनाचा ‘माझे शिक्षणातील प्रयोग’ हा कार्यक्रम आयोजला गेला. दोन्ही वक्त्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या प्रभावी विवेचनाने श्रोत्यांना विचार-प्रवृत्त केले. समाजाच्या ज्या स्तरामधे आपण काम करतो त्या स्तरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण जीवनाभिमुख कसे करता येईल व शासनाच्या, संस्थेच्या नियमांच्या चोकटीत राहून आपल्याला आपले वेगळे अवकाश निर्माण करणे, स्वातंत्र्य घेणे कसे शक्य आहे हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

खेडोपाडी जाऊन शिक्षणव्यवस्थेचे सर्वेक्षण करणारे, ‘शाळा आहे पण शिक्षण नाही’ या पुस्तकाचे लेखक हेरंब कुलकर्णी यांनी त्यांच्या व्याख्यानात शिक्षणव्यवस्थेची दुरवस्था मांडली. शिक्षक प्रेरित झाल्याशिवाय त्यात बदल होणार नाही. त्यांनी व त्यांच्यावर अंकुश असणार्‍या संस्थाचालकांनीही ‘व्यासपीठ’सारख्या चळवळीविषयी आस्था दाखवणे गरजेचे आहे हे त्यांनी नमूद केले.

सूत्रसंचालक अमिता भागवतज्येष्ठ मानसोपचारतज्ञ्ज्ञ डॉ. श्रीकांत जोशी, डॉ. आनंद नाडकर्णी, शिक्षणसंस्थेचे विश्वस्त प्रतिनिधी म्हणून श्री अ. गो. टिळक, मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून संपदा जोगळेकर अशा दिग्गज व्यक्त्तींना बोलावून ‘शिक्षा’ या विषयावर परिसंवाद आयोजला गेला. शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन होईल अशा स्वरूपाचा हा परिसंवाद दर्जेदार झाला. ‘व्यासपीठ’मधील शिक्षक सुरेश जंगले यांनी ही चर्चा सूत्रबध्द रीतीने पुढे पुढे नेली. शिक्षा असावी की नसावी, कशी असावी, परिणाम साधावा म्हणून काय करता येईल, शिक्षेचा अतिरेक असू नये, शिक्षा भोगून झाल्यावर शिक्षक व विद्दार्थ्याचे वय- त्यांच्या चुकांचे स्वरूप इत्यादी पाहूनच योग्य भूमिका घेणे याविषयी चांगला ऊहापोह या परिसंवादात झाला.

‘शिक्षण आणि सुजाण नागरिकत्व’ हा आणखी एक महत्त्वाचा विषय ‘व्यासपीठ’ने चर्चेला घेतला. त्याही वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर व्यक्त्ती उपस्थित होत्या. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, ठाणे कारागृह अधीक्षक योगेश देसाई, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, एम.एम.आर.डी.ए. (मुंबई)च्या सहाआयुक्त्त अश्विनी भिडे या मान्यवरांनी परिसंवादात भाग घेतला. सुजाण नागरिक बंनण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व, त्याचबरोबर कुटुंबीयांची जबाबदारी, माध्यमांची भूमिका, विधिसाक्षरता, लोकशाही रुजणे, व्यापक समाजहिताचे भान, समूहकेंद्री समाजजीवन, विवेक जागृत असणे, स्वयंशिस्त, विश्वासार्ह राजकारण उभे राहण्याची गरज अशा अनेक मुद्यांवर वैचारिक देवाणघेवाण झाली. त्यांचा शिक्षकांना सकारात्मक वापर करता येईल.

‘काव्यसंध्या’ या शीर्षकाअंतर्गत कवी अशोक बागवे यांनी शिक्षकांनी स्वत: कविता कशी समजून घ्यावी, कवितांमधून आनंद कसा घ्यावा हे सांगत कवितेच्या निर्मितीविषयीही सांगितले.

हे सर्व कार्यक्रम होत असताना प्रत्यक्ष शिकवण्याचे अभ्यासक्रमातील जे विषय असतात त्याविषयी शिक्षकांचे ज्ञान अधिक समृध्द व्हावे यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजले जातात.

उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योतिका ओझरकर यांनी ‘कवितेचे अध्यापन’ या विषयांतर्गत कवितांचा आस्वाद घेत त्यांचा अर्थ मुलांपर्यंत कसा पोचवावा, शिक्षक म्हणून काय तयारी असावी हे सांगत काही पद्यउतार्‍यांचे रसग्रहणात्मक विवेचन करून शिक्षकांसमोर आदर्श वस्तुपाठच घालून दिला!

‘व्यासपीठ’चा आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे 9 ऑगस्ट 2010 या क्रांतिदिनी विशेष पूर्वपरवानगी घेऊन, ठाणे तुरूंगाच्या आवारात जाऊन तेथील स्मृतिस्तंभासमोर हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक दाऊद दळवी यांचे व्याख्यान योजले गेले.

विज्ञान विषयासाठी टी.आय.एफ.आर .मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ हेमचंद्र प्रधान व त्यांचे सहकारी यांना बोलवले होते. या टीमने विज्ञानातील तत्त्वे छोट्या छोट्या, सहज मिळणा-या वस्तूंमधून कशी शिकवता येतात याची प्रात्यक्षिके दाखवली. विद्यार्थ्यांमधे कुतूहल कसे निर्माण होईल, ते विचाराला प्रवृत्त कसे होतील, त्यांना विज्ञानाची गोडी कशी लागेल याचे मार्गदर्शन त्यांच्या प्रयोगांतून शिक्षकांना झाले असेल.

इंग्रजीच्या अध्यापनाच्या मार्गदर्शनासाठी शैलजा मुळे यांना बोलावले होते. त्यांनी लेखनकौशल्य वाढावे व इंग्रजीचा अभ्यास आधुनिक पध्दतीने कसा घ्यावा याविषयी चांगले मार्गदर्शन केले.

भूगोल विषयातील तज्ञ विद्याधर अमृते यांचेही व्याख्यान झाले.

हे सर्व कार्यक्रम पाहात, ऐकत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे कार्यकर्त्यांमधे तळमळ असते. त्यांच्या नियमित बैठका होतात. हे ‘व्यासपीठी’य स्वत:च्या खिशातून निधी उभा करतात. काही शाळा त्यांना विनामूल्य सेवा पुरवतात, तर अनेकदा वक्त्ते कुठल्याही अपेक्षेशिवाय आनंदाने मार्गदर्शन करतात. अशा सकारात्मक व क्रियाशील उपक्रमाचे सर्व व्याख्यात्यांनी कौतुक केले व त्यास शुभेच्छा दिल्या. ज्यांच्यासाठी इतके दर्जेदार कार्यक्रम योजले जातात त्यांची उदासीनता, संस्थाचालकांची अनास्था दूर होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी अधिक सजग झाले, गुणक्त्तेची तळमळ असणारे समानधर्मी लोक एकत्र आले. प्रयोगशील झाले तर ‘व्यासपीठ’चा हेतू साध्य होईल.

वाहत असते पाणी जोवरी, असते जीवनदायी I

ध्यास नवे देण्याचा तोवरी, अध्यापन फलदायी II

‘व्यासपीठ’ गीतामधील या ओळींनी लेखाचा समारोप करते.

व्यासपीठीयांचे संपर्क क्रमांक :

सुरेश जंगले - 9869610403, 022-25453996
वीणा आंबेकर - 022.25410685

सुचेता शा. दामले
13, शांता निवास,
कर्वे होस्पितलच्यासमोर,
कोपरी रोड, नौपाडा, ठाणे-प.
पिन. 400602
फोन–022-25415367, 9969085674

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.