अहिराणी : आक्षेपांचे निरसन


अनिलकुमार भाटे यांचे माझे भाषणावरील आक्षेप ‘थिंक महाराष्ट्र’ वर वाचले. माझ्या भाषणाशी या आक्षेपांचा थेट संबंध नाही. माझ्या भाषणाशी या आक्षेपाचा थेट संबंध नाही.

१.   भाटे यांना माझे अहिराणी भाषण समजले. समजायला अडचण आली नाही म्हणून बरे वाटले. अहिराणी ढोल आणि माझी अहिराणी पुस्तकेसुद्धा महाराष्ट्रभर आणि राज्याबाहेरही चोखंदळ मराठी वाचकांना समजतात. त्याचा उल्लेख भाषणात सुरुवातीलाच आला आहे.

२.   नाशिकच्या मराठी लोकांनाही माझे अहिराणी भाषण समजावे म्हणून मी भाषणाची रचना सोप्या अहिराणीत केली होती. जशी सोपी मराठी, अवघड मराठी; अवघड हिंदी; सोपी इंग्रजी, अवघड इंग्रजी; अशी आपण वर्गवारी करतो त्या अर्थाने सुलभ अहिराणी ही संज्ञा मी येथे वापरत आहे.

उदाहरणार्थ राम गणेश गडकरी यांच्या ‘भावबंधन’ नाटकातील भाषा मराठी आणि ग.दि. माडगूळकर यांच्या कवितेची भाषाही मराठी. एक समजायला कठीण. दुसरी समजायला सोपी.

भाषा ह्या प्रवाहासारख्या असतात. प्रवाहात नदीचे पात्रे जसे पुढे विस्तृत होत जाते तसे भाषेचे असते. भाषा एकच असली तरी आजची भाषा कालच्या भाषेपेक्षा वेगळी असते. उदा. ज्ञानेश्वरांची मराठी, शिवाजी-तुकाराम यांची मराठी, ज्योतिराव फुल्यांची मराठी, चिपळूणकरांची मराठी, आजची मराठी यांत जसे साम्य नाही तसे आजच्या अहिराणीत आदिमपण दिसणार नाही.

३.   आदिम, प्राचीन, आर्ष या संज्ञा माझ्या भाषणात आलेल्या नाहीत आणि भाषणाचा तो विषय नाही, पाया नाही. या भाषणाला मराठी प्रास्तविक हवे असे ‘थिंक महाराष्ट्र’तर्फे मला सुचवल्यामुळे मी त्यांच्या प्रास्तविकाच्या रचनेत काही वाक्यांची व शब्दांची मदत केली. त्या प्रास्तविकात आदिम बोली हा शब्द वापरला आहे. माझ्या भाषणात तसा उल्लेख कुठेही नाही.

अहिराणी भाषेत प्रचलित मराठी शब्दांची अवशेष-रुपे दिसतात हे खरे आहे. अहिराणी बोली बोलणारे आजचे लोक पहिलीपासून मराठीत शिक्षण घेतात. त्यामुळे अहिराणी मध्ये मराठी शब्द प्रचंड प्रमाणात दिसतात. जेव्हा एखादी बोली प्रमाणभाषेच्या प्रभावाखाली येते तेव्हा तिचे अर्वाचिनीकरण आपोआप सुरु होते. शब्द, व्याकरण आणि लिपीही प्रमाणभाषेकडून उसनी घेतली जातात. अहिराणीला स्वतंत्र लिपी नसल्याने माझे भाषणदेखील देवनागरी लिपीत लिहिले गेले आहे. अहिराणीचे दृश्य रुपच मराठी दिसते तर मग ती आदिम कशी वाटेल?

४.   भाषेतील फक्त शब्दांचे आदिमपण सांगता येते. संपूर्ण भाषेचे आदिमपण दाखवता येणार नाही. भटनागर यांनी सुद्धा संस्कृत मधील विष्णु हा असा एकच शब्द सांगितला की ज्याची व्युत्पत्ती सांगता येत नाही. अहिराणीचे असे शंभर शब्द सहज सांगता येतील की ज्यांची व्युत्पत्ती लावता येत नाही. त्या शब्दांचे नैसर्गिक स्रोत दाखवता येत नाही.

५.   भाषेत जसे शब्दांचे आदानप्रदान होत राहते तसे व्याकरणही येत असते. याचे एकच उदाहरण देतो. मराठी व्याकरणानुसार वाक्यांची सुरुवात (अँड) आणि ने होऊ शकते. अलिकडच्या काळात मराठीतही आणि ने सुरुवात होणारी वाक्ये लेखकांकडून सुद्धा सहज लिहिली जातात. हे इंग्रजी भाषकांकडून व्याकरणाचे आदान आहे. याचा अर्थ मराठी भाषेला इंग्रजी व्याकरण आहे असे जसे म्हणता येणार नाही तसे अहिराणीला पूर्णपणे मराठी व्याकरण आहे असे म्हणता येणार नाही.

६.       ज्या प्राचीन भाषा इतर भाषांच्या संपर्कात आल्या नाहीत त्यांचे आदिमपण टिकून आहे. उदाहरणार्थ जारवा या आदिम माणसांची भाषा आज आदिम-प्राचिन-आर्ष म्हणता येईल. कारण जारवा ही जमात इतर लोकांच्या संपर्कात अजूनही आलेली नाही. ज्या बोली इतर भाषांच्या संपर्कात आल्या त्यांचे प्राचीनत्व त्यांच्यातील काही शब्दांवरुन ठरवता येते. भाषेवरुन नाही. जिथे शब्द फक्त हुंकाराचे काम करतात अशा प्राचीन भाषांना अगदी सुरुवातीच्या काळात व्याकरण नसते. मात्र भाषेत वाक्ये लागली की व्याकरण येते. म्हणून प्रत्येक भाषेला व्याकरण असते.

७.   हा मुद्दा गैरलागू आहे.

८.   परंपरेने चालत आलेल्या बोली वेगळ्या आणि पिजीन – क्रिऑल या कुत्रिम तयार झालेल्या बोली वेगळ्या. बोलीपासून प्रमाणभाषा तयार होतात. मात्र पिजीन-क्रिऑल सारख्या कुत्रिम बोली या प्रमाणभाषेपासून तयार होत असतात. उदा. मुंबईची हिंदी बोली ही अनेक प्रमाणभाषांच्या संकरातून तयार झालेली क्रिऑल भाषा आहे. ( काही गुप्त व्यवहारांसाठी कुत्रिम सांकेतिक भाषा तयार केल्या जातात, त्यांनाही बोली म्हणता येत नाही.)

९.   बोली सुधारल्या तर मराठी सुधारेल असे मी भाषणात कुठेच म्हटलेले नाही. बोली मुळीच सुधारायच्या नाहीत, वाचवायच्या आहेत. बोली वाचवायच्या आहेत. बोली वाचवल्या तर प्रमाणभाषा टिकतील हे मात्र खरे आहे, जे मी भाषणात म्हटले आहे.

अहिर लोकांचा एक समूह होता तो नैऋत्येकडून आला असे इतिहासकारांनी आधीच नमूद करुन ठेवलेले आहे. अहिर हे एका विशिष्ट जातीचे नव्हते. म्हणून आजही अहिर कुणबी, अहिर सोनार, अहिर लोहार, अहिर शिंपी अशा सर्व जातीत अहिर हे कुळ आढळते आणि तेव्हा म्हणजे तिच्या उगमापासूनच ती लोकभाषा आहे. विशिष्ट जातीची भाषा नाही.

१०.   लोकदेव म्हणजे काय हे भाषणातील विवेचनावरुन सहज लक्षात येते. लोकांनी लोकांसाठी तयार केलेला तो लोकदेव. लोकदेव हा लोकांचा साधासुधा देव असतो. लोकांचे अन्न ते त्याचे अन्न. लोकांचे कपडे ते त्याचे वस्त्र. म्हसोबा, आसरा, मुंजोबा, वाघदेव, नागदेव, खांबदेव, पिरोबा, खंडोबा, डोंगरदेव, कन्सरा माउली आदी अहिराणी पट्टयातील लोकदेव आहेत.

      शेवटी भाटे यांनी जे काही म्हटले आहे त्या आक्षेपाला काय उत्तर द्यावे मला सुचत नाही. बोलीभाषा टिकवल्या पाहिजेत, त्या मरु देता कामा नये, त्यांचे संगोपन करणे याला त्यांनी प्रतिगामी ठरवले आहे. आणि बोलीभाषा मारुन प्रमाणभाषेकडे जाणे म्हणजे पुरोगामी? अशी टिका मी पहिल्यांदा वाचतोय. त्यांच्या आक्षेपांचा हा शेवट वाचून मी सुन्न झालो.

-    डॉ. सुधीर रा. देवरे

Sudhirdeore29@rediffmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.