सुभाष शहा यांची परमार्थाची सुरावट
सुभाष शहा यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि ‘बासरी वाजवू का?’ असे विचारतात. त्यांचे वसाहतींमध्ये जाऊन असे तासाभराचे कार्यक्रम करण्यामागे धोरण आहे. ते म्हणतात, की सर्व माणसे हल्ली फार गडबडीत असतात; कोणाला म्हणून निवांतपणा नसतो. त्यामुळे सोसायट्यांत बाहेर क़ोणी येत नाही, एकमेकांना कोणी भेटत नाही. मी तेथे सुटीच्या दिवशी जातो, तासभर बासरी वाजवतो, गप्पा मारतो. बासरीने आल्हाद तयार होतो. चार माणसे जमतात-संवाद सुरू होतो.
उपजीविका माझी जशी
जांभळी पेन्सील आहे
जीविका माझी आता
बासरीचा सूर आहे!
या चार ओळी सुभाष शहा यांचा सध्याचा मूड व्यक्त करतात. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटण्ट, परंतु सध्या बासरीने झपाटले आहेत आणि त्यांची ओळख झाल्यापासून, ते क्षणार्धात बासरीचे सूर काढू लागतात, अर्थात ऐकणार्याची इच्छा असेल तर... त्यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि ‘बासरी वाजवू का?’ असे विचारतात. त्यांचे वसाहतींमध्ये जाऊन असे तासाभराचे कार्यक्रम करण्यामागे धोरण आहे. ते म्हणतात, की सर्व माणसे हल्ली फार गडबडीत असतात; कोणाला म्हणून निवांतपणा नसतो. त्यामुळे सोसायट्यांत बाहेर क़ोणी येत नाही, एकमेकांना कोणी भेटत नाही. मी तेथे सुटीच्या दिवशी जातो, तासभर बासरी वाजवतो, गप्पा मारतो. बासरीने आल्हाद तयार होतो. चार माणसे जमतात-संवाद सुरू होतो.
सुभाष शहा ७२ वर्षाचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवाचे भांडार मोठे आहे. ते त्या पोतडीतून एकेक गोष्ट काढून श्रोत्यांपुढे ठेवू शकतात. पण त्यांना अपेक्षा आहे ती रहिवाशांनी एकत्र येण्याची, नव-नव्या कल्पना राबवण्याची.
त्यांना सोसायट्यांत जायचे असते ते सकाळी. ते म्हणतात, की ठाण्यात कोंबडा आरवून जाग यायची ते दिवस फार मागे गेलेले नाहीत. प्रभातीची पक्ष्यांची किलबिल काय मंगल वातावरण निर्माण करायची. तो अनुभवदेखील अजून पन्नाशीपुढील ठाणेकरांच्या मनी आहे. सुटीच्या वारी सकाळी-सकाळी सोसायटीत जाऊन बासरी वाजवायची व काँक्रिटच्या जंगलात त्या आनंदाची उजळणी करायची ही शहा यांच्या उपक्रमामागील कल्पना.
शहा लहानपणी, सोलापूर येथे शाळेतील बॅन्डपथकात बासरी वाजवत असत. त्यानंतर पुढील शिक्षण, सीए म्हणून एकेचाळीस वर्षांचा व्यवसाय या नादात बासरी मागे पडली. ती त्यांनी पाच वर्षांपूर्वी; वयाच्या पासष्टाव्या वर्षी एका विपरीत परिस्थितीमध्ये पुन्हा हाती घेतली, शिकण्यासाठी क्लास लावला. त्यांचा श्वास या वयात व्यवस्थित टिकतो.
ते म्हणतात, की रागदारी संगीत फार अवघड नाही. श्रोता म्हणून तर ते अगदी छोट्या छोट्या हरकतींनी समजावून घेता येते, मात्र इच्छा हवी. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम बसवला आहे. त्याचे शीर्षक आहे- ‘क्लासिकल मेड सिंपल’
शहा रागदारीबरोबरच बासरीवर वेगवेगळी फिल्मी व लोकप्रिय सुगम गाणी हुबहू वाजवून दाखवतात. त्यामुळे गाण्यांचे वातावरण निर्माण होते आणि त्यात सहृदयता असते. ती ऋद्यताच आजच्या जीवनात कमी झाली आहे. माणसांच्या बोथट झालेल्या संवेदनांना आपल्या उपक्रमाने चेतना मिळली तर उत्तम अशी शहा यांची भावना आहे. ते सोसायट्यांमध्ये बासरी वाजवण्यासाठी साथीदाराला घेऊन येतात, पण कार्यक्रम विनामूल्य करतात.
शहा म्हणतात, “एक नवी संकल्पना म्हणून मी हे करत आहे. यामागे आर्थिक हेतू काही नाही. त्यामुळे बिदागीचा प्रश्नच येत नाही.”
सुभाष शहा आपली प्रॅक्टिस सचोटीने करत होते, परंतु त्यांनी कर्जतजवळ एक बंगला विकत घेतला. त्यात ते फसले. म्हणजे सगळे कागदपत्र त्यांच्या बाजूचे आहेत, हायकोर्टापर्यंतचे निकाल त्यांच्या बाजूचे आहेत, परंतु त्यांना त्यांच्या बंगल्यात निर्वेध राहता येत नाही. त्यांनी अलिबागचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्या भेटी घेतल्या, परंतु व्यर्थ. शेवटी ते कंटाळले. त्यांना नैराश्य आले. ते खचून गेले. त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला. डॉक्टरांनी त्यांना कोणतातरी छंद लावून घ्या आणि बंगल्याचा विषय डोक्यातून काढून टाका असे सांगितले, तेव्हा त्यांना लहानपणीची बासरी आठवली! त्यांना या वयात ती शिकवणारे शिक्षक भेटले आणि त्यांना नवे विश्वच गवसले! त्यांना बासरीत रमण्याचा व सभोवतालच्या जगाचा त्रास विसरण्याचा उत्तम मार्ग सापडला आहे. त्यांना जो आनंद गवसला तो इतरांशी ‘शेअर’ करावा म्हणून त्यांनी प्रात:काळी सोसायट्या-सोसायट्यांत जाऊन बासरी वाजवण्याची कल्पना काढली.
सुभाष शहा - ९८३३९९१०३४
राकेश कुलकर्णी - ९५९४५२५२८६
- आशुतोष गोडबोले
लेखी अभिप्राय
सुंदर उपक्रम
Add new comment