इंदापूर – इतिहासातच राहिलेले शहर (Indapur Still Lives in History)

2
3162

इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण.

इंदापूर हे ऐतिहासिक महत्त्व असलेले सुंदर शहर आहे. ते पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून उत्तर अक्षांश 1808′ आणि पूर्व रेखांश 7505′ अशा भौगलिक स्थानानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्टवर स्थित आहे. इंदापूरपासून जिल्ह्याचे पुणे हे ठिकाण एकशेपस्तीस किलोमीटर, तर सोलापूर हे नजीकच्या दुसऱ्या जिल्ह्याचे ठिकाण एकशेनऊ किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांची समाधी; एस टी स्टँडच्या बाजूलाच असलेले, 2019-20 सालचा महाराष्ट्र सरकारचा राज्यस्तरीय कृतिशील शाळा पुरस्कार प्राप्त झालेले प्रशस्त श्री.नारायण रामदास हायस्कूल; आणि नवीनच बांधलेले भव्य व देखणे जैन मंदिर ही शहरातील मुख्य वैशिष्ट्ये आहेत. इंद्रेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, खंडोबा मंदिर, मुरलीधर मंदिर, दत्त मंदिर, व्यंकटेश बालाजी मंदिर अशा आणखी काही जुन्या वास्तू इंदापूरात आहेत.

इंदापूर हा तालुका परंपरेने अवर्षणग्रस्त आहे. मात्र उजनीसारखे मोठे धरण झाल्यामुळे तालुक्यातील काही गावे त्या धरणाच्या पाण्यात गेली आहेत; शिवाय बॅक वॉटरमुळे मोठी शेती बागायतीखाली आली आहे. त्यामुळे रिक्रिएशन क्लब, मासेमारी अशा व्यवसायांना चालना मिळाली आहे व त्याचा शहराच्या भरभराटीला हातभार लागला आहे. उजनी धरण इंदापूरपासून केवळ सोळा किलोमीटर अंतरावर आहे. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर असलेले, दुसरे मोठे धरण. त्याचा प्रभाव सोलापूर, पुणे आणि नगर अशा तीन जिल्ह्यांतील अर्थकारण व राजकारण यांवर पडला आहे. उजनी धरणाचा अथांग जलाशय पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे केंद्र बनला आहे. पर्यटक तेथे दरवर्षी येणारे हजारो देशी-विदेशी पक्षी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. बॅक वॉटरच्या क्षेत्रात अनेक पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत.

इंदापूरचे हवामान विषम असून तापमान हिवाळ्यात कमीत कमी दहा सेल्सिअसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात तेच तापमान बऱ्याच वेळा चाळीस सेल्सिअसच्या पुढे असते. गावात पर्जन्यमान सरासरी पाचशेआठ मिलिमीटरच्या दरम्यान आहे. जमीन काळी आणि सुपीक असून डाळिंबे, द्राक्षे, मोसंबी वगैरे फळे; मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो, वांगी अशा भाज्या; आणि ऊस, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, भुईमूग इत्यादी पिके घेतली जातात.

इंदापूरचे नाव इंद्रप्रस्थ असे पौराणिक काळात होते. देवांचा देव इंद्र याने तेथे वास्तव्य केले होते म्हणून ते इंद्रप्रस्थ ! तेथे शंकराचे एक जुने सुंदर मंदिर आहे. ते गावाचे ग्रामदैवत असून ‘इंद्रेश्वर मंदिर’ म्हणून ओळखले जाते.

इंदापूर हे गाव ‘इंद्रपुरी’ म्हणूनही ओळखले जात होते. पुढे, अपभ्रंश होत आताचे ‘इंदापूर’ झाले असावे. गावाच्या पश्चिमेला भार्गवराम तलाव होता, त्याचे सुंदर बागेत रूपांतर भार्गवराम उद्यान म्हणून करण्यात आले आहे. तो तलाव पावसाळ्यात पूर्ण भरलेला असे. आम्ही त्यात पोहण्यास जात असू. प्राचीन काळी भार्गव ऋषींचे वास्तव्य तेथे होते. ते चिलिम ओढत असत. त्यांनी पाण्याची निर्मिती चिलिमीच्या धुरातून केली व तो तलाव तयार झाला अशी आख्यायिका सांगितली जाते.

श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर हे इंदापूरचे नवे, दशकभरातील आकर्षण ठरले आहे, ते त्यावरील सोनेरी मुलाम्यामुळे. ते तीर्थंकर गोल्डन टेम्पल म्हणून प्रसिद्ध झाले आहे. मंदिर 2011 साली बांधून झाले. त्यात जैन धर्मातील विसावे मुनिसुव्रत भगवान यांची सत्तावीस फूटी उंच मुख्य मूर्ती आहे. ती भव्य मूर्ती ही कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोळची प्रतिकृती आहे. ती राजस्थानी कलाकारांनी बनवली आहे. यक्ष, यक्षिणी आणि सरस्वती देवी यांच्या मूर्तीदेखील मंदिरात आहेत. मंदिरात दर वर्षी रथोत्सव आणि महामस्तकाभिषेक असे दोन मुख्य उत्सव साजरे केले जातात.

तहसीलदार कचेरीजवळ चांदखान नावाच्या मुसलमान फकिराप्रीत्यर्थ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत दरवर्षी उरुस भरतो. तेथे जुनी ऐतिहासिक मशीद आहे. त्याशिवाय शेख गल्लीत शेख सल्ला ही एक जुनी मशीद आहे. सक्रोबाची मिरवणूक हे इंदापूर शहराचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.

शहरात चार महाविद्यालये, एक इंजिनीयरिंग कॉलेज, आय टी आय अशा शिक्षण संस्था; कोर्ट, तहसीलदार कचेरी, सुसज्ज सरकारी रुग्णालय, मोठा एसटी डेपो अशी महत्त्वाची शासकीय कार्यालये व कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (पुणे) व कृषी उत्पन्न बाजार समिती (इंदापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमाल निर्यात सुविधा केंद्र कार्यरत आहे. केळी, डाळींबे, द्राक्षे ही पिके त्या सुविधा केंद्रामधून निर्यात केली जातात. गावाचे औद्योगिकीकरण फारसे झालेले नाही, पण कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना व दहा किलोमीटरवरील, लोणी देवकर येथील औद्योगिक वसाहत यांमुळे तरुणांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

इंदापूरची लोकसंख्या 1911 मध्ये सहा हजार सहाशेअठ्ठ्याऐंशी होती. तेथे नगर परिषद दीडशे वर्षे पूर्वीपासून म्हणजे 1865 सालापासून आहे. त्याचा अर्थ इंदापूर हे पूर्वापार मोठे शहर मानले जात असावे. इंदापूरची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार पंचवीस हजार पाचशेपंधरा आहे. त्यात तेरा हजार दोनशे ब्याण्णव पुरुष व बारा हजार दोनशेत्रेसष्ट महिला आहेत. महाराष्ट्रातील स्त्रियांचे दर हजार पुरूषांमागील प्रमाण नऊशे एकोणतीस असून इंदापूरला ते नऊशे पंचवीस आहे. मात्र गावातील साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या ब्याऐंशी पूर्णांक चौतीस शतांश (82.34) टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बावीस शतांश (88.22) टक्के आहे. पुरुषांच्या बाबतीत ते ब्याण्णव पूर्णांक चौतीस शतांश (92.34) टक्के तर स्त्रियांच्या बाबतीत त्र्याऐंशी पूर्णांक एकतीस शतांश (83.31) टक्के आहे. गावात धर्माप्रमाणे लोकसंख्या हिंदू अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सोळा शतांश (78.16) टक्के, मुस्लिम पंधरा पूर्णांक अकरा शतांश (15.11) टक्के, बौद्ध चार पूर्णांक अठ्ठावन्न शतांश (4.58) टक्के, ख्रिश्चन वीस शतांश (0.20) टक्के, शीख सात शतांश (0.07) टक्के अशी आहे.

अर्धवट पडलेले बुरुज व वेसेच्या भिंतीचे भग्नावशेष या वास्तू इंदापूर गाव ऐतिहासिक होते याची साक्ष देतात. इंदापूरचा उल्लेख 1448 मधील कागदपत्रांत आढळतो. त्यावेळी ते गाव विजापूरचा पहिला बादशहा युसुफ आदिलशहा याच्या ताब्यात होते. चाकणच्या किल्लेदाराने ज्यावेळी बंड केले, त्यावेळी त्याने आदिलशहाकडे मदत मागितली व आदिलशहाने सहा हजार घोडेस्वार पाठवून इंदापूरजवळ मुक्काम ठोकण्याचा हुकूम केला होता. इंदापूर, बारामती हे विभाग शहाजी राजांच्या मुलुखास 1640 च्या सुमारास जोडण्यात आले. औरंगजेबाने इंदापूर व सुपे शहाजी राजांना 1707 मध्ये दिले. इंदापूर गाव जुन्नर सरकारच्या परगण्याचे मुख्य ठिकाण 1790 मध्ये होते. त्याचे उत्पन्न एक लाख आठ हजार नऊशे रुपये होते. त्यावेळी अर्थातच इंदापूर हे महत्त्वाचे गाव होते. इंदापूरची लोकसंख्या फार कमी 1876-77 च्या भयंकर दुष्काळामुळे झाली. व्यापार बराच खालावला. ओबडधोबड कापडाचे विणकाम तेथे केले जात असे, ते गेल्या पन्नास वर्षांत पूर्ण बंद झाले आहे.

इंदापूरला महत्त्वाचे स्थान मराठी राज्यातही होते. ‘अंबाजी पंत तात्यांना दावलीराव सोमवंशी सरलष्कर यांनी पाठवलेल्या पत्रात इंदापूरला महाल स्वामींनी मुबादला करून घेण्याचे मान्य केले आहे’ असा उल्लेख आहे (रा. खं. 6 प.40). मानाजी केसरकर सरदेशमुख यांच्याकडे इंदापूर परगण्याबद्दल सरकारचा ऐवज दोन हजार येणे असल्याचा उल्लेख (रा.खं. 6 प. 94) आहे. पुणे, इंदापूर, चाकण वगैरे अफजलखानापासून ज्याकडे इनाम असतील तसे चालवण्याबद्दल हुकूम (रा.खंड 8 प. 11) आहे. इंदापूर महालाकडील पाच हजार होन खजाना करावयास आणावे अशी आज्ञा 1671-72 मधील (खंड 8 प. 21) आहे. इंदापूरच्या देशमुखीपैकी पस्तीसशे रुपये राजमंडळाच्या खर्चास येतात असा उल्लेख (रा.खं. 90 प. 278 मध्ये) आहे. त्याखेरीज काही किरकोळ उल्लेख रा.खं. 10 मध्ये दोन ठिकाणी खं.15 मध्ये अशा तीन ठिकाणी आलेले आहेत.

त्या तालुक्याची भरभराट थोरले माधवराव व नाना फडणीस यांच्या अमदानीत झाली होती. तो महाल पागेदार व शिलेदार यांच्या खर्चास लावून दिलेला असे. त्याला उतरती कळा 1794 पासून लागली. फत्तेसिंग माने नावाच्या होळकर सरदाराने इंदापूर 1802 साली उद्ध्वस्त करून टाकले. लोक पुढील साली मोठा दुष्काळ पडल्याने गाव सोडून गेले. ब्रिटिश अंमल सुरू झाला तेव्हा तो तालुका प्रथम अहमदनगरच्या कलेक्टरकडे होता. पुढे, इंदापूरचा समावेश पुणे जिल्ह्यात झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, मालोजी राजे यांना विजापूरच्या आदिलशाही सैन्याशी लढताना, 1620 मध्ये इंदापूर येथेच वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूबद्दलच्या 1606 व 1622 सालातील अशा वेगवेगळ्या तारखा आढळतात. मालोजी राजे हे बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव, ते पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवण्यास गरजेची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. मालोजी यांनी भोसले घराण्याच्या उत्कर्षाचा पाया घातला. त्यांनी वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. मालोजींची पत्नी उमाबाई यांच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा स्वत:चा व भावाच्या नावाचा शिलालेख पाहण्यास मिळतो. मालोजींनी साताऱ्यातील श्रीशिखर शिंगणापूर डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून यात्रेकरूंसाठी तलाव तयार केला. निजामशाहीने औरंगाबादेत ‘मालपुरा’ व ‘विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या होत्या. मालोजींचा पराक्रम वाढतच गेला. मालोजींनी त्यांच्या कामगिरीने बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला. त्यामुळे निजामाने मालोजींवर सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली होती. त्या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर मरण पावले ! भोसले घराण्यातील वीर पराक्रमाचे ‘पहिले स्मारक’ मालोजी यांच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले आहे. त्यांच्या दगडी पादुका इंद्रेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेल्या आहेत. मालोजी राजे यांनी त्यांची गढी तेथे अशी बांधली होती, की ग्रामदैवत इंद्रेश्वराचे दर्शन त्यांना सहजासहजी घडत असे.

-madhavrav-peshave

श्रीमंत विश्वासराव पेशवे यांचा जन्म 22 जुलै 1742 रोजी इंदापूर येथे झाला. ते नानासाहेब पेशवे ऊर्फ बाळाजी बाजीराव भट यांचे ज्येष्ठ चिरंजीव. विश्वासराव यांनी प्रशासन व युद्ध या विद्यांचे प्रशिक्षण वयाच्या आठव्या वर्षापासून घेतले होते. ते तलवारबाजीसह धनुर्विद्येत पारंगत होते. त्यांनी त्यांच्या युद्धकौशल्याने 1760 च्या सिंदखेडा आणि उदगीर येथे झालेल्या लढायांत मराठा पायदळाला प्रभावित केले होते. धनुर्धारी विश्वासरावांना आवरणे शत्रूला उदगीरच्या युद्धाच्या वेळी शक्य झाले नाही. ते हत्तीवर बसलेले होते. विश्वासराव उंच आणि धिप्पाड होते. त्यांच्या अंगी पेशवे घराण्याचे अनुवंशिक गुण उतरले होते. विश्वासराव पेशवे हे घराण्यातील सर्वात देखणे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे डोळे निळसर  होते. ते त्यांचे पराक्रमी आजोबा थोरले बाजीराव पेशवे यांच्यासारखे दिसत. ते नियमितपणे कठोर जीम पद्धतीचा व्यायाम करत असत. तसेच, सैन्याभ्यासाचे प्रशिक्षण घेत असत. या शूर योद्ध्याला त्यांच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 14 जानेवारी 1761 रोजी तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांची सरशी होत असलेल्या क्षणी वीरमरण आले. विश्वासराव धारातीर्थी पडले नसते तर मराठ्यांचा इतिहास वेगळा घडला असता.

_Hi_Vaat_Dur_Jate_1.jpg

प्रसिद्ध कवयित्री, गीतकार, लेखक शांता शेळके यांचे इंदापूर हे जन्मगाव. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी झाला. त्या आळंदी येथे 1996 साली भरलेल्या एकोणसत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. शांता शेळके यांनी अनुवादक, समीक्षक, स्तंभ लेखक, वृत्तपत्र सहसंपादक म्हणून मराठी साहित्यात मोलाची भर घातली. शांताबार्इंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने अनेक गीते लिहिली. त्यांचे निधन 6 जून 2002 रोजी, वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी झाले. त्यांचे 2022 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम सध्या सुरू आहेत.

नारायण रामदास शहा हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी 1942 च्या ‘चले जाव ‘ आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता. त्यांना स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगावा लागला. त्यांना नाराप्पा म्हटले जात असे. ते स्वतः विठ्ठल भक्त होते व विठ्ठलभक्तीची त्यांची परंपरा पुढील पिढ्यांतही आली आहे. नारायण दास शेठजींचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य त्यांच्या पुढील पिढीने चालू ठेवले आहे. त्यांना अपत्य नव्हते. त्यांचे कार्य पुतणे गोकुळ शहा यांनी पुढे चालवले, वाढवले. गोकुळ शेटजींची स्नुषा अंकिता शहा नगरपरिषदेच्या अध्यक्ष होत्या. शहा कुटुंबीयांच्या वतीने ब्लड बँक, शहा सांस्कृतिक भवन आणि पंढरपूर येथे एक धर्मशाळा चालवण्यात येते.

नारायणदास शहा म्हणजे इंदापूरमधील श्रीमंत आणि दानशूर व्यक्तिमत्त्व. त्यांनी दान केलेल्या सव्वीस एकर जमिनीवर त्यांचेच नाव असलेले इंदापूरमधील पहिले हायस्कूल आणि एकमेव इंदापूर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज उभे आहे. हर्षवर्धन पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत या दोन्ही शिक्षण संस्था चालवल्या जातात. एस एन आर हायस्कूलला महाराष्ट्र सरकारचा 2019-20 चा राज्यस्तरीय कृतिशील शाळा पुरस्कार मिळाला आहे.

इंदापूरच्या चिंतामण दत्तात्रय पंढरी यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत तुरुंगवास भोगला. ते समाजसेवकही होते. साधारण 1930/35 चा काळ असावा. इंदापूरच्या मध्यवस्तीत एक वाडा होता. तेथे सर्व प्रथम शाळा सुरू झाली, तिला कस्तुरबा बोर्डिंग असे नाव दिले होते. विद्यार्थिसंख्या वाढली म्हणून गावातील तरुण व वयोवृद्ध यांनी शाळेसाठी नवीन इमारत बांधण्याचे ठरवले, त्यासाठी पैसे हवे म्हणून निधी गोळा करण्यात आला. त्यात पंढरीसरांची कामगिरी खूपच मोठी होती. त्यांनी व त्यांच्या मित्रमंडळाने इंदापूरच्या पंचक्रोशीत झोळी फिरवून अगदी एक पैसा, चार आणे, आठ आणे, रुपया, असे मिळेल ते धन गोळा केले. कस्तुरबा बोर्डिंग चालवण्यासाठी धान्यही तसेच गोळा केले. नारायणदास शहा यांनी शाळेसाठी जमीन दिली. लोकवर्गणीतून शाळा बांधली गेली. पंढरीसर रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले व त्यांनी इंदापूर सोडले. एक प्रसंग नमूद केला पाहिजे. शाळेच्या नवीन इमारतीचा रौप्यमहोत्सवी सोहळा झाला, तेव्हा पंढरीसरांना आमंत्रित केले होते. ते एवढे साधे होते, की ते समारंभाला येऊन खाली प्रेक्षकांत बसले. संयोजन समितीतर्फे माईकवरून सांगण्यात आले, की ‘शाळेच्या उभारणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे तो माणूस खाली प्रेक्षकांत बसला आहे !’ तेव्हा त्यांना सन्मानाने स्टेजवर बसवून त्यांचा आदरसत्कार केला गेला. हाडाचा शिक्षक शिकवत शिकवत सतत नवीन काहीतरी शिकत असतो. पंढरीसर तसेच होते. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी अभ्यास करून एम ए पूर्ण केले. त्यांचा जन्म 31 मे 1920 रोजी तर मृत्यू 2 फेब्रुवारी 1994 या दिवशी झाला.

नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या आवारात स्वातंत्र्य सैनिकांची नावे लिहिलेला स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. त्या स्तंभावर दोन डझन स्वातंत्र्य सेनानींची नावे दिसतात. त्यावरून इंदापूरकर स्वातंत्र्य लढ्यात किती हिरिरीने सहभागी झाले होते हे लक्षात येते.

आदर्श शिक्षक गुरुवर्य जावडेकर गुरुजी हे इंदापूरमधील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. ते चौऱ्यांणव वर्षे जगले. त्यांनी तरुणांना सूर्यनमस्कार घालण्याची व व्यायामाची सवय लावली. शिक्षकांसाठी को ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. नारायणदास शहांचे बंधू – विठ्ठलदास व जावडेकर गरुजी यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या तरुणांना प्रेरणा देण्याचे महत्वपूर्ण काम केले. त्यांच्या नावे गुरुवर्य जावडेकर विद्यालय गावात आहे. त्यांचे पूर्ण नाव शंकर हरी जावडेकर व पत्नीचे नाव उमाबाई होते. दोघांनाही दीर्घायुष्य लाभले. त्यांची नातवंडे देश-विदेशात स्थायिक झालेली असून, त्यांनी गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक ट्रस्ट स्थापन केला आहे. त्या ट्रस्टमार्फत विविध शैक्षणिक प्रोत्साहनपर उपक्रम राबवले जातात.

गावात अशी मोठी, ध्येयप्रेरित माणसे होऊन गेली, परंतु गेली तीन-चार दशके मात्र इंदापूर कर्तबगार माणसांच्या शोधात आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अनेक संस्था नावारूपाला आणल्या आहेत. पण जवळच्या अकलूज व बारामती या गावांत अनुक्रमे शंकरराव मोहिते पाटील, शरद पवार असे नेतृत्व याच राष्ट्रप्रगतीच्या काळात झाले. त्यामुळे ती गावे इंदापूरपेक्षा कितीतरी पटींनी पुढे गेली आहेत. इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला रस्ता गल्लीसारखा छोटासा आहे. इंदापूर शहर राष्ट्रीय महामार्गावर असून, पुण्या-मुंबईहून येणाऱ्या व मराठवाडा, कर्नाटक, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर या भागांत जाणाऱ्या बसेसची तेथे प्रचंड वर्दळ असते. त्या एस टी स्टँडची पण मोठी मजा झाली ! महाराष्ट्र सरकारने इंदापूरसाठी एस टी डेपो आणि प्रशस्त एस टी स्टँड मंजूर केले. परंतु राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांचे एवढे दुर्लक्ष, की ते मंजूर झालेले बस स्थानक कोकणातील छोट्याशा इंदापूर नावाच्या गावात बांधले गेले ! नंतर लक्षात आले, की सरकारने या इंदापूरला मंजूर केलेली वास्तू भलत्याच इंदापूरला बांधली गेली आहे !

इंदापूर शहरात बालुशाही सारखा दिसणारा खाजा हा वेगळा पदार्थ खाऊन पाहण्यास हवा आणि तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी (पातळ भाजीसह) चटक लावणारी आहे. उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील प्रसिद्ध मासे हे वेगळेच आकर्षण; पण त्या करता इंदापूरी भेट देण्यास हवी.

विलास पंढरी 9860613872 vilaspandhari@gmail.com

ओम बंगला,61 अ, वारजे पुणे-411058

———————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. ऐतिहासिक शहर इंदापूर,इंदापुरातील प्राचीन मंदिरे,पंढरी कुटुंबियांचा इतिहास आणि इंदापूरचे सांस्कृतिक ओळख असलेला सक्रोबा उत्सव असे ४ लेख प्रसिद्ध केल्याबद्दल थिंक महाराष्ट्र डॉट कॉम, मुख्य संपादक दिनकर गांगल सर आणि उपसंपादक नितेश शिंदे यांचे आभार.मी स्वतः, हा लेख लिहिण्यास मदत करणारे आणि तमाम इंदापूरकर लेखांची गेले अनेक महिने वाट पहात होते.हा लेख लिहिण्यासाठी वेंकटेश मंदिर ट्रस्टचे दीपक देशपांडे,मित्रवर्य रमेश गानबोटे,संपत घाडगे,पंढरी बंधू-भगिनी,एस एन आर हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक अरविंद गारटकर सर, धनंजय बाब्रस,अनिल शहा, अशोक शहा,विनोद शहा,अरविंद इनामदार यांचे सहकार्य लाभले आहे.या सर्वांचाच मी ऋणी आहे.सगळ्यात जास्त मदत झाली आहे ती इंदापूर मधील तरुण संजय निगडे याची.त्याने आवश्यक ती माहिती तर जमा केलीच,पण कोरोना काळात रिस्क घेऊन अनेक मंदिरे,हायस्कूल,भार्गवराम उद्यान इत्यादींचे अनेक फोटो काढून मला पाठवले.त्याचे विशेष आभार.लेखात थोरले माधवराव पेशवे यांच्या ऐवजी विश्वासराव पेशवे यांचा फोटो असायला हवा होता.
    श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूमध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी लावण्याची हायस्कूलची सन १९५३ पासूनची परंपरा अजूनही चालू असून १९७३ साली प्रथम आल्यामुळे या गुणवत्ता यादीत माझे नाव असल्याने शाळेचा अंमळ जास्तच अभिमान वाटतो.
    एस एस सीला पहिला क्रमांक आल्याने शाळेने बक्षिस समारंभ आयोजित केला होता आणि परंपरेने गुणवत्ता यादीत माझे नाव लिहून ठेवले आहे.त्यावेळी दफ्तरदार मॅडम मुख्याध्यापिका होत्या.हा माझ्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे.मेरिट लिस्टचा फोटो थिंक महाराष्ट्र डॉट कॉमने लेखात छापल्याने पन्नास वर्षांपूर्वीच्या माझ्या शालेय जीवनातील रम्य आठवणी जाग्या केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.अर्थात मला घडवणाऱ्या शाळेचाही अभिमान आहेच.
    विलास पंढरी

  2. Hello sir
    I Kiran D Deokar from village Takali, Kopargaon Taluka, Dist Ahmednagar.
    I am very happy to have our family members in Indapur. I want to meet our Deokar Family, how can i meet them and where, or any address.
    I had seen name list of 2 Deokar students as they are from Sri Narayandas Ramdas High School, Indapur.
    1. Deokar Maruti Dattatray – 1968
    2. Deokar Mangesh Dhayraysingh-1988.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here