बाबांचे सहज काढलेले छायाचित्र अधिकृत ठरले!

माझे वडील दादासाहेब वगारे यांना साप पाळण्याचा छंद होता. आमच्या यवतमाळमधील माळीपुऱ्यातील घरी वऱ्हांड्यात ‘सर्पोद्यान’ होते. त्यात विविध चाळीस जातींचे साप होते. अनेक प्राणी-पक्षी होते. आमचे घर म्हणजे यवतमाळकरांसाठी प्राणिसंग्रहालयच होते! माझे वडील सापांना अंगाखांद्यावर खेळवत. तो छंद मलाही त्यांच्या सहवासात राहून जडला. एकदा गाडगेबाबा घरी आले असताना, मी सापांशी खेळत होतो. त्यांचा अवतार चिंध्यांनी जोडलेले कपडे, हातात खराटा व काठी, डोक्यावर खापर, खांद्यावर घोंगडी असा होता. तो बघून हा कोण माणूस? म्हणून मी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहू लागलो. ते अंगण झाडू लागले. झाडता झाडता, त्यांनी ‘बाबू, जरा इकडे ये’ म्हणून हाक मारली. पण त्यांच्या जवळ जायला भीती वाटत होती. त्यांनी आग्रह केल्याने हातातील साप खाली सोडून मी त्यांच्याजवळ गेलो. गाडगेबाबांनी मला जवळ घेत माझे कौतुक केले. मी त्यांचा हात सोडवून घेऊन घराबाहेर पळालो.

ते माईकडून दोन शिळ्या भाकरी आणि ताजे चून (पिठलं) घेऊन जाण्यास निघाले. आम्ही लहान मुले त्यांना ‘वेडा वेडा’ असे चिडवत त्यांच्या मागे लागलो. पण ते कोणालाही रागावले नाहीत, की त्यांनी मारलेही नाही. दादासाहेबांनी ते गेल्यानंतर मला त्यांच्याबद्दल सांगितले. गाडगेबाबा यवतमाळच्या भागात असले, की हमखास आमच्या घरी यायचे. दारातूनच ‘माई, भाकर वाढ’ म्हणून आवाज द्यायचे. आईसुद्धा लगबगीने त्यांच्यासाठी दोन भाकरी आणि पिठले आणून द्यायची.

गाडगेबाबा असेच 1951 मध्ये एकदा यवतमाळला कीर्तनासाठी आले होते. मी तरुण होतो. वडिलांनी वगारे फोटो स्टुडिओची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. एका घरून फोटोची ऑर्डर करून परत येत असताना आर्णी मार्गावर असलेल्या वडगाव येथे गाडगेबाबांचे कीर्तन चालू होते. मी सुद्धा ‘देवकीनंदन गोपाला’च्या त्या कीर्तनात दंग झालो. कीर्तन संपले. गाडगेबाबा तडक खाली उतरले. हातातील खराटा घेऊन परिसर झाडू लागले. जमलेले लोकही हाती झाडू घेऊन स्वच्छतेत रमले. मी बाबांकडे गेलो. त्यांनी तू दादासाहेबांचा पोरगा ना? असे विचारले. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो, ‘बाबा तुमचा एक फोटो काढू का’ बाबांनी हसतच प्रतिसाद दिला आणि म्हणाले, ‘एक काहून? काढ किती काढाचे ते!’ तेव्हा माझ्याकडे नव्यानेच रोल कॅमेरा आला होता. मी रोलिप्लेक्स कंपनीच्या त्या नवीन कॅमेर्‍याने गाडगेबाबांचे पटापट दोन-तीन स्नॅप मारले. अंगावर चिंध्यांचा वेष, डोक्यावर खापर, कानात डूल. हातात काठी असे ते छायाचित्र माझ्या करिअरमधील सर्वात अविस्मरणीय छायाचित्र ठरले! मी त्या छायाचित्राची ‘निगेटिव्ह कॉपी’ जपून ठेवली आहे. ते ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. नंतर तर ते छायाचित्र गाडगेबाबा मिशन आणि सरकार दप्तरीही पोचले. त्या छायाचित्राचा वापर गाडगेबाबांचे अधिकृत छायाचित्र म्हणून सर्वत्र सुरू झाला. गाडगेबाबांचे सहज काढलेले ते छायाचित्र इतके प्रसिद्ध आणि अजरामर होईल असे ते छायाचित्र काढताना स्वप्नातही वाटले नव्हते. नंतर गाडगेबाबांचे अनेक फोटो काढले. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेतही गेलो होतो. तेथेही फोटो काढले. बहुतांश फोटो प्लेट कॅमेर्‍याने काढल्याने ते मला संग्रही ठेवता आले नाहीत याची खंत वाटते. गाडगेबाबांचे उभ्या पोझमधले हे एकमेव छायाचित्र आणि त्याची निगेटिव्ह माझ्या संग्रही असल्याने गाडगेबाबांनी मला खूप लौकिक दिला असे वाटते.

– बाळासाहेब विठोबा वगारे 9527255656 / 9028632782

शब्दांकन-  नितीन पखाले 9403340240

——————————————————————————————————————————

(‘मीडिया वॉच’ विशेषांक, फेब्रुवारी 2018 वरून उद्धृत, संस्कारित)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here