डेबूचा गाडगेबाबा होताना (Gadgebaba his journey from childhood to sainthood)

0
105

मुक्काम पोस्ट दर्यापूर. दिवस दसऱ्याचा… दर्यापूरला दसऱ्याच्या दिवशी रेडा कापण्याची प्रथा होती. त्या ठिकाणी गाडगेबाबा पोचतात. मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांशी संवाद साधू लागतात. ‘मुक्या जिवाले कापू नका’ असे आर्जव करतात. लोक म्हणतात, ‘प्रथा आहे, देवाले रगतच लागते’. बाबा म्हणतात, ‘असं कसं…? रगत लागीन? आणि तसं असंन तर माह्य रगत घ्या’. बाबा साऱ्या जमावाला मोठ्या निर्धाराने रोखून धरतात. रूढी-परंपरावादी लोक विवेकी सारासार विचार करत नसतात. त्यांच्या देवाला रक्तच हवे हीच त्यांची धारणा! त्यांनी बाबांचेच रक्त सांडले असते तर? तशा प्रसंगी काहीही होऊ शकते! विरोध करणाऱ्या माणसाला चिडलेल्या जमावाला जीव पणाला लावून सामोरे जावे लागते. गाडगेबाबा तशा अनेक प्रसंगांना सामोरे गेले. त्यांनी त्यांचा जीव जाण्याची भीती असतानाही मुक्या जनावरांच्या जीवासाठी जीवाच्या आकांताने टाहो फोडून लोकांची मानसिकता बदलली. ते गाडगेबाबा एका दिवसात घडले नाहीत.

मी ‘डेबू’ ही कादंबरी ‘गोपाला गोपाला… देवकीनंदन गोपाला’ हा चित्रपट काढल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी लिहून पूर्ण केली. परंतु असामान्य व्यक्तित्वाचे लोक त्या समजुती व सिद्धांत, रूढी यांना छेद देणारे असतात. परिस्थिती सर्वसामान्य माणसांचे जीवन घडवते, त्याला आकार-उकार देते. परंतु असामान्य माणसांचे व्यक्तिमत्त्व परिस्थितीला घडवत असते. त्याचा प्रत्यय गाडगेबाबांच्या जीवनात प्रकर्षाने जाणवतो. डेबूचा जन्म ज्या घरात, कुळात, ज्या जातीत, ज्या विभागात झाला त्यातील प्रथा आणि रूढी समाजाला धरूनच होत्या. त्या लोकांच्याही आयुष्यात कमालीचे अज्ञान, अडाणीपणा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा, धर्मभोळेपणा, व्यसनाधीनता; त्यामुळे थोडीफार शेती असूनही कर्जबाजारीपणामुळे आलेले आर्थिक ढासळलेपण दिसते. मूल झाल्याचा आनंद असो, की बाप मेल्याचे दुःख असो, लग्नसोहळा किंवा धार्मिक विधी-उत्सव असो, तशा प्रसंगी पूजा-अर्चा करावी लागते. कोंबडे-बकरे कापणे, दारू पिणे हाच प्रकार रूढी-परंपरेचा भाग म्हणून केला जात असे. तशा व्यसनातून झिंगराजींची शेतीवाडी गेली. चंद्रभान मामांच्या डोक्यावर खोट्या प्रतिष्ठेपायी कर्जाचा डोंगर उभा झाला. डेबू ते सारे बालपणापासून पाहत होता. त्यावेळी विचार करत होता. त्यामुळे त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण होत आणि तो त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असे.

‘असं कसं?’ हा त्याला पडलेला प्रश्न. महार वाड्यातील वंक्या हा डेबूचा जिवाभावाचा मित्र. कूपात पकलं पिकलं, कवठ सापडलं- कुणी एकटा खाणार नाही. चिंचा, बोरं, आंबे, पावसाळ्या तोंडची जांभळं खायची, ती दोघे मिळून! वंक्या शिदोरी सोडतो. भाकर असते, चटणी असते-कधी नसते. कांदा असतो-कधी नसतो… ते पाहून डेबू हळहळणार! मग, ‘हे भाजी घे. रायतं तं तुले आवळतेच. हं हे घे’ असे दोघे एकमेकांत गुंतलेले, गुतमूत झालेले. वासनचे वेल जसे दूर-दूर खपखप वाढत जातात. एक दुसऱ्याला कवटाळीतच वाढतात. वेगळे काढतो म्हटलं तर निघायचे नाहीत. तुटतात, पण सुटत नाहीत. त्या दोघांचेही तसेच अतूट, अनामिक नाते. त्याची गावभर चर्चा. पाण्यात काठी मारली तर पाणी वेगळे व्हायचे नाही, अशी ही मैत्री. पण मायने सांगितलेले असते ‘म्हारामांगात खेयत नको जाऊ, त्याईच्या संग खातपेत नको जाऊ. बाट होते.’ डेबूला बाटागिटाचे काहीच वाटत नाही. एकदा वंक्याला तहान लागते, म्हणून डेबू त्यांच्या घरातील माठातले पाणी देतो. तितक्यात माय येते अन् मग डेबूचे बखोट धरून त्याच्या पाठीचा ढोल करणे सुरू होते. पण त्यावेळी डेबूच्या मनात मात्र ‘असं कसं?’ हा प्रश्न घुमत असतो. ‘माय एवढी काऊन भळकते. बाटोली म्हंजे काय? घागर फुटली, शिशी टिचली, ताटली चपली हे आपल्याला कयेत. पण थाली बाटली हे कसं कयेत नाई. डोयानई दिसत नाई. मायले कसं दिसते? कसं कयते?’ असे सारे प्रश्न डेबूला पडतात. देवीला नवस का करतात, देव खरेच आहे की नाही, हे प्रश्न किंवा त्याविषयीचा संशय सर्वसामान्य माणसाच्या मनात कधी येत नाही. कारण तो व्यक्त केला तर तो समाजाच्या, लोकांच्या आणि रूढीच्या मान्यतेविरुद्ध ठरतो. मग समाज त्याच्यावर उलटतो. त्याला तोंड देण्याची कुवत, धैर्य, धाडस त्यात नसते. म्हणून तो मूकपणे साऱ्यांच्या कळपात सामील होत असतो. चिडलेल्या, संतापलेल्या समाजाला तोंड देण्याची, त्याच्यासोबत दोन हात करण्याची कुवत ज्याची असते, तोच अशा परंपरागत गोष्टींना विरोध करू शकतो. म्हणून तो सामान्याहून वेगळा, असामान्य पुरुष ठरतो. गाडगेबाबा तसे होते.

आम्ही ‘देवकीनंदन गोपाला’ चित्रपटात बहिरमचा एक प्रसंग टाकला आहे. बाबा विचारतात, ‘मुकी जनावरे का कापतात?’ लोक म्हणतात, ‘वाडवडिलांपासून चालत आलेली रीत आहे.’ बाबा सांगतात, ‘रूढी वाईट असली, वाडवडिलांपासून चालत आली असली तर सोडून दिली पाहिजे.’ लोक म्हणतात, ‘असं कसं?’ तेथे बाबा म्हणतात, ‘रस्त्याने, वावरात आपण झाड लावतो. ते वाढते. डांगा पसरतात. येणाऱ्या-जाणाऱ्या बैलबंडीला अडथळा करतात. आपण त्या छाटतो. तसंच हे आहे. अशा रूढी छाटून टाका.’ बाबा असा प्रतिवाद करून त्यांचा विचार लोकांच्या गळी उतरवतात. हे करण्यासाठी बुद्धिसामर्थ्य, वाक्चातुर्य अशा महात्म्याच्या ठायी असावे लागते. अशा थोर पुरुषाची वैचारिक बैठकही कमालीची पक्की असते. वाद होतात. प्रतिवाद होतात, युक्तिवादही होतात. तेव्हाही ते वरचढच ठरतात. गाडगेबाबांमध्ये ती क्षमता डेबूने अनुभवलेल्या जीवनामुळे भक्कम झालेली दिसून येते.

एक प्रसंग आहे. डेबूची सेना गुरंढोरं घेऊन जंगलात जाते. सूर्य डोक्यावर आल्यावर शिदोर्‍या सोडल्या जातात. प्रत्येकाच्या शिदोरीत काय आहे याची चर्चा सुरू होते. त्यावेळी डेबू म्हणतो, ‘असे तं आपूण रोज जेवतो. शिदोरी सोळतो… चला, आता एक रोज आपून अथिसा भंडारा करू… लोक सोम्मारचे हप्ते करतात, आपुन तसा भंडारा करू…’ पोरांसाठी ते नवीनच होते. त्यांना डेबूच्या डोक्यातून काय निघेल याचा नेम नाही याची कल्पना होतीच… मग भंडारा कसा करायचा ते ठरते… अन् डेबूच्या कल्पनेतून ‘झोलेबा’ नावाचा देव तयार केला जातो. एका दगडाला शेंदूर फासला जातो, एका साधूची कहाणी तयार केली जाते अन् शंकर नावाच्या दोस्ताच्या अंगात डेबूच्या सांगण्यावरून झोलेबा घुमवला जातो… लोकांना ते पटते. लोकांनी चमत्काराला नमस्कार केला, डाळ-दाणा दिला, भंडारा झोकात झाला… खरे तर, ती बालसुलभ वयात केलेली गंमत होती. पण प्रत्यक्षात मात्र डेबूचे विचारमंथन वासुदेवबुवांचे कीर्तन ऐकल्यापासून सुरू होते, त्याचा तो परिपाक होता. दगडाचे देव अन् त्याच्या पुजनी लागलेले लोक, या दोघांचीही चीड डेबूला वाटू लागली होती. त्याने बुवा सांगतात तसेच लोकांचे वागणे पाहिलेले, पण लोक त्या दगडांना म्हसोबा, येताइबा, मरीमाय, जरीमाय म्हणतात. देव समजतात म्हणून डेबूने ठरवले, आपणच लोकांची पारख करू, करता आली तर गंमत करू… अन् झालेही तसेच. लोकांनी ‘झोलेबा’ नावाच्या देवालाही स्वीकारले. लोकांना बनवणे किती सोपे आहे हे सहज कळले. त्याला लोकांची दया आली, कीवही आली. तो मनातून कळवळला… तो कळवळा पुढे अशा देवांच्या नावाने सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीविरोधात चळवळ म्हणून पुढे आला.

‘डेबू’ कादंबरीत श्रीमंत वाड्यात राहणारी सखुमाईची मैत्रीण दाखवली आहे. ती लग्न होऊन तशाच तोलामोलाच्या श्रीमंताघरी जाते. तिचा नवरा दारू पितो. पट-तमाशे-बायका यांच्या आहारी जातो. घराला अवकळा येते. ते न सोसून त्याच्या बायकोला जीव द्यावा लागतो. डेबू एका दारूपायी होत्याचा नव्हता झाला तो संसार अन् त्या स्त्रीचे जीवन लहानपणापासून उघड्या डोळ्यांनी बघत आला आहे. त्यामुळे त्याच्या मनात सर्व व्यसनांच्या विरुद्ध चीड, संताप दगडावरील रेघेसारखा कोरला गेला आहे. त्यामुळेच डेबू गाडगेबाबा होऊन लोकांपुढे उभा राहतो. तेव्हा सर्व दुर्व्यसनांवर टीका आणि कडाडून प्रहार करतो. म्हणून तो संतांसारखा केवळ टाळकुट्या न ठरता मोठा समाजसुधारक, मूर्तिभंजक, विज्ञाननिष्ठ विचारवंत म्हणून नावाजला जातो.

– विठ्ठल वाघ 9822726347 kalyamatit@gmail.com

(‘मीडिया वॉच’ विशेषांक, फेब्रुवारी 2018 वरून उद्धृत, संस्कारित)

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here