दलिप सिंघ सौन्द – आशियाई वंशाचे पहिले अमेरिकन सांसद

0
84

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या तेव्हा त्या मूळच्या भारतीय वंशाच्या महिला म्हणून भारतात सर्वत्र कौतुक दाटून आले होते. अमेरिकेतील पहिले अ – अमेरिकन सिनेटर दलिप सिंग सौन्द हे होते ही नोंद येथे महत्त्वाची ठरेल.

कॅथरीन मेयो हिने 1927 साली ‘मदर इंडिया’ हे भारताची बदनामी करणारे पुस्तक लिहिले. त्याला उत्तर लिहिणारे दोन पुरुष अमेरिकेत त्या वेळी राहत होते. त्यापैकी एक म्हणजे धनगोपाल मुकर्जी. ते अमेरिकेत 1910 मध्ये गेले आणि तेथे लेखककवी-वाङ्मयभ्यासक म्हणून स्थिरावले. त्यांनी 1927 साली लिहिलेल्या ‘गे- नेक स्टोरी ऑफ अ पिजन’ या ‘बालवाङ्मय’ पुस्तकाला अमेरिकेतील प्रतिष्ठेचे असे न्यू बेरी अॅवॉर्ड मिळाले. मुकर्जी यांनी ‘अ सन ऑफ इंडिया आन्सर्स’ या शीर्षकाखाली मेयो ह्यांच्या पुस्तकाला उत्तर दिले. मेयो ह्यांच्या पुस्तकाची एकही विश्वसनीय अशी समीक्षा अमेरिकेत झाली नाही, म्हणून त्यांनी ती लेखन कामगिरी केली होती ! मेयो यांच्या मूळ पुस्तकाइतकाच मोठा प्रतिसाद मुकर्जी यांना मिळाला.

मेयो यांच्या पुस्तकाला उत्तर लिहिणारी दुसरी व्यक्ती म्हणजे दलिप सिंग सौन्द. ते पंजाबमध्ये अशिक्षित आईवडिलांच्या पोटी जन्माला आले. त्यांचा जन्म 1899 सालचा. दलिप सिंग यांनी 1920 मध्ये पंजाब विद्यापीठातून गणित या विषयात पदवी घेतली. त्यांचे वाचन चांगले होते. देशातील राजकीय परिस्थिती; त्या प्रमाणेच, ब्रिटनचा भारतीय स्वातंत्र्याला असलेला विरोध व त्यापोटी त्यांनी केलेल्या कुटिल कारवाया, जालियनवाला बाग हत्याकांड यांचा परिणाम त्यांच्या मनावर झाला आणि ते राष्ट्रवादी बनले. ते जम्मू येथील प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजमध्ये 1919 साली शिकत असताना, दोस्त राष्ट्रांच्या बड्या नेत्यांच्या बैठकीच्या वृत्तांताचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांना अमेरिकेचा इतिहास आणि त्यांतील लिंकन, रूझवेल्ट यांच्यासारख्या नेत्यांची विलक्षण कामगिरी यांनी प्रभावित केले. त्यांनी अमेरिकेत जाण्याचे निश्चित केले. त्यांना ‘सरकार लोकांचे, सरकार लोकांसाठी’ ह्या लिंकन यांच्या प्रसिद्ध वचनाने भारून टाकले होते.

त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचा बेत पसंत नव्हता. कुटुंबातील सर्व लोक शेती करणारे होते. दलिप सिंग यांच्या दहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यानंतर, त्यांच्या काकांनी कुटुंबाचा सांभाळ केला होता. काही विरोध, काही वाटाघाटी झाल्यानंतर दलिप सिंग यांचा अमेरिकेला जाण्याचा बेत मंजूर झाला. त्यांनी कुटुंबीयांना ते अमेरिकेत जाऊन अन्न डबाबंद करण्याचे तंत्रज्ञान शिकतील आणि परत आल्यावर हिंदुस्थानात तसा कारखाना सुरू करतील असे सांगितले होते. ते लंडनमार्गे अमेरिकेला गेले. तत्कालीन विदेशी विद्यार्थ्यांना येत त्या साऱ्या अडचणी त्यांनाही आल्या- अगदी अंथरुणात ढेकणांनी हैराण करण्यासकट. त्यातून मार्ग काढत ते शेतीविषयक शिक्षण घेऊ लागले, पण वर्षभराने त्यांची मूळ आवड प्रभावी ठरली. ते पुन्हा गणिताकडे वळले. गणितात एम ए आणि पुढे पीएच डी झाले (1924). मधल्या काळात ते ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ अमेरिका’ या संस्थेत सहभागी झाले, चर्चा आणि सभा यांच्यात भाषणे देऊ लागले. त्यावेळी त्यांना जाणवले, की अमेरिकेत हिंदुस्थानबद्दल गैरसमज अधिक आहेत. त्याच बरोबर तेथील सामान्य लोक हिंदुस्थानी लोकांना पाहुण्यांसारखे सौजन्याने वागवत असत. दलिप सिंग यांना तो टप्पा ओलांडायचा होता. त्यांनी तसे जाहीरपणे सांगितलेही. त्यांचे स्वप्न काही काळाने साकार झाले. एका अमेरिकन कुटुंबाने त्यांना आपलेसे केले. ते त्या कुटुंबाचे सदस्य व जावई बनले.

त्यांनी पीएच डी झाल्यावर अन्नप्रक्रिया करण्याच्या एका कारखान्यात काम केले. पण तोपर्यंत त्यांचा अमेरिकेत स्थायिक होण्याचा निश्चय पक्का झाला होता. त्यांनी जमीन खंडाने घेऊन शेती केली. त्यात त्यांना बरेवाईट अनुभव मोठ्या प्रमाणावर आले. हिंदुस्थानातील शेतकऱ्यांची आर्थिक हलाखी होत असे, तशीच ती अमेरिकेतील शेतकऱ्यांचीही होत असे. कधी निसर्ग प्रतिकूल झाला म्हणून तर कधी सरकारी नियमांमुळे आर्थिक चक्र थांबले म्हणून. त्यांनी तशा अनेक अडचणी पार केल्या. त्यांना त्यांच्या पत्नीने साथ दिली. आशियाई लोकांनाही अमेरिकेत वर्णद्वेष सहन करावा लागे, तोही दलिप सिंग यांनी सहन केला.

त्यांना बहुत वर्षे अमेरिकेत राहिल्यावरही अमेरिकन नागरिकत्व मिळाले नव्हते. त्यांनी अमेरिकन नागरिकत्वाचे दरवाजे खुले व्हावे यासाठी कायदा बदलण्याची चळवळ हाती घेतली. कालांतराने, तसा कायदा पास झाला (1946- Luce-Cellar Act ). आणि त्यांना 1949 मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाले. अमेरिकन नागरिकत्व मिळावे हे स्वप्न बाळगणारे आणि अखेरीस ते स्वप्न साकार झालेले दलिप सिंग हे तितक्याच उत्साहाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असेही सांगत होते. त्यांनी ब्रिटिशांनी हिंदुस्थानला स्वयंशासनाचा हक्क दिला पाहिजे असे भाषण फिलहार्मोनिक सभागृहात 1942 साली केले होते ! त्यांनी 1945 साली एम्बसी सभागृहात महात्मा गांधी यांच्या जन्मदिवशी झालेल्या सभेत गांधीजींची महत्ता वर्णन केल्यावर नेहेमीप्रमाणे ब्रिटिशांच्या हिंदुस्थानातील राजवटीचा धिक्कार केला.

दलिप सिंग वेस्टमोरलँड येथील जज्ज या पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यावेळी जज्ज या पदासाठी निवडणुका होत असत; आजही होतात. काही राज्यांत पुनर्नेमणुकीसाठीसुद्धा निवडणूक होते. दलिप सिंग निवडूनही आले. त्यांनी निवडणूक जिंकली. परंतु त्यापूर्वी एक वर्षपर्यंत त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले नव्हते. त्या तांत्रिक कारणाने त्यांची निवडणूक रद्द ठरली. त्यानंतर पुन्हा त्याच पदाच्या निवडणुकीसाठी ते उभे राहिले आणि जिंकून आले. ते डेमोक्रॅटिक पक्षात चांगले काम करत होते. तरीही जज्ज म्हणून निवडणूक लढवताना ते ‘हिंदू’ आहेत या कारणास्तव त्यांना विरोध करणारे अमेरिकन होतेच. ते डेमोक्रॅटिक पक्षाचे सेनेटसाठी उमेदवार म्हणून निवडले गेले आणि 1956 साली निवडून आले !

ते हिंदुस्थान सोडल्यानंतर सदतीस वर्षांनी, 1957 साली पहिल्यांदा मातृभूमीला भेट देण्यास आले. त्या प्रसंगाने त्यांच्या Congressman from India या आत्मचरित्राला सुरुवात होते. ते आत्मचरित्र त्यांनी शेती करताना अनुभवलेले सुखद आणि खडतर प्रसंग, जज्ज म्हणून निवडून येण्यासाठी केलेले प्रयत्न आणि जज्ज बनल्यानंतर त्या भागातील गुन्हेगारी संपवण्यासाठी त्यांनी केलेला यशस्वी प्रयत्न यामुळे वाचनीय झाले आहे. सौन्द यांच्या स्मरणार्थ पोस्ट ऑफिस 30777 रॅनचो, कॅलिफोर्निया रोड येथे 2005 साली सुरु करण्यात आले.

धनगोपाल मुकर्जी आणि दलिप सिंग दहा वर्षांच्या अंतराने अमेरिकेत गेले. दोघांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांत खूप यश मिळवले. दोघेही उच्च विद्याविभूषित. मात्र त्यांनी क्षेत्रे वेगवेगळी निवडली. दोघांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार केला. अमेरिकन नागरिकत्वाबाबत व पुढील कारकिर्दीतही दोघांनी पहिलेपणाचा मान मिळवला. एकाने बालवाङ्मय क्षेत्रातील प्रतिष्ठेचा न्यू बेरी पुरस्कार मिळवला, तर दुसरा आशियाई वंशाचा पहिला सिनेटर झाला. अमेरिकेत तीन दशलक्ष मूळ भारतीय राहतात, त्यांना त्यांचे हे आद्यसुरी माहीत आहेत का?

(फोटो सहाय्य – SAADA (South Asian American Digital Archive, saund.org या वेबसाईटवरून)

– रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com

———————————————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here