हॅकथॉन : नवप्रवर्तनाची नांदी!

_Hacathon_2_2.jpg

ज्या इंग्रजी शब्दांचा समाजाच्या रोजच्या संवादातील वापर लक्षात येण्याजोगा गेल्या काही वर्षांत वाढला आहे त्यात ‘इनोव्हेशन’ या शब्दाचा उल्लेख करावा लागेल. नव्या संकल्पना, पद्धती किंवा नवी उत्पादने वा उपकरणे यांच्या माध्यमातून स्थापित व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे इनोव्हेशन. चाकोरी भेदून, वहिवाट सोडून, मळलेली वाट नाकारून नव्या पद्धतीचा विचार वा नवी दृष्टी याला ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करण्याची शैली असेही म्हटले जाते. या प्रकारच्या विचारपद्धतीत जे वेगळेपण असते आणि त्यामागे जो तर्कशुद्ध व वैज्ञानिक विचार असतो; तो काहीसा नजरेआड करून त्यामागील चतुराईला अधोरेखित करणारा आणखी एक शब्द हल्ली समाज व्यवहारात सर्रास वापरला जातो, तो म्हणजे ‘जुगाड’! ‘जुगाड’ या शब्दाला चलाखीचा वास आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांचा ‘जुगाड’ या शब्दाला आक्षेप आहे आणि तो योग्यही आहे. ‘जुगाड’ हा शब्द एतद्देशीय प्रतिभेची परिणामकारकता नाकारून तीत कधी कधी डोकावणाऱ्या चलाखीला पुढे आणतो हे त्यांचे विश्लेषण विचार करण्यास लावणारे आहे. त्यामुळेच ‘इनोव्हेशन’ला चपखल हिंदी-मराठी प्रतिशब्द कोणता? हिंदी वृत्तपत्रे इनोव्हेशन म्हणजे ‘नवाचार’ असे सांगतात; पण ‘इनोव्हेशन’चा अनुवाद सरकारीरीत्या हिंदीत ‘नवप्रवर्तन’ असाही केला जातो आणि तो शब्द अधिक अर्थवाही आहे. अधिक चांगला मराठी शब्द सापडेपर्यंत मराठीतही तोच शब्द वापरायला हरकत नसावी.

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या 19 ते 23 मार्च या काळात राष्ट्रपती भवनात भरलेले नवप्रवर्तन – प्रदर्शन! माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘इनोव्हेशन स्किलर्स –इन – रेसिडेन्स’ हा कार्यक्रम डिसेंबर 2013 पासून सुरू केला. तेव्हापासून प्रतिभाशाली इनोव्हेटर्स दर वर्षी राष्ट्रपती भवनात त्या काळात येऊ लागले. प्रदर्शन, चर्चा-परिसंवाद आणि राष्ट्रपती भवनातील पाहुणचार यांचा समावेश त्या उपक्रमात असे. तो ‘फेस्टिवल ऑफ इनोव्हेशन’ या नावाने ओळखला जाई. मात्र 2018 या वर्षी, नव्या राष्ट्रपतींनी त्याला ‘फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन अ‍ॅण्ड एंटरप्राईज’ अशी जोड दिली व एक पाऊल पुढे टाकले आहे.

अहमदाबादचे ‘राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान’ (नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन) ही केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची संस्था तो उत्सव योजण्यात आघाडीवर असते. यंदाच्या प्रदर्शनात बारा निवडक नवप्रवर्तकांना त्यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवण्याची संधी मिळाली. त्यांत आसामच्या शाळकरी मुलीपासून काश्मीर खोऱ्यातील शेतकऱ्यांपर्यंत विविध व्यक्तींचा समावेश होता. आसामच्या कामरूप जिल्ह्यातील रेश्मा खानम या अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीने अल्झायमरच्या (स्मृतिभ्रंश) रुग्णांना त्यांच्या घराच्या पत्त्याचा ठावठिकाणा सहजपणे लागावा आणि त्यांना घरी पोचता वा पोचवता यावे यासाठी जी.पी.एस. प्रणालीचा वापर करून उपकरण बनवलेले आहे. ते प्रदर्शनात पाहण्यास मिळाले. मणिपूरच्या केनेडी सिंग या मध्यमवयीन नवप्रवर्तकाने मणिपूरमधील पारंपरिक ‘पेना’ या तंतुवाद्याची आधुनिक व्हायोलिनशी सांगड घालून ‘पेनाओ’ नावाचे अधिक प्रतिभाशाली तंतुवाद्य तयार केले आहे; तेही प्रदर्शनात मांडले होते. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागचा रहिवासी मोहम्मद रफिक अहंगर हा हाडाचा शेतकरी. त्याने परशू,हातोडा, फावडे, पहार अशी विविध उपकरणे एकात्मिक स्वरूपात एकाच दांड्याचा वापर करून उपयोगात आणण्याजोगे अभिनव उपकरण बनवले आहे; तेही प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

केंद्र सरकारच्या मानव-संसाधन विकास मंत्रालयाद्वारे ‘स्मार्ट-इंडिया हॅकथॉन’ या दुसऱ्या सर्जनोत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. मॅरेथॉन ही जशी धावण्याची शर्यत तशी हॅकथॉन ही प्रतिभेच्या मार्गाने मेंदूला म्हणजेच बुद्धीला चालना देऊन आणखी गतिशीलतेने व्यावहारिक समस्यांवर माहिती-तंत्र-केंद्रित उत्तरे शोधण्याची स्पर्धा!

सरकारी खाती चालवणारे अधिकारी नित्याचा कारभार सांभाळत असताना, त्यांना अनेक समस्या येत असतात. उदाहरणार्थ, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात विजेची बदलती गरज आणि त्या गरजेची वीजनिर्मिती, पारेषण इत्यादींशी पावलोपावली सांगड घालून समन्वय कसा साधावा? हा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयासमोर मोठा प्रश्न सध्या आहे. तेलंगणा सरकारला नद्यांना येणाऱ्या पुरांवर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवणारे आणि त्यायोगे पूर-व्यवस्थापनात नेमकेपणा आणू शकणारे उपकरण हवे आहे. केंद्र सरकारला, जंगलात लागणारे वणवे तत्परतेने ओळखून जंगलांची हानी रोखण्याची उपाययोजना सुलभतेने व्हावी यासाठीची शीघ्र-सूचनाप्रणाली हवी आहे, तर दिल्ली सरकारला ऑटोरिक्षाचालकांचे आणि प्रवाशांचे भाडे आकारणीसंबंधातील बखेडे संपवण्यासाठी रिक्षाचे मीटर रिक्षाचालक व प्रवासी यांच्या मोबाइलशी जोडणारी रचना विकसित करायची आहे.

_Hacathon_1.jpgमहिनाअखेरीस राज्या-राज्यांमधील माहिती-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांचे विद्यार्थी या सर्व प्रश्नांना ‘अ‍ॅप्स’ विकसित करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न दुसऱ्या हॅकथॉनमध्ये करणार आहेत. देशातील विविध सरकारी खात्यांच्या प्रशासकीय प्रश्नांच्या निरगाठी सोडवण्याच्या कामात प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना थेट सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न अभिनव आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध एकोणतीस प्रशासनिक समस्यांवर ‘अ‍ॅप’आधारित उतारे पहिल्या हॅकथॉनमध्ये (2017) शोधले गेले. देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सात हजार पाचशेएकतीस संघांनी 2017 च्या हॅकथॉनच्या पहिल्या फेरीत भाग घेतला. अंतिम फेरीत, एकाच ठिकाणी बसून छत्तीस तासांत अ‍ॅप विकसित करण्याचे आव्हान पेलण्यासाठी सुमारे तेराशे विद्यार्थी-संघ (विद्यार्थ्यांची एकत्रित संख्या सुमारे दहा हजार) विविध सव्वीस ठिकाणी एकत्र आले आणि त्यातून सर्जनशील प्रतिभेचे आणि नवप्रवर्तनाचे अभिनव आविष्कार साकारले गेले.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), म्हाळगी प्रबोधिनी, पुण्यातील आय-फोर-सी ही संस्था आणि शेकडो महाविद्यालये यांच्या सहभागाने होऊ घातलेल्या 2018 च्या ‘स्मार्ट- इंडिया हॅकथॉन’मध्ये सुमारे एक लाख विद्यार्थी भाग घेत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साडेसहाशे ‘मेंटर्स’ सज्ज आहेत आणि केंद्र व राज्य सरकार यांच्या चव्वेचाळीस समस्यांवर सॉफ्टवेअर- हार्डवेअर माध्यमातून उत्तरे शोधण्याचे आव्हान त्या सहभागींसमोर आहे. 2017 सालच्या हॅकथॉनमधून जे आविष्कारले गेले तेही उल्लेखनीय आहे. नाशिकच्या प्रभंजन पाध्ये या विद्यार्थ्याने औषधी गुण असलेल्या वनस्पती ओळखून, त्यांचे शास्त्रीय वर्गीकरण करून, त्यांचे भौगोलिक स्थान निश्चित करणारे विकसित केलेले ‘अ‍ॅप’ अंतिम टप्प्यात आहे. ‘आयुष’ मंत्रालय त्या अ‍ॅपचा वापर करणार आहे. केरळच्या अजमल हसन या विद्यार्थ्याने विमानतळांवर काम करणाऱ्या ए.टी.सी. कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि त्यांच्या कामांच्या पाट्यांचे सुलभ नियोजन यासाठी तयार केलेले ‘अ‍ॅप’ही हवाई वाहतूक मंत्रालय मे महिन्यापासून वापरणार आहे.

देशात असे हजारो ‘इनोव्हेटर्स’ आहेत. ‘राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान’ सारखी संस्था आणि ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’, निती आयोगाचे ‘अटल इनोव्हेशन मिशन’ वा राष्ट्रपती भवनातील ‘नवप्रवर्तन- उत्सव’ यांसारखे उपक्रम हे या प्रतिभाशाली इनोव्हेटर्सना उपलब्ध झालेले मंच प्रवर्तन- प्रक्रियेला गती देत आहेत.

हे सर्व घडून येत असताना इनोव्हेशन – स्टडीजसारख्या अभ्यासशाखाही महाविद्यालये वा विद्यापीठे पातळीवर विकसित व्हायला हव्यात. शेकडो नव्या संकल्पना जन्म घेत असतात, त्यांपैकी नेमक्या किती ‘व्यावसायिकदृष्ट्या’ निर्विवाद सफलतेच्या टप्प्यापर्यंत जातात? त्या का जातात आणि इतर कल्पना का जात नाहीत? सफलतेच्या वा असफलतेच्या प्रवासात कल्पनेच्या ताकदीचे, कल्पकाच्या चिकाटीचे आणि व्यावसायिकतेच्या विकासाला पोषक ठरणाऱ्या वातावरणाचे महत्त्व नेमके किती आहे? व असते?अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधून नवप्रवर्तनाचा मार्ग निर्वेध करण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर आजचे नवप्रवर्तक उद्या हिरमोड झाल्याने त्यांच्या प्रतिभेचे पंख आवरून पुन्हा ‘धोपट मार्ग सोडू नको’ हेच गीत गात राहतील. नवप्रवर्तनाचा मार्ग बिकट आहे आणि तसा तो राहणारच, पण त्या मार्गाने चालणाऱ्यांची हिंमत वाढावी यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांना त्या प्रयत्नांबद्दलच्या संशोधनाचीही जोड मिळायला हवी. तसे झाले तर नवप्रवर्तकांचे बळ आणखी वाढेल. सध्याचे बहुआयामी, बहुस्तरीय प्रयत्न हा नवप्रवर्तनाचा विशाल पट उलगडण्यासाठी नेटके नेपथ्यही हवे, कसबी दिग्दर्शकही हवेत, प्रेक्षकांचा प्रतिसादही हवाच; पण सर्वात आधी हवी ती नवप्रवर्तनाच्या हजारो नायकांच्या मनोधैर्याची मशागत. ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ तेच करू पाहत आहे!

– विनय सहस्रबुद्धे

About Post Author