हिवरे बाजार गावाचा कायापालट

1
82
_HivareBazar_1.jpg

पोपटरावांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी राज्य सरकारने आदर्श गाव योजना सुरु केली होती. त्यामुळे त्यांच्या नियोजित कामासाठी लागणारा निधी कोठून आणायचा, ती समस्या पोपटरावांपुढे नव्हती. त्यांना फक्त एक काम करणे होते, ते म्हणजे नशाबंदी, नसबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी व श्रमदान ही पंचसूत्री आचरणात आणण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करून घेणे! पोपटरावांची कमाल म्हणजे त्यांनी त्या पंचसूत्रीमध्ये लोटाबंदी म्हणजे गाव हागणदारीमुक्त करण्याचे कलम अंतर्भूत केले. सरकारनेही त्यांच्या पंचसूत्रीमध्ये या कार्यक्रमाचा अंतर्भाव पुढे केला. पोपटरावांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला 1995 साली सुरुवात करण्यापूर्वी ते सरपंच म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी त्यांच्या गावात जनजगृतीचे काम केले होते. त्यांनी पाणलोट क्षेत्र विकासाचे आणि ग्रामविकासाचे काम करण्यासाठी ‘यशवंत कृषी ग्राम आणि पाणलोट विकास ट्रस्ट’ स्थापन करण्याचा ठराव 15 ऑगस्ट 1994 रोजी ग्रामसभा बोलावून त्यामध्ये मंजूर करून घेतला. प्रत्यक्ष कामाला 1995 मध्ये सुरुवात झाली. काम सुरु झाल्यानंतर केवळ तीन वर्षांच्या कालावधीत योजलेल्या आराखड्यानुसार सर्व कामे पूर्ण करण्यात आली. त्या कामांमध्ये टेकड्यांवरील उतारावरून वाहणारे पाणी समतल समांतर चर खोदून जमिनीच्या पोटात ढकलणे, पाण्याच्या ओहोळांमध्ये बंधारे घालून वाहून जाणारे पाणी अडवणे, ओहोळातील अडवलेले पाणी पाझर तलावांत वा तळ्यांत वळवणे अशी सर्व कामे पूर्ण झाल्यावर गावातील विहिरींच्या पाण्याचा पातळीत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली. परिणामी गावातील शेतक-यांना खरीप हंगामात संरक्षक सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होऊ लागले. तसेच गावातील लागवडीखालील काही क्षेत्राला रबी हंगामातील पिकांसाठी सिंचनाचा लाभ मिळू लागला. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामामुळे हिवरे बाजार गावात पडणा-या सुमारे 400 मिलिमीटर पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात येऊ लागला.

_HivareBazar_3.jpgहिवरे बाजार गावमध्ये जलसंधारणाचे व मृद संधारणाचे काम होणापूर्वी तेथे सत्याण्णव विहिरी होत्या, पण त्यातील पाण्याची पातळी शंभर फुटांपेक्षाही खोल गेलेली होती. जलसंधारण व मृद संधारण ही कामे झाल्यावर भूगर्भातील पाण्याचा पातळीत वाढ झाली आणि शेतक-यांना सिंचनासाठी एकशेबत्तीस नवीन विहिरी खोदणे शक्य झाले. गावात एकूण दोनशे एकोणतीस विहिरी आहेत. त्यांमधील पाण्याची पातळी पन्नास फुटांपर्यंत उंचावलेली आहे. सर्व विहिरींवर पाण्याचा उपसा करण्यासाठी सर्व विहिरींवर पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युतपंप बसवण्यात आले आहेत. या बदलांमुळे गावातील लागवडीखालील सर्व क्षेत्राला संरक्षक सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. खरिपाच्या हंगामात लागवडी योग्य सर्व जमिनीवर पेरा करणे शक्य होते. रबी हंगामात सुमारे दोनशे वीस हेक्टर क्षेत्रावर कमी पाण्यावर येणारी भुसार पिके घेता येतात. अशा रीतीने पिकांची सघनता एकशेअठ्ठावीस एवढी झाली आहे. शेतीची उत्पादकता, म्हणजे दर हेक्टरी उत्पादन पूर्वीच्या जवळपास दुप्पट झाले आहे. काही शेतकरी कांदा, टोमॅटो, शेवंती यासारखी अधिक उत्पन्न देणारी पिके घेऊ लागले. चा-याची उपलब्धता वाढल्यामुळे गावात दुधाच्या धंद्याचा विस्तार शक्य झाला. गावाने विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी त्या गावातील लोकांचे दरडोई सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ आठशेतेवीस रुपये एवढे होते. गावातील एकशेऐंशी कुटुंबांपैकी एकशेअडुसष्ट कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली होती. त्यानंतर 2007 साली दरडोई सरासरी उपन्न चोवीस हजार आठशे त्र्याण्णव रुपये झाल्याचा निष्कर्ष सदर गावाच्या आर्थिक परिवर्तनाचा सखोल अभ्यास केलेल्या श्रीमती आशा कपूर-मेहता आणि श्रीमती तृष्णा सत्पथी या विदुषींनी काढला आहे. पोपटरावांच्या मते 2007 साली गावातील केवळ तीन कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली जगात होती. विकासाच्या प्रक्रियेत गावाचे केवळ एकूण उत्पन्न वाढले नाहीत तर त्या वाढीव उत्पन्नाचे सर्वसमावेशक पद्धतीने वाटप तेथे झाल्याचेही निर्देशित होते.

हिवरे बाजार गावातील जमीन ही हलकी, म्हणजे पाण्याचा झपाट्याने निचरा करणारी आहे. तशा जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकत नाही. निसर्गाच्या या शापाचे वरदानामध्ये रुपांतर करण्याची किमया तेथील शेतक-यांनी नैसर्गिक परिस्थितीला अनुरूप अशा पिकांची निवड करून साधली आहे. त्या संदर्भातील तपशील विषद करताना पोपटरावांनी सांगितले की आमच्या गावातील बरेच शेतकरी खरिपाच्या हंगामात कांदा, शेवंती, टोमॅटो ही नगदी पिके घेतात. त्या पिकांची पावसाळा सुरु होण्यापूर्वी लागवड करणे शक्य व्हावे म्हणून विहिरीतील पाण्याचा काही हिस्सा राखून ठेवण्यात येतो. त्या पाण्याचा वापर करून तेथील शेतकरी पाऊस सुरु होण्यापूर्वीच कांदा, शेवंती आणि टोमॅटो या नगदी पिकांची लागवड करतात. त्यामुळे त्या गावातील शेवंती व टोमॅटो भरपावसाळ्यात विक्रीसाठी बाजारात येतात. तसेच, हिवरे बाजार गावाचा कांदाही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बाजारात येतो. परिणामी, त्या नगदी पिकांना बाजारात चढा भाव मिळतो. गावाच्या समृद्धीमध्ये त्या व्यापारी पिकांचा मोठा वाटा आहे.

हिवर बाजार गावाने उपलब्ध नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता विचारात घेऊन त्यानुसार गावची पीक-रचना निश्चित केली आहे. पोपटरावांनी त्यांच्या गावातील सर्वांना नैसर्गिक साधनसंपत्ती विचारात घेऊन त्यांचा उत्पादन व्यवहार बेतण्यास शिकवले. त्यांनी गावामध्ये नव्याने विंधन विहिरी खोदण्यास बंदी करणारा ठराव ग्रामसभेत संमत करून घेतला. विंधन विहिरींचे पाणी केवळ घरगुती वापरासाठी राखून ठेवणे बंधनकारक केले. ग्रामसभेच्या त्या निर्णयामुळे लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळते. विंधन विहिरींचे पाणी फक्त घरगुती वापरासाठी राखून ठेवले गेल्यामुळे दरवर्षी भूगर्भात पाण्याचा जेवढा भरणा होतो. त्यापेक्षा त्याचा उपसा कमी होतो. या प्रक्रियेमुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत गेली आहे. आम्ही गावाला 2012-13 या दुष्काळी वर्षांत मार्च महिन्याच्या अखेरीस भेट दिली तेव्हा ग्रामसभेने पाण्याच्या अभावी रबी हंगामात पेरा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तेथील शिवारे ओस पडली होती. परंतु विंधन विहिरींवर बसवलेल्या हातपंपाचा दांडा वरखाली करताच पंपाच्या निष्कास वाटेद्वारे पाणी धो धो बाहेर पडत होते. त्यानंतरच्या काळात म्हणजे 2014-15 व 2016-17 या प्रलयंकारी दुष्काळाच्या दोन वर्षांच्या अखेरीस राळेगण सिद्धी गावात घरगुती वापरासाठी टँकरने गावाबाहेरून पाणी आणावे लागले, पण हिवरे बाजार गावावर तशी वेळ आली नाही.

गावातील सर्व विहिरी खाजगी जमिनीवर असल्या तरी त्यातील बहुतांशी विहिरी सार्वजनिक मालकीच्या आहेत. येथे विहिरींचे पाणी प्रामुख्याने संरक्षक सिंचनासाठी वापरले जाते.

मी हिवरे बाजार गावाला दोनवेळा भेट दिली. त्या गावाची आर्थिक संपन्नता तेथील टुमदार पक्क्या घरांमुळे सहजपणे नजरेत भरते. सदर गावातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे आहेत. तसेच, गावातील सांडपाणी जमिनीत मुरेल अशी व्यवस्था तेथे  करण्यात आली आहे. परिणामी, गावात डास व माशा यांचा उपद्रव नाही. पोपटराव सांगतात की गावात एक डास दाखवा आणि शंभर रुपयांचे बक्षिस मिळवा! मी स्वत: गावातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी शाळा सुरु होण्यापूर्वी शाळेतील मुळे शाळेच्या परिसरात झाडांची गळलेली पाने व फुले गोळा करून त्यांचा ढीग करून ठेवताना पहिले आहे.

_HivareBazar_2.jpgगावात महिन्यातून एक दिवस सहभोजनाचा कार्यक्रम होतो. अशा सहभोजनासाठी प्रत्येकजण त्याचा घरून भाकऱ्या घेऊन येतो आणि सार्वजनिक पातळीवर सर्वांसाठी आमटी केली जाते. त्या प्रथेमुळे गावातील एकोपा वृद्धिंगत होतो. गावातील लोक धार्मिक वृत्तीचे आहेत. ते वारकरी संप्रदायाचे आचरण करत असावेत. स्वत: पोपटराव दर आषाढीला पंढरपूरला दिंडीने जाऊन विठोबाचे दर्शन घेतात. वारकरी संप्रदाय केवळ पारलौकिक सुखाची आस दाखवत नाही तर इहलोकी कष्ट करून सुखी जीवन जगण्याचा संदेश भक्तांना देतो. त्यामुळेच वारकरी संप्रदायाचे माळकरी जीवन कष्ट करून प्रामाणिकपणे समृद्ध करण्यासाठी धडपडतात. आपल्या समाजात रुजलेल्या त्या धार्मिक परंपरेचा सार्थ वापर होत असल्याचा अनुभव हिवरे बाजारप्रमाणेच राळेगण सिद्धी, जांभरुण महाली, साखरा अशा गावात निदर्शनास आला.

पोपटराव पवार यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने त्यांना आदर्श गाव योजनेचे कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्या ग्रामविकासाच्या कामाची दखल घेऊन पंतप्रधानांनी त्यांना ‘अमेझिंग इंडियन’ (आश्चर्यकारक भारतीय) म्हणून गौरवले. त्यांनी राज्यातील दुष्काळप्रवण गावांना कृषि संपन्न करण्याचा श्वास घेतला आहे. ते त्यांच्या कामाच्या व्यापात सकाळी न्याहरी करतात, दुपारच्या जेवणाला चाट देतात आणि भोजन करतात. त्यांचा कामाचा झपाटा पहिला की एवढी ऊर्जा त्यांना कशी व कोठून प्राप्त होते असा प्रश्न कोणाच्याही मनात उद्भवेल.

– रमेश पाध्ये  9969113029

About Post Author

1 COMMENT

  1. पोपटराव पवार याना चांगल्या…
    पोपटराव पवार यांना चांगल्या कामाची चांगली पावती मिळाली आहे.

Comments are closed.