हिरवा दूत

hirva_doot1

विक्रम यंदे सुंदरलाल बहुगुणा किंवा अफ्रिकेच्‍या मथाईबाईंची आठवण यावी, असे काम करत आहे. ठाणे शहरातला तरुण- विक्रम यंदे! झपाट्याने होणारे शहरीकरण, बेलगाम होत चाललेले औद्योगिकीकरण, भौतिक सुखाची असीम लालसा ह्या गोष्‍टींमुळे झाडांची संख्‍या सर्वत्र झपाट्याने कमी होताना दिसते. एकीकडे ‘ग्‍लोबल वॉर्मिंग’, ‘ग्‍लोबल वॉर्मिंग’ म्‍हणून कंठशोष करणारे शहरवासीय दुसरीकडे झाडांच्‍या मुळावर उठले आहे. अशा वेळी, विक्रम यंदे झाडांची मुळे जपण्‍याचे हिरवे काम करत आहे. विक्रमला झाडापानांची आवड उपजत आहे. तो ठाण्‍याचा. पूर्वी ठाणे हे घनगर्द झाडांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. ठाण्‍याने विकासाच्‍या बाबतीत मुंबईसारखीच गती घेतली आणि तिथल्‍या वृक्षवल्‍लींचा नायनाट होऊ लागला. रस्‍त्‍यांचा विस्‍तार होऊ लागला आणि विस्‍तारलेली झाडे सपासप कापली जाऊ लागली. मोठ्या झाडांचे पुनर्रोपण झाले खरे, पण त्‍यात माया नव्‍हती. होता तो सरकारी उपचार! विकासाच्‍या ओघात ठाण्‍यातले वृक्षवैभव हरवत गेले.

कळवा येथील नर्सरीत वाढणारी विविध झाडांची रोपे

विक्रमच्‍या लहानपणी त्‍याच्‍या शाळेजवळ वाडे आणि झाडे होती. वसंतविहार परिसरात आंब्‍याच्‍या बागा होत्या. विक्रमने लहानपणी ते वृक्षवैभव पाहिले आहे. वाडे आणि  झाडे  यांच्‍या जागी सिमेंटचे जंगल उभे राहिले. लहानपणापासून ज्‍या हिरव्‍या मित्रांनी निरपेक्ष सोबत केली, ते नाहीसे होऊ लागल्‍याने विक्रमचा जीव कासावीस झाला. झाडांच्‍या बाबतीत त्‍याला इतका जिव्‍हाळा निर्माण झालेला होता, की त्‍याने आपल्‍या आईशीही एकदा पंगा घेतला होता! वटपौर्णिमेला विक्रमच्‍या आईने त्‍याला वडाची फांदी आणायला सांगितले. झाडाची फांदी तोडावी वगैरे काही विक्रमच्‍या तत्‍वात बसणारे नसल्‍यामुळे त्‍याने आईचे बौद्धिक घेतले. आईनेही त्‍याला प्रतिप्रश्‍न केला, की मला वडाची पूजा करायची आहे ती कशी करायची ते सांग. त्‍या माऊलीला तिची परंपरा जपायची –  जोपासायची होतीच. विक्रम शांतपणे गच्‍चीत गेला आणि तिथली एक कुंडी त्‍याने आईसमोर आणून ठेवत सांगितले, ‘याची पूजा कर’! त्‍या कुंडीत होतं, त्‍याने जगवलेले आणि जोमाने वाढणारे वडाचे झाड!

 विक्रमने २००४ मध्‍ये पर्यावरणविषयक काम करणा-या ठाण्‍यातल्‍या एका संस्‍थेसोबत काम सुरू केले. त्‍या संस्‍थेत राहून तो वृक्षसंवर्धनासाठी काम करू लागला, पण तो त्‍यात पूर्ण समाधानी नव्‍हता. त्यातून त्याच्या ‘ग्रीन अम्‍ब्रेला’चा जन्‍म झाला.

विक्रम आणि त्याला मदत करणारे त्याचे मित्र. विक्रमचा विश्वास निव्‍वळ जनजागृती करण्‍यावर नाही. त्‍याच्‍या मते विचारांना कृतीची जोड द्यायला हवी. ‘आधी केले, मग सांगितले’ ही रामदासी वृत्ती स्‍वभावात बाणवायला हवी. तरच बदल घडू शकतो. मग प्रारंभ झाला, तो इमारतीमध्ये रूजलेल्‍या झाडांचे पुनर्रोपण करण्‍याचा! विक्रमने इमारतींच्‍या भिंतींमध्‍ये उगवलेली पिंपळासारखी झाडे नीट काढाण्याचे, त्‍यांचे पुनर्रोपण करायचे काम सुरू केले. त्‍याला, ‘तुझं हे समाजसेवेचं वय नाही. आधी स्थिरस्‍थावर हो, मग सामाजिक कार्यात लक्ष घाल’ असा सल्‍ला दिला गेला, पण तो ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ ह्या न्‍यायाने घेतला वसा टाकायला तयार झाला नाही! ‘ग्रीन अम्‍ब्रेला’ने वर्षाला सातशे ते आठशे याप्रमाणे गेल्‍या दोन वर्षांत दोन हजाराहून जास्‍त झाडांचे यशस्‍वी पुनर्रोपण केलेले आहे. त्‍याला त्या कामात त्‍याचे पाच-सहा मित्र सेवावृत्तीने मदत करतात. तेही आपापला व्‍यवसाय सांभाळून. त्‍यांपैकी महेंद्र खवणेकर हा आयुर्वेदिक औषधे तयार करण्‍याचे काम करतो. कपिल जाधव इंडिसेन्‍ट बॅंकेत आयटी मॅनेजर आहे. विशाल रेवणकर एअरलाइन्‍सच्‍या तिकिटांचे बुकींग करतो, तर विनोद अमिन आर्थिक सल्‍लागार म्‍हणून कार्यरत आहे.

‘ग्रीन अम्ब्रेला’ने वाचवलेले पिंपळाचे झाड. ते झाड ‘ग्रीन अम्ब्रेला’च्या कळवा येथील नर्सरी शेजारी लावले आहे. विक्रमला कोणतीही झाडे लावत जायचे ही गोष्‍ट मान्‍य नाही. तो वनस्‍पतीशास्‍त्राचा अभ्‍यास करतो आणि त्‍यानंतर कुठे कोणती झाडे लावायची याचा निर्णय घेतो. त्‍याने झाडांचा अभ्‍यास करताना पुस्‍तकांमधून माहिती मिळवली, अनेक पक्षीतज्ञ आणि निसर्गतज्ञ यांच्‍या भेटी घेतल्‍या. तो वृक्षप्रेमींसोबत विविध ऋतूंमध्‍ये जंगलांमधून फिरला. त्या कामात त्‍याला पुण्‍याचे पक्षीतज्ञ उमेश वाघे यांची  मदत झाल्‍याचे तो नमूद
करतो. आपल्‍या वातावरणाशी सुसंगत, दीर्घायू, जीवनसाखळीला पोषक अशी झाडे वाचवण्‍यात आणि ती वाढवण्‍यात त्‍याला विशेष रस आहे.

 पक्षीमित्रांसोबतच माणसांसाठीही झाडं आपलं आयुष्‍य वेचत असतात, त्‍यासाठी कोणत्‍या वृक्षांची लागवड करावी, जोपासना कशी करावी, याचा अभ्‍यास करायला हवा, असंही तो तळमळीने सांगतो. विक्रम पुढे सांगतो, की झाडांकडून मिळणा-या प्राणवायूचे प्रमाण, त्‍यांना येणारी फळे, त्‍यांचे पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने इतर फायदे यांचा विचार करून झाडे लावल्‍यास ती पर्यावरणास पोषक ठरू शकतील. वड-पिंपळ-उंबर या झाडांकडून मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होतो. पूर्वी महामार्गाच्‍या दुतर्फा वडाची मोठमोठी झाडे लावलेली पाहण्‍यास मिळत असत. रस्‍त्‍यांचे चौपदरीकरण करताना त्‍या झाडांची कत्तल करण्‍यात आली आणि त्‍यांच्‍या जागी विदेशी झाडे लावली गेली. काही ठिकाणी रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा चक्‍क नारळाची झाडेही लावलेली दिसतात. ते अविचारी वृक्षारोपण पाहून विक्रम अस्‍वस्‍थ होतो.

 विक्रम म्‍हणतो, की आपल्‍याकडे रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा किंवा इतरत्रही परदेशी झाडे मोठ्या प्रमाणात लावलेली दिसतात. ती झाडे आपल्‍या वातावरणातील नसल्‍यामुळे त्‍यांना कीड लागत नाही. त्‍यामुळे त्‍यांची वाढ लवकर होते. त्‍यामुळे वनखाते व मनपाकडून ही विदेशी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्‍यात येतात. त्‍यामध्‍ये निलगिरी, अॅकेशिया, सुबाभूळ, गुलमोहर, रेनट्री आणि पेल्‍ट्रोफोरम अशा झाडांचा समावेश असतो. झाडांची लागवड करताना स्‍थानिक झाडांचा किंवा त्‍यांच्‍यावर जगणा-या जीवजंतू-पक्ष्‍यांचा विचार केला जात नाही. याचा परिणाम आपल्‍या बायोडायव्‍हर्सिटीवर होतो. त्‍यायाचा परिणाम पक्ष्‍यांच्‍या संख्‍येवर होऊ लागतो.

भिंतीत उगवलेले झाड काढण्याच्या प्रयत्नात ‘ग्रीन अम्ब्रेला’ची टीमविक्रम सांगतो, की लोकांमध्‍ये झाडांबद्दल गैरसमज असतात. इमारतींच्‍या परिसरात वड-पिंळासारखी झाडे उगवल्‍यास ती मोठी झाल्‍यानंतर इमारतीस धोका निर्माण होईल या गैरसमजापोटी इमारतींच्‍या आजुबाजूची झाडे उपटून फेकून दिली जातात. वड-पिंपळ किंवा उंबर यांसारख्‍या झाडांवर मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. मात्र शहरांत होणा-या वृक्षारोपणामध्‍ये ती झाडे दुर्लक्षित आहेत. त्‍यामुळे शहरात पक्ष्‍यांची संख्‍या घटलेली जाणवते.

 विक्रमने झाडे वाचवण्‍यासाठी काम सुरू केले तेव्‍हा तो सुरुवातीला वाचवलेली झाडे त्‍याच्‍या घराच्‍या आवारात ठेवत असे. मात्र, इतर रहिवाशांनी त्‍याच्‍या कृतीला विरोध केला. झाडांना घातल्‍या जाणा-या पाण्‍यामुळे डासांची पैदास होते आणि त्‍याचा त्रास होतो, असे अजब तर्कट लोकांनी लढवल्‍यामुळे त्‍याला झाडे तिथून हलवावी लागली. मग तो ती झाडे कळवा खाडीलगतच्‍या मोकळ्या जागेत ठेवू लागला. पण तिथेही ठाणे महानगरपालिकेने उद्यानाचे काम सुरू केले आणि विक्रमच्‍या झाडांना तिथूनही विस्‍थापित व्‍हावे लागले. आता, विक्रमला ठाणे महानगरपालिकेच्‍या कळवा येथील बागेमध्‍ये नर्सरीसाठी जागा मिळाली आहे. विक्रमने त्‍या नर्सरीत वड, पिंपळ, उंबर, पायर, कृष्‍णवड, नान्‍द्रुक, ऐन, बेहडा, आवळा, भोकर, मोह, कडूनिंब, शिवण, कुसुम, सोनसावर, उंडण, सीताअशोक, बहावा, शेमट, करंज, कळम, अर्जुन, पळस, बि‍बळा, जांभूळ, मेढशिंग, बेल, तोरण, बोर, रिठा, टेटू, बिब्‍वा, पांगारा अशी नानाविध झाडांची रोपे तयार केली आहेत.

‘नक्षत्रवनात’ वृक्षारोपण करत असताना त्‍याच जागेवर महापालिकेने बाग विकसित करण्‍यास घेतली. तेथे लॉन तयार करणे आणि शोभेची झाडे लावणे अशी कामे सुरू करण्‍यात आली. ते पाहून विक्रमने ठाणे महानगरपालिकेला संपर्क साधला. विक्रमने त्‍यांच्‍यासमोर एक प्रस्‍ताव सादर केला. त्‍याने म्‍हटले, की ‘आपल्‍या सत्‍तावीस नक्षत्रांपैकी प्रत्‍येक नक्षत्राचा एक पूजनीय वृक्ष असतो. त्‍या बागेत आपण प्रत्‍येक नक्षत्राचा एक असे सत्‍तावीस वृक्ष लावू.’ विक्रमची ती कल्‍पना मनपा अधिका-यांना पसंत पडली. मग तेथील कंत्राटदाराच्‍या मदतीने बागेत ‘ते’ सत्‍तावीस वृक्ष लावण्‍यात आले. अद्याप त्या बागेचे नामकरण झालेले नाही. मात्र सर्वजण त्‍या बागेचा उल्‍लेख ‘नक्षत्रवन’ असाच करतात.

 विक्रमने स्‍वतःच्‍या इमारतीच्‍या आवारात सूत्रबद्ध पद्धतीने झाडे लावली होती, मात्र रहिवाशांनी गाड्या उभ्‍या करायला अडचण होते म्‍हणून ती उपटून फेकून दिली. ती घटना विक्रमच्‍या जिव्‍हारी लागली. पण तो हार मानायला तयार नाही. विक्रम म्‍हणतो, ‘हे चित्र नक्‍की बदलेल. मुंबईमध्‍ये २६ जुलै २००५च्‍या पुरानंतर लोकांना प्‍लास्टिकचे दुष्‍परिणाम कळून चुकले. प्‍लास्टिकमुळे गटार-नाले तुंबल्‍यावर काय हाहाःकार घडू शकतो याची प्रचिती आली. अशीच एखादी आपत्‍ती आली, की लोकांना झाडांचेही महत्‍त्‍व कळल्‍याशिवाय राहणार नाही. पण, आपत्‍ती येण्‍याची वाट बघत बसण्‍यापेक्षा आधीच जर आपण शहाणे झालो तर ते आपले भाग्‍यच!’

 विक्रमने वर्षभर ताज हॉटेलमध्‍ये उद्यान प्रभारी (गार्डन इन्‍चार्ज) म्‍हणून काम केले. नंतर त्‍याने स्‍वतःहून ती नोकरी सोडली. आता तो उद्याने विकसित करण्‍याची (गार्डन डेव्‍हलपिंग) कामे घेतो. ठाणे , कर्जत, मुंबई या ठिकाणी त्‍याचे काम सुरू आहे. विक्रमला त्‍याच्‍या कामामध्‍ये घरून फारसा पाठिंबा मिळाला नाही. त्‍याने नोकरी वगैरे सांभाळून झाडांच्या संवर्धनाचे काम करावे असे घरच्‍यांचे म्‍हणणे असे. विक्रमने स्‍वतःचा उद्योग सुरू केल्‍याने घरातून होणारा विरोध मावळला आहे.

‘ग्रीन अम्ब्रेला’ची नर्सरीविक्रमचे मित्रांसोबत आसपासच्‍या जंगलात जायचे, तिथे पडलेल्‍या बिया गोळा करायच्‍या आणि त्‍यांची लागवड करून झाडे वाढवायचे व्रत जोमात सुरू आहे. ठाणे महानगरपालिका किंवा राज्‍य शासन यांनी, ‘ग्रीन अम्‍ब्रेला’ने वाचवलेली झाडे ठेवण्‍यासाठी जागा उपलब्‍ध करून द्यावी, अशी त्‍याची मागणी आहे. विक्रम ‘झाडांवर प्रेम करणा-या प्रत्‍येकान जमेल तसा हातभार लावावा, देता येईल, तेवढा वेळ द्यावा,’ असे आवाहन करतो. शाळा-कॉलेजांतील विद्यार्थ्‍यांनीसुद्धा त्‍यांच्‍या परिसरात वृक्षसंवर्धनाचे काम नेटाने सुरू केल्‍यास पर्यावरणाचे संतुलन राखण्‍यास मोलाची मदत होईल.

(पूर्वप्रसिद्धी – ‘ऋतुगंध’ मासिक, मार्च २०१२)

ह्रषीकेष सोनवणे
ए-३, नव अलिबाग कोऑपरेटीव्‍ह हौसिंग सोसायटी
नागडोंगरी, चेंढेरे, ता. अलिबाग,
जिल्‍हा रायगड – ४०२०२०१
मोबाइल – ९३७३७२००७६
इमेल – rushikeshs04@gmail.com

विक्रम यंदे
ए-१२ पारिजात सोसायटी,
गुणसागर नगर, स्टेशन रोड,
जैन मंदिरा जवळ, कळवा पश्चिम,
ठाणे – ४००६०५

नर्सरीचा पत्ता –
नक्षत्र उद्यान, गणेश विसर्जन घाट,
कळवा नाका, कळवा पश्चिम,
ठाणे – ४००६०५
मोबाइल – ९८३३९८८१६६
इमेल – vikram.yende99@gmail.com

Last Updated On – 17th Dec 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. इमारती, भिंती वरील झाडे काढून
    इमारती, भिंतीवरील झाडे काढून त्याचे पुनर्रोपण कसे करायचे, याची माहिती मिळाल्यास या भागातील अनेक झाडांचे पुनर्रोपण करण्यास मदत होईल. याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करावा.

  2. मला पण आवडते झाडे लावणे…
    मला पण आवडते झाडे लावणे निसर्गाचे संवर्धन करणे. खूप बरे वाटते आनंद वाटतो.

Comments are closed.