हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक उपचारातील साम्य

1
282

भारतातून हज यात्रेला हजारो भाविक दरवर्षी जातात. त्यांना सरकारने देऊ केलेल्या सवलतींच्या बातम्या व त्यावर प्रतिकूल किंवा अनुकूल प्रतिक्रिया वृत्तपत्रांतून छापून येतातमात्र त्या वार्तांतून हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक आचारात असलेले साम्य कधी समोर येत नाहीते रामचंद्र वझे यांना सुलतान जहाँ बेगमच्या हज यात्रेच्या वृत्तांतात वाचण्यास मिळाले…

भोपाळच्या गादीवर चार पिढ्या महिलांनी 1818 पासून शंभर वर्षे, मधला काही काळ वगळता राज्य केले. त्यातील पहिली बेगम होती कुदसिया बेगम; नंतर तिची मुलगी सिकंदर बेगम, त्यानंतर तिची मुलगी शहाजहाँ बेगम आणि शेवटची तिची मुलगी सुलतान जहाँ बेगम. सिकंदर बेगम आणि तिची नात सुलतान जहाँ बेगम या दोघींनीही हज यात्रा केली आणि विशेष म्हणजे त्यांनी त्या यात्रांची हकीगत लिहिली. सिकंदर बेगम हिने लिहिलेल्या यात्रावृत्ताचा अनुवाद 1870 मध्ये म्हणजे सिकंदर बेगम हिच्या मृत्यूनंतर दोनेक वर्षांनी लंडन येथे प्रकाशित झाला. त्या अनुवादाचे शीर्षक होते – Pilgrimage to Mecca व अनुवाद केला होता भोपाळचा तत्कालीन पोलिटिकल एजंट विलोबी ओसबॉर्न (Willoughby Osbourne) याच्या पत्नीने. ती यात्रा 1863-64 या काळात झाली होती. सिकंदर बेगम हिच्या नातीने हज यात्रा 1903 साली म्हणजे आजीने केलेल्या यात्रेनंतर चाळीस वर्षांनी केली. तिने लिहिलेल्या हकीगतीचा 1909 साली कोलकाता येथील ठाकर स्पिंक या कंपनीने प्रकाशित केला. त्या पुस्तकाच्या एकंदर दहा आवृत्त्या चार वर्षांत प्रकाशित झाल्या.

तो यात्रावृत्तांत दोन भागांत आहे. पहिला भाग हा माहितीपर आहे. त्यात अरेबिया देशाची भौगोलिक माहिती, अरेबियाचे प्रांत, त्या प्रांतांची मालकी कोणाकडे, मक्कामदिना यांचे भौगोलिक स्थान, हवामान, मदिना प्रांताची मक्केच्या तुलनेतील वसाहतस्नेही वैशिष्ट्ये आहेत – ‘मदिनेत फळझाडांच्या अनेक राया आहेत. शहराभोवतालच्या टेकड्यांतून खजुराची झाडे भरपूर आहेत. हवामान एकंदरीत सौम्य असल्याने लोकांना मदिना सोडून अन्यत्र जाण्याची गरज वाटत नाही.’ मदिनेची ती विशेषता सांगितल्यानंतर पाठोपाठ मक्का आणि इतर ठिकाणी व्यापार हाच पोट भरण्याचा मार्ग व तो ज्याचा ज्याचा म्हणून करता येईल त्याचा होतो असे मोजक्या शब्दांतील वर्णन येते. मात्र लेखिका कुशल प्रशासक होती आणि राज्यकारभार करताना आर्थिक बाजू किती काळजीपूर्वक सांभाळावी लागते हे तिला पुरेपूर ठाऊक होते. त्यामुळेच ती पुढे म्हणते, “जमीन महसूल कमी असल्याने व्यापाराच्या प्रत्येक शाखेवर कर लावलेले आहेत. सरकार जकात वसूल करते. जकातीचे दर पुष्कळ आहेत. त्याचे मूळ आर्थिक नियमांत शोधावे लागेल. राज्यकारभार सुरळीत चालण्यास हवा असेल तर देशाचे उत्पन्न हे खर्च भागवण्याइतके मोठे असले पाहिजे.”

त्यानंतर बेगम अरेबियातील अनेक तीर्थस्थळांची माहिती देते आणि ती देता देता त्या स्थळी कोणते धार्मिक आचार कसे केले जातात ते स्पष्ट करते. ते आचार किंवा प्रथा आणि काही वेळा कुराणातील आदेश बघितले, की मुस्लिम आणि हिंदू धार्मिक आचार यांतील साम्य ठळकपणे जाणवते.

जेद्दा जवळील समुद्रात एक खडक आहे. तो ओलांडताना त्यावर वस्त्रे अर्पण केली पाहिजेत असा धर्माचा आदेश आहे. तो आदेश असा – ‘संपूर्ण देहशुद्धी (स्नान) आणि आंशिक देहशुद्धी केल्यानंतर, पुरुषांनी शरीराचा वरचा भाग एका वस्त्राने झाकावा. खालच्या भागावर दुसरे वस्त्र गुंडाळावे. डोके उघडे ठेवावे. स्त्रियांनी देहशुद्धीनंतर नेहमीचे कपडे घालावेत, परंतु चेहरा बुरख्याने झाकू नये.’ हे लिहिताना तळटीप म्हणून रिचर्ड एफ बर्टन याने 1855 मध्ये लिहिलेल्या मदिना यात्रेच्या वृत्तांतातील मजकूर उद्धृत केला आहे – “स्त्रिया शिवलेले कपडे वापरू शकतात, पांढरे किंवा फिकट निळ्या रंगाचे; पण काळ्या रंगाचे कपडे वापरू नयेत. बुरखा चेहऱ्यापासून लांब असावा.” त्यानंतर बेगमने आणखी तपशील दिले आहेत- ‘कोणत्याही प्रकारचा शृंगार करणे मना असते. मौजमजा, शिकार, प्राण्यांची हत्या करण्यासही मनाई आहे. शरीरसंबंधही वर्ज्य असतो.’

काबा ही वास्तू मुस्लिम धर्मीयांसाठी सर्वात पवित्र. त्या वास्तूला स्नान घालणे हे बंधनकारक नाही. मात्र त्याला स्नान विधिपूर्वक घातले जाते. मक्का शहराचा शेरीफ आणि टर्किश पाशा हे तुर्की सुलतानाचे प्रतिनिधी. ते स्नान घालण्यापूर्वी शरीराच्या खालच्या भागाला शाल गुंडाळतात. ते ईश्वराच्या प्रासादाच्या किल्ल्या ज्याच्याकडे असतात त्या शेबासाहिब यांच्याबरोबर काबामध्ये प्रवेश करतात. त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक क्लीब असतात. प्रथम ते स्वतःच्या हातांनी भिंती व नंतर छप्पर-फरशी धुतात. त्या गोष्टी ते तीन तीन वेळा करतात – दोनदा पाण्याने आणि तिसऱ्यांदा गुलाबपाण्याने. भिंतींना व खांबांना – फरशीला आंघोळ घालून झाली, की मग भिंतींना चंदनाचा लेप दिला जातो. सुगंधी धूप जाळला जातो.

ज्या पाण्याने काबाला आंघोळ घातलेली असते ते पाणी, श्रद्धाळू भाविक पवित्र मानतात आणि ते चंबूतून भरून घेतात. ते स्वतःच्या घरी परतल्यावर त्यातील काही भाग त्यांच्या सख्या-सोबत्यांना आणि नातेवाईकांना भेट म्हणून देतात (हिंदूंच्या गंगाजल  पवित्र मानणे आणि गुरू किंवा ईश्वरमूर्तीच्या पायांवर घातलेले पाणी तीर्थ म्हणून घेऊन जाणे या प्रक्रियेच्या किती जवळ ती प्रक्रिया जाते हे जाणवते. अल्लाह मूर्तिस्वरूपात नसतो असे म्हणणाऱ्या मुस्लिम धर्मातील भाविक काबा या वास्तूला हिंदू जसे मूर्ती पूजतात तसे पूजतात असे वाटते).

महाभारतात कर्णाची परीक्षा तो ज्या परशुराम यांच्याकडे धनुर्विद्या शिकण्यास गेला होता त्यानी घेतली होती. त्याच्या मांडीवर डोके टेकून परशुराम झोपले. एक भुंगा आला आणि त्याने कर्णाच्या मांडीला दंश केला. मांडीतून रक्त आले तरी गुरुजींची निद्रा भंग पावू नये म्हणून कर्णाने ते सर्व सहन केले अशी कथा सांगितली जाते. अगदी तीच कथा महंमद  पैगंबर आणि त्यांचा भावी उत्तराधिकारी अबूबकर सिद्दीकी यांच्या संदर्भात घडली होती त्याबद्दल बेगम लिहिते –

मक्का शहराच्या बाहेर जबल-ई-सौर हा पर्वत आहे. त्याची गणती पवित्र परिसरात होते. त्या पर्वतात एक गुहा आहे. तेथे जाण्याचा रस्ता अवघड आहे. तो चालून यात्रेकरू गुहेशी पोचतात. तिला ‘घर’ असे संबोधले जाते. गुंहेचे तोंड लहान आहे आणि तिच्यातून बाहेर पडण्याचा दरवाजा मागील बाजूला आहे तो रुंद आहे.” (यावरून आपल्याला वैष्णोदेवी मंदिर आठवते).

“प्रेषित (पैगंबर) जेव्हा मक्केच्या बाहेर पळून गेले तेव्हा ते त्या गुहेत अबूबकर सिद्दीकी यांच्याबरोबर आले. ते तेथे आले आणि कबुतरांच्या एका जोडीने गुहेच्या दारावर एक घरटे बांधून त्यात अंडी घातली. एका कोळ्याने जाळे विणले. त्यामुळे त्या गुहेत कोणी राहत नसावे असा अंदाज बांधून, पैगंबरांच्या पाठलागावर आलेले लोक निघून गेले. अबूबकर याने गुहा स्वच्छ केली. अबूबकर याच्या मांडीवर डोके ठेऊन प्रेषित शांत झोपले. गुहेतील भिंतींना असलेली सर्व छिद्रे अबूबकर याने त्याच्या अंगरख्याच्या चिंध्यांनी बुजवली – म्हणजे छिद्रात लपून बसलेले जीव प्रेषितांची झोपमोड करणार नाहीत. एक भोक उघडे राहिले – तेथे अबूबकर याने त्याचा अंगठा दाबून धरला. त्या ठिकाणी असलेल्या सर्पाने अबूबकर याच्या हाताला दंश केला. त्याची कळ इतकी तीव्र होती, की अबूबकरच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले; ते प्रेषितांच्या गालावर पडले. प्रेषितांनी त्यांच्या लाळेने अबूबकरची जखम पुसली आणि बरी केली.”

काबा ही वास्तू प्राचीन आहे. तिची बांधणी आठ वेळा झाली. त्या वास्तुवर दरवर्षी वस्त्र चढवले जाते. त्यासाठी वापरले जाणारे वस्त्र कॉन्स्टँटिनोपल येथून येते. प्रथम ते वस्त्र घेऊन येणारी मिरवणूक अराफत येथे जाते. हज यात्रा आणि सारे विधी उरकले, की ती काबा येथे येते. तेथे ते महावस्त्र सीरियन भागात ठेवले जाते. नंतर जुने वस्त्र उतरवले जाते आणि नवे महावस्त्र चढवले जाते. जुन्या महावस्त्राचा एक भाग – दारावरील भरतकाम केलेला पडदा आणि तुर्कस्तानच्या सम्राटांची नावे लिहिलेला भाग मक्का शहराच्या शेरिफकडे जातो, उर्वरित भागाचे सारख्या आकाराचे तुकडे करून शैबी साहिब आणि काबाचे सेवक व क्लीब यांच्यात वाटले जातात.” (हिंदूंची पालखी आणि प्रसाद यांच्याशी ते उपचार किती मिळतेजुळते आहेत ते पाहा!)

काबा या वास्तूला प्रदक्षिणा घालणे हा धार्मिक आचारांपैकी आवश्यक, नव्हे सक्त जरूरीचा भाग. ती प्रदक्षिणा कशी घालावी याची पद्धत बेगमने विशद केली आहे – “यात्रिक प्रदक्षिणेला सुरुवात करतो ती काळ्या पत्थरापासून. त्या पत्थरावर एक सोन्याचा पत्रा आहे आणि काबा या वास्तूसमोर तो एका कोपऱ्यात उभा आहे. प्रदक्षिणा करताना कुराणातील वचने आणि नेमून दिलेल्या प्रार्थना सतत म्हणत राहणे आवश्यक असते. प्रदक्षिणा पुरी झाली, की यात्रेकरू काळ्या पत्थरासमोर पोचतो. तेथे पोचल्यावर त्याने गर्जना करायची असते – बिस्मिल्लाह अल्लाहू अकबर (ईश्वराची कृपा. तो सर्वश्रेष्ठ आहे.)

हिंदू लोकही देवळात गेले, की अपरिहार्य असल्यासारखी प्रदक्षिणा घालतात आणि त्यांच्या सवयीचे स्तोत्र म्हणतात. ते आठवले, की हिंदूंच्या पूजाअर्चेत स्वीकार कोणत्या गोष्टींचा करायचा याचे स्वातंत्र्य असल्याचे मनावर पुन्हा एकदा ठसते.

“ईश्वराच्या घराच्या एकंदर सात प्रदक्षिणा केल्या जातात. पहिल्या तीन प्रदक्षिणांच्या वेळी पुरुष त्याची छाती पसरून आणि ताठ मानेने चालतात. पुढील प्रदक्षिणा ते नेहमीच्या चालीने करतात. स्त्रिया सर्व प्रदक्षिणा नेहेमीच्या चालीने करतात.”

बेगमने यात्रा 1903 साली केली. तिच्या राज्यात हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ होती असे उल्लेख तिच्या आत्मवृत्तात येत नाहीत. तिची पणजी कुदसिया बेगम हिचा महत्त्वाचा असा एक मंत्री हिंदू होता. विशेष म्हणजे भोपाळच्या सर्व बेगम या ब्रिटिशांशी एकनिष्ठ होत्या. त्यांनी ब्रिटिशांची 1857 च्या उठावात सर्वतोपरी मदत केली होती. तो उठाव बहुतांशी हिंदूंनी केला होता, तरी हिंदूंबद्दल त्या सर्व बेगमांनी द्वेष बाळगला नव्हता असे त्यांचे लिखाण वाचताना जाणवते.

बेगमच्या हज यात्रा वृत्तांताचे तपशील वाचले, की मनात विचार येतो, हिंदूंच्या धार्मिक आचारांशी मुस्लिमांच्या धर्माचाराचे इतके साम्य असताना, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त का केली गेली असावीत?

– रामचंद्र वझे 9820946547  vazemukund@yahoo.com

——————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here