हरितायन – वृक्षराजीचा अनवट आनंद प्रदेश!

0
48
_Haritayan_1_0.jpg

मनुष्याला त्याच्या शहरी महानगरी जीवनात वीस-पंचविसाव्या मजल्यावरील सदनिकेतसुद्धा निसर्गातील हिरवाईचा, वृक्ष-पाने-फुले-फळांचा, त्यांच्या रंग-गंधांसह मनमुराद, उत्कट आस्वाद घ्यायचा असेल तर ‘हरितायन’ हे पुस्तक हातात घ्यावे आणि त्यात कांचन प्रकाश संगीत यांनी लिहिलेल्या ललित कथा वाचण्यास लागावे! वाचक त्यातील तरल, भावविभोर अनुभवात, गप्पागोष्टींत केव्हा तद्रूप होतो ते कळणारही नाही. त्यातील प्रत्येक कथा एका झाडाभोवती हळुवार विणलेली आहे. पुस्तकातील अकरा कथा या दहा वेगवेगळे वृक्ष व एक तुकुमराई म्हणजे तुळस यांच्याविषयी आहेत. त्यांपैकी चंदन, चिंच, औदुंबर, शेवगा, बोर, बकुळ, बाभूळ, जांभूळ, पिंपळ, पळस आणि तुळस यांतील एखाद-दुसरे नाव वगळता ती सगळी झाडे वाचकाच्या नेहमीच्या पाहण्यातील आहेत. पण वाचक त्यांच्याकडे लेखिकेच्या सुहृदयतेने, मायेने क्वचितच पाहत असतो हे पुस्तक वाचताना जाणवते. बरे, अपवाद वगळले तर त्या झाडांची लागवड करावी अशी ना त्यांची फळे ना त्यांची लाकडे. घरांच्या, बंगल्यांच्या आवारात तर त्यांना स्थान नाहीच. बाभूळ, बोराटी या तर उपद्रवी म्हणून गणलेल्या वनस्पती; पण लेखिकेने जवळच्या व्यक्तीच्या ममत्वाने चित्रण करावे त्या भावनेने तेथे केलेले झाडांचे व्यक्तिचित्रण-वृक्षचित्रण मनोमन भावणारे आहे. लेखनाचे स्वरूप वाचकाचे आप्त, सहकारी, मैत्रिणी यांच्याशी मुक्त संवाद, गप्पा असे असले तरी केंद्रस्थानी पाने-फुले-फळांची झाडेच आहेत. मुक्त संवाद व चटका लावणारे शेवट यांमुळे त्या लेखांना कथांचा बाज लाभला आहे.

लेखिकेच्या बालपणी शकरी नावाच्या मैत्रिणीच्या घराच्या आवारात बोरीची चार झाडे होती. लेखिका तिच्या आणखी मैत्रिणींसह बोरे खाण्यासाठी – ‘बोर फराळा’साठी तिच्याकडे जाते, आईचा नकार असूनही. तिला बोरे काढताना अनेक ठिकाणी काटे टोचतात, ओरखड्यांतून रक्त येते. ती घरी गेल्यावर ‘काटेबोच बोर फराळ’ झाल्याचे सांगते. शाळेच्या गेटवर मधल्या सुट्टीत खाल्लेली चण्या-मण्या बोरे, बोरांपासून बनवतात तो लब्दू, मध्यप्रदेशात मिळणारे बोरकूट, बोरांचे सरबत, चटणी अशा अनेक आठवणी मैत्रिणींबरोबर निघतात. ‘तेरे बंगले के पीछे, तेरी बेरी के नीचे… कांटा लगा…’ हे बोरीवरचे गाणेही सुचते. लेखिका नंतरच्या काळात मुंबईत आल्यावर गोवंडी स्टेशनवर जळमटांनी गुदमरणारी बोर पाहून म्हणते, ‘मुंबईत तगमगत, जंजाळत जगणाऱ्या अनेकांचे प्रतीक आहे ती. त्या बोरीकडे पाहून मला खूप वाईट वाटते.’

लेखिका ‘पळसपान’ या कथेत पळसपान आवडण्याचे कारण सांगताना म्हणते, “‘पानभर जाळीदार जीवनरस वाहिन्या व मृदू शहारे उमटवणारा त्याचा स्पर्श…’ “हो तर! झाडाला दुखते, वाईट वाटते, तसा झाडाला आनंद होतो, झाडे घाबरतातही. हे सगळे शास्त्राने सिद्ध केले आहे.” ताईचे ते बोलणे लेखिकेच्या बालमनावर कोरले आहे. पळसाच्या पानांपासून पत्रावळी-द्रोण बनवताना, टाके चोयीने कसे घालायचे हे सांगताना, “पत्रावळ कशी तर सारभात खाऊनही जमीन कोरडी दिसली पाहिजे!” आई एकदा म्हणाली होती, “अशीच, नेहमी पळसपानासारखी राहा.” त्याचा अर्थ नंतरच्या काळात लेखिकेला उमगतो. “पळसपानाच्या हिरवस मऊ मायेने तकाकणारे सगळे समजून आल्यागत निवांत” असा सुंदर अर्थ लेखिकेने मांडला आहे. लेखिकेच्या मुळशी धरणापलीकडील आजोळगावी पायी जाताना पहिल्या विसाव्याचे ठिकाण म्हणजे जांभळाने लगडलेली ‘जांभळाई’. लेखिकेला त्या झाडाची लेंडी जांभळे काढून, मनसोक्त खाण्याचे दिवस आठवतात. लहानपणी कुरडया खाल्ल्याने आईकडून मिळालेले रट्टे व त्या रागाच्या भरात झाडाझुडपांची पाने कुस्करताना आलेला जांभळीचा वास हा एक मनोरम अनुभव आहे. पुढे एकदा, मुंबईत बोरिवलीच्या रेल्वे यार्डच्या भिंतीजवळचे जांभळीचे झाड पेटलेले पाहून लेखिकेला दुःख होते. “लहानपणी मला वाटायचे, की आमच्या घराजवळ एखादी जांभळ असावी, पण आता वाटते, जेथे जेथे जांभळ तेथे तेथे माझेच घर आहे की!” या विचाराला मनापासून दाद दिली पाहिजे.

_Haritayan_3.jpgलेखिकेने ‘वानकाची गोष्ट’मध्ये ऑफिसच्या खिडकीतून दिसणारा पिंपळ व त्याच्या कोवळ्या पालवीशी असलेले पिंपळप्रेम याविषयी सुंदर लिहिले आहे. लेखिकेनेच पिंपळाला ते नाव दिले आहे – ‘वानक’ – म्हणजे वाकून नमस्कार करणारा पिंपळ. ऑफिस इमारतीला प्रसाधनगृहाच्या फरशा उखडल्या म्हणून आख्खा पिंपळच एक दिवस तोडून टाकला गेल्याने लेखिकेच्या मनाची घालमेल होते, पण काही दिवसांनी, त्याच जागी उगवलेली रोपे म्हणजे पिंपळ उडून जाऊ नये म्हणून ठेवलेला पेपरवेटच जणू! अशी कल्पना लेखिकेने लढवली आहे. तुळशीचे रामतुळस, कृष्णतुळस, रानतुळस असे कितीतरी प्रकार. तुळशीचे लग्न, ते दरवर्षी का करतात याविषयी ‘तुकुमराई’ या कथेत वर्णन आले आहे. तुकुमराई म्हणजे तुळशीचे बी. विठोबाची सोन्यामोत्याची तुला केली जात असताना ती कशानेच होईना म्हणून तुळशीचे पान घातले, तेव्हा तुला झाली! ती गोष्ट म्हणजे विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीमंजिऱ्याचा हार घालण्यामागील कारणच होय असे लेखिकेने म्हटले आहे.

‘ऋषीमुनीप्रमाणे एकाच जागी स्थिर साधनेला बसलेल्या आत्ममग्न’ चिंचवृक्षाबद्दल, बकुळीच्या फुलाबद्दल–झाडाबद्दल; तसेच, बाभळ, चंदन यांविषयी त्या कथांतून भरभरून लिहिले गेले आहे. काही झाडांबद्दल समाजात रूढ झालेल्या समज-अपसमजाचाही पुस्तकात उल्लेख आहे. ‘येते बरं’ या पहिल्या कथेत औदुंबरासंदर्भात ज्या काही घटना घडतात त्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या आहेत असे वाटून जाते. लेखिकेची ओघवती भाषाशैली, निसर्गाविषयीची प्रगल्भ जाण व सांगण्यातील सहजता या बाबी जमेच्या आहेत. हे पुस्तक सर्वांसाठी असले तरी खास करून किशोरवयीन व तरुणांनी वाचावे असे वाटते- जेणेकरून त्यांना एक अनवट असा आनंदप्रदेश गवसेल!

हरितायन
लेखक – कांचन प्रकाश संगीत
प्रकाशक – प्राजक्त प्रकाशन
पृष्ठ संख्या – 224
मूल्य – 240 रुपये

– अजित मगदूम, ajitbalwant@gmail.com

(प्रेरक ललकारी, ऑगस्ट २०१८वरून उद्धृत. संपादीत-संस्कारीत)

Last Updated On 1st Nov 2018

About Post Author

Previous articleसकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती
Next articleनवरात्रातील वडजाई
अजित मगदूम यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’च्या वाशी येथील 'कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालया'मध्ये इंग्रजी विषयाचा अधिव्याख्याता, विभागप्रमुख आणि उपप्राचार्य अशा विविध पदांवर काम केले. त्यांनी एम. ए, एम. फिल आणि पीएचडी या पदवी मिळवल्या आहेत. मगदूम हे संस्थेच्या उरण आणि मलकापूर येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. तौलनिक साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. त्यांनी मराठी दलित साहित्य आणि आफ्रिकन-अमेरिकन साहित्य या विषयांवर संशोधन केले आहे. मुल्कराज आनंद, चेकॉव्ह, टॉलस्टॉय अशा अनेक कथांचे मराठी अनुवाद केले. त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून सत्तर हून अधिक पुस्तकांचे परीक्षण लिहिले आहे. तसेच, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखती घेण्याचे कार्यक्रम केले आहेत. ते किशोरवयीन व महाविद्यालयीन युवकांशी व्यसन विरोधी काtर्यक्रमांद्वारे संवाद साधतात. लेखकाचा दूरध्वनी 7506067709