स्मृती.. मनस्वी कलावंताच्या.. (Memory .. of a Sensible artist ..)

माणसाच्या आयुष्यात तीन ‘P’ अत्यंत महत्त्वाचे ठरतात. Period, Place & Persons. माझ्या भाग्याने, मी अनेक चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात आलो. माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या घडणीवर ज्या थोर व्यक्तींचा खोलवर प्रभाव आहे, त्यांपैकी एक म्हणजे चाळीसगावचे विश्वविख्यात छायाचित्रकार कै. बाबूजी, म्हणजे केकी मूस. केकी मूस चाळीसगावला एका घरात तेवीस वर्ष राहिले. तेथून बाहेर पडले नाहीत. त्यांची टेबलटॉप फोटोग्राफी जगप्रसिद्ध आहे.

बाबूजींचा आणि माझा ऋणानुबंध तीन पिढ्यांचा. मी चाळीसगाव येथे नोकरीनिमित्त असताना त्यांच्याकडे खूपदा जात असे. त्यांचे सारे जीवन मनस्वी होते. कलावंताजवळ असणारी सारी वैशिष्ट्ये त्यांच्याजवळ होती, परंतु माणूस म्हणूनही त्यांचे व्यक्तित्त्व वेगळे, भारावून टाकणारे अन् विलक्षण होते. त्यांचा 31 डिसेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या सहवासातले काही क्षण, त्यांच्या स्मृती मन:पटलासमोर रुंजी घालत आहेत.

बाबूजींकडे गेल्यावर त्यांच्याशी बोलताना वेळ कसा निघून जाई ते कळत नसे. त्यांच्यासमोर बसलेले असताना घड्याळ पाहिलेले त्यांना आवडत नसे. गप्पांच्या ओघात एकदा खूप वेळ होऊन गेला. रात्रीचे दहा वाजून गेले असावेत. मी सहज म्हटले, ‘बाबूजी, जेवण राहिले असेल ना!’ ते म्हणाले, अरे अजून थोडा वेळ आहे. अजून तर कलकत्ता मेल जायचीय.’

मला आश्चर्य वाटले. त्यांच्या बोलण्यात हा संदर्भ पुढेही दोन-चार वेळा आला. एकदा, त्यांना विचारायचे धाडस केले. बाबूजी कलकत्ता मेल जाण्याचा अन् तुमच्या जेवणाचा काय संबंध? ते मिस्किल हसले, म्हणाले, अरे, ती एक मोठी कहाणी आहे. मी तरुण असताना माझी एक प्रेमिका होती. माझ्यावर आणि माझ्या कलेवर तिचे मोठे प्रेम, आमच्या पारशी समाजात जवळच्या नात्यात विवाहसंबंध होतात, छोटासा समाज आहे आमचा. तशी ती आमच्या नात्यातलीच, पण आमचे प्रेम तिच्या पिताजींना मान्य नव्हते. त्यांना वैभवात लोळणारा दामाद हवा होता! ते तिला म्हणायचे, हा केकी म्हणजे कलावंत, फकीर! हा तुला कसा काय सुखात ठेवील? पण तिचा तर माझ्यावर फार जीव. तिने मला आश्वासन दिले होते, ‘पुढल्या शुक्रवारी रात्री कलकत्ता मेलने मी तुला भेटायला येईन! पण तिचे पिताजी कसले जिद्दी, त्यांनी तिला येऊ दिले नाही. मी मात्र तिने सांगितल्याप्रमाणे, त्या शुक्रवारपासून रोज कलकत्ता मेलने ती येईल म्हणून मोठ्या आशेने वाट पाहतो, तोपर्यंत जेवण्याचे थांबतो. आज अनेक वर्ष हा क्रम सुरू आहे. आयुष्यभर तिची वाट पाहात मी थांबलो. आजही, एकटा तिची वाट पहात असतो. मी वाट पाहीन असा शब्द तिला दिला होता ना!….

केवढी ही निष्ठा… आपल्या शब्दावर आपल्या प्रेमावर, बाबूजींनी कथन केलेला तो प्रसंग आठवला, की आजही सारे अंग शहारते अन् आपल्या प्रेमिकेच्या आठवणीत बुडून गेलेला त्यांचा भावमग्न चेहरा नजरेपुढे येतो.

आजचा जमाना मोबाईलचा, परंतु त्यावेळी सारा संवाद प्रामुख्याने टपालाने होई. पोस्टमनने दिलेले टपाल केव्हा एकदा पाहू असे होऊन जायचे, पाकिट फोडून त्यातले पत्र वाचण्याची कोण उत्सुकता असायची! पण बाबूजींचे वागणे गूढ… रोज आलेले टपाल मग ते किती का महत्त्वाचे असेना ते शांतपणे त्यांच्या टेबलावर ठेवून देत आणि सारे टपाल केवळ गुरुवारी वाचत. त्यांच्या या वागण्याला संयम म्हणायचे की विक्षिप्तपणा, हे कळत नसे?

बाबूजी सौंदर्याचे नि:स्सीम उपासक. ते नेहमी म्हणत… “ज्याला सौंदर्याचे आकर्षण नाही असा मनुष्य या जगात विरळा… सौंदर्याने मला कायमचे आकर्षित करून घेतले आहे. ‘जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे…’ अशी माझी स्थिती होऊन जाते. मी जेव्हा सौंदर्याविषयी बोलतो त्यावेळी केवळ मानवी सौंदर्य नव्हे तर प्राकृतिक सौंदर्याविषयी मला अधिक प्रकर्षाने बोलायचे असते. निसर्ग किंवा प्रकृती मला जड, अचेतन वाटत नाही… जेव्हा एखादी कलिका पानाआडून डोकावत असते किंवा एखादे फूल उमलून येते, एखादे फळ रसभरून पिकते, त्यावेळी जीवनाचा तोच चैतन्यस्त्रोत त्या वनस्पतींच्या हृदयांतून प्रवाहित होताना मला दिसतो. पाण्यावर उठणारे तरंग, थंड हिमवर्षाव, आकाशात फुलणारं चंद्रकमळ पाहून आणि पक्ष्यांचा होणारा किलबिलाट ऎकून, का कुणास ठाऊक, माझे मन आनंदविभोर होऊन उठते. प्रकृतीच्या नृत्यलीलेनं माझं मन प्रकृतीशी तादात्म्य होऊन जाते.. असे का व्हावे याचे मला कित्येकदा आकलन होत नाही.”

थोर कलावंतांच्या रसिकतेचा हा महन्मंगल आविष्कारच नाही का?

कलावंताची दृष्टी सामान्य माणसापेक्षा वेगळी असते. बाबूजींनी त्यांच्या जगप्रसिद्ध छायाचित्रांपैकी एक सुंदर छायाचित्र मला दाखवले. मला विचारले, कशाचे वाटतेय हे छायाचित्र! मी म्हटले, सूर्योदयाचे… ते लगेच. म्हणाले, For everybody it is sunrise but for me it is 15th Aug. 1947… खरोखरच, दि. 15 ऑगस्ट 1947 च्या स्वातंत्र्यसूर्याचे काढलेले हे छायाचित्र आहे…

दुसरा प्रसंग असाच. त्यांच्या ‘किचनमध्ये’ आम्ही गप्पा मारत होतो. तेथील शिंकाळ्यात कांदे होते. त्यांना सुंदरसे मोड आले होते. ते तुकतुकीत, जिवंत मोड म्हणजे सृजनाचे प्रतीकच जणू… मला त्यांनी विचारले, ह्या दृश्याचे वर्णन कसे करता येईल? मी थोडा विचारमग्न होत असता लगेच ते उद्गारले. ‘Onions awakened’ किती समर्पक वर्णन!

बाबूजींच्या अखेरच्या काळातली ही आठवण आहे. त्यांना संध्याछाया अस्वस्थ करत असाव्यात. पैलतीर दिसू लागल्यानंतर माणूस विरक्तीची भाषा करू लागतो ना, तसेच काहीसे.. चाळीसगावहून त्यांचा निरोप मला मिळाला. त्यानुसार मी त्यांच्या भेटीसाठी गेलो. थोडी वास्तपुस्त होताच त्यांनी मुद्याला स्पर्श केला आणि त्यांच्या इच्छापत्राची प्रत असलेला दस्तऐवज माझ्यापुढे ठेवला. त्यातील पहिलाच परिच्छेद असा होता:

“एखाद्या जहाजाचा कप्तान संकटप्रसंगी जहाज बुडत असतानादेखील ज्याप्रमाणे त्याचे जहाज सोडत नाही, तसेच माझ्या अखेरीनंतरही माझ्या अचेतन शरीराला माझ्या घराच्या कुंपणापलीकडे नेऊ नये. रीतसर परवानगी घेऊन माझ्या शरीराला या परिसरातच मूठमाती द्यावी ” त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यात आली. त्यांच्या बंगल्याच्या परिसरात त्यांची समाधी उभी आहे अन् बाबूजींच्या असंख्य चाहत्यांचे ते श्रद्धास्थान आहे.

बाबूजींच्या बंगल्याचे त्यांनी केलेले नामकरण म्हणजे ‘Rembra’s Retreat’. त्यांचा असा दृढ विश्वास होता, की प्रसिद्ध चित्रकार रेम्ब्रांचे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचा जन्म आहे. अन् ही श्रद्धा मनात ठेवूनच आयुष्यभर ते कलासाधना करत राहिले!

– प्रा. शरच्चंद्र छापेकर 0257-2235128
‘आशिर्वाद’ 54, शाहूनगर, जळगाव – 425001.

About Post Author