स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)

3
78
carasole

पुण्याची ‘सा’ ही संस्था स्किझोफ्रेनिया व इतर मानसिक आजार यांच्यासाठी काम करते. [स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA)] कॅनडाचे रहिवासी डॉ. जगन्नाथ वाणी यांनी १९९७ साली त्या संस्थेची स्थापना केली. ‘सा’ची सेवाभावी संस्था म्हणून अधिकृत नोंदणी १९९८ मध्ये झाली.

जगन्नाथ वाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कॅनडातील कॅलगरी येथे स्किझोफ्रेनियासाठी संस्था प्रथम स्थापन केली. भारतातही अनेक लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, परंतु त्या आजारांविषयीची जाणीवजागृती समाजात कमी असल्यामुळे व त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था फारशा अस्तित्वात नसल्यामुळे आजारी लोकांना मदत मिळत नाही व ते मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत पोचत नाहीत. त्यासाठी संस्थेची आवश्यकता आहे या जाणिवेतून वाणी यांनी सहा तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन समिती स्थापन केली व मानसिक आजारासाठी कार्य सुरू केले. ते सहा जण – डॉ. नेहा पांडे, चित्रा फडके, सुहास वोरा, स्मिता शिरगावकर, मीनल दाणी, सुधाकर शेंदरकर.

त्याच सुमारास ‘एकलव्य’ नावाचा स्वमदत गट मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे पालक यांच्यासाठी चालवला जात होता. त्यामागे प्रेरणा होती अनिल वर्तक यांची. त्यांनी स्वत: स्किझोफ्रेनिया या आजाराचा अनुभव घेतला आहे. ‘सा’च्या स्थापनेनंतर ‘एकलव्य’ हा स्वमदत गट ‘सा’चा अविभाज्य भाग बनला. जगन्नाथ वाणी हे ‘सा’चे संस्थापक अध्यक्ष होते, तर अनिल वर्तक हे स्वमदत गटाचे शिलेदार होते. मानसिक आजारांवरील लेख वाचून; तसेच, रेडिओवरील भाषणे ऐकून स्वयंसेवी कार्यकर्ते संस्थेला मिळत गेले. वर्तकांच्या प्रेरणेने कार्यप्रवृत्त झालेले कार्यकर्ते टिकून राहिले आणि कामाच्या वाढत्या पसाऱ्याबरोबर कामांची विभागणी होऊन प्रत्येकाने पुढील टीम तयार करण्यासाठी शिलेदाराच्या भूमिकेची जबाबदारी पेलली; म्हणून संस्थेचा विस्तार होत गेला.

अ-व्यावसायिक स्वयंसेवकांनी चालवलेली मानसिक आजारांसाठी काम करणारी ‘सा’ ही एकमेव सेवाभावी संस्था म्हणून गणली जाते. मॅनेजिंग कमिटीचे सुरुवातीचे सभासद पुढील दोन वर्षांत बदलले गेले, नवीन कमिटीत सर्वजण नॉन प्रोफेशनल व्हॉलिंटियर्स होते. त्यात एक मानसिक आजारी व्यक्ती, एक पालक व इतर असे होते. ‘डे केअर सेंटर’ २००६ साली चालू झाले, तेव्हा संस्थेच्या स्टाफमध्ये सायकॉलॉजिस्टचा समावेश करून घेतला गेला. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी दुपारी १२:०० ते २:३० या वेळात एक सायकिअॅट्रिस्ट डॉक्टर ‘सा’मध्ये येऊन गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन करतात.

काही स्वमदत गट स्वत: व्यावसायिक केंद्र चालवतात. अशा गटात डॉक्टर स्वत: मार्गदर्शन करतात. मदत तेथल्या तेथे मिळते. परंतु ‘सा’च्या स्वमदत गटाचा उद्देश असा आहे, की मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे पालक हे दोन्ही गट त्या त्या व्यक्तींनीच चालवावेत. कारण त्यांना आजाराचा प्रत्यक्ष अनुभव असतो. समान समस्या असलेल्यांचा तो पिअर ग्रूप बनतो. स्वत: स्वत:ला मदत करून मग इतरांना मदत करावी. इतर कोणीतरी येऊन मला मदत करेल अशी अपेक्षा बाळगण्याऐवजी जर स्वत: स्वत:साठी जास्तीत जास्त प्रयत्न केले तर ‘रिकव्हरी’ चांगली होते व आजार उलटण्याची शक्यता कमी असते. गटप्रमुख फक्त पालकांना मन मोकळे करायला गटाच्या रूपाने व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तो प्रोफेशनल नसल्यामुळे सुरुवातीला ‘विश्वासार्हते’चा प्रश्न असतो. परंतु अनुभवाने पालकांच्या लक्षात येते, की ही पद्धत त्यांना जास्त कार्यप्रवण करणारी आहे. शिवाय, ते जरी प्रोफेशनल नसले तरी प्रशिक्षित व स्वत:ला सतत अपडेट करत जाणारे आणि मानसिक आजाराची पूर्ण जाण असलेले असतात. स्वयंसेवकांसाठी व मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांसाठी ‘सा’मध्ये खास शिबिरे आयोजित केली जातात. प्रशिक्षण हा त्यांचा हेतू असतो. दर चौथ्या शनिवारी धायरी येथील स्वच्छ, मोकळ्या निसर्गरम्य व प्रशस्त वास्तूत मानसिक आजारासंबंधित विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान योजले जाते.

मानसिक रुग्णांचा स्वमदत गट सुरुवातीला थोडा ‘तक्रार’ गटासारखा झाला. पण दोन-तीन वर्षांत अमेरिकेतील डॉ. अब्राहम लो यांची ‘रिकव्हरी मेथड’ वापरण्यास सुरुवात केल्यावर मात्र निराशेतून आशेकडे वाटचाल सुरू झाली.

‘सा’ ही संस्था तीन स्तरांवर काम करते. एक – समाजामध्ये मानसिक आजारांबद्दल वाटणारी शरमेची भावना नाहीशी करण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम राबवणे, दोन – मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे पालक यांच्यासाठी वेगवेगळे स्वमदत गट चालवणे आणि पुनर्वसन केंद्राची सुविधा गरजूंना उपलब्ध करून देणे. आजारी व्यक्तींना विविध उपक्रमांत गुंतवून त्यातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व नोकरी-व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यास मदत करणे. तीन- केंद्राच्या सभासदांना नेण्या-आणण्यासाठी बसची सोय केलेली आहे. शिवाय मानसिक रुग्ण व त्यांच्या पालकांना मानवी हक्काची जाणीव करून देऊन त्याबाबत मार्गदर्शन करणे आणि प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी नेटवर्क करणे.

‘सा’चे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ वाणी यांनी कॅनडाहून भरघोस देणगी मिळवून दिल्यामुळे संस्थेची वास्तू उभी राहू शकली. वाणी यांच्यानंतर यशवंत ओक यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सध्या अमृत बक्षी यांची अध्यक्षपदाची दुसरी टर्म चालू आहे. बक्षी स्वत: एक पालक म्हणून संस्थेत आले. तेथील कामकाजाची माहिती करून घेतल्यावर, अनुभवल्यावर ते पुण्यात शिफ्ट झाले. मानवी हक्कांवर काम करणाऱ्या ‘निम्हान्स’सारख्या सरकारी समितीत बक्षी यांचा समावेश झालेला आहे.

पुण्याबाहेरही ‘सा’सारखे स्वमदत गट चालू व्हावेत यासाठी संस्थेने एक पुस्तिका तयार केली आहे. त्यासाठी त्या त्या ठिकाणी जाऊन संस्थेची टीम मार्गदर्शन करते. नगर, नाशिक, औरंगाबाद, धुळे, यवतमाळ, नागपूर, इंदूर, अहमदाबाद, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी जाऊन संस्थेने स्वमदत गट चालू करून दिले.

‘सा’चे कार्य खूपच विस्तारले आहे. जवळ जवळ तीस एक लोकांची टीम मिळून संस्था चालवली जाते. ‘आमच्यानंतर आमच्या मुलांचे काय?’ हा मनोरुग्णांच्या पालकांचा प्रश्न अजून तरी अनुत्तरीत आहे.

संपर्क –

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)
कमलिनी कृती भवन, १४ गणेश नगर,
गल्ली नंबर बी – ३०, ३१, धायरी, पुणे ४११ ००४
९८८ ११९ ०० ००, (०२०) ६४७००९२०, २४३९१२०२

saa.help@gmail.com

– नीलिमा बापट

Last Updated On – 23rd Jan 2017

About Post Author

Previous articleसिन्नरचा क्रांतिकारक जलसा
Next articleत्रिवेंद्रमची सफर – कमला फडके
9923136584 नीलिमा बापट या पुण्‍याच्‍या. त्‍यांनी पुणे विद्यापीठाच्‍या मानसशास्‍त्र विषयाच्‍या पदवीधर आहेत. त्‍यांनी मानसिक रुग्‍णांकरताच्‍या शिक्षकांचा अभ्‍यासक्रम 'कामायनी'मधून पूर्ण केला. त्‍या 'सा' या संस्‍थेच्‍या संपर्कात १९९९ साली आल्‍या. त्‍यांनी संस्‍थेसोबत कार्यकर्ता म्‍हणून सुरू झालेल्या प्रवास सहसचिव, खजिनदार, उपाध्‍यक्ष अशा विविध जबाबदा-या पार पाडल्‍या. सध्‍या त्‍या संस्‍थेच्‍या सचिव म्‍हणून काम पाहात. त्‍यांनी 'बायपोलार' या मानसिक रुग्‍णांच्‍या अवस्‍थेबाबत 'आता उजाडेल' हे पुस्‍तक २००९ साली लिहिले. त्‍यांच्‍या कामाबद्दल त्‍यांना 'माऊली प्रतिष्‍ठान' आणि 'रोटरी पुणे वेस्‍ट' या पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

3 COMMENTS

  1. The article is very
    The article is very comprehensive and covers essential features of SAA. However if one wants to know more then he should visit SAA’s office with prior appointment.Volunteers or office bearers will provide guidance.

Comments are closed.