सोळावे बीएमएम अधिवेशन : चोख व्यवस्था

0
27

अधिवेशनाच्या व्यासपीठावरील सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल    बृहन्महाराष्ट्र मंडळाचे सोळावे अधिवेशन ७ जुलैपासून चार दिवस प्रॉव्हिडन्स या शहरी थाटामाटात पार पडले. मी आजवर पाहिलेल्या नऊ अधिवेशनातली चोख व्यवस्था या दृष्टीने ते सर्वोत्कृष्ट संमेलन असे म्हणता येईल. सामान्य मराठी माणूस कुठल्याही अधिवेशनाची आठवण ठेवतो ती त्याला वेळेवर जेवण्यास मिळाले की नाही यावरून. संमेलनाच्या चार दिवसांत जेवण्याच्या लांब रांगांत उभे राहण्याचा प्रसंग कधीच आला नाही. कुठेही गडबडगोंधळ आढळला नाही. पहिल्या दिवशी मुख्य सभागृहात प्रतिनिधींना त्यांच्या सीटवर न्यायला चक्क ‘अशर्स’ होते. तो पायंडा पुढे चालू ठेवावा असाच आहे. शिवाय, प्रत्येकाला सीट नंबर होते – त्यामुळे दर दोन वर्षांच्या सोहळ्यात अनुभवण्यास मिळतो त्याप्रमाणे मारामारीचा प्रसंग ओढवला नाही. याकरता सुरुवातीलाच न्यू इंग्लंड मराठी मंडळाचे मनःपूर्वक कौतुक, अभिनंदन करतो व आभारही मानतो.

महेश मांजरेकर आणि प्रशांत दामले यांच्यासह अध्यक्ष आशिष चौघुलेमाझ्या पिढीतील पुष्कळ लोकांना असे वाटते, की या संमेलनांना आता तोच तोपणा आला आहे. या वेळी संयोजकांनी ‘सा रे ग म’सारखे कार्यक्रम ठेवून तो दूर केला. सर्वप्रथम कार्यक्रमांची दखल घेणे आवश्यक आहे. कारण त्यांत नवीन पिढीच्या कर्तृत्वाचा आविष्कार दिसला. भाग घेणा-या सर्व तरुणतरुणींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अंतिम निर्णय राहुल देशपांडे व पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्यावर सोपवून संयोजकांनी चातुर्य दाखवले. देशपांडे व फेणाणी, दोघेही उच्च अभिरुचीचे ख्यातकीर्त गायक आहेत. ‘सा रे ग म’ स्पर्धा बंद पडू देऊ नये अशी बीएमएमला माझी विनंती आहे.

या अधिवेशनातील मी पाहिलेल्या कार्यक्रमांत सर्वोत्कृष्ट कार्यक्रम म्हणजे कॅलिफोर्नियातील ‘चाहूल’ हे प्रशांत दळवी यांनी लिहिलेले नाटक. (सगळे कार्यक्रम पाहणे शक्यच नव्हते). नाटक मुळातच अतिशय प्रभावी आहे. त्यात उत्कृष्ट दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय आणि तीक्ष्ण संवाद हा त्रिवेणी संगम झाल्याने नाटक मनाला चटका लावून गेले. दिग्दर्शक मुकुंद मराठे, नायक निकित अभ्यंकर व नायिका अमृता हर्डिकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. ते नाटक अमेरिकेतील प्रत्येक मंडळात दाखवायला हवे. गंमत म्हणजे नाटक मुख्य मंचावर नव्हते. मुख्य मंडप व उपमंडप अशा दोन-तीन ठिकाणी एकाचवेळी कार्यक्रम चालू होते. विविध रुचीचे अनेक कार्यक्रम सादर करायचे म्हणजे ते अपरिहार्य आहे. त्याची कसोटी काय असते ते संयोजकांना विचारावेसे वाटले.

'संगीत मानापमान' नाटकात प्रियंका बर्वे या संमेलनातील आणखी एक उच्च बिंदू म्हणजे  ‘संगीत मानापमान’. प्रियंका बर्वे आणि राहुल देशपांडे या तरुण कलाकारांना हे शंभर वर्षे जुने नाटक जिवंत करताना पाहून कंठ दाटून आला! त्यातील नेपथ्य ‘लेझर’च्या तंत्रामुळे प्रभावी झाले होते. अभिनयाला त्या नाटकात फारसा वाव नाही, पण केवळ शास्त्रीय संगीत गायनाची त्यांनी कमाल केली. या तरुण मंडळींना माझा त्रिवार कुर्निसात! ‘संगीत मानापमान’ नाटकामुळे संगीत नाटकाची प्रथा पुन्हा सुरू होण्यास उत्तेजन मिळेल. धैर्यधराचा मेकअप मात्र सेनापतीला शोभेसा हवा होता.

सोळाव्या अधिवेशनात ‘की-नोट’ भाषण श्री. बाळ फोंडके यांनी दिले, ‘ऋणानुबंध’ या विषयावर. त्यांनी यापूर्वीच्या अधिवेशनांतील प्रमुख वक्त्यांनी उपदेशाचे डोस पाजण्याचा केलेला उपद्व्याप प्रकर्षाने टाळला. भाषण मुद्देसूद, प्रवाहशील व विचारप्रवर्तक होते. भाषण झाले तेव्हा सभागृहात फारसे लोक नव्हते ही दुःखाची गोष्ट. हे उत्कृष्ट भाषण ध्वनिफीतीवर उपलब्ध करावे ही ‘बीएमएम’ला विनंती. एक प्रश्न विचारावासा वाटतो… संमेलनाचे प्रमुख वक्ते भारतातीलच असावे असे कुठे लिहिले आहे? महेश मांजरेकर यांचे उद्घाटनाचे भाषणही खुमासदार झाले. मांजरेकर शांताराम बापू यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही.

लेझिम पथक या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाला मोठ्या प्रमाणात भारतीय उद्योगपतींचे आर्थिक सहकार्य लाभले होते. गेली तीस वर्षे आम्ही अवासिक भारतीयांनी भारतात लाखो डॉलर्स आर्थिक उत्थापनाप्रीत्यर्थ पाठवले. जणू काही त्याचेच सुफल आम्हाला या स्पॉन्सरशिपच्या स्वरूपात परत मिळत आहे, असा विचार येऊन मनाला गुदगुल्या झाल्या. पण आजकालच्या लोकप्रिय चित्रवाणी कार्यक्रमांत ज्याप्रमाणे कार्यक्रम थोडा व जाहिराती जास्त असा प्रकार आढळून येतो त्याप्रमाणे या अधिवेशनाचे तर होणार नाही ना अशीही पाल मनात चुकचुकली. बीएमएमच्या भावी नेतृत्वाने हे पथ्य कटाक्षाने पाळण्यास हवे.

याशिवाय संगीत – नृत्य यांची रेलचेल असलेले, ‘खेळ मांडला’, ‘स्वरगंगेच्या काठावरी’ आणि ‘मेलांजी’ हे नाविन्यपूर्ण उत्कृष्ट कार्यक्रम सादर करण्यात आले. शेवटच्य़ा रात्रीचा ‘अजय- अतुल’ यांच्या मुलाखत/ चित्रसंगीताचा कार्यक्रम तुफान यशस्वी झाला. लोकांनी सभागृह डोक्यावर घेतले. नव्या ढंगाचे ते संगीत मला फारसे परिचित नाही, पण दोन मराठी संगीतकार चित्रपट क्षेत्रात पुन्हा महाराष्ट्राचे नाव वर करत आहेत हे पाहून मन डवरून आले.

उत्तम  जेवणव्यवस्था, उत्तम कार्यक्रम व उत्तम तांत्रिक साहाय्य याकरता पुन्हा एकदा न्यू इंग्लंड मराठी मंडळाच्या तीनशे स्वयंसेवकांना माझे अभिवादन व बीएमएमचे अभिनंदन.

पुढील अधिवेशने करताना या अधिवेशनाचा साचा समोर ठेवण्याला हरकत नसावी.

–  प्रकाश लोथे
prakashlothe@aol.com

सुखद आठवणींचे संमेलन

पद्मजा फेणाणी-जोगळेकरबृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सोळाव्या संमेलनात सहभागी होऊन त्याची रंगत आणि दर्जा वाढविणा-या कलाकारांपैकी एक म्हणजे पद्मश्री पद्मजा फेणाणी – जोगळेकर. त्यांनी बीएमएमच्या पूर्वसंध्येला ‘मंगलदीप’ हा सांगितिक कार्यक्रम सादर केला. तसेच, त्यांनी सारेगम स्पर्धेच्या ग्रॅंड फ़िनालेच्या परीक्षक म्हणूनही  जबाबदारी पाहिली. त्या संमेलनाविषयीचा त्यांचा अनुभव. 

बोस्टनमधील बीएमएम संमेलन हे रसिकांसाठी जशी पर्वणी होती, तशीच आम्हा कलाकारांसाठीही ती जवळपास चार हजार रसिकांना भेटण्याची सुवर्णसंधी होती. एकाच वेळी, एकाच छताखाली वीस देशांतून एकत्र आलेले मराठी बांधव आणि कलाकार यांचा तो सुंदर मेळावा होता. त्यात संगीत, नृत्य, नाट्य, काव्य, सारेगम स्पर्धा… अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता. बीएमएम पूर्वसंध्येला माझा ‘मंगलदीप’ कार्यक्रम रसिकांच्या ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसादामुळे, विनोदाची-गप्पांची-गाण्यांची देवाणघेवाण करत करत रंगला आणि स्टॅंडिंग ओवेशनसहित पार पडला.

विशेष म्हणजे आम्ही दादरच्या ‘बालमोहन’च्या शंभर एक विद्यार्थ्यांनी एका दुपारी एकत्र येऊन जोरदार कल्ला केला आणि माझ्यासह सर्वजण आनंदाने (ओरडून ओरडून) ‘अंतर मम विकसित करी हे परात्परा’ ही शाळेतील रोजची प्रार्थना गायलो. खूप खूप धम्माल आली!

‘सा रे ग म’मधील अमेरिका व कॅनडामधील निवासी असलेल्या मुलांना ऐकण्याची संधी मिळाली आणि खरेच कौतुक वाटले. रोजची भाषा, संगीत आणि वातावरण नसतानाही त्या सहाही फायनलिस्ट मुलांनी, कुठेही अडसर होत नसावा या पद्धतीने गाणी उत्तम रीत्या सादर केली. त्यातही रवी दातार आणि समीधा जोगळेकर यांच्यामध्ये चांगलीच चढाओढ होती. अक्षय अणावकरही सुंदर गायला. शेवटी, समीधाने अप्रतिम गाऊनही ऐन वेळी रवी दातारने, केशरी फेटा बांधून, शाहिराच्या शुभ्र वेशात येऊन, चढ्या पट्टीत, खड्या सुरेल आवाजात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ गायले आणि टाळ्यांच्या  कडकडाटाने सभागृह दुमदूमून गेले. परीक्षण करताना मी आणि राहुल देशपांडेनेही खूप आनंद घेतला. निवेदक प्रशांत दामले यांच्या साथीने रवी दातारचा प्रथम क्रमांक जाहीर झाला.

प्रसिडेंट आशिष चौघुले, अदिती टेलर आणि सर्व बीएमएम कार्यकारी मंडळ यांनी भरपूर मेहनत घेऊन रसिकांच्या प्रचंड उत्साहात संमेलन यशस्वी रीत्या पार पाडले. जुन्या, नव्या ओळखी आणि सुखद आठवणी ह्दयाच्या पेटीत बंद करून आम्ही परतीच्या वाटेला निघालो…

पद्मश्री पद्मजा फेणाणी–जोगळेकर

About Post Author