सोप्या शब्दांत गंभीर समीक्षा – नाट्यकलारूक्कुठार (Drama Criticism In Non Formal Language)

0
37

मराठी नाट्य व्यवहार आजच्या इतका मोठा (आर्थिक परिमाणात) झाला नव्हता तेव्हाची ही गोष्ट आहे. माधव मनोहर नावाचे नाट्यसमीक्षक सोबतया साप्ताहिकात पंचम या सदरातून ज्याला समीक्षा म्हणता येईल अशा स्वरूपाचे लेखन करत असत. कधी कधी ते एकाच नाटकावर दोन लेख लिहीत असत. एक संहितेवर तर दुसरा प्रयोगावर. माधव मनोहर यांचे निधन झाल्यालाही पंचविसाहून जास्त वर्षे झाली. कधी कधी कुतूहल वाटे, की माधव मनोहर यांच्या पद्धतीची समीक्षा त्यांच्या पूर्वी कधी होत असे का? त्याचे उत्तर होकारार्थी मिळते ते एका जुन्या पुस्तकातून. पुस्तकाचे नाव आहे नाट्यकलारूक्कुठार (नावाचे ते संक्षिप्त रूप आहे). ते प्रकाशित झाले 1908 साली (कै. माधव मनोहर यांच्या जन्मापूर्वी तीन वर्षे) आणि ते लिहिले होते सदाशिव नारायण ठोसर (बी ए एलएल बी) व गणेश सदाशिव साठे (एम ए) या लेखक जोडीने.पुस्तकाचे स्वरूप काय आहे त्याचा अंदाज पुस्तकाचे शीर्षक पूर्ण वाचले तर येऊ शकतो अश्विनीकुमारप्रणीत श्रीमद भरताचार्य प्रासादिक नाट्यकलारुक्कुठार ऊर्फ रा.रा.श्री.कृ.कोल्हटकर ह्यांच्या

श्री.कृ.कोल्हटकर

संगीत गुप्तमंजूष नाटकावर संभाषणात्मक विनोदी टीका. आता संगीत नाटकावर टीका करायची आणि तीसुद्धा श्री.कृ.कोल्हटकर (1871-1934) ह्या त्या वेळच्या अग्रगण्य नाटककाराच्या नाटकावर, तर ती दीर्घ निबंधाच्या रूपात करता आली असती आणि ते कोल्हटकर यांच्या लेखनप्रणालीला अनुकूल झाले असते. (कोल्हटकर यांनी तोतयाचे बंड या नाटकावर एकशेदहा पानी समीक्षा लेख लिहिला होता). लेखकजोडीने तो मार्ग का स्वीकारला नाही याचा खुलासा त्यांनी ग्रंथकर्त्याचे चार शब्द या प्रस्तावनेत केला आहे.केवळ मनोरंजक ललित कलेच्या विषयावर जर कोणी गंभीरपणाचे लेख लिहू लागले तर त्याने शास्त्राधाराचे काही ढोंग केल्याशिवाय त्यांच्या लेखाचा लोकांवर व्हावा तसा परिणाम होत नाही. सारांश, मनोरंजक विषयांवर लिहिणे झाल्यास भाषाही मनोरंजक वापरली पाहिजे.”

ह्या पुस्तकाचा हेतू केवळ या नाटकावर टीका करणे हा नाही. प्रस्तावनेत पुढे लिहिले आहे नाटक कसे लिहावे हा ह्या ग्रंथाचा विषय असल्याने नाटकातील प्रत्येक अंगाचा सूक्ष्म रीतीने यथामती विचार केला आहे. नाट्यशास्त्र ह्या विषयावर पुन्हा एकवार गंभीर लिहिण्याऐवजी प्रेक्षकांना/वाचकांना समजेल अशी उदाहरणे द्यावी या हेतूने सर्व ग्रंथ एकतंत्री कादंबरी रूपाने दिसावा म्हणून श्री.रा.रा. कोल्हटकर यांचे गुप्तमंजूष नाटक निमित्त मात्र करून हाती घेतले आहे.
लेखकांनी नाटक कसे लिहावे याबद्दलची मते मांडताना एकंदर नाटकांचा विचार जरी केला असला, तरी कोल्हटकर यांच्या गुप्तमंजूषवरच त्यांच्या आक्षेपांचा भर मुख्यत्वे करून आहे. गुप्तमंजूष नाटक कोल्हटकर यांच्या मूकनायक आणि वीरतनय या नाटकांनंतर आले. त्यामुळे लेखकद्वयीच्या प्रतिपादनाचा रोख तरीही या तिसऱ्या नाटकात फार ढोबळ अशी आक्षेपार्ह रचना आहे.’ असा एकंदर दिसतो.
          लेखकांनी प्रतिपादन संवादरूपाने केले आहे. त्या अगोदर त्यांनी कल्पनेचा पिसारा मांडला आहे. त्यातील एका दृश्यात – रंगदेवता प्रचंड शरीरयष्टीच्या स्त्रीच्या रूपाने अवतरते!तिचे वर्णन कसे केले आहे ते पाहा – नेत्र रात्रजागरामुळे म्हणा किंवा मदिरापानामुळे म्हणा, आरक्त असून धुंद झालेले दिसत होते. तिचे कपोल अंगरागाने अगर चुम्बनातिरेकाने संध्यारागासारखे लाल झाले होते. मुखात ताम्बूलचर्वण सारखे सुरू असतानाही ओष्ठांचा कृष्णवर्ण मधून मधून चमकत होता. याप्रमाणे ते परम रमणीय दैदिप्यमान स्वरूप पाहून मी, मोहित जे आहे ते झालो, चकित झालो; विस्मित झालो.” हे रूप दिसल्यावर पुढे काय झाले ते प्रत्यक्ष वाचावे हे अधिक योग्य. त्या वर्णनाच्या शैलीवरून पुस्तकातील गुप्तमंजूष या नाटकावरील टीकेचा रोख ध्यानात येण्यास मदत होते.
लेखकांनी गुप्तमंजूष या नाटकाच्या अनेक पैलूंना आक्षेप घेतले आहेत. ते सांगण्यासाठी विविध विषयांतील जाणकार मंडळी गप्पा मारण्यासाठी एकत्र येतात आणि त्या गप्पांतून (संवादरूपाने) नाटकावरील आक्षेप, त्या आक्षेपांचा संभाव्य प्रतिवाद ह्या साऱ्या गोष्टी मांडल्या आहेत. अशा प्रकारचे प्रारूप निवडण्यामागे एक कारण (त्यांनी सांगितलेले) – गप्पांच्या रूपाने दाखवलेल्या उणिवा मनावर अधिक ठसतात हे तत्त्व आहे. गुप्तमंजुष नाटकाची लोकप्रियता मूकनायक आणि वीरतनय यांच्यापेक्षा अधिक असावी, त्यामुळेही ते टीकाविषय झाले असावे.
टीका विनोदी संवाद रूपाने लिहिण्याचे योजल्याने काही ठिकाणी अतिरेक झाला असेल अशी कबुलीही प्रस्तावनेत दिली आहे. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते (प्रकाशनापूर्वी) खुद्द कोल्हटकर यांनाही दाखवले होते आणि त्यांना ते आवडले होते असे त्यांनी या लेखकांना सांगितले.(प्रस्तावना). पुस्तकात सुरुवातीला नाटकाचे कथानक थोडक्यात दिले आहे. नंतर प्रवेशानुक्रमे चिकित्सा केली आहे. त्यांनी प्रथम विचारात घेतली आहे ती पदांची शब्दरचना. मराठी संगीत नाटकातील (विद्याधर गोखले पूर्व काळातील)- विशेषतः खाडिलकर यांच्या – पदांची शब्दरचना अत्यंत दुर्बोध असते असा आक्षेप वेळोवेळी घेतला गेला आहे. येथे लेखकांनी कोल्हटकर यांच्या पूर्वीच्या दोन नाटकांचीही चर्चा केली आहे. त्यात असे नमूद केले आहे, की सु हा प्रत्यय वापरणे ही कोल्हटकर यांची खासीयत आहे. वीरतनयमध्ये नऊ वेळा सुहा प्रत्यय अनावश्यक पद्धतीने आला आहे. उदाहरणार्थ सुनिकटी,सुविश्वास,  सुप्रेमाने, सुगात्रांसी वगैरे. मूकनायकमध्ये चौदा वेळा — सुरम्य, सुजर्जर, सुवीर्यहीनता तर गुप्तमंजुषमध्ये अकरा वेळा– सुरुचीर, सुचरित, सुरक्षणा, सुसंतप्त.
नाटककार पदांच्या शब्दरचनेबाबत प्रासाचा अतिशय सढळ वापर करण्याची वृत्ती दाखवत असत, त्याची उदाहरणे दिली आहेत .–
मी कलंक कुलज, वधुलागी जाहले/जगतात राहिले/आधी न का मेले
शांतीधरा नृपराज/शोका टाकुनी व्हा धृतिभाज/खिन्न असेना का आज/प्राक्तन केलीही समजावी, हीस ना काही इलाज.
(अशी खटकणारी शब्दरचना स्वयंवर नाटकातही दिसते. रुक्मिणीच्या आईच्या तोंडचे पद —
दिपले नरेश, लागेल दृष्ट बाळे (ध्रु)
नोहे खोटे, नयन सुख दाटे
अतिशये पिसळले डोळे
शिशुपाल — काजा करील घात, गवळी कुटील जात, होतांचि निःपात, ना लाज लज्जा ||ध्रु ||
आला सखा धीट, सजला कुशल वीट, अति नीच हा चेट, झाला की राजा
लेखकांनी पदातील शब्दरचनेवर जे आक्षेप घेतले आहेत त्या मागचे कारण देताना ते म्हणतात नाटकाचा प्रयोग स्टेजवर जर करायचा आहे तर पदांचा एकंदर भावार्थ तरी लोकांना समजला पाहिजे – नाटक पाहणाऱ्यांना थोडेबहुत संस्कृत समजते आहे असे समजू. अशा लोकांना अली थंबुनियायाचा अर्थ लवकर कळणे दुरापास्त आहे. तसेच, काही आक्षेप गद्यातील शब्दांविषयी आले आहेत. सौदामिनी (राणी) एकदा वाटते महाराजांपाशी सारे ओकून टाकावे आणि मोकळे व्हावे.ओकून टाकणे ही शब्दरचना खटकते. तसे मत प्रदर्शित झाल्यावर हा केवळ शब्दच्छल आहेअसा प्रतिवादही या चर्चेत झाला. त्यावर उत्तर आले कोल्हटकर यांच्यासारखे उच्च शिक्षण मिळालेले तरुण पदवीधर, महाराष्ट्र वाङ्मयाची जी सेवा करू इच्छितात (आणि त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे मनापासून अभिनंदन करतो) ती व्यर्थ न जावी अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच त्यांच्या नाटकातून त्यांस पुढे सुधारता येण्यासारखे दोष आम्ही स्पष्ट दाखवतो.
त्याचा वाढदिवस आहे तो नंदिनी प्रेमानं पाळणार आहे” – यावर टीका – वाढदिवस नावाचा एखादा कुत्रा असेल. (असाच एक प्रयोग खाडिलकर यांच्या विद्याहरणमध्ये दिसतो.
देवयानी – युवराज, दीन बहिणीला चुडेदानद्या.- स्त्रियांच्या शरीरात वास करणाऱ्या कोमल हृदयांनो) पुढे नंदिनी (राजकन्या) म्हणते – “राजविलास नको, माझा हा एकटा विलास मला मिळाला म्हणजे माझे काही म्हणणे नाही.”यावर आक्षेप येतो, की जो काळ दाखवला आहे त्या काळात मुली भावी पतीचा उल्लेख एकारार्थी करत नव्हत्या.
माधव मनोहर

नाटकातील शब्दरचनेबरोबरच कोणती पदे कोणत्या रागात घालावीत याचीही चर्चा आहे. नांदीचे पद पिलू रागात गाण्यालाही आक्षेप घेतला गेला.” पिलू , झिंझोटी , काफी हे राग जरी कोणत्याही वेळी गायले जात असले तरी पहिल्या नांदीच्या पदाला पिलू राग वापरला तर ते अनुचित. कारण प्रारंभ मोठ्या गंभीर व उदात्त पदांनी केला तर प्रेक्षकांची वृत्ती एकदम शांत होऊन नटांची रंगभूमीवर छाप बसते. नाटक जर संगीत आहे तर ते संगीत शास्त्राला धरूनच असले पाहिजे. गद्य नाटकात जसे शब्दोच्चाराचे शास्त्र आहे; तसेच, संगीत नाटकात समय व राग यांचे शास्त्र आहे.

          पदांचे शब्द आणि पदांचे राग यांबाबत चर्चा झाल्यानंतर पुढे पदांची रचना, व्यक्तिरेखांतील वैशिष्ट्ये – त्यावरील टीका – असे काही विषय येतात. सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप या नाटकावर घेतला गेला आहे, तो त्यातील सकृतदर्शनी सामाजिक महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयासंबंधीने. तत्कालीन समाजाला महत्त्वाचा वाटणारा स्त्री शिक्षणाचा प्रश्न कथानकात एका राणीच्या स्वप्नाच्या अर्थातून मांडला आहे. कथानकात असा भाग आहे, की राजा व राणी यांचे भांडण होते. त्यावेळी राजा बऱ्याच वादविवादानंतर मान्य करतो, की त्याला राज्यात एक तरी सुशिक्षित विनयवती अशी स्त्री दिसल्यास स्त्री शिक्षणासाठी शाळा काढण्यात येतील. नंतर राणीला सतत तीन दिवस स्वप्न पडते. सरस्वती स्वप्नात दर्शन देऊन सांगते, की सहा वर्षे अज्ञातवास करून सरस्वतीच्या ओघात आकंठ रूपाने उभे राहिले पाहिजे. त्याचा अर्थ ज्योतिषी तिला सांगतो, तो असा की तिने सहा वर्षे गुप्त राहून विद्याभ्यास करावा. त्यानंतर राणी गुप्त वेषाने अभ्यास करण्यास जाते वगैरे.
त्यावर मुद्दा असा मांडला गेला आहे की —
स्त्री शिक्षणाचा प्रसार अधिक करणे ही सुधारणा किती जरी आवश्यक असली, वंद्य असली तरी ती सुधारणा चांगली असे जर लोकांच्या मनावर तुम्हाला ठसवायचे असेल तर त्याचे मार्ग निराळे आहेत. आपल्या एखाद्या मैत्रिणीला शिक्षणार्थ दूरदेशी पाठवून किंवा तेथेच पुरुषाच्या वेषांत तिला सुशिक्षित करून तिच्याकडून लोकोत्तर चमत्कार करून दाखवायचे होते. किंवा एकंदर कथानकातच जर जास्त मोहकपणा आणायचा असेल तर सौदामिनीने (राणीने) तिच्या मुलीवरसुद्धा जर हा प्रयोग केला असता, तरी ते उत्तम वठले असते. सुपरस्टीशस स्वप्नांचे काही काम पडले नसते. संसारसुख पूर्णपणे अनुभवत असलेल्या प्रौढ स्त्रियांनी नवऱ्यांना सोडून देऊन इतक्या मोठेपणी शिक्षणाची इतकी मोठी हाव धरावी हे जे मूर्खपणाचे चित्र तेही कवीला रंगभूमीवर काढावे लागले नसते.
आणखी एक आक्षेप महत्त्वाचा आहे –
          नाटकात राजकन्येचे स्वयंवर योजलेले आहे. स्वयंवर ही प्रथा ज्या काळात अस्तित्वात होती तो काळ कोणता? – द्रौपदी, दमयंती यांचा. अगदी अलिकडचा काळ द्यायचा तर तो पृथ्वीराज – संयोगिता यांचा. त्या काळात स्त्री शिक्षणाची आवश्यकता लोकांना कधी वाटली होती? कारण दमयंतीच्या काळी स्त्रिया सुशिक्षित होत्या. स्त्री शिक्षण चांगले असे जर लोकांच्या मनात कवीला भरवून द्यायचे असेल तर त्रेता युगातील राजा, द्वापार युगातील राणी यांच्या तोंडी असला वाद घालण्याचा द्राविडी प्राणायाम कशाला? मुंबई-पुणे-कोल्हापूर असली स्थळे व बाळासाहेब, रमाबाई, कृष्णराव असली नावे घालून, मग अशा गोष्टींची चर्चा करावी म्हणजे सद्यस्थितीचे प्रतिबिंब लोकांना बरोबर दिसते.”
          नंदिनी (राजकन्या) हिचे ज्याच्यावर प्रेम जडते तो विलास हा मुलगा प्रतिपाचा (नंदिनीच्या वडिलांच्या मित्राचा). तो जन्मताच त्याचा त्याग केला गेला होता, कारण त्याची आई त्याच्या जन्मसमयी मरण पावली होती. तो नंदिनीबरोबर वाढला व शिकला. परंतु त्याच्या बोलण्यात स्त्रियांच्या लकबी येतात अशी प्रखर टीकाही लेखकांनी केली आहे. –
नंदिनीने माझा गळा कापावा ना? आग लागो तुझ्या शब्दांना… अगं आई गं – साऱ्या मुलखाचा लबाड… आता यातून माझी सुटका कशी होणार?”
ही सर्व वाक्ये विलासच्या तोंडची आहेत. ती मिळमिळीत आणि पुरुषाला न शोभतील अशी आहेत असे लेखकांना वाटते.
नाटकात स्वयंवराचा एक प्रसंग आहे. त्यात जमलेल्या विविध राजांची नावे अंगराज, वंगराज, मगधराज अशी आहेत. ते सर्व राजे शुद्ध मराठीत बोलतात. आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे असे, की या विविध प्रांतातील राजे मराठी कसे बोलतील? त्यांच्याकडे ओरिएंटल ट्रान्स्लेटर होते का?”
स्वयंवरात लावले गेलेले पण, त्या पणांची कालानुरूपता, कोणती व्यक्ती जिंकायला हवी म्हणून ते पण लावले गेले अशी चर्चाही त्या संवादातून केली गेली आहे. नाटक सुखांत करण्याच्या हव्यासापायी अनेक विसंगती नाटकांत आल्या आहेत असा एक आरोप या संवादातून आला आहे. पुस्तकाच्या अखेरीस उपसंहार या दोन पानी मजकुरात, झालेल्या चर्चेचा सारांश काढून दाखवला आहे. गुप्तमंजूष या नाटकाचे कथानक मनोरंजन हेच ध्येय ठेवून रचले गेले असावे असा समज ते गुंतागुंतीचे कथानक वाचल्यावर होतो. हे नाटक 1903 साली रंगभूमीवर आले तेव्हाचे सामाजिक वातावरण आणि स्वातंत्र्याची चळवळ वगैरे गोष्टी दुरान्वयानेही नाटकात येत नाहीत – महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व हा मुद्दा आभासी रूपाने येतो, तो सोडला तर नाट्यकलारुक्कुठार या पुस्तकाचे वैशिष्ट्य हे की त्याने गंभीर स्वरूपाची समीक्षा गणवेश टाकून देऊन, साधे कपडे घालून पुढे आणली. मराठी नाटकांची समीक्षा अधिक सोप्या भाषेत केली गेली तर प्रेक्षकांची अभिरुची अधिक अर्थपूर्ण होईल असे वाटण्यास लावणारे हे पुस्तक.
रामचंद्र वझे +91 98209 46547
vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. वझे यांची शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडलेआणि टिळक ते गांधी मार्गे खाडीलकरही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
——————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here