सूर्यकांत कुलकर्णी यांची स्वप्नभूमी

_SuryakantKilkarniYanchi_Swapnabhumi_4.jpg

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात केरवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. त्या गावात लहान मुलांचे आयुष्य फुलवणारी, घडवणारी ‘स्वप्नभूमी’ आहे. सूर्यकांत कुलकर्णी यांचा बालकांसाठीचा महत्त्वाचा असा तो प्रकल्प आहे. संस्थेचे नाव आहे ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ – काहीसे रूक्ष, पण त्याला फाटा देत लोकांनी ‘स्वप्नभूमी’ या कल्पकेतलाच साद घातल्याचे दिसते.

केरवाडी हे कुलकर्णी यांचे मूळ गाव. त्यांनी शिक्षणासाठी पुण्यापर्यंतचा प्रवास केला. त्यांना मनात भीक मागणाऱ्या, काम करावे लागणाऱ्या मुलांविषयी सहानुभूती वाटायची. कुलकर्णी यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी, पुण्यात ‘कायनेटिक कंपनी’त चांगल्या पगाराची नोकरी सुरू असतानाच ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ची स्थापना केली होती. त्यांनी धोरण ‘सोशियो-इकॉनॉमिक’ मॉडेल उभे करत सामाजिक कामांना हात घालायचा हे ठरवले होते. त्यांना त्यांच्या मनात दडलेल्या मूळ प्रेरणा ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर गप्प बसू देईनात. त्यांनी बालकांसाठी काम करायचे या इरेला पेटून नोकरीचा राजीनामा दिला. त्या सुमारास त्यांचे लग्न झाले होते. ते पुण्यात राहत असलेल्या घरामागे झोपडवस्ती होती. कुलकर्णी यांनी त्या झोपडवस्तीतील तीन-चार मुलांना व बायकोला घेऊन केरवाडी गाठले आणि तेथेच स्थायिक झाले.

संस्थेच्या पहिल्या दिवसापासून नंदकुमार जोशी त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या पत्नी माणिक कुलकर्णी व पुण्याहून सहा मित्र हेही सोबत आले होते. त्यांनी पुण्याच्या झोपडवस्तीतील दहा मुलांना तेथे आणले होते. अनाथांची संस्था त्या मुलांसह सुरू केली. पण जागा कोठे होती? केरवाडीच्या धान्याच्या गोदामातील एका बाजूस राहण्याची सोय झाली. समोर किराणा मालाचे दुकान आणि मागे गोदाम. त्या गोदामात सामान सोडून उरलेल्या जागेत सगळे मिळून पंधरा जण राहत होते. ती गोष्ट 1980 सालची. गावातील पोलिस पाटलाने संस्थेसाठी म्हणून अडीच एकर जागा दोन वर्षांनी दिली आणि मराठवाड्यातील पहिला अनाथाश्रम सुरू झाले!

‘स्वप्नभूमी’चे जग जागा मिळाल्यानंतर पत्र्याच्या दोन खोल्यांत उभे राहू लागले. अनाथाश्रम ही संकल्पना छोट्या गावासाठी फारच नवी गोष्ट होती. त्यामुळे परिसरातील, पंचक्रोशीतील मुले सुरुवातीला अनाथाश्रमात यायची नाहीत. हळुहळू कुलकर्णी यांच्यावरील विश्वास वाढू लागला. पंचवीस मुले ‘स्वप्नभूमी’त रूळू लागली. आता, शंभर मुले संस्थेत आहेत. चारशेहून अधिक मुलांनी ‘स्वप्नभूमी’तून स्वप्नांना पंख लावून घेऊन बाहेरील जगात झेप घेतली आहे! ते ‘स्वप्नभूमी’चे श्रेय!

_SuryakantKilkarniYanchi_Swapnabhumi_1.jpgआश्रमात मुलांचा शिस्तबद्ध दिवस सकाळपासून सुरू होतो. पहाटे पाचपासून अनिता हाळे, कालिंदी जाधव, सविता येडपे यांचे ‘हाऊस मदर’चे काम सुरू होते. त्या तिघी अनाथ किंवा आईवडिलांपासून दुरावलेल्या मुलांना आईचे प्रेम मिळावे, त्यांची काळजी घेतली जावी आणि त्यांना स्वयंशिस्त लागावी यासाठी झटतात. मुलेही प्रेमाने त्यांचे ऐकतात. ‘स्वप्नभूमी’ तीन एकरांत विस्तारलेली असल्याने, मुलांना खेळण्यासाठी भरपूर मोकळी जागा आहे. दुमजली इमारत आणि सहा प्रशस्त खोल्या. मुलांसाठी दहा शौचालये आणि दहा बाथरूम. सगळीकडे स्वच्छता. आहारात मुलांच्या आरोग्याचा विचार. दोन वेळा नाश्ता, दोन वेळा जेवण- घरातल्यासारखे. तेथील मुले टवटवीत आणि तंदुरुस्त दिसतात. मुले शाळा संपवून दुपारच्या वेळेत ‘स्वप्नभूमी’त येतात. चारच्या वेळेला, ‘हाऊस मदर’ त्या मुलांसोबत मुले होऊन खेळतात. त्या स्वत:च्या पाल्याची काळजी करावी तशा झटतात. एका भल्यामोठ्या कुटुंबासारखे चित्र असते ते.

मुलांसाठी छोटेखानी लायब्ररी आहे. त्यात पंधराशेहून अधिक पुस्तके आहेत. मुलांना कोठल्याही प्रकारे कशाचीही कमतरता जाणवणार नाही याची काळजी घेतल्याचे तेथे दिसते. मुले उत्तम शिक्षण घेऊ शकतील, त्यांचे भवितव्य घडेल याचीही काळजी घेतली जाते. त्यांना शालेय शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष फिल्डवरच्या उपक्रमांत सहभागी करून घेतले जाते. बागेत-शेतात काम करवून घेतले जाते. पर्यावरणाचे प्रेम प्रत्यक्ष बागेतून-शेतातून फुलवले जाते. सगळ्या उपक्रमांचा उद्देश हाच, की मुलांच्या जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात! त्यांच्यातून चांगली माणसे घडावीत! त्याचा परिणाम दिसतही होता. मुलांमध्ये समज आणि शहाणपण जाणवत होते. तसेच, संस्थेतून बाहेर पडलेली मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगल्या हुद्यांवर कामे करत आहेत. संस्थेतच प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणारे राम लटपटे. राम अनाथ. त्यांच्या काकांची परिस्थितीही हलाखीची. राम गुरे सांभाळण्याचे काम करत. पाचव्या इयत्तेत आश्रमात आले, मग दहावीपर्यंत तेथे शिक्षण घेऊन पुण्याला गेले. तेथे त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. टिळक विद्यापीठातून ‘एम एस डब्ल्यू’ केले. त्यानंतर ते संस्थेत आले व विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

कुलकर्णी यांनी अनाथाश्रमाची घडी बसल्यावर बालकामगार मुलांचा प्रश्न समजून घेण्यास सुरुवात केली. त्यांना शाळाबाह्य मुलांचे प्रश्न त्रास देऊ लागले. त्यांनी आंध्रप्रदेशात जाऊन शांता सिन्हा यांचे काम पाहिले. त्यातून कुलकर्णी यांच्या लक्षात आले, की त्या मुलांना सहजच शिक्षण देता येणार नाही. त्यांना गोडी वाटावी, आनंद वाटावा अशा गोष्टी त्यासाठी घडायला हव्यात, शिवाय मजुरी! काम करणाऱ्या मुलांना मालकाच्या तावडीतून सोडवले तरी त्यांचे पुनर्वसन होण्याची गरज नितांत असणार. बालकामगारांच्या सर्वेक्षणासाठी पन्नास गावांचे नियोजन करण्यात आले. तसेच, अडीचशे गावांतील मुलांना बेसलाईन शिक्षण पुरवण्यात आले. त्यातून शिक्षणविषयक अनेक प्रयोग सुरू झाले. मुलांच्या पालकांना व्यावसायिक प्रशिक्षणही देण्यात आले -स्क्रीन प्रिंटिंग, इलेक्ट्रिशियन, मसाला कांडप, टेलरिंग, फोटोग्राफी असे उद्योग व्यवसाय मुला-मुलींना शिकवले जाऊ लागले.

बालकामगारांच्या प्रश्नाबाबत लोकसहभाग वाढवण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या आखण्यात आल्या. सरपंच, शिक्षक यांना मान देऊन त्यांच्याकडून शाळेकडे, मुलांकडे लक्ष देण्याचे काम वाढवण्यात आले. गावकरी-शिक्षक यांच्यामधील संवाद वाढला. त्यामुळे शाळेतील मूलभूत सुविधांची सोय गावकऱ्यांनी केली तर शिक्षकही मन लावून मुलांना शिकवू लागले. पैशांअभावी शाळेत दुरुस्तीचे काम रखडले होते ते चित्र हळुहळू पालटले. गावकऱ्यांनी लाख-लाख रूपये जमवून शाळांचे प्रश्न सोडवले. कुलकर्णी यांनी औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत ‘सेतू’ या उपक्रमांतर्गत चौदा हजार मुलांना शाळांत प्रवेश मिळवून दिला आहे. त्यांनी गावकऱ्यांच्या सहभागाने सहाशेपन्नास शाळा सुंदर केल्या आहेत.

_SuryakantKilkarniYanchi_Swapnabhumi_2.jpgकुलकर्णी यांनी ‘श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया’ची स्थापना आदर्श शाळा कशी असावी याचा वस्तुपाठ घालून द्यावा म्हणून 2006 मध्ये केली. ‘स्वप्नभूमी’तील सातवीपर्यंतची मुले त्या शाळेत जातात. शिवाय, पंचक्रोशीतील पालक त्यांच्या मुलांनाही त्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून धडपडत असल्याचे वास्तव आहे. परिसरातील सर्वोत्तम शाळा म्हणून ‘संत ज्ञानेश्वर विद्यालया’ने लौकिक कमावला आहे.
विज्ञान मुलांमध्ये हसतखेळत रुजायला हवे अशी कुलकर्णी यांची खूप इच्छा होती. त्यांनी केरवाडीसारख्या छोट्या गावात त्यांच्या त्या इच्छेला आकार दिला. त्याकरता त्यांनी दोन एकरांतील वीस हजार चौरस फूट जागेत विज्ञानाची गोडी लावणारा एक तंबू ठोकला. त्याचे ‘डिस्कव्हरी सायन्स सेंटर’ असे नाव. तेथे एकशेचाळीस प्रयोग ठेवण्यात आले आहेत. चारशे प्रयोग तर हाताळण्यासाठी आहेत. मुलांना ते सगळे प्रयोग हाताळत विज्ञान समजून घेण्याची सोय केलेली आहे. मुले एकदा का तंबूत शिरली, की ती बाहेरच येऊ इच्छिणार नाहीत अशी छोटीमोठी आकर्षणे आत आहेत.

‘स्वप्नभूमी’त बालकांच्या प्रश्नाबरोबर इतर अनेक प्रश्नांना हात घालण्यात आले. महिलांचे प्रश्नही हाताळले जाऊ लागले. ‘स्वप्नभूमी’चे काम महिलांचे बचत गट, त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, व्यावसायिक प्रशिक्षण, पाणलोट विकास, एचआयव्ही – एड्सबाधित रूग्णांचे समुपदेशन, दुर्बलांचे सक्षमीकरण अशा अनेक आघाड्यांवर चालते. संस्थेत दोनशेहून अधिक कार्यकर्ते पूर्णवेळ काम करत आहेत. त्यांतील कितीतरी जण संस्थेच्या पहिल्या टप्प्यापासून सोबत आहेत. काही कार्यकर्त्यांनी संस्थेला वीस–वीस वर्षांपासून वाहून घेतले आहे.
कुलकर्णी यांना शिक्षणविषयक अनेक प्रश्नांनी पछाडलेले असते. त्यांना शाळा असूनही मुले शाळेत जात नाहीत याविषयी मोठी चिंता वाटते, किंबहुना रागच येतो. ते म्हणतात, “मुले भारतीय व्यवस्थेत शाळाबाह्य का राहतात? शाळा असून ती शाळेत का जात नाहीत हे कोणी तपासायला हवे? राजकीय नेत्यांना त्यांच्या पुढील पिढ्यांनी अकार्यक्षम, वाया गेलेले असावे असे का वाटते? एकूण बालकांपैकी अडतीस टक्के बालकांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर का ठेवले जाते? कोणत्याही नेत्याला असे वाटत नाही, की मुलांनी शाळेत यावे आणि शिकावे. शाळा हा केवळ व्यवसाय झाला आहे. मुलांना शाळेत पाठवले तरी शाळेत शिकण्याची तरतूद आहेच कोठे?

कुलकर्णी तळमळीने सांगत राहतात, “मुलांना शाळेत आनंदी वातावरण मिळत नसेल तर मुलांना शाळा नको वाटतात. परंतु आपण कधीही मुलांशी चर्चा करत नाही, की त्यांना शाळा नको का वाटते? त्यांना शाळा आवडत नाही म्हणजे काय? शाळाव्यवस्थेत त्रुटी-उणिवा काय आहेत हे कधी समजून घेतले जात नाही.”

मुलांना वाचता येत नाही ही बाब लक्षात घेऊन, कुलकर्णी यांनी नव्वदच्या दशकात ‘चावडी वाचन’ उपक्रम सुरू केला. शासनाने त्या उपक्रमाच्या यशानंतर तो राज्यात सर्वदूर सुरू करण्याचा आदेश दिला. वाचनाची गोडी वाटावी, पालकांनाही त्यांच्या मुलाला वाचता येते याचा आनंद व्हावा आणि एकूणच, शिक्षक-पालक दोघांचा दबाव गट तयार व्हावा म्हणून ‘चावडी वाचना’चा उपक्रम अभिप्रेत आहे. ‘चावडी वाचना’मुळे अल्पावधीत पालम तालुक्याच्या परिसरातील साडेसहा हजार मुले खाडखाड वाचू लागली असा कुलकर्णी यांचा दावा आहे.
शिक्षणाचा दर्जा घसरला असेल, शिक्षणाविषयी अनास्था निर्माण करणारी व्यवस्था असेल किंवा शिक्षणातून खरोखरच उपजीविकाभिमुख शिक्षण मिळत नसेल असे सर्व नकारात्मक चित्र असतानाही, गेल्या पाच-सात वर्षांत पालकांचा दृष्टिकोन प्रचंड बदलला आहे. विशेष करून, ग्रामीण भागातील पालकही त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाविषयी जागरूक झाल्याची बाब कुलकर्णी अधोरेखित करतात. पूर्वी ग्रामीण पालकावर कोणतेही आर्थिक संकट ओढवले, की मुलांची शाळा प्रथम बंद व्हायची. आता मात्र, चित्र बदललेले आहे. ग्रामीण भागातील शेती करणारा पालकही कर्ज काढून मुलाला शिकवू इच्छितो. मुलाला होस्टेलवर ठेवून शिक्षण देऊ इच्छितो. त्याला शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे, पण त्यासोबत आता खेड्यापाड्यांत शिक्षणाचा बाजारही बसत आहे. क्लासेसचे फॅड खेड्यापाड्यांत पोचले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर खाजगी शाळांचे पेव फुटेल आणि मनमानी कारभार सुरू होईल अशी भीती कुलकर्णी यांना वाटते.

_SuryakantKilkarniYanchi_Swapnabhumi_3.jpgअव्यावहारिक शिक्षणाला फाटा देऊन विद्यार्थ्याला जे व्हायचे आहे तेच शिक्षण घेता यायला हवे, अशी सोय भारतीय शिक्षणव्यवस्थेत असायला हवी. सतरा-अठरा वर्षें शिक्षण घेऊनही पोट भरता येणार नसेल, तर त्या कुचकामी शिक्षणाला अर्थ नाही. असे सांगून कुलकर्णी म्हणतात, की जर कोणाला शेतकरी व्हायचे असेल, तर त्याला शेतीचे शिक्षण हवे, कोणाला कारखानदार, तर त्याला व्यवसायाचे, कोणी शास्त्रज्ञ, कोणी कलाकार होऊ इच्छित असेल तर त्याला त्या प्रकारचे शिक्षण मिळायला हवे.

नेदरलँड, स्पेन या देशांमध्ये मुले पदवीधर होताना, तो अमूक एका विषयातील तज्ज्ञ असतो. कौशल्यपूर्ण शिक्षण मिळाले तर कौशल्यपूर्ण माणसे घडतील. भारतात गरिबी असण्याचे कारण भारतात जे शिक्षण दिले जाते ते कुचकामी आहे. उपयोगशून्य, व्यवहारशून्य आहे. पदवीधर होऊनही नोकरी मिळवण्यासाठी आणखी शिक्षणाची गरज पडत असेल तर त्या शिक्षणाला अर्थ नाही. शिक्षणातून समृद्धी यायला हवी. निरनिराळ्या वाटा उपलब्ध व्हायला हव्यात. सुरुवातीला पोट भरता आले पाहिजे, मग अक्कल वाढवता आली पाहिजे आणि त्यातून ज्ञानप्राप्ती करता यायला हवी. पण आपल्या शिक्षणात या तिन्ही वाटांची सोयीस्कर वाट लागलेली आहे. त्या आता तरी दुरूस्त व्हायला हव्यात.

कुलकर्णीं यांनी अगदी मोलाचा प्रश्न केला, “आईबाप कष्ट करून मुलांना शिकवतात, काही देणगीदार पुढे येऊन मुलांसाठी तशी सोय करतात, काही संस्था मुलांसाठी वाहून घेतात. इतके सगळे करून, त्या मुलांना सर्व तऱ्हेच्या अनुपलब्धतेतून उपलब्धतेकडे वळवले जाते, तरीही ती मुले शिकत का नाहीत? त्यांची मानसिकता त्यांनी शिकावे, त्यांची परिस्थिती सुधारावी अशी का दिसत नाही? उलट, बाप राबतोय, आई कष्ट करतेय आणि मुले त्यांच्या पैशांतून मौज करताना दिसतात, तेव्हा मन खिन्न होते. या मुलांमध्ये मुळी त्यांच्या परिस्थितीची जाणीव, त्याबद्दलची टोचणी नाही; ती कोठून आणायची? जगण्याविषयीचे गांभीर्य कोठून आणायचे? त्यांच्या कुटुंबीयांच्या कष्टाविषयीच्या संवेदना जागृत कशा करायच्या? विपरीत परिस्थिती समोर असतानाही खड्ड्यातून बाहेर पडावेसे वाटत नसेल, तर त्या मुलांना घडवायचे तरी कसे?”

अगदी खरे आहे. अमुकतमूक करण्याची परिस्थिती नसेल, तर ती निर्माण करता येऊ शकते, पण ती निर्माण करण्याची धमक तर मुलांना स्वत:लाच मिळवावी लागते. आजच्या बाजारीकरणाच्या जगात त्या प्रकारच्या संवदेनांचा जन्म कसा घडवायचा हा खरोखरीच अवघड प्रश्न आहे. कदाचित त्यासाठी सर्वांना, सर्व समाजाला एकत्र येऊन काम करावे लागणार आहे.

सूर्यकांत कुलकर्णी यांचे ‘सल शिक्षणाचा’ नावाचे पुस्तक साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख व माजी मुख्य सचीव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते जून 2018 मध्येच प्रकाशित झाले आहे. त्यातून कुलकर्णी यांचे शिक्षणविषयक विचार स्पष्ट होतात.  

– हिनाकौसर खान-पिंजार

About Post Author

Previous articleमराठी साहित्य मंडळ, बार्शी
Next articleज्ञानरचनावादी शिक्षणप्रक्रिया व शिक्षक
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200

1 COMMENT

Comments are closed.