सुवर्णांकित सृजनसोहळा

नृत्य -नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये? दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ती कला शिकू शकतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांत बदल घडवून त्यांचा विकास साधू शकतील… कांचन सोनटक्के यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी तो कृतीत आणून असंख्य जीवनांत आशेची, आनंदाची किरणे आणली, असंख्य कुटुंबांत आनंद निर्माण केला.

– ज्योती शेट्ये

नृत्य -नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये? दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ती कला शिकू शकतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांत बदल घडवून त्यांचा विकास साधू शकतील… कांचन सोनटक्के यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी तो कृतीत आणून असंख्य जीवनांत आशेची, आनंदाची किरणे आणली, असंख्य कुटुंबांत आनंद निर्माण केला.
 

नावाने, गुणाने आणि कर्तृत्वाने कसदार सोन्यासारख्या असणार्‍या आणि दिसणार्‍या कांचन सोनटक्के (पूर्वाश्रमीच्या कांचन कीर्तिकर- इथेही नावात कीर्ती आहेच!) हे नाव त्यांनी सार्थ केले. त्या मूळच्या मुंबईकर. त्यांनी एलफिन्स्टन आणि विल्सन कॉलेज मधून बी.एससी. पदवी प्राप्त केली. त्यांनी कथ्थक नृत्या चे धडे सीता झवेरी ह्यांच्याकडे घेतले. भरतनाट्यमचा अभ्यास रमेश पुरव व पार्वतीकुमार ह्यांच्याकडे केला. त्यांनी लोकनृत्याचा अभ्यासही रमेश पुरव ह्यांच्याकडे केला.
 

कांचन सोनटक्के यांनी नाट्यकलेचा ‘अमृतनाट्य भारती’चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तेथील गुरुवर्यांशी (कमलाकर सोनटक्के) विवाहबध्दही झाल्या. कमलाकर हे आपले स्फूर्तिस्थान आहे, असे त्या म्हणतात.
 

कमलाकर औरंगाबाद येथे विद्यापीठात प्राध्यापक असताना कांचन यांनी औरंगाबाद मध्ये काही वर्षे ‘नृत्यभारती’ ही नृत्यशाळा चालवली आणि मग सोनटक्क्यांची फॅमिली मुंबई ला आली, म्हणून त्या मुंबई त परतल्या. मुंबई त त्यांच्याच सेंट कोलंबा शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती परेरा ह्यांच्या आग्रहावरून त्या शाळेत, सृजनशील नाट्य (Creative Dramatics) हा विषय, अर्धवेळ शिक्षिका म्हणून शिकवू लागल्या. शाळेतील सर्वसामान्य मुलांबरोबर, कर्णबधिर मुलेही त्यांच्या वर्गात होती. तेथे त्यांनी स्वत:च्या कल्पना व क्षमता आणि मुलांचा उत्साह व उत्स्फूर्तता ह्यांचा मेळ घालत नवनवीन कलाकृती सादर केल्या.
 

त्या ‘सेंट कोलंबा’बरोबर आणखी दोन शाळांत शिकवू लागल्या. शाळांमध्ये शिकवत असतानाच त्यांचे शिक्षण व कलाविचार विकसित झाले व त्यांनी ते कृतीत आणले. त्यातून त्यांची उपचारपध्दत आकार घेऊ लागली. पारंपरिक भारतीय नाट्यकलेची मूलभूत तत्त्वे आणि पाश्चात्यकलेची आधुनिक तंत्रे ह्यांची सांगड घालून त्यांनी 'नाट्यकला- एक उपचारपध्दत' ही नवीन संज्ञा जन्माला घातली. ती अपंगांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी व पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरू लागली. त्यामुळे कांचन सोनटक्के यांचे कार्यक्षेत्र आणि ध्येय निश्चित झाले. नाट्यशालात्यांनी अरुण व डॉ. रूपा मडकईकर ह्यांना सोबत घेऊन 1981 मध्ये 'नाट्यशाला' ही संस्था स्थापन केली. संस्थेचे घोषवाक्य आहे- 'व्यक्तिविकासाय कलाशिक्षा'. हे माध्यम असेल आणि उपचारपध्दतही असेल. मुलांच्या शालेय शिक्षणास त्याची प्रभावी जोड लाभेल व त्यास सांघिक तत्त्वाची बैठक असेल. मनोरंजनातून हसतखेळत शिक्षण होईल. अपंग मुलांचा व्यक्तिविकास साधल्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळेल.
 

सोनटक्के म्हणाल्या, की 'नाट्यशाले'ला जोडले गेलेले दुर्बल, अपंग, विकलांग हे मानसिक, भावनिक, बौध्दिक व शारीरिक दृष्टया संवेदनक्षम धडपड करू शकणा-या व्यक्ती असतात. ह्या मुलांचा गट असा आहे, की त्यांच्या समस्या वेगळ्या असतात. त्यांना समजून घेऊन त्यांच्या उर्वरित क्षमतांचा उपयोग करून घेऊन त्यांचे आत्मभान आणि आत्मविश्वास जागा करण्यासाठी त्यांना नाट्यशिक्षण द्यावे लागते.
 

शिक्षणातील पहिला प्रयत्न असतो तो प्रत्येक अपंग मुलाची 'स्वत:बद्दल आत्मीयता' वाढावी ह्यासाठी. स्वत:ची ओळख, मी कोण आहे व माझ्यात काय नाही ह्यापेक्षा माझ्यात काय आहे ह्याचे भान त्यांना यावे यासाठी. त्यांच्या शारीरिक आणि बौध्दिक उणिवांमुळे त्यांचा विकास कमी झालेला असतो. नृत्यनाट्य शिक्षणाने त्यांच्यात सकारात्मक बदल होऊन ते आपले अपंगत्व विसरून शारीरिक हालचाली आणि मनोविकास होण्याच्या दृष्टीने हळुहळू प्रगती करू लागतात.
 

अपंगांच्या बाबतीत शिकवण्याच्या मूलभूत गोष्टी म्हणजे नाट्यातून भावभावनांचे प्रकटीकरण, नृत्याद्वारे लयबध्द हालचाली, संगीतातून आवाजातील वैविध्य व लयतालाची जाणीव निर्माण करणे. सोनटक्के म्हणाल्या, की नाट्यमाध्यमाच्या सक्षमतेमुळे मुलांच्या संस्कारक्षम व शारीरिक वाढीच्या वयात बरेच काही साध्य करण्यासारखे असते. नाटक-खेळांचे साहाय्य घेऊन अपंग मुलांमधील क्षमता अजमावणे गरजेचे असते. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, प्रत्येकाच्या अपंगत्वाची वेगळी दखल घेऊन त्याप्रमाणे शिकवावे लागते. परत-परत शिकवावे लागते. प्रयत्नांत सातत्य ठेवावे लागते.

सोनटक्के प्रशांतची गोष्ट सांगतात. प्रशांत हा पाच-सहा वर्षे वयाचा असताना कार्यशाळेत दाखल झाला. तो होता बहुविकलांग, उभे राहणेही शक्य नसलेला. त्याला नृत्य-नाटय शिबिरात जो सराव दिला जात होता, त्याच्याकडून जी प्रात्यक्षिके करून घेण्यात येत होती, त्यांना प्रतिसाद देऊन, त्याने पहिले पाऊल टाकले. त्यावेळी त्याला मसाजतज्ञही उपचार करत होते. तेव्हा तज्ञांच्या असे लक्षात आले, की प्रशांतच्या सुधारणेमध्ये त्या एका आठवड्यात लक्षणीय प्रगती झाली आहे.
 

दुसरे उदाहरण आहे, वर्धा इथे राहणा-या सागर नावाच्या मुलाचे. नृत्य-नाट्य कार्यशाळेमुळे त्याच्या आत्मविश्वासात एवढा फरक पडला की त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन गाणे, वक्तृत्व आणि खेळ ह्या विभागांत बरीच बक्षिसे मिळवली.
 

कांचन सोनटक्के उपचारपध्दतीमध्ये नवनवीन शक्यता अजमावून पाहत प्रयोग करत राहिल्या. त्यांनी जास्तीत जास्त अपंग मुलांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न केले. अपंगांमध्ये खूप वेगवेगळया प्रकारची मुले आढळतात; अंध, अस्थिअपंग, मतिमंद, गतिमंद, विकलांग, बहुविकलांग, कर्णबधिर वगैरे. अंधांमध्ये दृष्टिहीन, अंशत: दृष्टिहीन, रातांधळे असे अपंगत्व आढळते. अपंगांसाठी विशेष शाळांची संख्या हळुहळू वाढत आहे. आजमितीस पाचशेच्यावर अशा विशेष शाळा आहेत.
 

कांचन सोनटक्के यांनी अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना भेटून सृजनशील नाट्यकला व 'नाट्यशाला' ह्याबद्दल चर्चा केली. अपंग मुलांसाठी शालेय वातावरणाबरोबर आणि अभ्यासक्रमाबरोबर नृत्य-नाट्य कार्यशाळेचा फायदा कसा होईल ते पटवून दिले. नाट्यकलेचे परिचयवर्ग घेतले. नाट्यकला मुलाची आकलनशक्ती, संवादकौशल्य, एकाग्रता, स्मरणशक्ती, स्नायूंच्या हालचाली-लवचीकता-लयबध्दता वाढवते हे त्यांनी नाटुकल्यांतून व प्रात्यक्षिकांतून दाखवले. शिक्षकांनीही ह्या गोष्टीचा स्वीकार केला.
 

सोनटक्के यांनी असे नमूद केले आहे, की नृत्य-नाट्य शिबिराने, सरावाने अपंग मुलांच्या मनात, शरीरात जे बदल घडून येतात ते प्रयत्नात सातत्य ठेवले तर कायमस्वरूपी टिकतात. त्यांच्या विकासाचा वेग वाढतो. त्यांचे भावविश्व समृध्द होते.
 

शिक्षकांना नृत्य-नाट्य उपचारपध्दतीची माहिती देणे गरजेचे होते व म्हणून शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू झाल्या. त्यासाठी दिल्लीस्थित ‘कल्चरल सेंटर फॉर रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग’ ह्या संस्थेने अर्थसाहाय्य दिले. कार्यशाळेच्या अभ्यासक्रमाच्या आखणीमध्ये अभिनय, उच्चार, वेशभूषा, रंगभूषा, दिग्दर्शन, लयबध्द हालचाली, प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य, नाटयलेखन ह्या बाबींचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. कार्यशाळा महाराष्ट्रभर आणि भारतातल्या काही ठिकाणी झाल्या. सर्व राज्यांच्या शिक्षकांनी महाराष्ट्रात येऊन ह्या उपक्रमांत प्रशिक्षण घेतले.
 

'नाट्यशाले'ने पंचाहत्तर प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आणि साडेसात हजारांवर शिक्षक प्रशिक्षित केले. कार्यशाळांत पाच हजारांच्यावर मुलांनी भाग घेतला, पण 'नाट्यशाले'ने प्रशिक्षित केलेल्या शिक्षकांकडून शिकणा-या मुलांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. 'नाट्यशाले'तर्फे बालनाट्य शिबिरेही महाराष्ट्रात होतात.
 

सोनटक्के यांनी पुढे जाऊन विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलाशिक्षण द्यायला सुरुवात केली. शारीरिक जडणघडणीसाठी योगासने, रोप-मल्लखांब वगैरे शिकवले जाऊ लागले. ह्या शिबिरांचे नाव होते- 'रंगतरंग'. ही शिबिरे ग्रामीण भागातही यशस्वी झाली. कान्हे, वाडेश्वर, वर्धा , पाली, डहाणू येथे हे उपक्रम पार पडले.
 

नाटक प्रत्यक्ष सादर करण्याने मुलांच्या भावविश्वात सकारात्मक बदल घडून येतात. त्यांचा आत्मविश्वास दुणावतो. त्यांचे सर्वसाधारण मुलांसारखे रंगमंचावर वावरणे हा मुले आणि त्यांचे पालक ह्यांच्यासाठी उत्साहवर्धक अनुभव असतो. रंगमंचावरून प्रेक्षकांशी होणा-या संवादाने, त्यांच्या प्रतिसादाने मुले खूष होतात. नाट्य सादरीकरण करताना बरोबरच्या सहका-यांबरोबर बंध निर्माण होतात, संघभावना वाढीस लागते. अपंगांचे एकाकीपण नाहीसे होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी, शाबासकीने त्यांचे मन बहरून येते. स्वाभिमान वाढू लागतो, डोळयांत चमक येते आणि अजून काहीतरी चांगले करायची इच्छा निर्माण होते. बालप्रेक्षक प्रभावित होतात, त्यांनाही प्रेरणा मिळते.
 

राज्यस्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. फेब्रुवारी 2010 मध्ये ह्या स्पर्धा महाराष्ट्रभर दहा केंद्रांत घेण्यात आल्या. त्यात एकशेतीन शाळांनी भाग घेतला. अंतिम फेरीसाठी एकवीस नाटके निवडण्यात आली. अंतिम फेरी मुंबई इथे पार पडली.

'नाट्यशाले'तर्फे रंगभूमीवर स्वतंत्रपणे नाटके सादर होतात. भारतभर नाटकांचे प्रयोग होतात. आजपर्यंत पंचावन्न नाट्यकृतींचे बाराशेवर प्रयोग झाले आहेत. ह्या प्रयोगांमुळे 'नाट्यशाले'चे कार्य भारतभर पसरले आहे.
 

राधा कल्याणदास दटयानानी या चॅरिटेबल ट्रस्टने उभारलेल्या साईबाबा सेवाधाम ह्या वास्तूत संस्थेला जागा मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात कान्हे इथे ही वास्तू उभी आहे. संस्थेच्या वतीने इथे ग्रामीण प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे. 'नाट्यशाले'चा रौप्यमहोत्सव इथे 2006 साली दिमाखात साजरा झाला.
 

'नाट्यशाला' स्पर्धेसाठी लिहिल्या गेलेल्या नाट्यसंहितांचे संच प्रकाशित करते. असे सात संच प्रकाशित झाले आहेत. 'गोष्ट तुमची-आमची' (इयत्ता 3रीच्या इतिहासावर आधारित) व 'महाराष्ट्र आमुचा' (इयत्ता 3री व 4थी च्या भूगोलावर आधारित) ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
 

कांचन यांच्या मुली -मानसी आणि मैथिली- ह्यांचे त्यांच्या कार्यात सक्रिय सहकार्य असते. नाट्यदिग्दर्शक शिवदास घोडके हेही त्यांच्याबरोबर असतात. त्यांचे कामच एवढे मोठे आहे, की 'दाते' त्यांना शोधत येतात आणि ते विपुल आहेत, म्हणून त्यांना स्वत:ला कुणाकडे याचना करावी लागली नाही हे त्या कृतज्ञतेने नमूद करतात.
 

मानसन्मान व पुरस्कारत्यांना खूप मानसन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांतले
'सह्याद्री हिरकणी' पुरस्कार, 'नाट्यदर्पण' पुरस्कार, 'दलित मित्र' पुरस्कार, 'वसंत सोमण स्मृती' पुरस्कार हे काही उल्लेखनीय. पण त्यांचा खरा पुरस्कार म्हणजे, त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर जीवनाची वाटचाल यशस्वीपणे करणारे त्यांचे सर्व विद्यार्थी, असे त्या मानतात. त्यांना आलेली पालकांची पत्रे आणि त्यांच्या परिवाराला जोडल्या गेलेल्या सर्व मुलांच्या वागण्याबोलण्यातून प्रकट होणारा आदर ही त्यांच्या या पुरस्काराची पोचपावती!
 

कांचन माणुसकी जपणार्‍या थोर कलावंत आहेत. त्यांच्या सृजनाची त-हा अलौकिक आहे.
 

ज्योती शेट्ये
9820737301

About Post Author