साने गुरूजींचे सर्व साहित्य वेब साईटवर

    0
    25

    sane_guruji

    साने गुरूजींचे साहित्य ‘कॉपीराइट फ्री’ झाल्यानंतर ते सर्व आता वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही अभिनव वेबसाइट चालवणार्‍या ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने ‘साने गुरूजी डॉट कॉम’ …….


    ’थिंक महाराष्ट्र’चा उपक्रम 

    साने गुरूजींचे साहित्य ‘कॉपीराइट फ्री’ झाल्यानंतर ते सर्व आता वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही अभिनव वेबसाइट चालवणार्‍या ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने ‘www.saneguruji.net’ ही वेबसाइट तयार केली असून, ती सोमवार, 30 मे 2011 रोजी मराठी जनतेस अर्पण करण्यात येईल.

    sane_guruji

    दादरच्या साने गुरुजी विद्यालयात सोमवार 30 मे रोजी सायंकाळी 6 वा. होणार्‍या समारंभात या वेबसाइटची झलक दाखवली जाईल. या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. शांती पटेल व र.ग.कर्णिक हे असणार आहेत. धारप असोशिएट्स या पनवेल-कर्जत भागात प्रामुख्याने कामे करणार्‍या विकासकसंस्थेने ही साइट स्पॉन्सर केली आहे. पूजासॉफ्ट टेक्नॉलॉजीने या साइटची निर्मिती केली आहे.

    ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या साइटवर गेले वर्षभर महाराष्ट्राचे कर्तृत्व व सांस्कृतिक संचित यांची नोंद केली जाते. आता ही नोंद दैनिक स्वरूपात होणार आहे. ‘दैनिक मल्लिनाथी’ व ‘चित्र महाराष्ट्राचे’ अशा दोन विभागांत प्रकट होणार्‍या नव्या स्वरूपातील ‘थिंक महाराष्ट्र साइट’चे प्रसारणदेखील 30 मे पासून सुरू होणार आहे. त्या ‘साइट’ची झलक किरण क्षीरसागर सादर करतील.

    साने गुरूजी डॉट कॉम या साइटवर साने गुरूजींची सर्व पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. हे साहित्य सुमारे अकरा हजार पृष्ठांचं आहे. त्यातील कोणताही भाग, कोणताही वाचक केव्हाही साइटवर वाचू शकेल, अथवा डाउनलोड करून घेऊ शकेल. ते युनिकोडमध्ये असल्यामुळे संशोधनास सोपं झालं आहे. ‘श्यामची आई’पासून मुलांच्या छोट्या छोट्या पुस्तकांपर्यत सर्व साहित्य वाचकांच्या सतत नजरेसमोर राहील हा मोठाच लाभ होय, असे कार्यक्रम संयोजक आदिनाथ हरवंदे यांनी म्हटले आहे.

    ते म्हणाले, की रवींद्रनाथ टागोरांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे. बंगालच्या सांस्कृतिक जीवनात रवींद्रनाथांना जसे अनन्यस्थान आहे तसेच स्थान महाराष्ट्राच्या भावजीवनात साने गुरूजींना आहे. योगायोग असा, की 30 मे रोजी साइटचे उदघाटन झाल्यावर लगेच 12 जूनला साने गुरूजींचा स्मृतिदिन येत आहे.

    About Post Author

    Previous articleसृजनाचे नवे रंग!
    Next articleबिनकवचकुंडलाचा कर्ण – श्रीपाद हळबे
    दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.