साखरवाडी – खो खो ची पंढरी

जसा लौकिक कुस्तीसाठी हरियाणाने, टेनिससाठी आंध्र प्रदेशने आणि फुटबॉलसाठी ईशान्य भारताने कमावला आहे, तसाच लौकिक महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी नावाच्या गावाने खो-खो च्या राष्ट्रीय मैदानावर मिळवला आहे ! साखरवाडीच्या विशेषतः मुलींचा धसका देशभरच्या खो-खो खेळाडूंनी घेतला आहे. त्याचे वर्णन एक खेळाडू प्रियांका येळे यथार्थ करते. ती म्हणते, “स्पर्धेला खेळायला कोठेही गेलो, की आधीच ‘साखरवाडीचा संघ खूप डेंजर खेळतो’ अशी हवा तेथे तयार झालेली जाणवायची. त्यातही प्रतिस्पर्धी संघातील अनेक खेळाडू विचारत, ‘प्रियांका आली आहे का?’ ‘हो’ असे उत्तर कळताच ते खेळण्याआधीच गर्भगळीत होऊन जात आणि घडायचेही तसेच. त्यांचा पराभव ठरलेला असायचा. आपले कौतुक आपणच सांगताना संकोच होतो, पण महाराष्ट्रातील साखरवाडी भारतभर माहीत आहे, ती तेथील साखरेमुळे नाही, तर खो खो संघामुळे !” प्रियांका येळे पदवीधर आहे. तिने तिच्या वयाची वीस वर्षे उलटण्याच्या आतच ‘जानकी’, ‘वीरबाला’, ‘राणी लक्ष्मीबाई’ आणि ‘शिवछत्रपती’ असे खो खो खेळातील सर्व पुरस्कार मिळवले आहेत. तिचा खेळ तिच्या आख्ख्या गावासाठी उत्साहवर्धक ठरला आहे. तिच्यासारखे आणखी बरेच खो खो खेळाडू साखरवाडीत तयार होऊन गेले आणि तयार होत आहेत.

माधवी भोसले, भाग्यश्री फडतरे यांनीही महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ पटकावला आहे. त्या दोघींनाही देश पातळीवरील सर्वोच्च ‘कुमारी जानकी पुरस्कार’ मिळाला आहे; त्यांना ‘वीरबाला पुरस्कार’, ‘शिवछत्रपती पुरस्कार’ ही मिळाले आहेतच. प्रियांकाचा व त्या दोघींचा वेळोवेळी अनेक पुरस्कार मिळून गौरव झाला आहे.

साखरवाडी संघाच्या कामगिरीचा गेल्या काही वर्षांतील आलेख तर पाहा- भाग्यश्री फडतरे हिने एकवीस राष्ट्रीय स्पर्धा खेळून आठ सुवर्णपदके, सात रौप्यपदके आणि दोन कांस्यपदके तर माधवीने तेवीस राष्ट्रीय स्पर्धा खेळून तेरा सुवर्णपदके, पाच रौप्यपदके व तीन कांस्यपदके कमावली आहेत. रुबिना सय्यद हिने एकोणीस राष्ट्रीय स्पर्धा खेळून अकरा सुवर्णपदके, दोन रौप्यपदके व तीन कांस्यपदके मिळवली आहेत. भाग्यश्री, माधवी आणि रुबिना या तिघींनी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद पाच-पाच वेळा भूषवले आहे. सारिका जगताप हिने बारा राष्ट्रीय स्पर्धा खेळून एक सुवर्णपदक, सात रौप्यपदके व दोन कांस्यपदके मिळवली आहेत. प्रियांका भोसले हिने सतरा राष्ट्रीय स्पर्धा खेळून अकरा सुवर्णपदके, दोन रौप्यपदके व एक कांस्यपदक मिळवले आहे. तसेच, तीन वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे.

साखरवाडीच्या मुलींच्या मैदानावरील चपळाईने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरते आणि पाहणारे थक्क होऊन जातात ! त्या गावातून शंभराहून जास्त राष्ट्रीय खो खो खेळाडू घडले आहेत. एवढेच नव्हे तर गावातील एकाच माध्यमिक शाळेतील तीन विद्यार्थिनींना शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला आहे. म्हणूनच साखरवाडी म्हणजे ‘खो-खो ची पंढरी’ हे बिरूद देशभरात पोचले आहे. व्यत्यास असा सांगता येईल, की त्यामुळे विठ्ठलाच्या पंढरीचे महात्म्यही भारतभर सर्वश्रुत होत आहे !

साखरवाडी पुण्यापासून साधारण सत्याऐंशी किलोमीटर अंतरावर फलटण तालुक्यात आहे. उद्योजक भाऊराव आपटे यांनी त्या गावात साखर कारखाना सुरू केला. त्यामुळे गावाचे नाव साखरवाडी असे पडले. साखर कारखान्याबरोबर तेथे काम करणाऱ्या कामगारांसाठी वसाहती बांधण्यात आल्या आणि त्यांच्या मुलांसाठी साखरवाडी विद्यालयाची स्थापना झाली. साखर कारखान्यातील कामगारांच्या मुलांना त्या विद्यालयात प्रवेशात प्राधान्य दिले जाते. तेथे ‘अत्यंत कमी गुंतवणुकीचा खेळ’ म्हणून खो-खो रुजू लागला. विद्यालयाच्या प्रांगणातच घडत गेल्याने शाळेला त्याचे श्रेय लाभले. त्यात व्यावसायिक प्रशिक्षण मिळू लागले आणि बघता बघता, गावात घरटी एक खो-खो पटू तयार होऊ लागला. हे सारे कोणतीही अद्ययावत सुविधा उपलब्ध नसताना ग्रामीण भागातील या मुली जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर, राष्ट्रीय पातळीवर खेळत गेल्या आणि गावासाठी व राज्यासाठी नाव कमावू लागल्या !

प्रियांका साखरवाडीच्या कामगार वसाहतीतील दहा बाय दहाच्या एका घरात राहते. तिच्या घरात इतर कोणत्याही वस्तूंपेक्षा खो-खोमध्ये कमावलेली पदके भिंतीवर मांडलेली जास्त दिसतात. प्रियांकामध्ये या खेळाविषयी आवड कशी तयार झाली, ते सांगताना ती म्हणाली, “चौदा वर्षीय वयोगटात खेळत असताना वेळेत न पोचल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील एक स्पर्धा खेळण्याची माझी संधी हुकली. ती हुरहुर मला फार लागून राहिली. तेव्हापासून मी खेळायला जाण्यास उशीर कधीच केला नाही आणि जिद्दीने स्पर्धा जिंकत गेले. खेळातील सर्वच पुरस्कार मिळवले.”

करिष्मा, मुस्कान आणि खुशबू या तिघी नगारजे बहिणी साखरवाडीच्या खो-खो संघात वेगवेगळ्या वयोगटांतून खेळतात. करिष्मा ही मोठी मुलगी. तिने जेव्हा खो-खो खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा तिला घरातून पाठिंबा मिळाला, पण नातेवाईकांनी जोरदार विरोध केला. नातेवाईक म्हणायचे, की “मुलींना कशाला खेळायला पाठवता, तेही एवढे तोकडे कपडे घालून ! सगळ्या जगासमोर असे खेळण्याची काय गरज? मुली खेळून काय करणार- लग्नच तर करणार ना?” तेच आता म्हणतात, “चांगल्या खेळतात हं मुली.” करिष्माच्या यशामुळे धाकट्या दोन बहिणींचा मैदानाच्या दिशेने मार्ग खुला झाला. मुलींच्या खेळाविषयी त्यांची आई शहिदा नगारजे म्हणाल्या, “आम्ही शाळेत खेळणाऱ्या इतर मुलींना मिळणारे यश बघून मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. मोठ्या मुलीची खेळात कामगिरी चांगली होतीच. म्हणून मग आम्ही इतर दोघी मुलींनाही खेळायला पाठवले. तिन्ही मुलींच्या खेळाला प्राधान्य देत असताना आमची ओढाताण होते.” मात्र पोरींचे अब्बू म्हणाले, “मोठ्या झाल्यावर त्यांच्यासाठी काही तरी करायचे आहे ना, त्यापेक्षा आताच पाठिंबा दिला तर पोरींचे नशीब तरी बदलेल !”

साखरवाडीचे खो-खो खेळातील यश ही किमया आहे शिक्षक संजय बोडरे यांची. ते शाळेत इतिहास-भूगोल विषय शिकवतात. ते साखरवाडीच्या शाळेत 1996 साली रुजू झाले, तेव्हा खो-खोच्या खेळालाच पालकांचा विरोध होता. प्रियांका भोसले हिने सांगितले, की “पण जसजसे मुलींनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तिन्ही पातळ्यांवर स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली, तसतसे आई-वडिलांना कौतुक वाटू लागले. तोपर्यंत शाळेत चांगले शिकले पाहिजे. खेळण्यात पोरगी गुंतली तर त्याचा अभ्यासावर मोठा परिणाम होईल, असे आमच्या आईवडिलांना वाटायचे.” प्रियांका ही पहिल्या संघातील यशस्वी मुलगी.

विविध स्तरांतील असा विरोध आणि खो खो खेळाला ‘ग्लॅमर’ नाही, त्यामुळे मुलींचा खो-खोचा सराव हा शाळेच्या वेळाबाहेर होई आणि खेळामुळे अभ्यासात त्यांचे दुर्लक्ष होणार नाही, याची खबरदारी बोडरेसर घेत. मात्र तरीही ‘मुली गावात कोठे सर्वांसमोर चड्ड्यांमध्ये खेळतील’ हा मूळ प्रश्न काही लोकांच्या डोक्यातून जात नव्हता. बोडरेसर सांगतात, की त्यामुळे मुली आरंभी पंजाबी ड्रेस घालून खेळायच्या. पण तसे खेळताना मुलींना त्रास व्हायचा, त्या अडखळायच्या. त्यांना खेळण्यासाठी योग्य हाफ पॅंट आणि टी-शर्टची आवश्यकता होती. पण मुलींना भीती होती, की पालक खेळण्यास कशीबशी परवानगी देतात. तसा पोशाख सांगितला तर पूर्ण खेळच बंद करून टाकतील !

बोडरे यांनी त्यावर एक उपाय शोधून काढला. ते म्हणाले, “मी मुलींच्या पालकांची बैठक बोलावली. मुलींना खेळताना जाणवत असलेली अडचण त्यांना समजावून सांगितली. त्यावर ते म्हणू लागले ‘आता आख्ख्या गावासमोर पोरी चड्ड्या-शर्ट घालून खेळणार का? लोक काय म्हणतील?”’ तेव्हा बोडरे यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या काही सीडी आणून पालकांना त्या स्पर्धांमधील खेळाडूंचे व्हिडिओ दाखवले. आपल्या मुलींना जर असा योग्य पोशाख मिळाला तर त्यासुद्धा खूप चांगल्या खेळू शकतात हे पटवून सांगितले. तेव्हा कोठे पालक तयार झाले. मात्र मुली सराव करत असताना रिकामटेकड्या पोरांना तेथे घुटमळू द्यायचे नाही, असे ठरले. अन् खो-खोचा संघ कोणत्याही अडचणीशिवाय खेळू लागला.

गावाला मान मुलींच्या खो-खो मधील यशामुळे मिळाला आहे. पंचक्रोशीत साखरवाडीच्या नावाची चर्चा होते. बोडरे यांनी आणखी एक प्रश्न लक्षात आणून दिला. मुलींना गरज होती ती योग्य आणि पोषक आहाराची. बऱ्याच खेळाडू मुली या कामगार वसाहतीत राहणाऱ्या होत्या, त्यांच्या आहारात कडधान्ये आणि पालेभाज्या यांचा समावेश होई. मात्र प्रत्येकीला सुकामेव्याचा आहार घेणे शक्य नव्हते. तेव्हा कडधान्यांना मोड आणून त्यांचा आहारात योग्य पद्धतीने समावेश केला गेला. विशेष म्हणजे, तो कमी खर्चात आणि शेतात सहज उपलब्ध असणारा पोषक आहार ठरला.

मुली दररोज सकाळी शाळा भरण्याच्या दोन तास आधी आणि शाळा सुटल्यानंतर तास-दीड तास सराव करतात. मुलींनी सुरुवातीच्या काही महिन्यांतच जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खो-खो स्पर्धांत बाजी मारली, बक्षिसे मिळवली तेव्हा गावातील लोक खूष झाले. यशाचा हा आलेख चढता राहिलेला आहे. साखरवाडी विद्यालयातून लहान, मध्यम आणि मोठ्या वयोगटातील मुलींचे संघ खेळतात. संजय बोडरे यांना उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी वयाच्या सदतिसाव्या वर्षीच महाराष्ट्र शासनाच्या दादोजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते अभिमानाने सांगतात, “एवढ्या कमी वयात दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळवणारा मी पहिला प्रशिक्षक आहे.” बोडरे बोलताना मृदू स्वभावाचे आहेत, मात्र मैदानावर सरावादरम्यान प्रशिक्षकाच्या भूमिकेत ते कडक आणि शिस्तप्रिय असतात असा खेळाडू मुलींचा अनुभव आहे.

– प्रतिनिधी
(मूळ आधार प्राजक्ता ढेकळे यांचा बीबीसी मराठी वरील लेख)
———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. खो खो या विलक्षण चापळ्य असलेल्या गतिमान खेळातील खेळाडूंची, खेळाडूंच्या गावाची माहिती देणारा लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here