सरोवर संवर्धिनी : गावोगावचे तलाव वाचवण्यासाठी ! (India’s Lake Culture)

 
सरोवर संवर्धिनीहा नवा, अजून फारसा न रुळलेला उपक्रम आहे. त्याचे स्वरूप ठिकठिकाणच्या लोकांनी त्या-त्या ठिकाणी एकत्र येऊन, तेथील जलस्रोतांची काळजी घेऊन जलसंवर्धनाच्या दृष्टीने आखलेला कृती आराखडा असे आहे. सरोवर संवर्धिनी ही संकल्पना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी मांडली. दिवंगत जलशास्त्रज्ञ डॉ. मोहन कोदारकर यांनी त्या संकल्पनेला रूप दिले. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात, काही ठिकाणी सरोवर संवर्धिनी अशा संस्था स्थापनही झाल्या आहेत. महाराष्ट्रातील नांदेड येथील शंकरसागर सरोवर संवर्धन, पवई येथील नौशाद अली सरोवर संवर्धिनी या असे कार्य करणाऱ्या दोन संस्था आहेत. औरंगाबादच्या जायकवाडी येथील नाथसागर सरोवर संवर्धिनी आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील लोणार सरोवर संवर्धिनी यांचे कामही सुरू झाले आहे. पुण्याचे उजनी सरोवर, हैदराबाद येथील हुसेनसागर सरोवर, उदयपूरची झील संरक्षण समिती, भोपाळ येथील भोज वेटलँड, ओडिशातील चिल्का लेक अ‍ॅथॉरिटी, नेपाळमधील रुपा सरोवरया संस्थादेखील सरोवर संवर्धिनी संकल्पनेतील उद्दिष्टांनुसार काम करत आहेत.
           


 तलाव/सरोवर हे सर्व बाजूंनी बंदिस्त असे जलसाठे असतात. त्यांमध्ये पाणी जाऊ शकते, पण त्यांतून बाहेर मात्र पडू शकत नाही. तलावांत पाणी साचत असते, साचवले जात असते. म्हणून ते साठे स्वास्थ्यदृष्ट्या जपले जाण्याची गरज असते, तीच माणसांची जबाबदारी असते. नद्यांची स्थिती त्या उलट असते. नद्या वाहत्या असल्याकारणाने त्यांची स्वयंस्वच्छता होत असते. तलाव, सरोवर, धरणे हे गोड्या पाण्याचे साठे आहेत. त्या पाणीसाठ्यांशी निगडित काही छोटेमोठे उद्योग उभे राहिलेले असतात. स्थानिक लोकांच्या अस्वच्छतेच्या सवयी आणि शासनयंत्रणेने उभारलेल्या सांडपाणी विल्हेवाट पद्धती यांचाही त्या जलसाठ्यांच्या निर्मळतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे तलावांच्या पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेचा स्तर कमी होतो आणि त्यामध्ये जैविक व रासायनिक प्रदूषके मिसळली जातात. जलाशयांचे पर्यावरण निकोप ठेवण्यासाठी सरोवर संवर्धिनी उपयुक्त ठरतील ही धारणा आहे.
तलाव हे दोन प्रकारचे आहेत : एक – निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित. भारतामध्ये तलावांची संख्या लक्षणीय आहे. तलावांची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळात लोकसहभागातून बरीच झाली. त्यासाठी त्यावेळच्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती, सर्वसामान्य जनांचा लोकसहभाग आणि धार्मिक स्थळानजीक असलेली त्यांची उपयुक्तता इत्यादी कारणे आहेत. लोकसहभाग हा प्रकार स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षला गेला आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर धरणाव्यतिरिक्त गावोगावी तलाव बांधणे, त्यांचे संवर्धन करणे संपुष्टात आले. शिवाय, जलवाटपाची केंद्रवर्ती पद्धत सर्व गावांमध्ये लागू करण्याची व्यवस्था होत असते. त्यामुळे लोकांना घरोघरी पाणी मिळते. स्वाभाविकच सार्वजनिक साठ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. तीच पद्धत दक्षिण आशियामध्ये आहे. सर्वसामान्य, स्थानिक लोकांचा सहभाग तेथील निर्णयप्रक्रियेमध्ये, त्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्येही घेतला जात नाही. त्यामुळे प्रत्यक्षात योजना आखणारे एकीकडे राहतात आणि त्या संबंधातील अडचणींना स्थानिक जनतेला सामोरे जावे लागते. तशातूनच तलावांचे संवर्धन आणि त्यांची स्वच्छता या बाबतीत स्थानिक जनसमूह आणखीच उदासीन झाले. त्या पार्श्वभूमीवर, जलाशय जपावे यासाठी त्या-त्या जलाशयाभोवती सरोवर संवर्धिनी संस्था तयार होणे गरजेचे आहे. त्या कार्यामध्ये संबंधित लोकसमूह अंतर्भूत व्हावेत अशी अपेक्षा आहे.
उदयपूर झील संरक्षक कमिटी
लोक जलाशयावर विविध कारणांसाठी अवलंबून असतात – जसे, की सिंचन, मत्स्योत्पादन, दुग्धपालन, धोबी व्यवसाय, शेती इत्यादी. त्याशिवाय पर्यटन, मनोरंजन, जलजीवनाचा अभ्यास या कारणांसाठीदेखील तलाव महत्त्वाचे असतात. प्रशासकीय अधिकारी, स्थानिक पुढारी/कार्यकर्ते, समाजसेवी संस्था इत्यादींचे प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात त्या जलाशयाच्या संवर्धिनीचे सदस्य बनू शकतील. तशा नोंदणी झालेल्या संस्था त्या-त्या जलाशयाच्या कृती आराखड्याच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील. लोकांमध्ये जलाशयाबाबत जनजागृती करणे हा कृती-आराखड्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. तशा संस्था तलावाच्या व्यवस्थापनासंबंधी अनेकविध उपक्रमही राबवू शकतात. उदाहरण म्हणून भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या कामाचा उल्लेख करता येईल.
इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅक्वेटिक बायोलॉजिस्ट ही संघटना जागतिक जलसहभागिता(Global Water Partnership) या संघटनेची सदस्य आहे. संघटनेचे उद्दिष्ट सरोवरांचे जल गुणवत्ता व्यवस्थापनकरणे हे आहे. त्यामुळे इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅक्वेटिक बायोलॉजिस्टच्या माध्यमातून सरोवरांच्या व्यवस्थापनासाठी सरोवर संवर्धिनीचे प्रारुप तयार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सरोवरीय पर्यावरण समिती (जपान) या समितीनेही सरोवर संवर्धिनीच्या उद्दिष्टांना पाठिंबा दिलेला आहे. South Asia Network of Lakes and Reservoirs (SASNET-L&R) यांचेदेखील उद्दिष्ट पूरक आहे. भारताचे सुधारित राष्ट्रीय जल धोरण-2002 नुसार देशातील जलसंपत्तीची जपणूक करण्यासाठी योग्य अशा संघटनात्मक संरचना उभारल्या जाव्यात असे अपेक्षित आहे. जलसंपत्ती संदर्भातील योजना आखणी आणि व्यवस्थापन यामध्ये अनेकविध शाखांचे, विविध स्तरांवरील लोक, त्यांच्या संस्था व संघटना यांना सामावून घ्यावे असेही धोरणात नमूद आहे. अशा तऱ्हेने आपल्या गावातील सरोवराचे रक्षण करता यावे यास अनुकूल वातावरण देशामध्ये उपलब्ध आहे. त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे असे आवर्जून सांगावेसे वाटते.
विद्यार्थ्यांना सरोवर संवर्धिनीविषयी माहिती देताना
सरोवर संवर्धिनी संस्थांना काम करता येईल असे उदाहरणादाखल काही उपक्रम सुचवत आहे –
१. जलाशयाच्या माहितीचे संकलन करणे. त्यात त्याचा इतिहास, पाण्याची गुणवत्ता, भूरचना, जैवविविधता, तेथील पर्जन्यमान, त्यावर आर्थिकदृष्ट्या विसंबून असणारे विविध घटक, त्यांचे प्रकार इत्यादी तपशील जमा करणे.
२. पर्यटनवाढीसाठी आवश्यक असणारे उद्बोधन, त्यायोगे वाढणारी आर्थिक तरतूद …
३. त्याची माहितीपुस्तिका, पत्रके प्रकाशित करणे. त्यायोगे जलाशयाची माहिती सर्वदूर जाऊन प्रचार होईल.
४. जलाशयांची संकेतस्थळे बनवणे- त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासकांना माहिती त्वरित उपलब्ध होईल.
५. तलावाभोवती जत्रा, जलदिंडी उत्सव इत्यादी आयोजित करणे.
६. अभ्यासकांना जलाशयांच्या शास्त्रीय अभ्यासास उद्युक्त करणे.
७. विद्यार्थ्यांच्या अभ्याससहली काढणे. त्यांना तलावाची रचना आरेखित करणे, पाणीपरीक्षण, शेवाळ व प्लवक यांचे नमुने इत्यादी गोष्टी अभ्यासण्यास देणे.
८. तलावात सांडपाणी, प्रदूषके इत्यादी हानिकारक गोष्टींचा प्रादुर्भाव होत असल्यास त्यासाठी उपाययोजना करणे, इत्यादी.
९. अनेक वेळा हे जलसाठे एकापेक्षा अधिक विभागांच्या अखत्यारीखाली येत असतात. (उदाहरणार्थ – वनविभाग, पुरातत्त्व खाते, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी) या सर्वांमध्ये जलाशयांच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रशासकीय एकवाक्यता असणे अत्यंत गरजेचे आहे.
१०. जलाशयांचे नैसर्गिक स्वास्थ कायम राहील यासाठी आवश्यक असे उपाययोजना करण्यासाठी वरील नमूद केलेल्या सर्वांमध्ये सहबंध निर्माण झाल्यास आर्थिक तरतुदीचा प्रश्न सुटेल.
ही यादी कार्यकर्ते त्यांची सृजनशीलता आणि उपक्रमनिष्ठा यांवर आधारित, वाटेल तेवढी वाढवू शकतात. या प्रकारे काम करणाऱ्या अनेक सरोवर संवर्धिनींचे जाळे भारत देशात आणि आशिया खंडात पसरू शकेल. त्यांचा उद्देश हा त्या त्या ठिकाणच्या जलाशयांचे संवर्धन करणे हाच असेल. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, लोकसंस्कृती – लोकपरंपरा, शास्त्रीय अभ्यासाची सोय; तसेच, जनसामान्यांची इच्छाशक्ती आणि जलाशयांबद्दलची आपुलकी यांवरच सरोवर संवर्धिनी संस्थांची वाढ न विकास अवलंबून आहे.
 सरोवर संवर्धिनीचे काम हे दोन प्रकारांमध्ये ढोबळ मानाने विभागले जाईल: १. जलाशयाच्या व्यवस्थापनविषयक तांत्रिक, कायदेशीर व सामाजिक बाजू. २. जलाशयावर प्रत्यक्षपणे अवलंबून असणारे लाभधारक. ते त्यांच्या कृतिपूर्ण सहकार्याने तलाव राखतील. काळाच्या ओघात लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ, शहरीकरण आणि औद्योगिकरण यांमुळे पूर्वीच्या जलसंवर्धनाच्या समृद्ध लोकपरंपरेस खीळ बसली आहे. परिणामतः भारतातील सरोवर, नद्या, तळी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या उपयोजनाच्या आणि जागतिकीकरणाच्या बदलत्या संदर्भात जलस्रोतांच्या संवर्धनाचा विचारही नव्या दृष्टिकोनातून करण्यास हवा, तरच जलस्रोत टिकवून ठेवणे शक्य होईल.
क्षमा खोब्रागडे 9822294639
kshama.earth@gmail.com
क्षमा खोब्रागडे या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात उपप्राचार्य आणि पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख आहेत. त्यांनी एकशेसहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे; शोधनिबंधाचे वाचन केले आहे. त्यासाठी त्यांनी चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, कॅनडा या देशांचा प्रवास केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पीएच डी व एक एम फील अशा सात विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे. त्या लोणार सरोवराच्या जलगुणवत्तेचा अभ्यास गेल्या दोन दशकांपासून करत आहेत. त्यांनी लोणारसंबंधी मांडणी आंतरराष्ट्रीय सरोवरीय पर्यावरण समितीच्या (International Lake Environment Committee, Japan) व्यासपीठावर सातत्याने केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील गोदावरी नदीत आढळणाऱ्या प्राणी प्लवकांच्या डीएनए बारकोडिंबाबत संशोधन केले आहे. औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन, जैव वैद्यकीय कचरा, औद्योगिकीकरणामुळे जलस्रोतांवरील दुष्परिणाम, जायकवाडी नाथसागर सरोवराचे पाणथळ क्षेत्र या विषयांतील त्यांचा अभ्यास प्रसिद्ध आहे. त्यांनी इंडियन असोसिएशन ऑफ अॅक्वटिक बायोलॉजिस्ट, भारतीय जलसंस्कृती मंडळ, जलदूत, निसर्ग मित्र मंडळ, अंनिस (महाराष्ट्र) या संघटनांकरताही काम केले आहे.
——————————————————————————————————-
 
नौशाद अली संवर्धिनीचे उद्घाटन करताना          
 

 

 

 

 
————————————————————————————————————–

About Post Author

6 COMMENTS

  1. क्षमा खोब्रागडे यांनी जलसंपत्तीचे संरक्षण नि संवर्धन याविषयी सुरेख आढावा घेतला आहे .

  2. डॉ. खोब्रागडे मॅडम यांनी लेखातील मांडलेल्या उपाय योजना वास्तविक स्वरूपाच्या आहेत. प्रशासन आणि शासन यांनी लोकसहभागातून सरोवरांचे संवर्धन करण्याची गरज आहे. लेखातील मुद्दे मार्गदशर्क असे आहेत.

  3. लेख माहितीपूर्ण.आणि उपक्रमशिलतेला वाव देणारा आहे.मात्र या सर्व अभ्यासात गाव पातळीवरील पाणी वाटपात जातसंस्थेचा होणारा हस्तक्षेप.नदीवरची वर्णश्रेणी विभागणी यावरही बोललं गेलं पाहिजे.आपण सध्या ती व्यवस्था स्विकारलीय व जोपर्यंत तिथे वाद होत नाही तोपर्यंत नदीचा काठ सर्वांचा अशा गोड समजूतीत राहतो.पाणी,तलाव,नद्या,विहिरी यांचे सोशल आॅडिट ही झाले पाहिजे.बाकी कार्यास शुभेच्छा!

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here