सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता

0
23

मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला आहे. ही संस्था समाजाचे ऋण जाणून ‘मातृपूजन व मातृशक्ती जागरण समारंभ’ (सामाजिक कृतज्ञता सोहळा) दरवर्षी घडवून आणते. याही वर्षी तो मुंबईत दादर येथील महात्मा फुले कन्याशाळेतील हॉलमध्ये झाला. ‘सैनिक भारती ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ च्या संस्थापक व अध्यक्ष वीरपत्‍नी श्रीमती प्रतिमा राव आणि नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचा गौरव यावर्षी करण्यात आला.  इंगोले देहविक्रय करणार्‍या स्त्रियांचे व त्यांच्या मुलांचे पुनर्वसन व त्यांच्या भविष्यासाठी तरतूद या प्रकारचे कार्य गेली दोन दशके करत आहेत. डॉ. स्नेहलता देशमुख समारंभाच्या अध्यक्ष होत्या

प्रतिमा राव या ‘घास अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ हे शब्दश: खरे ठरवून, सैनिक व त्यांच्या कुटुंबांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याकरता उभ्या ठाकल्या आहेत. त्यांनी सांगितले, की सैनिकांना, त्यांच्या विधवा पत्‍नींना ‘जिल्हा सैनिक कल्याण केंद्र’ असूनदेखील योग्य ती मदत योग्य वेळी मिळत नाही. पतिनिधनानंतर मलासुद्धा सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या सोयीसुविधा मिळवताना वाईट अनुभव आले. आपल्यासारख्या शेकडो कुटुंबांची तशीच अवस्था असल्याचे लक्षात आले. मग त्यांच्यासाठी आपणच लढले पाहिजे असा विचार मनात आला आणि तो कृतीत उतरवण्यासाठी ‘सैनिक भारती ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ या संस्थेची उभारणी केली.
 

या संस्थेच्या माध्यमातून सैनिकांचे विविध प्रश्न सोडवले जातात. त्यांतील महत्त्वाचा प्रश्न मालमत्ता करमाफीचा. देशातील अठरा राज्यांत आजी-माजी सैनिक आणि पत्‍नी यांच्या नावांवरील घरांना मालमत्ता कर माफ केला जातो. महाराष्ट्रात तो निर्णय कागदावर होता, पण ‘सैनिक भारती’ या पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पाक्षिकाने पाठपुरावा केल्यानंतर ठाणे, नवी मुंबई, पुणे, अहमदनगर येथील महापालिकांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे.
 

प्रत्येक महापालिकेत पाठपुरावा करण्यापेक्षा राज्य सरकारकडून यासाठी आदेश काढून या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ठोस पावले उचलावीत अशा प्रयत्‍नात आम्ही आहोत आणि त्याला लवकरच यश येईल असा विश्वास राव यांनी व्यक्त केला.
 

त्या म्हणाल्या की माजी सैनिकांना घर आहे की नाही? याची जाणीव शासनाला नाही. मी त्यांच्यासाठी लढते. मुंबईच्या उपनगरातील चेंबूर येथील एका माजी सैनिकाने चार वर्षे मेणबत्तीच्या प्रकाशात काढली. कारण काय तर त्याचा शेजारी गुंड होता व तो कॉंग्रेसचा होता! शेवटी, त्या माजी सैनिकाने स्वतंत्र ‘मीटर बोर्ड’ बसवला. सैनिक कल्याण बोर्डांने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. इतर राज्यांत सैनिकांना शून्य पर्सेंट वॅट आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात मात्र तो आठ टक्के आहे.
 

सैनिकाची चाळिसाव्या वर्षी सेवेतून मुक्तता होते. नंतर त्याला स्वत:ला किंवा त्याच्या मुलांना शिक्षणासाठी सर्टिफिकेटची आवश्यकता भासते. ते सैनिक बोर्डाकडे जातात. तिथे त्यांना ‘आता इथं पंधरा वर्षे राहा, मग सर्टिफिकेट मिळेल’ असे सांगण्यात येते! सैनिकांना अपमानास्पद वागणूक देणे हा गुन्हा असला तरी त्यांचा अवमानच केला जातो असे प्रतिमा राव यांनी सखेद सांगितले.
 

दुसरे गौरवांकित रामभाऊ इंगोले यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना त्यांच्यापासून समाजसेवेचे बाळकडू मिळाले. नागपूरमधील ‘गंगा-जमुना’ ही वेश्यावस्ती हटवण्यासाठी नागरिकांनी १९८० साली चळवळ सुरू केली, तेव्हा रामभाऊंनी त्या विरुद्ध वेश्या व त्यांच्या मुलांसाठी जिवाचे रान केले. समाजात त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून काम केले. आता, त्यांचे कार्य नागरपूरपुरते मर्यादित राहिलेले नाही तर ते अमरावती, अकोला, सुरत या ठिकाणीसुद्धा पसरले आहे. त्यांना दीनदयाळ पुरस्कार, सह्याद्रीचा हिरकणी पुरस्कार मिळाले आहेत. ‘वारांगनांच्या मुलांचा आभाळाएवढा बाप’ म्हणून ते ओळखले जातात. अरूण नलावडे यांनी त्यांच्यावर चित्रपट तयार केला आहे.
 

इंगोले म्हणाले, की मला ‘दादा’, ‘भाई’ म्हणून तसेच ‘भाऊ’, ‘मामा’ म्हणून, असे दोन्ही प्रकारचे अनुभव समाजाकडून आलेले आहेत. मी जांबुवंतराव धोटे या विदर्भातील नेत्याचा जबरदस्त फॅन होतो. पुढे, मी त्यांचा जवळचा कार्यकर्ता झालो. नागपूरमध्ये ‘गंगा-जमना’ नावाचा वेश्याचा मोठा विभाग आहे. वस्तुत: तो भाग शहराच्या बाहेर आहे.  परंतु गाव वाढत गेले तेव्हा तो भाग मध्यवस्तीत येऊ लागला. नागरिकांनी वेश्यांना तेथून हाकलून देण्याबाबत आंदोलन १९८० साली सुरू केले. जांबुवंतरावांनी या आंदोलनाकडे लक्ष दिले. त्यांचे म्हणणे असे होते, की या स्त्रियांना येथून हाकलून दिले तर त्या इतर ठिकाणी विभागल्या जातील. अशा विखुरलेल्या स्त्रिया ज्या वस्तीत जातील तेथील ‘समाजस्वास्थ्य़ बिघडेल’, तेव्हा त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत. परंतु त्यांचे धोरण म्हणजे ‘ऐक नाहीतर झोडप’ असे असायचे. त्यांनी मध्यमवर्गीय लोकांच्या आंदोलनाविरुद्ध ‘गंगा-जमना बचाव’ हे प्रतिआंदोलन छेडले. हे आंदोलन पंचेचाळीस-सत्तेचाळीस दिवस चालले. त्यावेळी ए. आर अंतुले मुख्यमंत्री होते. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून चांगली योजना सुचवण्यास सांगितले. मुंबईतील प्रमोद नवलकर या माणसाचा या क्षेत्रातील (वेश्यावस्ती पुनर्वसन) अभ्यास दांडगा होता. त्यांना यासाठी आमंत्रित केले गेले. वेश्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय असावी वगैरेसारख्या सूचना, ठराव पुढे आले. त्यातून मी या कार्यात गुंतला गेलो. नंतर ध्यानात आले, की प्रश्न व्यापक आहे. शहरवस्ती वाढत जाते तसा गावागावात हा प्रश्न तयार होतो. बहुतकरून वेशावस्त्या, दलित-वंचितांच्या वस्त्या या शहरांच्या मध्यभागी आल्या आहेत. त्यामुळे बिल्डर लोकांची वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळली आहे. त्याच कारणाने १९८७ साली ‘सुरत’मध्ये आंदोलन केले. ते आंदोलन तीन महिने लढवले. त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. ते ‘सुरत’मध्ये येणार होते. त्या वेळेस मी त्यांना तिथे पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर, तीन दिवसांनी आंदोलन यशस्वी झाले.
 

त्यांनी पुढे सांगितले, की वेश्यांच्या मुलींनी या व्यवसायात जाऊ नये. त्यांना जगण्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्‍नशील असतो. मी १९९२ साली वेश्यांची चार मुले घरी आणली. हेतू हा की त्यांना कौटुंबिक वातावरण मिळावे. कारण वसतिगृहात टाकलेल्या मुलांमध्ये, त्यांचा वर्षभर फॉलोअप घेतला, पण काही बदल जाणवत नाही. घरी आलेल्यांपैकी एकाने दहावीमध्ये चौसष्ट टक्के मार्क मिळवले. मित्रांनी माझ्या आर्थिक गरजा भागवल्या. मी मित्रांना सांगतो, की ‘माझ्या मुलां’चे नातेवाईक व्हा!
 

मी या मुलाना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडवस्त्या आहेत, तेथील लोकांचे जीवन व चांगले लोक राहतात ते इमारतींचे, बंगल्यातील जग दाखवले व त्यांना, तुम्हाला यांच्यासारखे व्हायचे ना असे विचारून प्रयोग सुरू केले. झोपडवस्तीतल्या मुलांच्या अंगावर कपडे नव्हते, त्यांना ते देण्यासाठी ‘जुने कपडे गोळा करून देऊया का?’ असे त्या मुलांना सुचवले. म्हटले, मी कपडे मिळवून देतो! असे म्हणताच ती मुले लगेच तयार झाली. पण यामध्ये तुमचे काँट्रिब्युशन काय? असेही मी त्यांना विचारले आणि त्यांना सांगितले, की, तुम्ही हे कपडे स्वच्छ धुऊन, ते फाटले असतील तर शिलाई मारून, बटणे वगैरे लावून द्या, तर तुमचे योगदान घडेल. ते त्यांना पटले. वारांगनांची ही मुले अशी समाजोपयोगी कामे करू लागली!
 

नागपूरहून पंचवीस किलोमीटर अंतरावर अव्वल दर्जाचे दगड निघणा-या खाणी आहेत. त्या सुमारे एकशेचार आहेत. छत्तीसगड, ओरिसा, मध्यप्रदेश अशा मागसवर्गीय राज्यांतून तेथे मजूर येतात ते पिढ्यान् पिढ्या अशिक्षित असतात. मी माझ्या मुलांना त्या मजुरांची मुले दाखवली. ती मुले गाजरगवताचे झुडुप घेऊन बिळांतले उंदीर पकडायची. बाजूलाच जाळ (विस्तव) करून उंदीर भाजून खायची. त्यांना शिक्षण नाही म्हणून माझ्या मुलांनी २००१ साली ‘सण्डे स्कूल’ सुरू केले. पण आऊटपूट काही नाही! म्हणून मी ती शाळा बंद करण्यास सांगितले. त्या मुलांना रोज फक्त दोन तास शिकवणे जरुरीचे आहे. म्हणून दुपारी दोन ते पाच अशी शाळा सुरू केली. आज त्या शाळेला निवासी शाळेचे स्वरूप आले आहे. शाळेत दोनशेपन्नास मुले आहेत. शाळा माझ्या मुली चालवतात. माझ्या मुली ग्रॅज्युएट झाल्या आहेत. एक मुलगी Ph.D. करत आहे. सर्वजण मला या मुलांचा ‘आभाळाएवढा बाप’ म्हणून संबोधतात. पण ही सर्व ईश्वराची कृपा आहे, कारण मला धाकटा भाऊ आहे. त्याचा मी कधी भाऊ, बाप होऊ शकलो नाही! त्याच्या नावावर केस नाही असे नागपूरमध्ये एकही पोलिस स्टेशन नाही. त्यासाठी रोज घरी पोलिस येत असतात!
 

आपणही या माझ्या मुलांचे नातेवाईक व्हा असे आवाहन करून त्यांनी त्यांचे भाषण संपवले.
 

सरस्वतीदेवी शिक्षण संस्था
उज्ज्वला पवार, 9833160224

 

– राजेंद्र शिंदे

About Post Author