सचिन जोशींची Espalier – फास्टर फेणेची खरीखुरी शाळा

1
38
_FasterPhenechi_KharikhuriShala_2.jpg

“मैत्रेयीचे सर ना तिच्याबरोबर खेळतात!” पाचवीतील श्रेया तिला वाटणारे नवल मला सांगत होती. मैत्रेयीचे ते सर म्हणजे नाशिकचे सचिन जोशी. त्यांच्या शाळेचे नाव ‘Espalier exprerimental school’. ‘Espalier’ हा फ्रेंच भाषेतील शब्द. त्याचा अर्थ झाडाला आकार देणे किंवा झाडाची गुणवत्ता वाढवणे असा आहे. ते नाव त्या शाळेचा हेतू स्पष्टपणे व्यक्त करते. सचिन जोशी यांनी त्यांना मराठी शाळेसाठी परवानगी न मिळाल्याने नाशिक येथे सुरू केलेली इंग्रजी माध्यमाची ही शाळा. नाशिककरांच्या बोलण्यात त्या शाळेविषयी सांगताना कुतूहलाच्या जागी कौतुकमिश्रित अभिमान डोकावतो. पूर्व-प्राथमिक ते दहावीपर्यंत एकूण हजारएक मुले त्या शाळेत शिकत आहेत.

सचिन जोशी यांनी गांधी आणि आईन्स्टाईन यांच्या शिक्षणविषयक विचारांना आधारभूत मानून, व्यासंगातून प्रथम स्वतःला आणि मग पालकांना घडवत त्या शाळेची उभारणी केली. त्यांना स्वतःला शालांत परीक्षेत केवळ एकोणचाळीस टक्के गुण मिळाले होते. नंतर, त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.कॉम, एम.पी.एम. टॅक्सेशन लॉ, लेबर लॉ, एम.बी.ए., सी.एस. अशा अनेक पदवी घेतल्या. मात्र त्यांच्या जगण्याला एक अस्वस्थता वेढून राहिली होती. त्यांना शिक्षणाचा पुनर्विचार गरजेचा वाटत होता. त्यांना विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले इत्यादींच्या विचारांमध्ये शिक्षणाची खरी नस सापडली. मग मात्र पुढे नक्की काय करायचे हे स्पष्ट दिसू लागले. तशात त्यांची भेट पु.ग. वैद्य यांसोबत झाली. त्यांचे ‘नापासांची शाळा’ या विषयावर काम सुरू होते. सचिन जोशी त्यात सहभागी झाले. त्यांचा शाम मानव यांच्याशीही परिचय झाला. सचिन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करू लागले. त्यात विचार परिपक्व होत गेले. सचिन यांना श्याम मानव यांच्याकडून बालमानसशास्त्र समजून घेता आले. त्यानंतर त्यांनी अनेक मुलांसोबत संवाद साधला, त्यांचे प्रश्न समजून घेतले.

_FasterPhenechi_KharikhuriShala_6.jpgमग सचिन यांनी स्वतःच शाळा काढण्याचा चंग बांधला आणि पुण्यामध्ये सेनापती बापट रोडवर पासपोर्ट ऑफिसमोर इमारत भाड्याने घेऊन पूर्व-प्राथमिक शाळा 2006 साली काढली. तिचे नाव होते ‘नापासांची शाळा’! सचिनला त्यांच्या वडिलांनी पाठिंबा दिला. ती शाळा दोन वर्षें सुरळीतपणे चालली. सचिन यांना स्वत:च्या नाशिक शहरात शाळा सुरू करायची होती. त्यांनी त्याकरता पुण्यातील शाळा बंद करून नाशिक येथे ‘ग्रीन इंडिया’ ही शाळा 2009 साली सुरू केली. त्यावेळी सचिन यांनी नाशिकमधील पालकांशी संवाद साधला. त्यांच्यासमोरील पहिले आव्हान समाजमान्य चौकटींच्या बाहेर येऊन शिक्षणाचा नव्याने विचार करू शकणारे पालकांना घडवणे असे होते. त्यांनी ते स्वीकारले. मात्र ‘ग्रीन इंडिया’च्या कामकाजात काही अडचणी निर्माण झाल्या आणि सचिन यांना ती शाळा बंद करावी लागली. दरम्यान सचिन यांचा वेगवेगळ्या शिक्षणपद्धतींचा अभ्यास चालू होता. त्यांना महात्मा गांधी यांची ‘नई तालीम’ ही विचारप्रणाली सर्वाधिक पटली. त्यांनी आईन्स्टाईनचे शिक्षणविषयक धोरण अभ्यासले आणि नाशिकमध्ये ‘अनुभवाधारित शिक्षण’ देणारी ‘Espalier experimental school’ ही शाळा 2011 मध्ये सुरू केली.

सचिन जोशींनी शाळेसाठी बायकोचे दागिने विकले, राहते घर गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढले आणि नाशिकमधील ‘मटाले मंगल कार्यालया’च्या पडिक जागेचे नूतनीकरण करून घेतले. पालकांनी सचिनसरांना साथ देण्याचे ठरवत ऐंशी लाखांचा निधी त्यांच्या हाती सुपूर्द केला आणि स्वत:ची मुलेही निर्धास्त मनाने त्यांच्याकडे सोपवली.

मुलांना त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत लेखनापासून मुक्त ठेवायचे असा धाडसी निर्णय घेत ‘Espalier’ दिमाखात सुरू झाली! शाळेतील विद्यार्थी इयत्ता नव्हे तर बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरवत पुस्तके, वर्ग, कठोर शिस्त, दडपण, मार्कांची मोजदाद या सगळ्यांच्या पलीकडे जात कमालीच्या मैत्रीपूर्ण वातावरणात बहरत गेली. आज पूर्व प्राथमिक ते दहावी अशा इयत्तांमधून हजार मुले शाळेत शिक्षण घेत आहेत.

सचिन जोशी पालकांच्या रीतसर सभा घेऊन शैक्षणिक क्रांतीची गरज ठामपणे पटवू लागले. शिक्षणाचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ते प्रयत्नशील आहेत. ते स्वतःच्या अभ्यासातून पालकांना सांगतात, “शिक्षणाच्या केंद्रस्थानी स्मृती नको तर कृती हवी. घोकंपट्टी नको. मुलांच्या प्रतिभेला वाव द्या. चुका करण्याची संधी द्या. त्यांना सेल्फ लर्नर बनवा. मेंदूत कोंबली जाणारी माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. जे आत आहे ते बाहेर काढणे म्हणजे शिक्षण, म्हणजेच ज्ञान. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून काढणे हे शिक्षकांचे आणि पालकांचे काम आहे. माहितीवर आधारित उत्तरे तर गुगलवरही मिळतात. मात्र सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करण्यासाठी शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवा. ज्ञानरचनावाद महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यास हवे. मुलांच्यात समस्या निवारण्याची ताकद निर्माण व्हायला हवी. ती स्वानुभवातून मिळते आणि ते सगळे आपणच करायचे आहे.”

सचिन यांच्या धडपडीचे मूळ त्यांच्यावर झालेल्या कुटुंबाच्या संस्कारांमध्ये आढळते. त्यांचे वडील विलास जोशी सरकारी लेखापरिक्षक. तो कष्टप्रद जीवन जगलेला प्रामाणिक माणूस. त्यांच्या सामाजिक जाणिवांचा प्रभाव सचिनवर पडला. सचिन यांची आई गृहिणी तर त्यांचे दोन्ही भाऊ, विनोद जोशी आणि संदीप जोशी इंजिनियर आहेत. सचिन जोशी मेंदू, शिक्षण आणि मुलांची जडणघडण या विषयाची गुंतागुंत सोप्या पद्धतीने पालकांना समजावून सांगतात. ‘पूर्व-प्राथमिक’मधील विद्यार्थ्यांचे वय मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यांच्या पुढील आयुष्याची दिशा त्या विकासबैठकीवर ठरते. त्यांचे त्या वयातील अनुभव म्हणूनच सकारात्मक हवेत. खरे अनुभव पुस्तकातून नव्हे तर वर्गाबाहेर मिळतात, मैदानावर मिळतात. मुलांना खेळू द्या. वर्गात भीतीचे वातावरण असेल तर मुलांच्या मेंदूची सक्रियता बिघडते. बौद्धिक विकास थांबतो. ते सर्व समजणारे पालक आणि शिक्षक प्रथम घडायला हवेत. मुलांकडे आईवडील आणि शिक्षक जसे बघतील तशी मुले घडतील. सचिन यांनी डी.एड.च्या अभ्यासक्रमात प्रयत्नपूर्वक त्या सर्व बाबींचा समावेश करण्यास लावला आहे.

त्यांचे विचार पालकांनाही अधिकाधिक मानवू लागले आहेत. Espalier च्या पालक डॉ. ज्योती शुक्ल यांची मुलगी दुसरीत गेली आहे. त्या शाळेच्या पालक या नात्याने मुलीच्या ज्युनिअर केजीपासून म्हणजे गेली तीन वर्षें संपर्कात आहेत. आम्ही “सचिन जोशी यांच्याशी कधीही संपर्क साधून मतांची, विचारांची देवाणघेवाण करू शकतो. एखादी गोष्ट पटली नाही तर मोकळेपणी सांगू शकतो.” असे म्हणत त्यांनी Espalier मधील सर्व प्रयोगांचे कौतुक केले. मॉण्टेसरीची तत्त्वे स्वीकारून ‘पूर्व-प्राथमिक’च्या मुलांना घडवताना जी सहजता जोपासावी लागते ती त्या शाळेला सहज साधली आहे. कोठेही कृत्रिमता नाही. ‘स्मॉल’ आणि ‘बिग’मधील फरक दाखवण्यासाठी शाळेत हत्ती आणला गेला आणि शेजारच्या पिंजऱ्यात उंदीर होता. मुले पुस्तकात चित्रे पाहण्याऐवजी मेंढी, गाढव, हत्ती, बेडूक अशा प्राण्यांना प्रत्यक्ष हात लावू शकतात. सचिन जोशी यांचा हातखंडा आहे तो सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना सुचणे आणि त्या साकार करणे यांमध्ये. त्यामुळेच त्यांचे आणि Espalier चे कौतुक जगभरात होत आहे.

_FasterPhenechi_KharikhuriShala_1.jpgशाळेतील मोठ्या मुलांनी पाण्याच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमवून बोट तयार केली आणि गोदावरीत सोडली. सचिन जोशींनीदेखील त्या ‘नोहाच्या नौके’तून मुलांबरोबर सफर केली. मुलांना सूतकताई सातवीच्या अभ्यासक्रमात शिकवली जाते. त्यातून बावन्न-त्रेपन्न मीटर कापड पहिल्या वर्षी तयार झाले. सचिन त्या कापडाचा शर्ट घालून मुलांचे कर्तृत्व अभिमानाने दाखवतात तेव्हा कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. मुलांकडून वेगवेगळे प्रयोग दर महिन्याला तीन याप्रमाणे करून घेण्यात येतात. त्यातून ‘सोलार कार’सारख्या वस्तू त्यातून प्रत्यक्षात उतरल्या आहेत. मुलांचे तशा धडपडीतून स्वतःचे म्युझियम त्यांच्या घरात दोन-तीन वर्षांत तयार होते. मुले कुंभारकाम, सुतारकाम, शिवणकाम, स्वयंपाक अशा कामात गढून जातात आणि वेगळा आत्मविश्वास कमावतात. मुले मातिकाम, मूर्तिकाम, शिल्पकला आनंदाने शिकतात. मुलांना मातीच्या संपर्कात ठेवणे मातीशी नाते राखण्यासाठी महत्त्वाचे असते. शेतीपासून मूर्तीपर्यंतचे प्रयोग मुलांसाठी तेथे राबवले जातात. सचिन जोशी “माझी मुले नाक-डोळे (चेहरे निर्माण करताना) खूप छान करू लागली आहेत” असे अभिमानाने सांगतात.

मुले विद्यार्थी म्हणून घडताना त्या त्या कामांमध्ये आणि कलांमध्ये तज्ज्ञता मिळवतात असे नाही, पण त्यांची वाटचाल योग्य वयात त्या दिशेने सुरू होते. पालकांना आणि शिक्षकांना त्यांचा कल कोठे आहे त्याची पारख करता येते. मुलांच्या ठायी ‘करणाऱ्याला अशक्य काही नाही आणि एकेका विषयाच्या अभ्यासाला एकेक आयुष्यही पुरे पडत नाही’ ही जाणीव रुजते.

शाळांना स्वतःचा अभ्यासक्रम आठवीपर्यंत निवडण्याचे स्वातंत्र्य भारतात आहे. होमी भाभा इन्स्टिट्यूटची पुस्तके या शाळेत आठवीपर्यंत निवडली आहेत. त्यानंतर एस.एस.सी. बोर्डाचा अभ्यासक्रम. सचिन यांच्या मते, बोर्ड नाही तर शिक्षक महत्त्वाचे असतात. आता तर, भारताची वाटचाल ‘एक हिंदुस्तान एक बोर्ड’ या दिशेने होत आहे. सचिन जोशी यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमापैकी दहा टक्के अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडलेला असतो. मुलांची पथनाट्ये बसवली जातात. मुलांना वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना भेटण्यास नेले जाते. मुले तंबाखू निषेध दिनी टपऱ्यावरील गिऱ्हाईकांना गुलाबपुष्प देऊन व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करतात. मुलांनी भूत नसते हे जाणून घेण्यासाठी सचिन जोशींसोबत स्मशानाचा फेरफटका मारला आहे. शाळेनेच विद्यार्थ्याने स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लिहावे अशी पद्धत सुरू केली. स्वतः सचिन जोशीही स्वत:चे नाव ‘सचिन उषा विलास जोशी’ असे लिहितात.

या शाळेतील गॅदरिंग तब्बल चार दिवस चालते. सर्व मुलांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळावी हा त्या मागील हेतू. पालकांचेही स्नेहसंमेलन घेतले जाते. मुलांची बालसभा भरवली जाते. ती सभा खटकलेल्या गोष्टींची तक्रार करण्याचा अधिकार मुलांना देते. मुले परिसरातील समस्या समजून घेतात, त्यासाठी सर्वेक्षण करतात, अभ्यास करतात, रिपोर्ट्स बनवतात.

सचिन जोशी इतर तऱ्हेच्या सामाजिक कार्याशी संलग्न आहेत. लैंगिक अत्याचारांपासून काही मुलींची सुटका, बालविवाह रोखणे ही वानगीदाखल काही उदाहरणे. सचिन जोशी यांचे अलीकडचे दोन परदेश दौरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांचे शिक्षणविषयक व्याख्यान अनेक देशांच्या प्रतिनिधींसमोर झाले. त्यांना युरोपीयन पार्लमेंटमध्ये युरोपीयन कौन्सिल आणि युरोपीयन पार्लमेंट आयोजित ‘World forum for democracy’ या जागतिक लोकशाही परिसंवादासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ‘डिझाईन फॉर द चेंज’ या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट निवडण्यात आले. त्यासाठी सचिनसरांबरोबर विद्यार्थी स्पेनला जाऊन आले.

_FasterPhenechi_KharikhuriShala_3.jpgशाळेचा ‘चाक-शिक्षणाची’ हा उपक्रम जगभर कौतुकाचा ठरला. वस्ती-पाड्यांमधील मुले शाळेत येऊ शकत नाहीत, तर शाळाच त्यांच्यापर्यंत जाईल या कल्पनेतून अद्ययावत यंत्रणेसह एक बस शाळा होऊन नाशिकच्या दोन वस्त्यांमध्ये जाऊ लागली. दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर तेथील विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच जणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य झाले आहे. ‘चाक-शिक्षणाची’ या उपक्रमाची दखल ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड  रेकार्ड’ने पुरस्कार देऊन घेतली आहे.

Espalier शाळेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘एज्युकेशन टुडे’कडून शाळेचा ‘उत्कृष्ट प्राथमिक शाळा’ असा गौरव करण्यात आला आहे. त्याचसोबत ‘ग्लोरिया डिसोझा एक्सलन्स अवार्ड – इनोव्हेशन डे’ हा पुरस्कार शाळेला लाभला आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या हातून Espalier शाळेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आहे.

सचिन जोशी यांनी कोणताही व्यवसाय-नोकरी केली नाही. ‘अंनिस’सोबत सामाजिक कार्यात असताना त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय्य कळून आले आणि त्यांनी शिक्षणविषयक कामात झोकून दिले. त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या डॉक्टर पत्नी प्राजक्ता शेटे-जोशी यांनी स्वत:ची प्रॅक्टीस बंद करून सचिन यांना शाळेच्या कामामध्ये मदत करण्याचा निर्णय घेतला. त्या सध्या Espalier शाळेच्या व्यवस्थापनाचे काम पाहतात. सचिन यांचा मुलगा समर याच शाळेत शिकत आहे.

सचिन जोशी – 9890002258, espaliersachin@gmail.com
Espalier Experimental School,
साईखेडकर हॉस्पिटलसमोर, जुने मटाले मंगल कार्यालय, त्रिमूर्ती चौक, कामतावडे रोड, नाशिक.

– अलका आगरकर रानडे

(पूर्वप्रसिद्धी - दैनिक दिव्य मराठी, रसिक पुरवणी, 3 जून 2018)

About Post Author

1 COMMENT

  1. सचिन सर प्रथम आपणास नमन
    आपले…

    सचिन सर प्रथम आपणास नमन
    आपले काम प्रेरणादायक आहे भारताचेआदर्श नागरिक बनण्यासाठी रचनावीदी असलेच पाहीजे
    मी प्रदीप कुंभार सातारा गेली चार वर्ष हीच पध्दत राबवित आहे आपल्या कामाची माहीती वाचुन व चिञफित पाहुन अधिक प्रेरीत झालो

Comments are closed.