‘सखाराम बाइंडर’: वेगळा अन्वयार्थ

-heading

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक ही अभिजात कलाकृती आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीला त्या नाटकाला हात घालण्याची इच्छा होते. त्यातील सखाराम बाइंडर, लक्ष्मी, चंपा वगैरे पात्रे अजरामर झाली आहेत. त्यांच्या आयुष्यांचा, परस्पर संबंधांचा अन्वयार्थ लावण्याचे काम प्रत्येक पिढीतील प्रतिभावान दिग्दर्शक करत असतो. मुंबईतील जेफ गोल्डबर्ग स्टुडिओतर्फे अलिकडेच ‘सखाराम बाइंडर’चे प्रयोग हिंदीत सादर करण्यात आले. ते प्रयोग अशोक पांडे यांनी दिग्दर्शित केले आहेत. ते स्वत:च ‘सखाराम’ची प्रमुख भूमिका नाटकात करतात.

‘सखाराम बाइंडर’ 1972 साली प्रथम मराठीत मंचित झाले. त्या नाटकामुळे एकच गदारोळ उठला होता. नाटकात चंपाचे पात्र रंगभूमीवर साडी बदलते असे दृश्य आहे. शिवाय सखाराम बाइंडरच्या तोंडी असलेली भाषा उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय संवेदनशीलतेला मानवणारी नव्हती. जोडीला सखारामचे जगावेगळे जीवनविषयक तत्त्वज्ञानसुद्धा मराठी संवेदनशीलतेला आव्हान देत होते. ‘सखाराम’ अशा वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरला व त्याने इतिहास घडवला. तेव्हा लेखकाच्या आविष्कार स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यात एक मुद्दा सुप्त दडलेला होता- तो म्हणजे नाटककाराने ‘सखाराम बाइंडर’ हा जातीने ब्राह्मण दाखवला होता.

‘सखाराम बाइंडर’ नाटकाची, खास करून त्यातील सखाराम, चंपा वगैरे पात्रांच्या प्रतिमा निदान मराठी रसिकांच्या मनांत स्थिरावली आहे. अशोक पांडे यांनी त्या प्रतिमेमध्ये विचार करण्यास लावतील असे नवे रंग भरले आहेत. मी निळू फुले, लालन सारंग यांनी सादर केलेल्या मूळ ‘सखाराम’चे चार-पाच प्रयोग बघितले आहेत. मुंबईतीलच नाट्यकर्मी ओम कटारे यांनी हिंदीत सादर केलेला ‘सखाराम’ बघण्याची संधीही मला मिळाली आहे. परिणामी, माझ्याही मनात ‘सखाराम बाइंडर’ नाटकातील पात्रांच्या प्रतिमा रूढ झालेल्या होत्या. त्यात सखारामची वासना, त्याचा (आजही) पचनी पडण्यास अवघड असा प्रामाणिकपणा व रोकडा व्यवहार, चंपाच्या व्यक्तिमत्त्वात असलेली कामुकता, लक्ष्मीचे पारंपरिक हिंदू स्त्रीचे संस्कार प्रमाण मानून जगणे वगैरे प्रतिमा माझ्या मनात गडद होत्या. अशोक पांडे यांनी दिग्दर्शित व अभिनित केलेला ‘सखाराम बाइंडर’ बघून त्या प्रतिमांना तडा गेला.

अशोक पांडे यांच्या नाटकातील सखाराम 2019 मधील आहे. त्याच्याजवळ मोबाईल फोन आहे. मात्र नाटकात त्याने त्याचा फारसा वापर केलेला नाही. त्याच्या घराचा सेट मात्र जुन्या काळाला शोभेल असे नेपथ्य वापरून उभा केला आहे. नाटकाची सुरुवात सखाराम आणि लक्ष्मी यांच्या आगमनाने होते. सखाराम त्याची जगण्याची व काम करण्याची पद्धत तिला व पर्यायाने प्रेक्षकांना समजावून सांगतो. एवढेच नव्हे, तर शेजारच्या कपाटातून चक्क एक करारपत्र काढतो व त्यावर लक्ष्मीला स्वाक्षरी करण्यास लावतो. हे नवीन आहे. मूळ संहितेत सखाराम फक्त बोलतो, लेखी करार करत नाही. त्यामुळे नाटक २०१९ मधील वाटते; समाजात ‘विवाहपूर्व करार’ वगैरेची चर्चा सुरू झाली आहेच.

नाटक नेहमीच्या कथानकानुसार पुढे सरकते. सखारामचा मित्र दाऊद येतो. लक्ष्मी त्याला गणपतीची आरती करू देत नाही. परिणामी, कमालीचा चिडलेला सखाराम तिला बेदम मारतो. सखारामचा निधर्मी दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर येतो. हळुहळू सखारामला वाटू लागते, की लक्ष्मीच्या डोक्यावर परिणाम झालेला असावा. ती ज्या आत्मीयतेने मुंगळ्यांशी लाडे लाडे बोलते त्यावरून सखारामसह प्रेक्षकांनासुद्धा तसा संशय येतो. तेंडुलकर यांचे नाटककार म्हणून मोठेपण येथे ठसते. त्यांनी तशा प्रसंगांतून लक्ष्मीचे पात्र ठसठशीत केले आहे. यथावकाश सखारामला लक्ष्मीचा कंटाळा येऊ लागतो व त्रास होऊ लागतो व तो तिला घराबाहेर काढतो. अद्याप जगाचा फारसा अनुभव नसलेली लक्ष्मीसुद्धा घरातून जायला तयार होते व जातेसुद्धा. सखारामच्या घरात पुन्हा एकदा व्हेकन्सी निर्माण होते, ती चंपा भरून काढते.

नाटकाच्या त्या टप्प्यापर्यंत दिग्दर्शकाने फारसे बदल केलेले नाहीत किंवा जे केले आहेत ते फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत (उदाहरणार्थ मोबार्इल वगैरे सखारामच्या हातात दाखवणे). त्यांनी काही प्रसंग का गाळले हे मात्र समजत नाही. उदाहरणार्थ, मूळ नाटकात एका प्रसंगी लक्ष्मी असताना सखाराम मृदंग वाजवतो. त्यातून रंगमंचावर एक वेगळे पवित्र, आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर नंतरचा धिंगाणा जबरदस्त परिणाम करतो. अशोक पांडे यांनी सादर केलेली चंपा खूप वेगळी आहे. एक तर, ती ज्या तऱ्हेने व ज्या पोशाखात रंगमंचावर येते ते बघता ती गरीब घरातील असेल असे वाटत नाही. ती तिने परिधान केलेला स्लीव्हलेस ब्लाऊज, लावलेला काळा गॉगल, बेंबीखाली नेसलेली साडी, लालभडक लिपस्टिक वगैरेमुळे एक बाजारबसवी वाटते. लालन सारंग यांनी साकारलेली चंपा अशिक्षित, गरीब घरातील स्त्री वाटायची. सखारामने तोपर्यंत घरात आणलेल्या स्त्रियांपैकीच एक, पण जरा भडक व कडक असे वाटायचे. मात्र, अशोक पांडे यांनी सादर केलेल्या चंपाबद्दल माझा आक्षेप नाही.

नाटक तेथून पुढे वेगळया प्रकारे विकसित होते. चंपा सखारामच्या सततच्या सांगण्यानुसार त्याला शरीरसुख देण्यास तयार होते, पण भरपूर मद्यपान केल्यावरच त्यानंतरच्या संवादांतून आणि सखाराम/चंपा यांच्या देहबोलीतून प्रेक्षकांना जाणवते, की या दोघांना एकमेकांपासून अभूतपूर्व शरीरसुख मिळाले आहे. सखारामला बायका आडव्या करण्याची सवय असली तरी त्या सर्व परित्यक्ता होत्या. त्यांच्यासाठी सखारामला शरीरसुख देणे हा त्यांच्यातील कराराचा महत्त्वाचा भाग होता. आता, सखारामने आणलेली चंपा खूप वेगळी आहे – नवऱ्याने चंपाला सोडलेले नसते तर चंपाने नवऱ्याला सोडलेले असते, हा महत्त्वाचा फरक येथे लक्षात घ्यायला हवा. त्याचा संदर्भ पुढे येतो, त्यामुळे नाटकाच्या आशयात बदल होतो.

सखाराम-चंपा यांचे जीवन आनंदात सुरू होते. सखारामला तसे अभूतपूर्व शरीरसुख आधी कधीही मिळालेले नसल्यामुळे तो चंपाचा जवळजवळ गुलाम होतो. तिच्यापायी त्याची नोकरी जाते, शेजारीपाजारी त्याला टोमणे मारू लागतात, दाऊदसारखा मित्र दुरावतो. पण सखाराम पर्वा करत नाही. तो त्याच्याच मस्तीत जगत असतो आणि अशात लक्ष्मी परत येते!

घरकामाचा कंटाळा असणाऱ्या चतुर चंपाला लक्ष्मीचे येणे फायद्याचे वाटते. ती सखारामला लाडीगोडी लावून लक्ष्मीलापण घरात ठेवून घेते. लक्ष्मीसारख्या पारंपरिक संस्कार प्रमाण मानणाऱ्या स्त्रीला सखाराम-चंपा यांच्यातील बेभान करणारा शृंगार सहन होत नाही. शिवाय, तिच्या येण्यामुळे सखारामच्या मनावरही वेगळ्या प्रकारचा ताण येतो. तो चंपाला आधीसारखे जबरदस्त शरीरसुख देऊ शकत नाही, ज्याची चटक एव्हाना चंपाला लागलेली असते. ती त्या सुखासाठी दाऊदकडे जाऊ लागते. लक्ष्मीच्या विश्वात हा बदफैलीपणा असतो, फसवणूक असते. त्याच दरम्यान, चंपाचा नवरा नाटकात अवतीर्ण होतो व नाटकाला वेगळेच परिमाण प्राप्त होते. अशोक पांडे यांनी त्या पात्राच्या अन्वयार्थात बदल केले नसले तरी चंपाचा हा नवरा अभिनयाच्या पातळीवर फार उजवा वाटतो.

अशोक पांडे यांनी चंपा वेगळ्या प्रकारे सादर केली आहे. ते सर्वच विचार करण्यासारखे आहे. तेंडुलकर यांची चंपा शरीरसुखाबद्दल किळस बाळगणारी आहे. एका प्रसंगी, ती सखारामला चोख सांगते, की ‘मला बिघडवू नको सांगते. मला तसलं काय आवडत नाही, ते बाई-पुरुषातलं’. पांडे यांची चंपासुद्धा सुरुवातीला शरीरसुखाबद्दल नाराज असते, पण सखारामच्या सहवासात तिलासुद्धा त्यातील आनंद अनुभवण्यास मिळतो. नंतर नंतर तर तीसुद्धा त्या सुखाला आतुर झालेली दिसते.

तशा स्थितीत लक्ष्मी सखारामला फितवते. ती त्याला चंपाच्या बदफैलीपणाबद्दल व तिच्या दाऊदशी असलेल्या संबंधांबद्दल सांगते. चिडलेला सखाराम रागाच्या भरात चंपाचा खून करतो. लक्ष्मी सखारामला धीर देते व तिचे प्रेत पुरून टाकण्यास सांगते. तेंडुलकर यांचे नाटक संपते, तेव्हा रंगमंचावर सखाराम चंपाचे प्रेत गाडण्यासाठी खड्डा खणत असतो व लक्ष्मी त्याला मदत करत असते. पांडे यांच्या नाटकात तो प्रसंग नाही. त्याऐवजी नाटकात चंपाचा कायमचा काटा निघाल्याबद्दल खूश झालेली लक्ष्मी दिसते व नंतर तिच्या अंगात देवी संचारली असा प्रसंग आहे. तेथे नाटक संपते.

तो शेवट जास्त अर्थपूर्ण आहे असे एकदा मला वाटले. चंपाचा खून केल्यावर सखारामची मिजास पूर्णपणे उतरलेली असते. सखाराम चंपाला अपेक्षित असे सुख देऊ शकत नाही म्हणून ती दाऊदकडे जाते हा धक्का तो पचवू शकत नाही. त्याने असा धक्का आजपर्यंत वापरलेल्या बायकांपैकी एकीनेही त्याला दिलेला नसतो. म्हणून चंपाचा खून करण्याअगोदर सखाराम पराभूत झालेला असतो. पण पांडे यांनी लक्ष्मीवर नाटक संपवले तिच्या अंगात देवी आलेली दाखवून, तिला हर्षवायू झालेला दाखवून केलेला तो शेवट, जास्त समर्पक वाटतो.

नाटकात अशोक पांडे (सखाराम), सुश्री श्रेया मिश्रा (लक्ष्मी), शोनाली नागराणी (चंपा), हसित शहा (दाऊद) आणि अनिल मिश्रा (चंपाचा नवरा) यांच्या भूमिका आहेत. त्यांतील प्रत्येकाने कमालीच्या तन्मयतेने त्यांच्या भूमिका वठवल्या आहेत. तरीही लक्ष्मीच्या भूमिकेतील सुश्री व चंपाच्या नवऱ्याची भूमिका करणाऱ्या अनिल मिश्रा यांचा उल्लेख खास करावा लागेल. सुश्री लक्ष्मीतील आमूलाग्र बदल फार सहजतेने व्यक्त करते. विशेषतः शेवटच्या प्रसंगात तर तिने कमाल केली आहे. अनिल मिश्रा यांनी चंपाच्या लोचट आणि लाचार नवऱ्याच्या छोट्याशा भूमिकेचे अक्षरशः सोने केले आहे. मूळ प्रयोगात बघितलेला फौजदार शिंदे आणि अनिल मिश्राने साकार केलेला फौजदार शिंदे फार वेगवेगळे आहेत.

‘सखाराम बाइंडर’सारख्या आधुनिक अभिजात नाटकाचे सतत वेगवेगळे अन्वयार्थ लावणे व त्यानुसार नाटक सादर करणे हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण आहे.

अविनाश कोल्हे 
nashkohl@gmail.com
(‘अक्षरनामा’ वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

About Post Author

Previous articleसाहित्याची लोकनीती
Next articleमी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर
अविनाश कोल्हे हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून एप्रिल 2017 मध्ये मुंबईच्या डी.जी. रूपारेल महाविद्यालयातून निवृत्त झाले. सध्या ते ‘चीनमधील मुस्लिम समाजातील अलगतेची भावना’ या विषयावर पीएच डी पदवीसाठी संशोधन करत आहेत. त्यांनी ‘साप्ताहिक माणूस’च्या काही काळ संपादनासह अनेक दिवाळी अंकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांचे चरित्र’ आणि ‘भारताची फाळणी’ ही दोन पुस्तके भाषांतरित केली असून, गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्रही लिहिले आहे. 2016 मध्ये त्यांचा ‘रंगदेवतेचे आंग्लरूप : मुंबईतील अमराठी रंगभूमी’ हा इंग्रजी व हिंदी नाटकांच्या परीक्षणांचा संग्रह आणि 2017 मध्ये ‘सेकंड इनिंग’ हा दोन दीर्घकथांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांची ‘चौकट वाटोळी’ ही पहिलीच कादंबरी आहे. लेखकाचा दूरध्वनी 989 210 3880