संस्कृत विश्वकोश-डेक्कन कॉलेज

0
32

डेक्कन कॉलेजमध्ये गेली साठ वर्षे एका एनसायक्लोपीडियाचे
काम चालू आहे आणि पुढील पन्नास वर्षे तरी चालणार आहे
– प्रत्येक भारतीय माणसाला अभिमान वाटेल असे बुद्धीचे
काम पुण्याच्या भूमीत चालू आहे…


सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र

संस्कृत विश्वकोशडेक्कन कॉलेजचे,पुण्याचे भूषण !

– जयश्री साठे

डेक्कन कॉलेज, पुणे येथील संस्कृत व भाषाशास्त्र विभागातर्फे फार मोठा प्रकल्प १९४८ साली हाती घेण्यात आला. An encyclopedic dictionary of Sanskrit on historical principles अर्थात ‘विश्वकोशाच्या स्वरूपाचा ऐतिहासिक तत्त्वांवर आधारलेला संस्कृत इंग्रजी शब्दकोश’ असे या प्रकल्पाचे पूर्ण नाव आहे.

या कोशाचे पहिले प्रधान संपादक डॉ. सु. मं. कत्रे यांनी १९४८ साली पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत या प्रकल्पाविषयी जाहीर निवेदन केले. प्रथम हा प्रकल्प शिलालेख व व्याकरणातील ग्रंथांपुरता मर्यादित ठेवावा अशी कल्पना होती. मात्र नंतर पूर्ण संस्कृत वाङ्मयाचा (वैदिक आणि अभिजात) समावेश या कोशात करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा या कोशाला फार मोठे स्वरूप प्राप्त झाले. जगभरातल्या संस्कृतज्ञांचे अभिप्राय, मते व सूचना मागवून कोशाच्या स्वरूपाचा निश्चित निर्णय घेण्यात आला. कोशाच्या कामाची सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंतच्या कामाचे चार टप्पे पडतात,

पहिल्या टप्प्यात प्रकल्पाविषयीचा कार्यक्रम ठरवणे व सरकारकडून अनुदान मिळवणे या दोन गोष्टींचा मुख्यत्वे अंतर्भाव होता. अनुदान मिळवण्यात बराच काळ गेला. तसेच या कोशात कोणकोणत्या पुस्तकांचा अंतर्भाव करायचा, त्यासाठी कोणती संपादित आवृत्ती वापरायची वगैरे प्राथमिक माहिती गोळा करण्यात व त्यांची नीट व्यवस्था लावण्यात जवळजवळ पंधरा वर्षांचा काळ गेला. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक पुस्तकातील शब्द निवडणे, मोठमोठ्या सामासिक शब्दांच्या मर्यादा ठरवणे, पुस्तकांचा रचनाकाळ निश्चित करणे वगैरे काम सुरू झाले. निवडलेले शब्द, त्यांचा अर्थ आणि तो अर्थ नेमकेपणाने व्यक्त होऊ शकेल असे उद्धरण किंवा वचन निवडून त्याची पद्धतशीर नोंद करून ठेवण्याचे काम करण्यात आले. एका साचेबंद छोट्या पत्रिकेवर (slip)  शब्द, त्याचे व्याकरणदृष्ट्या स्वरूप, इंग्रजी रूपांतर, इंग्रजी अर्थ, तसेच मुख्यतः तो शब्द असलेले संस्कृत वाक्य, हे उद्धरण ज्या पुस्तकातून घेतले त्या पुस्तकाचे संक्षिप्त नाव व उद्धरणाचा संदर्भ आणि त्या पुस्तकाच्या रचनेचा अंदाजे काळ एवढ्या गोष्टींची नोंद करण्यात आली. अशा प्रकारे, तयार झालेल्या सुमारे एक कोटी आणि काही लाख स्लिपा सुरक्षित राहण्यासाठी बरीच मोठी जागा व सुयोग्य व्यवस्था यांची गरज लक्षात घेऊन भव्य स्क्रिप्टोरियम उभारण्यात आले.

तयार झालेल्या स्लिपा संस्कृत वर्णानुक्रमानुसार लावणे हा कोशप्रकल्पाचा तिसरा टप्पा होता. योजनाबद्ध कार्यक्रम आखून, या नोंदींना अनुक्रमांक देऊन त्या लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले आणि स्क्रिप्टोरियम परिपूर्ण झाले. संस्कृत वाङ्मयातील कोणताही शब्द संस्कृत वर्णानुक्रमानुसार स्क्रिप्टोरियममधे उपलब्ध आहे. या स्क्रिप्टोरियमचा भारतीय व परदेशी अभ्यासक मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अभ्यासकांना संस्कृतातील विशिष्ट शब्द, त्यामागील संकल्पना याची समग्र माहिती या स्लिपांमुळेच मिळते. स्क्रिप्टोरियम आजतागायत त्याच स्थितीत जतन केले जात आहे. मात्र स्लिपांचा कागद फार जुना झाल्याने, हात लावताच काही वेळा, त्यांचे तुकडे पडतात. वाळवीच्या त्रासापासून स्लिपांना जपावे लागते. या गोष्टींकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधून या अमूल्य ठेव्याचे कायमस्वरूपी जतन संगणकाच्या साहाय्याने करावे अशी याचना वारंवार केल्यावर त्यासाठी मान्यता व अनुदान मिळाले आहे आणि सध्या स्कॅनिंग व डिजिटायझेशनचे काम सुरू झाले आहे. हा ठेवा संगणकाच्या मदतीने सुरक्षित राहील अशी अपेक्षा आहे.

कोशप्रकल्पाचा चौथा व महत्त्वाचा टप्पा संपादनाचा होय. संपादनाचे हे काम १९७३ पासून अविरतपणे चालू आहे. संपादनाचेच काम सर्वात महत्त्वाचे व वेळखाऊ आहे. कोशाचा प्रचंड आवाका पाहता तुटपुंजा कर्मचारीवर्ग हे काम लौकर पूर्ण करू शकणार नाही हे निश्चित. आजपर्यंत या प्रकल्पाच्या प्रचंड कार्याची धुरा डॉ. सु. मं. कत्रे. डॉ. अ. म. घाटगे, डॉ. के. पां. जोग, डॉ. शि. द. जोशी, डॉ. वसुधा गंधे, डॉ. हरिभाऊ रानडे या प्रधान संपादकांनी समर्थपणे सांभाळली. सध्या ही जबाबदारी डॉ. विनायक भट्ट सांभाळत आहेत.

कोशाच्या प्रत्येक खंडाचे तीन भाग असतात. आत्तापर्यंत आठ खंड व नवव्या खंडाचा पहिला भाग (एकूण पंचवीस भाग ) प्रकाशित झाले आहेत. तरीही वर्णमालेतील पहिलाच स्वर ’अ’, त्याने सुरू होणा-या शब्दांचेच काम अजूनही सुरू आहे! सध्या ’अपर’, ’अपरिमित’ वगैरे शब्दांच्या अर्थांचे वर्गीकरण करण्यात येत आहे. मोनियर विल्यम्स या अभ्यासकाने तयार केलेल्या संस्कृत – इंग्रजी डिक्शनरीची सत्तेचाळीस पाने म्हणजे या विश्वकोशाची चार हजार एकशे एकोंणसत्तर पाने होत. एवढा या प्रकल्पाचा आवाका प्रचंड आहे. कोशाचे स्वरूपही इतर कोशांपेक्षा वेगळे आहे. ’जर्मन इंडॉलॉजिस्ट्स्’ या पुस्तकात व्हॅलेंटिना सॅचेरोझन् हिने १९८० – १९८१ साली या कोशाविषयी काढलेले उद्गार ’द डिक्शनरी ऑफ मोनियर विल्यम्स विल बी सुपरसीडेड ओन्ली आफ्टर द क्रिटिकल संस्कृत डिक्शनरी विच इज बीईंग प्रिपेअर्ड् इन पुणे हॅज अ‍ॅपिअर्ड इन् प्रिंट’.

अशा प्रकारे सुरुवातीपासूनच या प्रकल्पाकडे जागतिक विद्वानांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ विशद करणारी उद्धरणे, अर्थांचे तात्त्विक व व्युत्पत्तीदृष्ट्या वर्गीकरण करून ही उद्धरणे कालक्रमानुसार कटाक्षाने दिली जातात. त्यातून शब्दाच्या अर्थाच्या विकासाचा संपूर्ण आराखडा मिळतो. हे या कोशाचे आगळेपण आहे. यापूर्वी संस्कृत–जर्मन, संस्कृत–मराठी, संस्कृत–इंग्रजी असे कितीतरी कोश तयार केले गेले. पण हा विश्वकोश इतरांपेक्षा परिपूर्ण आणि अधिक उपयुक्त माहिती पुरवतो.

या कोशामध्ये – ऋग्वेद हा संस्कृतातील अतिप्राचीन ग्रंथ (अंदाजे इसवी सन पूर्व १४०० वर्षे ) ते इसवी सन च्या एकोणिसाव्या शतकातील हास्यार्णवप्रहसन ग्रंथ – एवढ्या काळातील सुमारे पंधराशे निवडक व प्रातिनिधिक पुस्तकांचा आणि काही भाष्यग्रंथांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व ग्रंथ वेगवेगळ्या अभ्यासशाखांमधील आहेत. यात वेद, वेदांत, रामायण, महाभारत, पुराणे, व्याकरण, न्याय, मीमांसा, तंत्र, शिल्पशास्त्र, वास्तुशास्त्र, गणित, आयुर्वेद, योग वगैरे एकसष्ठ ज्ञानशाखांवरील पुस्तकांचा विचार केला आहे. या पुस्तकांतील तांत्रिक, पारिभाषिक व सामासिक शब्दांचा समावेश या कोशात करण्यात आला आहे.

स्क्रिप्टोरियममधे सर्व स्लिपा तयार असताना कामाला वेळ लागण्याचे कारण काय? अशी शंका कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे, परंतु प्रत्यक्षात अर्थ ठरवण्याचे काम करताना अनेक अडचणी येतात. स्लिपांवर नोंदवलेला अर्थ विशिष्ट संदर्भांमध्ये योग्य आहे का ते तपासणे, नेमका योग्य अर्थ ठरवणे, स्लिपांचे अर्थानुसार वर्गीकरण करणे आणि कालक्रमानुसार संपूर्ण नोंदींची यथायोग्य मांडणी करणे हे काम जिकिरीचे असते. एका शब्दासाठी कमीत कमी एक तरी स्लिप असतेच, पण काही शब्दांबाबत हजारो स्लिपा संदर्भ म्हणून पुढे येतात. पंधराशे पुस्तकांमध्ये अनेक ग्रंथ केवळ शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. त्यांचा अचूक अर्थ देण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकारांची जरुरी असते. परंतु सर्व क्षेत्रांतील असे जाणकार मिळत नाहीत. पूर्वी या कोशाच्या संपादकवर्गात पंधरा शास्त्री होते. त्यांपैकी कोणीही उपलब्ध नाही. अर्थनिश्चितीस उपयुक्त ठरतील असे संदर्भग्रंथ दुर्मीळ होत चालले आहेत. फार थोड्या ग्रंथांची भाषांतरे उपलब्ध आहेत. तसेच, सर्व ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्ती उपलब्ध नाहीत. अशा अनेक कारणांमुळे संपादनाचे काम अतिशय बिकट व वेळखाऊ आहे. छापून आलेली मुद्रिते बारकाईने तपासावी लागतात. या सर्व संपादन प्रक्रियेला ठरावीक वेळ द्यावाच लागतो. अशा प्रकारचे विश्वकोश ग्रीक, लॅटिन, अरेबिक इत्यादी भाषांमधे तयार झाले आहेत. त्यांच्या रचनेसही शंभर वर्षांपेक्षा कितीतरी जास्त काळ लागलेला आहे.

संस्कृत शब्दाबद्दल उपलब्ध अशी सर्व माहिती अभ्यासकाला पुरवणे हे या कोशाचे उद्दिष्ट आहे. एखाद्या शब्दाचा सर्वात प्रथम वापर कोणत्या काळात झाला इथपासून त्या शब्दाचा व त्याच्या अर्थाचा विकास कशा प्रकारे झाला, निरनिराळ्या ज्ञानशाखांमधे तो शब्द किती वेगवेगळ्या अर्थांनी वापरला गेला, शब्दाचा पारिभाषिक व तांत्रिक अर्थ आणि प्रत्यक्ष वापरातला अर्थ यांत कसाकसा फरक पडत गेला ही सर्व महत्त्वपूर्ण तरीही रंजक अशी भाषाशास्त्रीय माहिती हा कोश पुरवतो. म्हणजेच, योग्य विभागांवर आधारलेला संस्कृत वाङ्मयातील सर्व शब्दांच्या विविध व परिपूर्ण अर्थच्छटा नेमकेपणाने उलगडून दाखवणाऱ्या उद्धरणांचा खजिना असलेला हा ज्ञानकोशच होय. सुमारे तीन-चार हजार वर्षांच्या कालमर्यादेत विकसित झालेल्या संस्कृत भाषेतील सांस्कृतिक, भाषाशास्त्रीय व ऐतिहासिक ज्ञानाचा अमूल्य व समृद्ध असा वारसा हा कोश जतन करून ठेवत आहे यात शंकाच नाही.

हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून नेमलेल्या संपादकवर्ग आणि केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास खात्याकडून मिळालेल्या अनुदानातून नेमलेल्या संपादकवर्गाकडून चालवला जातो.

कोशाचे काम जलदगतीने होण्याविषयी आजपर्यंत अनेक शिफारसी झाल्या. संगणकीकरणाचीही शिफारस झाली. त्यानुसार सध्या कोशाचे संगणकीकरण व सुयोग्य संगणकप्रणाली विकसित करून घेण्याचे काम सुरू आहे. परंतु रोडावत जाणाऱ्या कर्मचार्‍यांच्या संख्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. चाळीस-पन्नास माणसांचे काम गेली काही वर्षे सुमारे पंधरा अभ्यासक महत्प्रयासाने पूर्ण करत आहेत. त्यामुळे रिक्त पदांवर नवीन कर्मचार्‍यांची नेमणूक तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे. कोशाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व तंत्रज्ञ आणि पुरेसा संपादकवर्ग मिळणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. दोन्ही सरकारांनी गंभीरपणे लक्ष देऊन काही ठोस पावले उचलली तरच हा जगद्वविख्यात प्रकल्प काळाची गरज भागवू शकेल. अन्यथा संपादकवर्गाच्या नशिबी फक्त ओढाताण आणि दडपण येईल. हा विश्वकोश डेक्कन कॉलेजचे पर्यायाने पुण्याचे, महाराष्ट्राचे, आपल्या भारतदेशाचे भूषण आहे. अवघ्या जगातील संशोधकांचे, अभ्यासकांचे लक्ष वेधून घेणार्‍या या कोशाची परवड होऊ नये आणि तो पूर्णत्त्वाला जावो यासाठी समाजाने पाठीशी उभे राहणे गरजेचे झाले आहे.

जयश्री साठे

About Post Author

Previous articleसंयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा
Next articleमहाराष्ट्र टिकला पाहिजे
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.