शेतकरी विधवांना साहित्यिकांची सहानुभूती !

पाटणबोरी हे माझे ग्रामपंचायतीचे गाव. ते महाराष्ट्र-आंधप्रदेशच्या सीमेवर आहे. तेथे माझ्या माहेरची शेती आहे, वाडा आहे. मी 1990 साली डिसेंबरच्या सुट्टीमध्ये गावी गेले होते. टेलिव्हिजनवर 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षानिमित्त कार्यक्रम सुरू होते; अन् अचानक रात्री बारा वाजता वाड्याच्या मागील भागातील झोपडीवजा घरातून आर्त किंकाळी ऐकू आली. मी धावलेच. लक्ष्मी रडत होती. तिची लहान मुले भेदरली होती. तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा कळले, की तिच्या नवऱ्याने- शिवाने आत्महत्या केली होती. त्या दाम्पत्याकडे तीन एकर शेती होती, त्यांनी कशीबशी शेती केली. थोडीथोडकी गुजराण व्हायची; पण कालांतराने इतर गरजा वाढल्या. शेतीला लावण्यास गरजेचे असे जवळचे भांडवल कमी पडू लागले. त्यात कर्ज झाले. बँकेचे कर्ज घ्यावे म्हटले तर आधीचे कर्ज फेडण्याचे राहिले होते. तेव्हा शिवाने शेतीचा व्यवसायच सोडून दिला आणि तो किराणा दुकानात कामाला लागला.

मालकाने 31 डिसेंबरच्या दिवशी, दुकान बंद करते वेळी शिवावर गल्ल्यातील पैसे चोरल्याचा आरोप लावला. शिवाला तो अपमान सहन झाला नाही. त्याने घरी न परतता शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली! खरे तर, ती शेतकऱ्याची आत्महत्या होती. शेतकऱ्याची पहिली नोंद झालेली आत्महत्या साहेबराव करपे पाटील यांची मानली जाते. ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावचे. साहेबराव करपे पाटील यांनी 19 मार्च 1986 ला सेवाग्रामला येऊन सहकुटुंब आत्महत्या केली. ती कृषीसंबंधित कारणांनी केली. म्हणून ती शेतकऱ्यांची आत्महत्या अशी गणली गेली; पण त्या आधी व नंतरही तशा अनेक आत्महत्या झाल्या असाव्यात.

मी लक्ष्मीची नंतरची फरपट डोळ्यांनी पाहिली, अनुभवली आहे. जाणारा निघून जातो, परंतु कुटुंबाच्या मागे विवंचनांचा पहाड उभा राहतो. त्यातून सावरता सावरता बायकांचे आख्खे आयुष्य वेठीला धरले जाते. त्या आप्तस्वकीय, समाज, साऱ्यांकडून पिडल्या जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे एखादा रोग पसरावा तसे दिवसेंदिवस फुगतच चालले आहेत. त्यामुळे मागे जिवंत राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनींची संख्याही वाढत आहे.

मी ‘तेरवं’मध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिलांची भेट घेतली. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वैशाली येडे नामक तरुणी अठ्ठावीस वर्षांची आहे. तिचे लग्न झाले तेव्हा तिला जेमतेम एकोणिसावे लागले होते. सासरी खूप मोठा खटला! सख्खे-चुलत मिळून चौदा दीर-सासरे. जावा-सासवा वेगळ्या. तसाही तिला त्यात सासुरवास होताच. वैशालीच्या नवऱ्याच्या नावाने तीन-चार एकर शेती होती, दोघे शेती करायची आणि त्यांची गुजराण करायची. वैशालीच्या नवऱ्याने पण कर्जाला कंटाळून 2011 साली आत्महत्या केली, तेव्हा तिला पाच वर्षांचा मुलगा होता आणि ती तिच्या माहेरी दुसऱ्या बाळंतपणासाठी गेली होती. तिच्या नवऱ्याच्या आत्महत्येची बातमी महिनाभराची मुलगी कुशीत असताना आली. नवऱ्याच्या आत्महत्येनंतर तिच्या हालअपेष्टांमध्ये आणखी भर पडली. सासरच्यांकडून छळ आणखी सुरू झाला. तिला मोलकरणीसारखे वागवले जाऊ लागले. तिचे बाहेर जाणे बंद करून टाकले गेले. तिने साधे तयार झालेले, नीट राहिलेले सासरच्यांना सहन होत नव्हते. चेहऱ्याला साधी फेस पावडर लावली तरी सासू दूषणे द्यायची. तिची संभावना ‘आता कोनाले आपलं थोबाड दाखवायचं हाय तुले?’ अशा अनर्गल भाषेत केली जायची. तिला घरातील लोकांच्याही वाईट नजरांचा सामना करावा लागला. वैशाली ते सारे निमूटपणे सहन करत होती तोपर्यंत ठीक होते, पण तिने जसा प्रतिकार केला तेव्हा तिला घरातून निघून जाण्यास भाग पाडले गेले. अखेर, एके दिवशी तिने तिच्या मुलाला घेत सासरचा उंबरठा ओलांडला, तो कायमचाच. त्यानंतर ती वर्ध्याच्या ‘एकल महिला संघटने’त सामील झाली. ती तिची गुजराण शिलाई मशीन आणि मजुरी करून करत आहे… यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उद्घाटक म्हणून तिला बोलावण्यात आले होते!

मंदा अलोणेची व्यथाही त्यापेक्षा निराळी नाही. ती आर्वी तालुक्यातील सोरहाता गावात राहते. तिच्याही नवऱ्याजवळ तीन एकर शेती होती. सततच्या नापिकीने, बिनभरवशाच्या पावसाने नवरा कर्जबाजारी झाला. त्याने कंटाळून, अखेर 2013 साली आत्महत्या केली. मंदाच्याही पोटी दोन मुले. ती देखील तशीच सासरहून हाकलली गेली. ती घराबाहेर पडली. ‘नाम फाउंडेशन’ने तिला शिलाई मशीन दिले. तीदेखील तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष करत आहे.

तळेगाव ठाकूरच्या माधुरी चिटुलेचीही तीच कहाणी. तिच्या नवऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या सासरची मंडळी शेतीवरील अधिकार देत नाही. तीदेखील सासरहून बाहेर घालवली गेली. कविता ढोबळे वर्ध्याच्या ‘एकल महिला संघटने’चे काम बघते. वर्धा जिल्ह्यातील विरुळच्या कविताची स्थितीदेखील त्याहून निराळी नाही. तिनेही एके दिवशी सासर सोडून मुलांना घेऊन माहेर गाठले. ती ‘एकल संघटने’चे काम बघता बघता इतर महिलांचे समुपदेशन करू लागली आहे. ‘तेरवं’मध्ये काम करणाऱ्या तेजस्विनीची (नावे बदलली आहेत) कथा हृदयद्रावक आहे. तिचे लग्न ती नववीत असताना, तिच्या वडिलांनी लावून देण्याचे ठरवले. तिने विरोध केला. ती तिला पुढे शिकायचे आहे असे म्हणाली. वडील ऐकेनात. तरीही ती बधली नाही. ती तिच्या शिकण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. तेव्हा तेजस्विनीच्या वडिलांनी संतापाच्या भरात तिच्या पोटात लाथ घातली. तिच्या किडनीला मार लागला. त्या वेदना तिला आजही भोगाव्या लागत आहेत; पण त्याच दिवशी तिने शिक्षणासाठी घर सोडले ते कायमचे. तेजस्विनीने बराच संघर्ष केला. एकटी राहिली. ती वर्ध्याच्या हिंदी विश्व विद्यापीठात फिल्म डायरेक्शनचा अभ्यासक्रम करते. तिने संगणकात कौशल्य मिळवले आहे.

कविता या तरुण विधवेचे मनोगत ऐकून तर माझे मन सुन्न झाले. “आम्ही विधवा ना. आमच्यावर समाज आक्षेपच घेतो. आम्ही सख्ख्या भावासोबत दिसलो तरी लोक संशयाने पाहतात. आम्ही प्रत्येक पुरुषाला संधी वाटत असतो. आम्ही सरळसोट वागलो तरीही आमच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मग मी वेश्याव्यवसायही करण्यास तयार होईन, पण मुलाला शिकवीन.” कविताच्या कथनाने अंगावर काटे उभे राहिले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्या एकल महिलांसाठी सरकारने कायदा करावा आणि त्यासाठी साहित्य संस्कृती महामंडळ पाठपुरावा करेल असा ठराव करण्यात आला आहे! त्यांच्या काही मागण्या आहेत. खूप साध्या आहेत. ‘एकल महिला संघटने’च्या माध्यमातून त्या समोर केल्या जातात. ते नाटक बघून त्या मागण्या किती साध्या आहेत, रास्त आहेत याची जाणीव होते.

– वैधव्य वाट्याला आलेल्या त्या कोवळ्या-तरुण मुली आहेत. त्यांच्यावर त्यांच्या लहान वयातील एक-दोन मुलांची जबाबदारी आहे. सरकारने त्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी महिना तीन हजार रुपये द्यावेत.

– त्यांना त्यांच्या पतीच्या आत्महत्येनंतर सासरचे हाकलून लावतात अन् माहेरचेही पाठ फिरवतात. सरकारने उघड्यावर पडलेल्या त्या महिलांना घर बांधण्यास भूखंड द्यावा.

– त्या महिलांना स्वतंत्र रेशन कार्ड मिळावे. त्यांना ‘अंत्योदय योजने’त स्थान असावे.

भाग्यश्री पेठकर 8600044367, pethkar.bhagyashree3@gmail.com
 

 

 

About Post Author

Previous article‘तिला काही सांगायचंय’च्या निमित्ताने…
Next articleआली चैत्रमासी गौराई
भाग्यश्री पेठकर यांनी ‘लोकसत्ता’, ‘नवराष्ट्र मराठी दैनिक’, दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रांत उपसंपादक म्हणून काम केले आहे. त्यांचा ‘काया’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्या विविध दिवाळी अंकांमध्ये लेख, कथा, कविता लिहितात. ‘वर्ड्स अँड व्ह्यूज’ ही त्यांची कंपनी आहे. त्याअंतर्गत त्या क्रिएटिव्ह रायटिंग, स्लोगन्स, ऑडिओ-व्हिज्युअल्स, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांतर इत्यादी कामे करतात. लेखकाचा दूरध्वनी 8600044367

1 COMMENT

  1. Something needs to be done…
    Something needs to be done to help those farmers who genuinely get into debt that they cannot manage. Not a very good idea to let things get to suicide and the pick up the pieces.

    Debt cancellation is a moral hazard. And donations to widows are too late. Farmers will always need debt to get them over bad periods of crop failures, so debt needs to be provided but a culture of managing debt for recovery needs to be created.

Comments are closed.