शेखरचा शेतजीवनाचा आनंद ( Engineer Seeks Happiness in Farming)

51
18
मुंबईचा स्ट्रक्चरल इंजिनीयर शेखर भागवत हा हरहुन्नरी, निसर्गप्रेमी आहे. तो आयआयटीत शिकत असताना पक्षीनिरीक्षण, निसर्गात भटकंती यांचे वेड त्याला लागले. त्याने तेव्हाच ठरवले, की वयाच्या पन्नाशीच्या आसपास व्यवसाय-नोकरी सोडून छंद आणि हौशी जोपासत जगायचे. त्याला अलिबागजवळ कनकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी मुनवली गावात एक एकर जागा मिळालीही. जागा चढउताराची आहे. तेथे आधीचा जमीनमालक कोंबडीपालन व्यवसाय करत होता. शेखर भागवत याने जुन्या मालकाची बांधकामे थोडीफार बदलून तेथे विविध गोष्टी हौसेच्या सुरू केल्या. येणाऱ्या पाहुण्यांना दोन दिवस राहण्याची सोय केली. पौर्णिमेच्या मध्यरात्री कनकेश्वरच्या डोंगरावर लख्ख चांदण्यात गिरिभ्रमण करायचे. स्वच्छ आकाशात ग्रहतारे निरखण्याचा आनंद घ्यायचा. रात्री दोन-अडीचपर्यंत घरी येऊन झोपी जायचे. त्याची बहीण पार्ल्याहून दोन महिन्यांतून एकदा तेथे येते आणि योगशिक्षणाचे कँप घेते. शेखर म्हणाला, दिवस कसा जातो ते कळतच नाही.
शेखर तेथे शेती करतो, गरज पडेल तशी बांधकामाची कंत्राटे घेतो, जवळच कामर्ल्याच्या शेतावर धान्याबरोबर सर्व तर्‍हेचा भाजीपाला पिकवतो. त्यामुळे तो ताज्या भाज्या खाण्याची वर्णने फोनवरून सांगत असतो. तो म्हणाला, की त्याची पत्नी सरिता हिलाही भाजी पिकवण्याचे वेड लागले आहे. परंतु सरिता हिचे कौशल्य व ‘निर्मिती’सुद्धा व्यक्त होते ती त्यांच्या रेसिपींमधून. भोकर, पांगार यांची कोवळी पाने खाण्यायोग्य असतात हा शोध त्यांना तेथे लागला. मोहाच्या फुलांपासून लाडू, पुऱ्या असे तऱ्हतऱ्हेचे पदार्थ चविष्ट बनवता येतात व ते पौष्टिक असतात. शेखर म्हणाला, की कलिंगडाच्या अगदी आतल्या गराचे सॅलड वा धिरडी/घावन ही खास सरिताची ‘निर्मिती’. ते काकडीच्या घावनांपेक्षा सरस लागतात. सरिता होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पेशंट येत असतातच.
माणूस शहरात राहतो, त्यापेक्षा गावाकडे वेगळा कसा वागतो हे शेखर भागवत याच्या साऱ्या हालचालींत दिसते. शेखर याचे नव्वद वर्षांचे वडीलही तेथे राहतात. त्यांचेही सर्व आयुष्य शहरात गेले. पण मुनवलीत ते झकास रमलेत! कोठेही पडलेली काठी उचलतात आणि सारे रान फिरून येतात. आता आतापर्यंत, ते स्कूटर घेऊन अलिबागला वीस किलोमीटरवर जाऊन येत. ते म्हणाले, मुलाने आता मला तसे करण्यास बंदी घातली आहे.

 

शेखर म्हणाला, की मी स्वत:चे असे येथे एकच बांधकाम केले; छोटेसे मंदिर बांधले. त्याने ते दगडी देऊळ बांधतानाही इंजिनीयरिंगची गंमत केली आहे. ती म्हणजे त्याने व्यावसायिक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जी बांधकामे केली त्या प्रत्येक ठिकाणची एकेक शिळा आणून त्या मंदिराच्या भिंतीला लावली आहे. त्यामुळे ते त्याच्या व्यावसायिक कामाचे ‘मेमोरियल’ आपोआपच होऊन गेले आहे. शेखर म्हणाला, “शांतपणे बसायला जागा म्हणून मी ते बांधले. बांधले तेव्हा महाशिवरात्रीला काही दिवस होते, म्हणून शिवमंदिर. आणखी एक कारण म्हणजे भारतभर केलेल्या जंगल भ्रमंतीत निदर्शनास आलेली होती ती तोडकीमोडकी मंदिरे अथवा शिवाच्या पिंडी. तो साचा येथे घेतला. अगदी पायापासून संपूर्ण नवीन असे हे बांधकाम केले. महाशिवरात्रीला तेथे शिव/पिंड याची प्राणप्रतिष्ठा केली. मी तेथे रोज पूजा वगैरे करतो असेदेखील नाही. पण एक गोष्ट घडली, की मंदिर बांधल्यानंतर आजुबाजूच्या खेड्यांतील, वस्त्यांतील लोक तेथे येऊ लागले. दोन-तीन वर्षांपूर्वी एका महाशिवरात्रीला खूप सारे लोक जमले आणि मग तो परिपाठच झाला. आम्ही त्यांना प्रसाद देऊ लागलो. त्यामुळे महाशिवरात्र हा आमच्या येथे इव्हेंट होऊन गेला आहे. मी आणि माझे कुटुंबीयही त्या दिवसाची (महाशिवरात्र) वाट पाहू लागलो.
          शेखरच्या नित्यक्रमावर कोरोना काळाचा तसा काही परिणाम झालेला नाही. बाजार बंद आहे, रस्त्यावरील वर्दळ-वाहतूक कमी झाली आहे, पण तो त्याचे कामर्ल्याला शेत आहे तेथे नित्य जातो. तेथेच त्याने त्याची गाईगुरे हलवली आहेत. त्याने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिनी इंग्रजीत लिहून ती मित्रमंडळींना व्हॉट्सअॅपवर पाठवणे सुरू केले आहे. त्यातील त्याची निरीक्षणे अभ्यासू असतात. तो झाडांच्या रचनेकडेदेखील स्ट्रक्चरल इंजिनीयरच्या दृष्टीतून पाहतो. आपट्याचे झाड पडले, त्याचे फोटो काढून त्याने ते पाठवले. आडव्या झाडाला नवा फुटवा आला तेव्हा वाढलेली मौजही वर्णन करून लिहिली. करंजाचे झाड, त्याच्या बिया-त्यांच्यापासून तेल अशा नाना गोष्टी त्याच्या त्या दैनंदिनीतून प्रकट होतात. तसेच, कोकणचा मेवा, करवंदांची जाळी, हिरव्या करवंदांचे लोणचे, आंब्यांच्या ओझाने जमिनीला भिडलेल्या फांद्या … आणि केव्हातरी येणारा इंदिरा संत यांच्या कवितेचा व त्याचबरोबर युट्यूब युनिव्हर्सिटीचा संदर्भ अशा मनोवेधक गोष्टीदेखील दैनंदिनीत वाचण्यास मिळतात. शेखर म्हणतो, या लॉकडाऊनवर माझे तर प्रेमच बसले आहे. त्याने माझ्या या शेतजीवनाला नवा सूर लाभला आहे!
शेखर आता, सहा वर्षांनंतर शेतावर रमून गेला आहे. त्याला विचारले, की तुझे मुंबईला येणे होते की नाही? तो म्हणाला, की मी माझे ऑफिस पार्ल्यात दोन वर्षांपूर्वीपर्यंत ठेवले होते. तेथे यावे लागायचे. नंतर ती गरज राहिली नाही, परंतु आता मिरची-वांगी-पडवळ-तोंडली अशी विविध प्रकारची भाजी सारखी तयार होत असते. ती घेऊन समुद्रमार्गे गेटवेवरून चर्चगेटला येतो आणि तेथे वेगवेगळ्या मित्रांना/परिचितांना देऊन टाकतो. माझा जाण्यायेण्याचा खर्च निघतो. त्यांना ताजी भाजी मिळते. तसे त्याने मित्र-परिचितांचे पार्ले, अंधेरी, कुलाबा असे गट बनवले आहेत. ते त्यांच्या ठरलेल्या दिवशी चर्चगेटला येऊन भाजी घेऊन जातात. शेखर दर दहा दिवसांनी मुंबईला येतो. तो त्याच्या शेतीच्या उत्पादनांना लाडाने ‘ओना’ असे म्हणतो -म्हणजे ‘ऑरगॅनिक अँड नॅचरल अफेअर’.
          तो आता परिचितांसमोर व्हॉलंटरी लॉकडाऊनची कल्पना मांडणार आहे. म्हणजे त्यांच्यापैकी ज्या कोणाला शहरी जीवनापासून पाच-सहा महिने दूर राहायचे असेल आणि कृषी जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, त्यांची तशी निसर्गात राहण्याची सोय तो करणार आहे – व्हॉलंटरी लॉकडाऊन इन नेचर!
          तरीही कोरोना काळात शेखरशी संबंधित दोन गोष्टी घडल्याच. त्याच्या तेथील बांधकाम कंत्राटांवर काम करण्यासाठी पश्चिम बंगालमधून पंधरा-वीस मजूर दरवर्षी आठ महिन्यांसाठी तेथे येतात. त्यांच्यातील बाराजण डिसेंबर-जानेवारीत परत गेले. सात जण तेथे राहिले. ते ‘कोरोना’मुळे तेथेच अडकले आहेत. शेखरला त्यांना धान्य भरून द्यावे लागते; त्यांच्यासाठी त्यांना अन्य कामे नसल्याने शेतीत कामे काढून द्यावी लागतात.          
       दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा वडिलांशी कोरोनामुळे वेगळा बंध तयार झाला आहे! वडिलांची दाढी करण्यासाठी नाभिक नित्य त्यांच्याकडे येई. तो ‘कोरोना’मुळे आता येत नाही. मग शेखर म्हणाला, “मीच त्यांची दाढी करून देतो. ही वेगळीच जवळीक पिताजींजवळ साधली गेली आहे.” शेखर असा हरहुन्नरी आहे. त्यामुळे त्याचे खेड्यात शेतावर राहण्यास गेल्याने काही अडत नाही; उलट तो उत्फुल्लपणे शेतजीवन जगत आहे.
शेखर भागवत 9921610522 shekhar.dimen@gmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

—————————————————————————————————————-
शेखर भागवत यांच्या शेतातील छायाचित्रे –


About Post Author

Previous articleप्रश्न जीवन मरणाचा की भांडण्याचा? (Domestic Violence)
Next articleकोरोना – किती काळ? (Corona – How Long?)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

51 COMMENTS

  1. वा! वाचूनच खूप निसर्गात फेरफटका मारुन आल्यासारखे वाटले .ह्या तुमच्या नोंदीमुळे खूप नविन माहिती मिळत रहाते व एक आशावाद निर्माण होतो .नाहीतर TV व पेपरमधल्या निगेटीव बातम्या वाचून निराश वाटते . सौ.अंजली आपटे दादर

  2. आम्ही रहायला गेलोय तिकडे। खूपच सुंदर आहे ही कल्पना। मी त्याला ओळखतो। खूपच मनमिळाऊ व स्वच्छ मोकळा स्वभाव आहे।

  3. खूप छान. ते ठिकाण पाहायची आणि शेखर यांना भेटण्याची उत्सुकता आहे.

  4. मौज प्रकाशन च्या श्री. पू. भागवत कुटुंबाशी ह्यांचा काही संबंध आहे का?

  5. छानच माहिती. शेखर भाऊ आणि सरिता वहिनी, तुम्हा उभयतांचे कौतुक वाचून खूप आनंद झाला.

  6. हेच खर जीवन आहे…गगनचूंबी इमारती आज कोरोनामुळे धास्तावल्यात…कोटीच्या बाता करणारे आज हतबल आहेत…फोरचूनर..ऑडी..आणि कोटीतल्या आलीशान गाड्या आज गेटच्या आत ऊभ्या आहेत..पण..काही हजारातली बैलगाडी आजही रानात धावतेय…आजही खेड्यातला माणूस मोकळा श्वास..आणी शाश्वत आनंदाच जीवन जगतोय..आणी शहरातला श्रीमंत नोटांच्या थाप्या लावत शरीरान आणी मनान दरीद्री होत चाललाय..सगळा लेख वाचताना..मन जगावेगळ्या आनंदाने भरून गेल…हीच खरी दौलत…हेच खर जीवन…आणी हेच शाश्वत सुख….

  7. Aamchi Matoshree Residencychi overnight trip Keli hoti. We really enjoyed the farm and the food. Actually my aajol is just 10mins away from on the farm but this was delightful.

  8. नमस्कार …गांगलांनी थोडक्यात पण फारच सुरेख लिहिलेय तुमच्याविषयी ..बहुतेक त्या लेखाचा पहिल्या पाचांतील मी एक वाचक असेन …भारीच कमाल केलीयेत तुम्ही …पावसाळ्यात येईन तुम्ही तेथे केलेले सारे पहायला आणि तुम्हाला ऐकायला प्रत्यक्ष…तुमच्या पूर्व परवानगीने आणि फोनवर कळवून.- हेमंत शेट्ये

  9. या लेखातील voluntery विलगीकरण ही कल्पना आवडली.थोरो असेच जीवन जगला.पाहता पाहता पर्यटन ठिकाण म्हणून बदलेल्या माझ्या hometown संबंधातील लेख म्हणून अधिक आपुलकीने वाचला. आवास चे दिवस ह्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या नीला उपाध्ये यांच्या पुस्तकातील वातावरणाची आठवण आली..कारण आवास व कनकेश्वर दोन्ही रेवस रोड वरच येतात.संध्या जोशी.

  10. श्रीपुंचे कुटुंबिय आमचे आडनाव बंधु, नातं असं नाही. पण मजा म्हणजे श्रीपुंची भाच्ची पद्मजा माझी वर्ग मैत्रीण😊

  11. मला आठवतेय तुमची मातोश्री ची सहल, या परत आता कामार्ल्याला शेतावर काम करायला, येता का भात लावणीच्या वेळी ? सगळे जण या😊☺️

  12. अवश्य या, तेव्हा लावणीचे दिवस असतील त्यामध्ये सहभागी होता येईल तुम्हाला😄👍

  13. आमचे अलिबागला gondhalpada येथे शेत आहे.अलिबागचे दली नगर माझ्या वडिलांची जमीन होती.माझ्या शेत लावणीच्या. आंबे काढून आणण्याच्या अनेक आठवणी आहेत. गवत उंच दाट दाट.. वळत जाय पायवाट.. वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे..तसे आमचे प्रिय शेत अजूनही उरत घर करून आहे…संध्या जोशी (रानडे.)

  14. हे खरं जगणं आहे.अतिशय समृद्ध जीवन.पण असा निर्णय घ्यायलाही धाडस लागत. मला हे प्रोजेक्ट बघायला खूप आवडेल.कनकेश्वर परिसरातील गावं माझ्या थोडीफार परिचयाची आहेत.अनुराधा म्हात्रे

  15. नमस्कार शेखर काकाखूप जवळचे वाटलात कारण माझे यजमान इंजिनिअर आहेत आणि नोकरी सोडून हौसेने कोकणात जमीन घेऊन शेतीचे प्रयोग करीत आहेत. मी आणि मुलगीही प्रासंगिक असतो इथल्या घरी. सध्या लाॅकडाऊनच्या काळात आम्ही इथेच कोकणात आहोत आणि शेतात शांतपणे जगत धमाल सुद्धा करतोय.तुम्हाला येऊन भेटायला नक्की आवडेल.शुभेच्छा आणि धन्यवाद!आर्या आशुतोष जोशी

  16. या आपण😊🙏, धाडसापेक्षा तीव्र इच्छा नक्कीच हवी आणि वेळ द्यायची तयारी.निव्वळ पैसा मिळवण्यापेक्षा समाधान आणि आनंद मिळवायचे एकदा ठरवलं कि सोपं होतं. मनःशांती आणि शरीर दोन्ही राखता येतं

  17. अवश्य या! आशुतोष साहेबांकडुन त्यांचे अनुभव आणि त्यातुन उमजलेलं ज्ञान शिकता येईल. मी पण माझे अनुभव आणि झालेल्या चुका , काही यशस्वी प्रयोग केले ते सांगेन😊🙏

  18. मी ही माझ्या मित्र मंडळी ना घेऊन येईन.भागवत सर किती लोकांची राहण्याची सोय होऊ शकते साधारण आणि किती दिवसा आधी कालवावे लागेल.8976638786Ex Navy”हे जीवन सुदंर आहे” ह्या वाल्याच बेस्ट उदाहरण फक्त जिद्द हवी…..” हर हर महादेव….

  19. मी ही माझ्या मित्र मंडळी ना घेऊन येईन.भागवत सर किती लोकांची राहण्याची सोय होऊ शकते साधारण आणि किती दिवसा आधी कालवावे लागेल.8976638786Ex Navy”हे जीवन सुदंर आहे” ह्या वाल्याच बेस्ट उदाहरण फक्त जिद्द हवी…..” हर हर महादेव….

  20. मी ही माझ्या मित्र मंडळी ना घेऊन येईन.भागवत सर किती लोकांची राहण्याची सोय होऊ शकते साधारण आणि किती दिवसा आधी कालवावे लागेल.8976638786Ex Navy”हे जीवन सुदंर आहे” ह्या वाल्याच बेस्ट उदाहरण फक्त जिद्द हवी…..” हर हर महादेव….

  21. दोन आठवडे आधी सांगितलंत तर फार उत्तम! 50 ते 60 जणांची सोय सहज करता येईल. कृषी, गिरीरोहण, वृक्षवल्ली,मनसोक्त पोहणं जे काही आपल्याला आवडेल ते सांगा त्याप्रमाणे आयोजन करता येईल😊🙏

  22. २/३ वर्षांपूर्वी मधुरा परुळेकर बरोबर आम्ही चौघी मैत्रिणी आलो होतो. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. रात्रीच्या नीरव शांत वातावरणात विहिरीवर बसून केलेलं जेवण, शिवमंदिर आणि तुमचं आदरातिथ्य !! सगळंच अविस्मरणीय. पुन्हा एकदा यायला नक्की आवडेल.

  23. खूप सुंदर वर्णन. कृपया पत्ता कळवावा. आम्ही नक्की येऊ. अनिता काळे माहीम मुंबई

  24. मी ज्योती साठे. २/३ वर्षांपूर्वी मधुरा परुळेकर बरोबर आम्ही चौघी मैत्रिणी आलो होतो. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. रात्रीच्या नीरव शांत वातावरणात विहिरीवर बसून केलेलं जेवण, शिवमंदिर आणि तुमचं आदरातिथ्य !! सगळंच अविस्मरणीय. पुन्हा एकदा यायला नक्की आवडेल.

  25. मस्त.लेखही छान लिहिला आहे. आपल्या अभिनव प्रयोगाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आपले व्यवस्थापन चोख आहे. परत कधीतरी चक्कर मारू.आपल्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा.

  26. नमस्कार, कधी तरी येऊन भेटायला आवडेल, योग् कधी येतोय बघू, मुंबई गोरेगाव

  27. लेख वाचला. आवडला. शेखर भागवत सरांना भेटायला आणि समजून घ्यायला नक्कीच आवडेन, फक्त लॉकडाऊन पिरियड संपू दे. तसे हे मुनवली गाव माझ्या गावापासून दीड तासाच्या अंतरावर आहे.- रोहिदास कवळेरसायनी, ता. खालापूर जि. रायगड

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here