शिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव

3
391

संतकवी रामदास स्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना एकमेकांबद्दल आदर होता. लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, संस्कृती रुजावी यासाठी शिवाजी राजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चार  ते माघ शुद्ध  पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत, पाच महिने 1675 साली साजरा केला…

‘सुखकर्ता दुःखहर्ता…’ ही गणपतीची प्रसिद्ध आरती रामदास स्वामींनी रचली आहे. गणेशोत्सव सध्या भाद्रपद शु. चार (श्री गणेश चतुर्थी) ते भाद्रपद शु.चौदा (अनंत चतुर्दशी) असा साजरा करतात. त्या प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामी यांनी तो उत्सव सुरू केल्याची नोंद आहे. रामदास त्यांच्या दासबोध या ग्रंथाचे लिखाण संपवून नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरता शिवथरच्या घळीतून 1658 साली बाहेर पडले. तेव्हा शिष्यांनी त्यांच्या कानावर महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे ‘एक विघ्न’ चालून येत आहे ही गोष्ट घातली. त्यावेळी त्यांनी गणपतीची स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध असणारी गणपतीची ही आरती रचली. त्या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख ‘वार्ता विघ्नाची’ या शब्दांत आहे.

रामदास स्वामी राहत असत तो सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे. त्याचा उल्लेख शिवाजी राजांच्या मोडी पत्रात आढळतो. तेथेच शिवाजी राजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चार (श्री गणेश चतुर्थी) ते माघ शुद्ध पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत, पाच महिने 1675 साली साजरा केला. म्हणजे पहिला सार्वजनिक गणपती हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा गणपती आहे ! त्या गणेशोत्सवाचे ‘पहिले वर्गणीदार’ राजे शिवछत्रपती आहेत ! त्यांनी त्या उत्सवाला त्या साली एकशे एकवीस खंडी धान्य दिले होते. तसा उल्लेख समर्थांच्या इतिहासात आहे.

समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली !
शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया !!
(11 x 11( आकारा आकरी) म्हणजे 121)

शिवाजी राजांनी पाच महिने सुरू राहिलेल्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजया दशमीच्या दिवशी घेतले असा उल्लेख आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात आहे. रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटापासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना आरतीच्या शेवटच्या चरणात केलेली आहे.

दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना !!

शिवाजीराजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी अठरा वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे महाराजांना प्रसाद म्हणून भेट दिली. महाराजांनी उलट भेट म्हणून (रिटर्न गिफ्ट !) पांढरा घोडा समर्थांना दिला. (या संदर्भातील थोडी वेगळी माहितीही पाहण्यास मिळते छत्रपती शिवाजी राजांनी दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी जेव्हा समर्थांना भेट दिली तेव्हा अठरा वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे आणि एक पांढरा घोडा अर्पण केले. समर्थांनी त्यांतील फक्त घोडा ठेवून इतर अठरा शस्त्रे महाराजांना परत केली अशी नोंद काही ऐतिहासिक पत्रांत मिळते. दोन्ही माहितीत फरक असला तरी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती हे तर त्या दोन्हींमध्ये नमूद आहे.

इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी म्हटले आहे, की ग.ह. खरे, वि. का. राजवाडे, ग.भा. मेहेंदळे, बाबासाहेब पुरंदरे, सेतुमाधवराव पगडी यांच्यापैकी कोणीही रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते असे म्हटलेले नाही. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यात एकमेकांबद्दल आदरभाव होता. महाराजांनी महिपतगड आणि सज्जनगड (तेव्हाचे नाव परळी) यांवर रामदासांना राहण्याची परवानगी व त्यांना शिधा उपलब्ध करून देण्याचे आदेश असलेली पत्रेही किल्लेदारांना पाठवली होती. इतिहास लेखक इंद्रजित सावंत यांच्या मते शिवाजी महाराज तेव्हाच्या स्वराज्यातील अनेक संत-महंतांचा परामर्श घ्यायचे. पाटगावचे मौनी महाराज, रामदास स्वामी, केळशीचे याकुतबाबा अशा काही संत-महंतांचा परामर्श शिवाजी महाराज घ्यायचे; तसेच, शिवाजी महाराज संत तुकाराम यांनाही भेटल्याचा उल्लेख आढळतो.

शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 आणि मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी तर रामदास स्वामींचा जन्म 24 मार्च 1608 आणि मृत्यू 13 जानेवारी 1681 रोजी झाला. त्याचा अर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी हे समकालीन होते आणि स्वामी शिवाजी महाराजांपेक्षा वयाने बावीस वर्षांनी मोठे होते. शिवाजी महाराज रामनवमी उत्सवासाठी दरवर्षी दोनशे होन पाठवत असत.

समर्थांनी गणपतीची आरती 1658 साली लिहिली व शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 1675 ला गणेशोत्सव साजरा झाला. तो महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव ! समर्थ 16 सप्टेंबर 1676 ला सज्जनगडावर वास्तव्याकरता गेले. सार्वजनिक गणेशपूजा शिवरायांच्या मृत्यूनंतर बंद पडली. ती पेशव्यांनी 1718 मध्ये पुन्हा सुरू केली. ती प्रथा 1818 पर्यंत चालू राहिली.

दसर्‍याचे सीमोल्लंघन, गणेशोत्सव व होळी हे तीन उत्सव पेशवे काळात भव्य प्रमाणात आणि मोठ्या उल्हासाने साजरे केले जात. पेशवे त्या उत्सवांचा सर्व खर्च करत असत. करमणुकीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात. त्या निमित्ताने व्यायामपटू, नर्तक, नट, गायक, शाहीर, गायक अशा कलाकारांना मानधन मिळत असे. तो गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंतचे दहा दिवस पेशव्यांच्या महालात साजरा होत असे. गणेशाची मिरवणूक निघत असे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुण्यात लोकांची गर्दी होत असे. पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा 1893 पासून आहे.

लोकमान्य टिळक यांनी उत्सव सुरू केला तेव्हा आरंभीच्या वर्षी पुण्यात तीन ठिकाणी आणि मुंबईत दोन ठिकाणी असे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले होते. प्रारंभी मंडळांच्या गणपतींच्या समोर दिवसाच्या वेळी भजनाचे कार्यक्रम आणि रात्री कीर्तने आयोजित होत असत. शाहिरांचे पोवाडे, समई नृत्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम त्यात समाविष्ट असत. जनमर्द मावळी मेळा, जना मावळी मेळा, सन्मित्र मेळा हे प्रसिद्ध मेळे होते. देशभक्तीपर गीते म्हणणारे मेळे संध्याकाळच्या वेळेत होत असत.

पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतींना अग्रक्रम असतो. पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती असे आहेत – 1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे), 2. तांबडी जोगेश्वरी गणपती (पुण्याची ग्रामदेवता), 3. गुरुजी तालीम गणपती, 4. तुळशीबाग गणपती, 5. केसरीवाडा गणपती

पुण्याच्या गणेशोत्सवातील इतर महत्त्वाचे सार्वजनिक गणपती –

  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती • मंडईचा गणपती • हत्ती गणपती • खडकमाळ • हुतात्मा बाबू गेनू

मिरवणुकीतील ढोल-ताशा पथकांचा सहभाग हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. तेथून ते महाराष्ट्रभर व आता परदेशातही पसरले आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेने ढोल-ताशा वादन आणि बरची नृत्य यांची ही आगळीवेगळी परंपरा सुरू केली.

टिळक यांनी पहिला गणेशोत्सव 1893 साली विंचुरकर वाड्यात केला. त्याला लोकोत्सवाचे रूप प्राप्त झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन केले जाते. गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातील भाविक गर्दी करतात.

– विलास पंढरी 9860613872 vilaspandhari@gmail.com

—————————————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

  1. अतिशय साक्षेपी आणि मुद्देसूद लेखन. धन्यवाद.

  2. अत्यंत रंजक आणि अभ्यासपूर्ण ऐतिहासिक माहिती ! श्री स्वामींचे महाराजांच्या प्रति असलेले जिव्हाळ्याचे संबंध छान प्रतित झाले आहेत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here