शाही दफन भूमी – खोकरी

0
49
-khokri

मुरुडवरून म्हसळा येथे जाताना चार किलोमीटरवर एका टेकडीवर खोकरी नावाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा भास मशिदी असल्यासारखा होतो. त्या वास्तू आपले लक्ष्य वेधून घेतात. पण त्या प्रत्यक्षात मशिदी नसून मुरुड संस्थानाचे राजे सिद्दी यांच्या तीन शाही कबरी आहेत.

कबरी दगडी तीन आहेत. त्या सुमारे साडेचारशे वर्ष जुन्या आहेत. सर्वात मोठी कबर सिद्दी सुरूल खान यांची आहे. जंजिऱ्याची सत्ता सुरूल खान यांच्या हातात 1708 ते 1734 या काळात होती. सुरुलखानाची कबर त्याच्या हयातीत बांधण्यात आली असे सांगण्यात येते. सुरुलखानाची कबर उंच चौथऱ्यावर आहे. तेथपर्यत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. कबरीच्या भिंतीवर दगडात जाळ्या कोरल्या आहेत. तसेच, छोटीछोटी कोष्टके बनवली आहेत. कबरीवर सर्वत्र फुलांचे कोरीव काम केलेले आहे. कबरीच्या अंतर्भागात सुरुलखान आणि त्यांचे गुरु यांचे थडगे आहे.

दुसऱ्या दोन कबरींपैकी एक कबर मुघली सत्तेचा नौदलाचा प्रमुख सिद्दी कासीम याची आहे. ती 1677 ते 1697 या काळात बांधली असावी. सिद्दी कासीम याकुतखान या नावाने ओळखला जात होता. त्याने 1670 ते 1677 आणि पुन्हा 1697 ते 1707 अशी सत्ता उपभोगली. तिसरी कबर याकुतखानाचा भाऊ खैरियातखान यांची आहे. खैरियात खान दंडा राजापुरी प्रांताचा 1670 ते 1677 या काळात प्रमुख होता. खैरियात खान जंजिऱ्याचा प्रमुख 1677 ते 1696 या काळात होता. याकुतखान आणि खैरियातखान यांच्या कबरीच्या प्रवेशद्वारावर अरबी शिलालेख कोरले आहेत. त्या शिलालेखानुसार खैरियातखानाचा मृत्यू हिजरी 1108 (सन१६९६) आणि याकुतखानाचा मृत्यू 30 जमादिलवल हिजरी 1118 (सन 1707 ) रोजी झाला.

सुरुलखानाच्या कबरीच्या देखरेखीसाठी दोन हजार रुपये वार्षिक महसूल असलेले सावळी-मिठागर, याकुतखान आणि खैरियातखान यांच्या कबरीच्या देखभालीसाठी दोडाकल गावाचा महसूल नवाबाने लावून दिला होता. त्या तीन कबरींच्या आजूबाजूला अनेक कबरींचे दगड पसरलेले आहेत. कबरीच्या परिसरात मशिदीसुद्धा आहेत. तसेच, रस्त्याच्या आजुबाजूला अजून एक कबर आहे, पण ती कोणाची आहे हे समजलेले नाही.

– संकलन ­
(भारत इतिहास संशोधन मंडळ,पुणे यांच्या फेसबुकवरुन, संपादित -संस्कारित)

About Post Author