व्हिक्टोरिया – मुंबईची शान

1
37
carasole

तसे पाहिले तर मुंबईचा इतिहास हा चार-पाचशे वर्षांचा. उत्तम सोयीचे एक नैसर्गिक बंदर एवढीच तिची ख्याती होती. उत्तरेतील शहरांसारखे प्राचीन ऐतिहासिक वैभव नसतानाही, एकाचवेळी भिन्न प्रकृती-संस्कृतीच्या, अठरापगड जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, सुखनैव नांदणारे, व्यापारउद्योगधंद्याचे धाडसी नेतृत्व करणारे, सार्वजनिक हिताची कळकळ असणारे, शेजारधर्म जागवणारे, कलापारखी सुसंस्कृत बुद्धिमंतांचे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मागाल ते देणारे, जागेपणी स्वप्नपूर्ती करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव शहर म्हणून मुंबई घडत गेली.

या मुंबई शहराने स्वत:ची संस्कृती निर्माण केली. त्यातील वेगळे असे वैशिष्ट्य टिकवून आहे ती म्हणजे ‘व्हिक्टोरिया’ किंवा मुंबईची आबालवृद्धांची आवडती घोडागाडी!

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईतील प्रवासी वाहतूक ही प्रामुख्याने रेकला (छकडा), बग्गी (टांगा) व पालखीतून तर मालवाहतूकही हातगाडीवरून होत असे. १८७२ सालच्या सरकारी नोंदीनुसार मुंबईत त्यावेळी परवानाधारक पाचशेपंचावन्न रेकले, चार हजार आठशेसोळा हातगाड्या व सातशेपंधरा टांगे किंवा बग्ग्या होत्या. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘बॉम्बे ट्राम वे कंपनी’ने मुंबईत घोड्यांनी ओढायची ट्राम चालू केली. कुलाबा येथे कंपनीचे प्रशासकीय मुख्य कार्यालय व घोड्यांचे मोठे तबेले होते. भायखळा येथे राणीच्या बागेसमोर आणि गिरगावात ठाकूरद्वार येथेही सरकारी तबेले होते. चर्नीरोड स्टेशनसमोर ‘ताराबाग इस्टेट’मध्ये स्कॉट नामक ब्रिटिशाच्या मालकीचे घोड्यांचे तबेले होते व बाहेरच्या बाजूस कोच तयार करण्याची फॅक्टरी होती. ‘बॉम्बे ट्राम वे कंपनी’च्या मालकीचे जवळजवळ एक हजार घोडे होते. ट्रामल जोडलेल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी कंपनीने परळ नाक्यावर पोयबावडी, म्हणजेच पाण्याच्या पाण्याची विहीर बांधली होती.

मुंबईच्या रस्त्यांवर १८८२ मध्ये प्रवासी वाहतुकीसाठी पहिली ‘व्हिक्टोरिया’ आली. त्याचे श्रेय बेवर या स्थानिक माणसाला जाते. त्याचबरोबर घोडागाडीला व्हिक्टोरिया हे नाव कसे पडले याविषयी मनोरंजक माहिती मिळते.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टांगा (स्थानिक व इंग्रज लोकांच्या भाषेत बग्गी) हे प्रवासी वाहतुकीचे मुख्य साधन होते. बग्गी किंवा टांगा या दोन चाकी वाहनात प्रवाशांना वाहकाच्या म्हणजे टांगेवाल्याच्या शेजारी बसावे लागे. घोड्याच्या मागच्या बाजूने उंच पॅडलवर पाय देऊन टांग्याच्या पुढच्या जागेत शिरण्यास किंवा बाहेर येण्यास अडचण येत असे, आरामदायक प्रवास होत नसे. चार आणे प्रती मैल भाडे होते. सधन लोक, ब्रिटिश अधिकारी त्यातून प्रवास करण्यास नाखूश असत. या सर्व अडचणी, गैरसोयींचा विचार करून फ्रान्समध्ये १८६० च्या दरम्यान घोडागाडीचे एक नवीन मॉडेल बनवण्यात आले. इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेर्ल्सने १८६९ साली नवीन रूपातली घोडागाडी फ्रान्समधून इंग्लंडला आयात केली. इंग्रज आणि फ्रेंच लोक यांचे संबंध विशेष चांगले नव्हते. फ्रेंच कारागिरांनी घोडागाडीच्या या नवीन मॉडेलचे नाव उपहासाने ‘व्हिक्टोरिया’ असे ठेवले. इंग्रजी भाषेत १८७० पर्यंत घोडागाडीसाठी व्हिक्टोरिया हा शब्द नव्हता. या नवीन मॉडेलच्या व्हिक्टोरियात घोड्याला जोडलेल्या गाडीची उंची कमी करण्यात आली. प्रवाशांना रस्‍त्‍यापासून फूटभर उंच असलेल्या फूटबोर्डवर (पायरीवर) पाय ठेवून सहजगत्या बसता येत असे. समोर घोड्यांच्या दिशेने तोंड असलेली, दोन प्रवाशांसाठी, चामड्याचे आवरण असलेली, लोखंडी सीट किंवा बैठक देण्यात आली. ड्रायव्हर किंवा गाडीच्या वाहकाची सीट लोखंडी फ्रेमच्या साहाय्याने बरीच उंच करण्यात आली. त्यामुळे दुरूनही व्हिक्टोरिया दृष्टीस पडत असे. या नवीन फॅशनच्या गाडीचे व्हिक्टोरिया याच नावाने उत्स्फूर्त स्वागत झाले. विशेषत: स्त्रिया व सधन कुटुंबातील लोक रोज सायंकाळी व्हिक्टोरियातून फेरफटका मारण्यास जाऊ लागले.

पुढील दोन-तीन वर्षांतच १८७२ पासून इंग्लंडमधील व्हिक्टोरिया मुंबईत दाखल झाली. मुंबईतही व्हिक्टोरियाचे भरघोस स्वागत झाले. मुंबई गॅझेटच्या अनुसार १९०८ मध्ये एक हजार पाचशेचाळीस नोंदणीकृत व्हिक्टोरिया मुंबईत प्रवासी वाहतूक करत होत्या. प्रत्येक नोंदणीकृत व्हिक्टोरियाला वर्षाला त्रेसष्ट रुपये व्हील टॅक्स भरावा लागे. याशिवाय पोलिस परवाना, वाहकाचा दंडावर लावायचा बॅच, पत्र्याची नंबर प्लेट व प्रवासाचे दरपत्रक यासाठी वेगळे पैसे द्यावे लागत. बहुतेक व्हिक्टोरियांचे चालक हे मुस्लिम होते. गुजराती बनिए व पारशी यांच्याही मालकीच्या काही व्हिक्टोरिया होत्या. परंतु त्यांचे वाहक किंवा चालक हे मुस्लिम होते. रेकल्याचे (खटारा) मालक हे बहुसंख्येने मुस्लिम व भंडारी हिंदू होते तर हातगाड्यांचे मालक व चालक हे देशावरचे (घाटावरचे हिंदू), बनिया, लोहाणा व मुस्लिम होते. बहुसंख्य व्हिक्टोरियाचालक व्हिक्टोरिया भाड्याने घेऊन वर्षाकाठी चारपाचशे रुपये कमावत.

इतरत्र टांग्याला किंवा बग्गीला लहान अंगचणीचे तट्टू जोडलेले असत. व्हिक्टोरियाला मात्र अरबी पैदाईशीचे, मजबूत अंगकाठीचे अरबी घोडे जोडले जात. व्हिक्टोरिया हे प्रवासी वाहन आहे, हे जनतेला समजण्यासाठी त्याच्या लाकडी फ्रेमला काळे, पिवळे पट्टे मारलेले असत. या व्हिक्टोरियाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण असे. मजबूत लोखंडी फ्रेमला बाभळी व  सागाच्या लाकडी पट्ट्या मारलेल्या असत. वाहकाची उंच लाकडी सीट एखाद्या सिंहासनाप्रमाणे भासे. त्याच्या शेजारच्या रिकाम्या प्रवासी सीटवर बहुधा कुटुंबातील लहान मुलांना हौसेने बसवले जाई. घोडेवाल्याच्या मागच्या जागेत तीन प्रवासी आरामात बसू शकत. सीटच्या मागचे काळे छप्पर केवळ पावसातच उघडले जात असे. या व्हिक्टोरियात बसून सैर करण्यात एक वेगळीच गंमत असे. घोडेवाल्याच्या दोन्ही बाजूंना तेलाचा मिणमिणता कंदील असे. चालकाकडे सहा फूट लांब वेताचा चाबूक असे. पूर्वी दहा-बारा वर्षांची लहान मुले, छपराच्या मागे असलेल्या दांडीला धरून मागे लटकत फुकट प्रवास करत. अशा वेळी तो घोडेवाला मुलांना उलटा (पीछे) चाबूक मारत असे. त्याच्या पायाशी सामान ठेवण्यासाठी जागा असे. ट्रंका, वळकट्या तेथे ठेवल्या जात. या सीटच्या खालच्या बाजूला, मोकळ्या जागेत पोत्याच्या साहाय्याने गवताच्या पेंड्या ठेवल्या जात. मुंबईतील चाळींतून, वाड्यांतून सार्वजनिक होळी पेटवली जात असे. त्या होळीत जाळण्यासाठी लागणारे गवत, मुले याच व्हिक्टोरियातून चोरत असत.

मुंबई शहर १९१० नंतर उत्तरेच्या दिशेने वाढू लागले. मुंबईची लोकसंख्या, पर्यटकांचा लोंढाही वेगाने वाढू लागला. व्हिक्टोरिया हे प्रवासी वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले. त्या काळी मुंबई सेंट्रलला माधव मिल परिसरात (सध्या तेथे नवजीवन सोसायटी उभी आहे.) व्हिक्टोरियांचे म्‍हणजे घोडे, घोड्यांच्या गाड्या, गवताच्या पेंड्या, घोड्यांचे चाबूक, कंदिल (दिवे), लगाम, खोगीर, रिकिब, छप्पर यांचा मोठा बाजार होता. बेलासिस रोडवर, अलेक्झांड्रा थिएटरपासून बेलासिस रेल्वे पुलापर्यंत घोड्यांचे पंचवीस ते तीस तबेले होते. तेथे अत्यंत अस्वच्छ आणि बकाल जागेत एकेका तबेल्यात सत्तर-ऐंशी घोडे ठेवलेले असत. तेथे सर्वत्र चिखल, घाण, कुजलेले गवत, घोड्यांच्या मलमूत्राची दुर्गंधी, डासांचे साम्राज्य असे. हे घोडेवाले त्याच तबेल्यावरील अपुऱ्या कोंदट जागेत राहत. सतत मच्छर चावत असल्याने त्यांना गजकर्ण, खरूज, नायटा यांसारखे चर्मरोग होत असत. ते सतत अंग खाजवत असत. म्हणून लोक त्यांना उपहासाने ‘ए गजकरण’ असे संबोधत. तबेल्यात सर्वत्र चिखल व गवत पडले असल्याने हे लोक आखूड तुमान किंवा विजार घालत. त्यामुळे एखाद्याने लांडी म्हणजे कमी उंचीची पॅण्ट घातली, की त्याला ‘ए टांगेवाला’ असे चिडवले जाई. हे गरीब मुस्लिम घोडेवाले व्हिक्टोरिया भाड्याने घेऊन चालवत. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी गुंडांनी बॉम्बे सेंट्रलचा एक मोठा तबेला जाळून टाकला होता. त्यात अनेक घोडे मेले होते. लॅमिंग्टन रोडवर, घासगल्लीत घोड्यांना लागणाऱ्या गवताच्या पेंड्याचा घाऊक बाजार होता. मुंबईत होळीसाठी लागणाऱ्या गवताच्या पेंड्या लोक तेथूनच खरेदी करत असत. बाहेर रस्त्यावर व्हिक्टोरियाचे कंदील (दिवे), लगाम, खोगीर, घुंगरांच्या माळा, नाल, रिकीब, चाबूक आदी विकणारी दुकाने होती. घासगल्लीच्या बाजूच्या कोपऱ्यावर मोक्याच्या जागी पंधराशे यार्डाचा छोटासा घोड्यांचा तबेला होता. पुढे त्या जागेतच -१९३२ च्या आसपास – सातशे आसनक्षमता असलेले मिनर्व्हा थिएटर उभे राहिले.

व्हिक्टोरिया प्रवासी वाहन असले तरी त्याचे भाडे मध्यमवर्गीय खिशाला परवडणारे नव्हते. टॅक्सीसारखे व्हिक्टोरियाला मीटर नव्हते. त्यामुळे त्या घोडेवाल्याशी घासाघीस करूनच भाडे ठरवावे लागे. पर सीट व सामानाप्रमाणे भाडे आकारले जात असे. ते सुद्धा गिरगावातील घरापासून भाऊचा धक्का, बोटीतून गावाला जायला व यायला किंवा बोरीबंदरला, रेल्वेने बाहेरगावी जायला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे टॅक्सीपेक्षा व्हिक्टोरियात माणसे व सामान खच्चून भरता येत असे. व्हिक्टोरियाला हॉर्न नव्हता. घोडेवाल्याचे तोंड म्हणजेच व्हिक्टोरियाचा हॉर्न. तो तोंडाने ‘साईस साईस’ (म्हणजे साईड साईड) किंवा ‘बाजूऽऽ बाजूऽऽ’ असे ओरडत असे. बऱ्याच वेळा हे घोडेवाले एखाद्या हॉटेलबाहेर रस्त्यावर व्हिक्टोरिया थांबवून गिऱ्हाईकांची प्रतीक्षा करत. तेथे उभे राहण्यावरून घोडेवाले व हॉटेलमालक यांच्यात भांडणे होत. कारण एका ठिकाणी उभे राहिल्यावर घोडे तेथेच मलमूत्रविसर्जन करत. त्यामुळे दुर्गंधी पसरून घोड्याच्या लिदीमुळे डांबरी रस्ता निसरडा होत असे. जाणारे येणारे, पादचारी, सायकलस्वार त्यावरून घसरून पडत. पूर्वी म्युनिसिपालिटीचे लोक रात्री टँकर आणून रोज रस्ते धुऊन काढत असत.

या व्हिक्टोरियावाल्यांचे खरे आश्रयदाते म्हणजे विलासी, रंगेल, ऐय्याश राजे-महाराजे-नवाबजादे, शेठ, सावकार, जमीनदार व गर्भश्रीमंत धनिक मंडळी! रात्री यांचा दिवस उजाडत असे. लखनवी कुर्ता, पायजमा, शेरवानी, जॅकेट घालून मनगटाभोवती मोत्यांसारखा मोगऱ्याचा गजरा गुंडाळून, मघई पानाची जोडी चघळत व्हिक्टोरियातून त्यांच्या लवाजम्यासह मंडळी ग्रँट रोडच्या पवनपुलाखाली (आताचा केनेडी ब्रिज) अथवा फोरास रोडला बच्चूभार्इंच्या वाडीत नायकिणीच्या कोठ्यावर गाणे बजावणे ऐकण्यास नियमित जात.

व्हिक्टोरियातील ‘ए दिल, है मुश्कील जीना यहाँ | जरा हटके जरा बचके यह है बम्बई मेरी जान’ हे प्रसिद्ध गाणे असलेला चित्रपट होता सीआयडी. जाली नोट, श्रीमान सत्यवादी या चित्रपटांतही व्हिक्टोरियाचे दर्शन घडले होते. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्हिक्टोरिया नं. २०३ चित्रपटामध्येही मुंबईतील व्हिक्टोरिया पाहायला मिळाली होती.

गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून मुंबईत आमूलाग्र बदल होऊ लागला. लोकसंख्या व वाहनसंख्या प्रचंड वेगाने वाढू लागली. रस्त्यावरील रहदारीवर प्रचंड ताण पडू लागला. राहत्या जागेची टंचाई वाढू लागली. त्याचा परिणाम व्हिक्टोरियावाल्यांच्या धंद्यावर होऊ लागला. तबेल्यांमधून स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्यामुळे १९७४ नंतर मुंबई महानगरपालिकेने घोड्यांच्या तबेल्यांना परवाने देणे बंद केले. रहदारीला अडथळा येतो म्हणून मुंबईतील अनेक रस्ते व्हिक्टोरियाच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. जुन्या, मोडकळीला आलेल्या, मोक्याच्या जागी वसलेल्या तबेल्यांच्या जागेवर अतिक्रमण होऊन तेथे इमारती उभ्या राहू लागल्या. व्हिक्टोरियांची संख्या रोडावू लागली. ज्या दोन-चारशे व्हिक्टोरिया मुंबईत शिल्लक होत्या त्यांनी त्यांची भाडी प्रचंड वाढवली. नोकरदार मंडळींना ती परवडण्यासारखी नव्हती. हौशी पर्यटकांवरच व्हिक्टोरियाचा धंदा चालू होता. याच दरम्यान प्राणीमित्र संघटना अस्तित्वात आल्या. त्या प्राण्यांच्या जीविताची सुरक्षा व काळजीविषयक केलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही ते पाहू लागल्या. त्यासाठी कोर्टात न्यायालयीन लढाई देऊ लागल्या. पोलिसी कारवाया करू लागल्या.

हे गरीब, अशिक्षित व्हिक्टोरियावाले घोड्यांना निष्ठूरतेने वागवत. घोड्यांना उन्हातान्हात, पावसांत त्यांच्याकडून सोळा सोळा तास काम करून घेत. अत्यंत घाणेरड्या तबेल्यात त्यांना डांबून ठेवत. घोड्यांच्या जखमांना मलमपट्टी करणे तर सोडाच; पण त्यांची कधी साधी वैद्यकीय तपासणीही करत नसत. जखमी, आजारी घोडे धावताना कधी कधी मुंबईच्या रस्त्यावर मूर्छित पडत. त्यामुळे प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सरकारी कार्यवाही होण्यास सुरुवात झाली.

नागपंचमीला नागाला दूध पाजणारे गारूडी, मांग, अस्वलवाले दरवेशे, माकडवाले बंद झाले. भायखळ्याच्या राणीच्या बागेतील हत्ती, घोडे, उंटावरची रपेट बंद झाली. सर्कशीतील प्राण्यांच्या खेळावरही बंदी आली. प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाचे निवारण हे व्हायलाच पाहिजे; याविषयी दुमत होणार नाही. पण त्याचबरोबर हे प्राणी मात्र आपल्यापासून विशेषत: बालगोपाळांपासून दूर जात आहेत, ही वस्तुस्थितीसुद्धा जाणून घेतली पाहिजे. सध्या चालू असलेला न्यायालयीन लढा घोडेवाल्यांच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे वर्षभरात मुंबईची एतिहासिक व्हिक्टोरियाही बंद होणार आहे. परंतु एखादी सेवासुविधा योग्य प्रकारे राबवली जात नाही म्हणून ती बंदच करून टाकणे कितपत योग्य आहे? मूक प्राण्यांची योग्य काळजी घेऊन मुंबई शहराच्या या जुन्या परंपरा, रुढी, वैशिष्ट्ये जपायला काय हरकत आहे? आम्ही घोडा, घोडागाडी व घोडेवाला ‘गजकरण’ जवळून पाहिला. आज, २०१५ सालच्या पुढच्या पिढीला तो केवळ चित्रात पाहायला लागू नये. ‘व्हिक्‍टोरिया’ ही मुंबईची शान आहे, ऐतिहासिक वारसा आहे. तो टिकवायची आपणा सर्वांची जबाबदारी नाही का?

– अरुण पुराणिक

(सर्व छायाचित्रे – अरुण पुराणिक)

(श्री आंतरराष्ट्रीय दीपलक्ष्मी जुलै २०१५ वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleचिंचवडचा श्री मोरया गोसावी
Next articleअडकित्ता – पानाच्‍या तबकाचा साज
अरुण पुराणिक हे 'रिलायन्‍स' कंपनीतून उपाध्‍यक्ष पदावरून निवृत्‍त झाले. ते सध्‍या 'टाटा पॉवर'मध्‍ये सल्‍लागार म्‍हणून कार्यरत आहेत. पुराणिक 1986 सालापासून वर्तमानपत्रे-साप्‍ताहिके यांमधून सातत्‍याने लेखन करतात. ते चित्रपट, संगीत, मुंबईतील जुनी स्‍थळे अशा विविध विषयांचा शोध घेऊन लेखन करतात. त्‍यांचे दीड हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले असून 'सरगम', 'अनसंग हिरोज', 'हमारी याद आयेगी', 'मुंबई टॉकिज' अशी पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यांनी 'सिनेमाची शंभर वर्षे', 'सिनेमा आणि मुंबई शहर' अशा विषयांवरील फोटो, पोस्‍टर्स, लॉबी कार्ड, पुस्‍तीका यांची प्रदर्शने भरवली आहेत. अरुण पुराणिक यांच्‍या कुटुंबाला संगीताची पार्श्‍वभूमी आहे. त्‍यांचे आजोबा पंढरपूरकर बुवा हे 'गंधर्व नाटक कंपनी'त मुख्‍य गायक म्‍हणून कामास होते. त्‍यांनी अभिनेत्री शांता आपटे यांना शास्‍त्रीय संगीताचे धडे दिले होते. लेखकाचा दूरध्वनी 9322218653

1 COMMENT

Comments are closed.