विद्यादात्या विद्या धारप

carasole

विद्या धारप या सेवानिवृत्त क्‍लार्क. निवृत्तीनंतर त्या स्वतःचा वेळ सत्कारणी लागावा आणि इतरांनाही त्याचा फायदा व्हावा या हेतूने काम पाहू लागल्या‍. त्या शोधात त्या येऊन पोचल्या  कल्या‍णच्या डंपिंगग्राऊंड शेजारच्या अण्णाभाऊ साठेनगरच्या झोपडपट्टीत. तेथे कचरा वेचणारे लोक राहतात. धारप यांनी तेथील कच-याचे ढिग, वाहणारी गटारे, प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी अशी हलाखीची परिस्थिती पाहिली. तेथे शिक्षणाविषयी कमालीची अनास्था असल्याचे त्यांना जाणवले. शिक्षणाचा गंध नसलेल्या त्या वस्तीत धारपांनी विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासवर्ग’ घेणे सुरू केले. गेली आठ वर्षे त्यांचे विद्यादानाचे कार्य अथकपणे सुरू आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून त्या झोपडपट्टीत घडत असलेला बदल नोंद घेण्याजोगा आहे. मात्र तो बदल समजून घेण्यासाठी तेथील पूर्वस्थिती जाणून घेणे आवश्यक ठरते.

कल्याण हे ऐतिहासिक शहर. आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करणारे! मात्र कोणत्याही विकसित अथवा विकसनशील शहरात आढळणारे अरुंद रस्ते, बगिचे-मैदाने यांची दुरावस्था-अस्वच्छता, सांडपाण्याचे अपूरे व्यवस्थापन, कच-याचे ढीग असे चित्र कल्याणमध्येही पडते.

शहरातील लोकवस्ती डंपिंग ग्राऊंडसारख्या परिसरापासून दूर वसली आहे. मात्र परिस्थितीने पिचलेले काही मानवी समूह कच-याच्या त्या अवाढव्य ढिगाशेजारी झोपड्या बांधून जगण्याची धडपड करत आहेत. त्यांच्या जीवनाचा दर्जादेखील असा, की त्यांना दोन वेळच्या जेवणाशिवाय इतर कशाचीही जाणीव नाही.

आधारवाडीच्या डंपिंग ग्राऊंडच्या म्हणजेच टेकडीच्या पायथ्याशी अण्णाभाऊ साठेनगरची वस्ती आहे. तेथे शंभर कुटुंबे राहतात. डंपिंग टेकडीच्या पायथ्याशी सुरुवातीला भंगार विकत घेणा-या दलालांची दुकाने व नंतर अरुंद रस्त्याच्या बाजूला झोपड्यांची गर्दी आहे. महाराष्ट्रात १९७२ साली दुष्काळ पडला होता. लातूर जिल्ह्यातील मातंग, महार समाजाची कुटुंबे काम शोधत कल्याणात आली. ती लालचौकीतील गणेशमंदिरामागे स्थायिक झाली. नगरसेवकांच्या वा इतरांच्या प्रयत्नाने त्यांना तेथून हुसकावण्यात आले. पण तोपर्यंत त्यांना कच-याच्या ढिगावर काम मिळू लागले होते. कच-यातील कागद, प्लॅस्टिक, भंगार इत्यादी वस्तू निवडायच्या, त्या वेगळ्या करायच्या, भंगाराच्या दलालाला विकायच्या असे काम करून त्यांचा रोजंदारीचा प्रश्न सुटला. गणेशमंदिरामागून हुसकावल्यानंतर त्यांच्या झोपड्या डंपिंग ढिगा-याच्या बाजूलाच उभ्या राहिल्या. त्या लोकांनी तेथे साठेनगर उभे केले. तेथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा आहे.

त्या वस्तीतील कुटुंबातील प्रत्येक सदस्य भंगारातून प्रत्येकी दोनशे ते तीनशे रुपये दिवसाला कमावतो. हाती आलेल्‍या पैशामुळे दारू पिण्याचे प्रमाण वाढले.  पैसा जुगार वा दारूत रोजच्या रोज उडवला जातो. त्या उद्योगामुळे वस्तीतून शाळेत जाणा-या मुलामुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. वस्तीतील आठ-दहा वर्षे वयाच्या मुलामुलींच्या अंगावर कपडे नसत. पंधरा-सोळा वर्षांच्या काही मुलीही अर्धनग्न अवस्थेत राहत, वयात आलेल्या मुलींचा प्रश्न बालविवाहाने सोडवला जाई. अंगात ‘देवी’’ आली असे लोकांना सांगून, बुवाबाबांकडून मार दिला जाई. भारत २०२० मध्ये महासत्ता बनणार ह्या वल्गना करणा-या भारतात २०१४ साली मुंबई महानगरीजवळ ही परिस्थिती होती. विद्या धारप यांनी ती परिस्थिती बदलण्यासाठी तेथील मुलामुलींना शिक्षणाची ओळख होणे गरजेचे आहे हे ओळखत जुलै २००७ पासून तेथे काम सुरू केले. त्यांनी सर्वप्रथम वस्तीतील मुलामुलींना महानगरपालिकेच्या शाळेत पाठवण्यास सुरुवात केली. सोबत विद्यार्थ्यांसाठी वस्तीत अभ्यास वर्ग घेणे सुरू केले. त्या भाषा, इंग‘जी, गणित या विषयांबरोबर इतर सर्व शैक्षणिक विषयही शिकवू लागल्या. विद्या धारप तेथील मुलांच्या ‘धारप मॅडम’ झाल्या. ज्या वस्तीत बाहेरची माणसे नाक दाबून फिरत, त्या वस्तीत धारपमॅडम रोज दुपारी ४:०० ते ७:०० या वेळेत अभ्यासवर्ग घेऊ लागल्या. आजही घेतात.

धारप यांचा अभ्यासवर्ग झोपडपट्टीतील एका छोट्या पत्र्याच्या झोपडीत चालतो. त्या स्‍वतः व आता तयार झालेले त्यांचे इतर आठ सहकारी दररोज घरोघरी जाऊन मुलांना बोलावून आणतात. अभ्यासवर्गात पंधरा ते वीस मुलेमुली अभ्यास करत असतात. आजुबाजूची दुर्गंधी, इतस्तत: फिरणारी नग्न लहान मुलेमुली, तेथे चालणारे दारू आणि जुगारांचे अड्डे अशा वातावरणात तो वर्ग चालत असतो. वर्ग चालत असलेल्या झोपडीची जमिन घुशींनी पोखरून काढलेली आहे. त्यांनी त्याबाबत तेथील नगरसेवकाकडे विनंती करून जमिनीची साधारण दुरूस्ती करून देण्याची विनंती केली. मात्र त्यांना मदत मिळाली नाही. वस्तीशेजारी असलेल्या शशांक विद्यालयाचे प्राचार्य शेवाळे यांनी धारप यांच्या प्रयत्नांना मदत म्हणून त्यांच्या शाळेतील एक खोली देऊ केली. धारप यांचा वर्ग सध्या त्या ठिकाणी सायंकाळी चार ते साडेसहा या वेळात भरतो.

विद्या धारप या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून (RBI) अधिकारी म्हणून २००२ साली सेवानिवृत्त झाल्या. त्यांना तीन मुले. मुलगा परदेशात इंजिनिअर आहे. दोन मुलींची लग्ने‍ झाली असून त्या ठाण्यात वकील आणि इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. विद्या धारप कल्याणमधील सुखवस्तू गृहसंकुलात राहतात. त्यांनी निवृत्तीनंतर घरच्या जबाबदा-या पूर्ण केल्या आणि सामाजिक कामामध्ये गुंतण्याचे ठरवले. त्यावेळी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता अरूण देशपांडे याने विद्या धारप यांना साठेनगरात आणले. त्याच्या व संघाच्या कार्यकत्यांच्या सहकार्याने धारप यांनी झोपडपट्टीत वर्ग सुरू केले.

विद्या धारप २००७ सालापासून नियमितपणे वर्ग घेतात. मुलांना वर्गात पाठवण्‍याकरता त्‍यांना त्‍यांच्‍या पालकांशी अनेकवेळा संवाद साधावा लागला. त्‍या संवादाचा परिणाम त्‍या लोकांच्या जीवनमानावर होऊ लागला असल्‍याची उदाहरणे दिसू लागली. ती अशी, की  आता त्या वस्तीत मुलेमुली नग्न-अर्धनग्न अवस्थेत फिरत नाहीत. तेथील बालविवाहाचे प्रमाण कमी झाले आहे. घुले नावाचा मुलगा २०१३ साली दहावी पास झाला. तो त्या वस्तीतील पहिला दहावी उत्तीर्ण विद्यार्थी. मात्र यशाचा हा आलेख फारच कमी वेळा उंचावतो असे धारप यांच्या बोलण्यातून जाणवते. त्या म्हणतात, की आमच्या धडपडीमुळे तेथील नागरिकांच्या विचारात बदल घडत असल्याचे दिसून येते. पूर्वी मुलांना वर्गात पाठवण्यायस नाखुष असलेले पालक आता मुलांना स्वतःहून वर्गात जाण्यास सुचवतात. मात्र मुलांमध्ये अभ्यासाची गोडी नाही. आठ वर्षांनंतरही मुले स्व‍तःहून वर्गात येत नाहीत. त्यांना घरी जाऊन बोलावून आणावे लागते. सरकारचे मुलांना नापास न करण्याचे धोरण आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील मुलांमध्ये, ते शाळेत न गेल्यास त्यांचे काहीच नुकसान होणार नाही अशी भावना आहे. ती मुले तसे बोलूनही दाखवतात. धारप यांना सरकारचे ते धोरण चुकीचे वाटते. एका सार्वजनिक कार्यक्रमानंतर धारप यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तसा प्रश्नही केला होता. त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. धारप यांच्या‍ वर्गात अद्याप असे विद्यार्थी आहेत, की ज्यांना अक्षराला लागणारा काना आणि वेलांटी यातील फरक समजत नाही. त्या मुलांना अक्षरांची ओळख करून देण्यासाठी धारप आणि त्यांच्या सहका-यांना फार प्रयत्न करावे लागतात.

धारप यांचे काम पाहून अनेकजण त्यांना मदत करण्यास पुढे येतात. तशा लहानमोठ्या मदतींमधून धारप यांनी त्या मुलांच्या काही सहली काढल्या आहेत. मुंबईतील सेवासहयोग नावाची एक संस्था प्रत्येक शै‍क्षणिक वर्षाच्या सुरूवातीला तेथील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करते. दहावीला बसणा-या विद्यार्थ्यांसाठी धारप वेगळा क्लास लावतात. मात्र अशा सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही मुले शिकत नसल्याचे निरीक्षण धारप नोंदवतात.

विद्या धारप यांनी त्या‍ झोपडपट्टीतील अभ्यासवर्गास वाहून घेतले आहे. एरवी त्यांच्या मदतीस येणा-या व्यक्ती पावसाळ्यात झोपडपट्टीत घाण झाल्यानंतर तेथे येण्यास कचरतात. मात्र विद्या धारप न चुकता वर्गाच्या वेळेस तेथे हजर असतात. धारप मुलामुलींना एखादा विषय कठीण जात असेल तर त्यांची तयारी करून घेण्यासाठी त्यांना स्वत:च्या घरी घेऊन जातात. त्यांची ती चोवीस तासांची सामाजिक कार्याची तळमळ कोणालाही थक्क करेल अशी आहे.

विद्या धारप  9820117159
vvdharap@gmail.com

– श्रीकांत पेटकर

Last Updated On – 9th March 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. खरंच महाश्वतादेवी यांच काम
    खरंच महाश्वतादेवी यांच काम महाराष्ट्रात चालते हे विद्यां धारप यांनी दाखवून दिले आभार

Comments are closed.