वाल्मिकीचे पठार – पानेरी

वाल्मिकी पठार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या पठारावर वाल्मिकी ऋषींनी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. तेथील वाल्मिकी मंदिर पूर्वाभिमुख असून, वाल्मिकींची मूर्ती गर्भगृहात आहे. त्या भागाचे आणखी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे वन्य जीवांचा अधिवास असलेले घनदाट जंगल…

सातारा जिल्ह्यातील वाल्मिकी पठार, तेथे जाण्यासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलजवळून पश्चिमेला जाणाऱ्या रस्त्याने ढेबेवाडी आणि तेथून सणबूर असा मार्ग आहे. त्या भागात रस्त्याला दोन्ही बाजूंना डोंगर दिसतात. तेथे प्रामुख्याने सागाची झाडे आहेत. उजव्या हाताला वांग नदी आहे. सणबूरपासून घाटातून चढ चढावा लागतो. त्यावेळी दिसणारे डोंगरदऱ्यांत लपलेले निसर्गसौंदर्य अपूर्व आहे. सणबूरकडे येत असताना डाव्या हाताला ढेबेवाडीच्या पुढे डोंगरावरील प्रसिद्ध देवस्थान नाईकबाला जाण्याचा रस्ता लागतो. एकनाथ महाराजांचे नातू उद्धव महाराज यांनी त्या देवस्थानाला येऊन दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. उद्धव महाराजांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील बुवांचे वाठार येथे आहे.

वाल्मिकी पठारावरील वाल्मिकी मंदिराला जाण्यासाठी सणबूरपासून पुढे मंदिरापर्यंत डांबरी रस्ता आहे. नाईकबा मंदिराच्या पठारापासून थोड्याशा कच्च्या रस्त्यानेही तेथे जाता येते. सणबूर ते वाल्मिकीचे पठार हे अंतर बावीस किलोमीटर आहे. तो घाट चढताना प्रथम एका पोलिस चौकीजवळ थांबावे लागते, कारण तो भाग शासनाने व्याघ्र प्रकल्पासाठी संरक्षित केलेला आहे. तेथून थोड्याच अंतरावर दुसऱ्या चौकीजवळ थांबून नोंद करावी लागते. तेथून पाचपंचवीस पावलांवर जुने-पुराणे वाल्मिकी मंदिर आहे. तेथूनच जंगलाचा बफरझोन सुरू होतो. त्यामुळे वनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. त्या जंगलात हिंस्त्र जनावरे आहेत.

वाल्मिकी ऋषी वाल्मिकी पठारावर राहिल्याचे सांगितले जाते. मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे. वाल्मिकींची मूर्ती गर्भगृहात आहे. काहींच्या मते, ती शक्तिदेवतेची मूर्ती आहे. तेथे महादेवाचेही स्मरण केले जाते. मंदिराच्या समोर, थोड्या उतारावर महादेवाची पिंड असलेले छोटे मंदिर आहेच. देवळाच्या सभामंडपात भिंतींवर वेगवेगळी भित्तिचित्रे रंगवलेली दिसतात. त्यांचा रंग कालौघात कमी होत आहे. मंदिरात आधुनिक वातावरण जाणवत नाही, परंतु कळस नव्याने उभारलेला असावा. तो रंगवलेला आहे. मंदिराच्या समोर एक झाड आहे. ते फार जुने वाटत नाही. पण वाल्मिकी मंदिराच्या दर्शनानंतर त्या झाडापाशी येऊन दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. प्रामुख्याने स्त्रिया त्या झाडाजवळ जाऊन प्रदक्षिणा घालून, पाच छोट्या दगडांचा मनोरा करून ठेवतात.

त्या भागाचे आणखी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे, वन्य जीवांचा अधिवास असलेले घनदाट जंगल. तेथून साधारण सांगली जिल्ह्यातील चांदोली जंगलाची हद्द लागते. त्या जंगलात गवे, अस्वले आणि बिबटे वावरत असल्याचे सांगतात. तेथून साधारणपणे तीस ते पस्तीस किलोमीटरवर प्रसिद्ध असा कंधारचा डोह आहे. तेथपर्यंत पायी जावे लागत असल्याने, ते एक आव्हानच असते. त्या जंगल परिसरात पाथरपुंज गाव असून तेथे वारणा नदीचा उगम आहे.

 प्रल्हाद कुलकर्णी 8830072503

drpakull@yahoo.com  

———————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here