लाला लजपतराय, लेखक कसे होते? (Lala Lajpat Rai As Writer)

1
56

लाला लजपत राय
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील लाल-बाल-पाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल. सर्व भारत ह्या त्रिमूर्तीच्या रूपाने – पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल – एकत्र आला होता असा संदेश देण्याचा प्रयत्नही त्यामागे असतो. हे तिघे स्वातंत्र्यलढ्यातील जहाल पंथी असे होते. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेल्या ग्रंथांची माहिती मराठी वाचकांना असते, परंतु लाला लजपत राय यांच्या लेखनाची माहिती कमी ऐकू येते. लाला लजपत राय यांच्या नावावर सहा पूर्ण पुस्तके आहेत. ती त्यांनी 19081928 या काळात लिहिली. त्यांच्या ग्रंथलेखनाची सुरुवात ज्या पुस्तकाने झाली ते म्हणजे The Story Of My Deportation. त्याच पुस्तकाचा परिचय आज करून घ्यायचा आहे. लाला लजपत राय (या नंतर लालाजी) यांना रावळपिंडीला अटक करून ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात स्थानबद्ध 1907 सालच्या मे महिन्यात करून ठेवले गेले. ही कहाणी त्याच सहा महिने एवढ्या काळातील बंदिवासाची आहे. इतक्या छोट्या काळातील तुरुंगवासाची कहाणी इतक्या सविस्तरपणे सांगितली जावी (237पृष्ठे) याचे नवल वाटेल; पण अधिक नवल ते पुस्तक पूर्ण वाचल्यावर वाटते.

        

 पुस्तकाची सुरुवात लालाजींना ज्या पद्धतीने अटक झाली आणि ज्या तऱ्हेने मंडाले येथे नेण्यात आले त्या वर्णनांपासून होते. झाले असे, की पोलिसांनी लालाजींच्या तीन मित्रांवर एप्रिल 1907 च्या अखेरीस रावळपिंडीत नोटिस बजावली. त्यांनी केलेल्या देशद्रोहाची सुनावणी जाहीर रीतीने करण्यात येईल असे नोटिशीत म्हटले होते. लालाजी त्या मित्रांना मदत करण्यासाठी म्हणून 151907 रोजी रावळपिंडी येथे पोचले. नोटिस बेकायदेशीर होती, सुनावणी ठरल्या दिवशी झालीच नाही. पोलिस आणि सरकारी यंत्रणा यांनी चौकशीचे नाटक पुढील पाच दिवस केले आणि कोणताही आरोप न ठेवता, गुन्हा दाखल न करता लालाजींना अटक केली. आरोप फक्त एक – तोही तोंडी केलेला किंवा सांगितलेला – त्यांनी देशद्रोह करणारी भाषणे केली. त्यामुळे लोकांत असंतोष माजून शांतता भंग होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला येथून अज्ञात स्थळी नेले जात आहे.

          गुप्तता खरोखरच पाळण्यात आली. रेल्वेने जाताना एखादे स्टेशन जवळ आले, की डब्याच्या खिडक्या पूर्ण बंद केल्या जात. पहारा देणाऱ्यांत एक मुस्लिम सब इन्स्पेक्टर, सहा मुस्लिम शिपाई, एक हिंदू सार्जंट आणि एक हिंदू शिपाई होते. लालाजींना एवढी सारी गुप्तता असूनही त्यांना मंडाले येथे नेले जात आहे हे उमगले.मुख्य पोलिस अधिकाऱ्याने मला विचारले, की मी कोठे जात आहे याची काही कल्पना मला आहे का? तेव्हा मी म्हटले, की मला ते स्टेशन माहीत आहे. कारण मी पूर्वी तेथे येऊन गेलो आहे. मला रंगून किंवा मंडाले येथे नेण्यात येत आहे.”( पृष्ठ 43).

        

त्यानंतर लालाजींनी मंडाले तुरुंगातील व्यवस्था (किंवा गैरव्यवस्था) याचे तपशीलवार वर्णन केले आहे. ते लेखन तसेच त्यांनी त्यांच्या अटकेसंबंधी लिहिताना झालेल्या अन्यायाविरुद्ध जे लिहिले आहे ते लेखन संयमी पद्धतीने केलेले आहे. त्यांची भूमिका त्यांच्या कोणत्याही कृत्याने अप्रत्यक्ष रीतीनेसुद्धा लोक उद्दीपित होऊन हिंसाचार भडकू नये अशी होती, कारण त्यामुळे अखेर लोकांचे अनहितच होणार होते. लालाजींना प्रकृतीचा त्रास होता. त्यावर उपचार सुयोग्य रीतीने झाले नाहीत. परंतु त्याबाबत त्यांनी फार तीव्रपणे अथवा संतापाने लिहिलेले नाही. संपूर्ण रेल्वे प्रवासात भोजनाची व्यवस्था अत्यंत असमाधानकारक होती; परंतु पोलिस अधिकारी सौहार्दाने वागत होते. ज्या पोलिस इन्स्पेक्टरकडे भोजनाची व्यवस्था सोपवली होती, त्याची कल्पना बहुधा अशी होती, की त्याचा खानसामा त्याच्यासाठी जे अन्न शिजवत होता त्याहून अधिक चांगल्या प्रतीचे अन्न मला मिळावे अशी माझी पात्रता नाही.

          बोट डायमंड हार्बरमधून सुटली, ती तीन दिवसांनी रंगूनला पोचली. त्या क्षणाला त्यांना काय वाटले? ज्या क्षणाला आमची बोट इरावतीच्या मुखात शिरली, त्या क्षणी का ते मला ठाऊक नाही, मी ब्रह्मदेश आणि त्या देशाच्या नागरिकांकडे ओढला गेलो. कदाचित असेही असेल, की मी तेथे अज्ञातवासात गेलो होतो आणि त्या लोकांची सहानुभूती मिळण्याची आशा मला होती. किंवा असेही असेल, की मी सिलोन वगळता बघितलेला आशियातील तो पहिला देश आणि त्यामुळे आशियाची राजकीय असहायिता मला माझ्या आशियायी बांधवांकडे खेचत होती, किंवा ब्रह्मी लोकांनी त्यांचा धर्म आमच्याकडून घेतला असल्याने त्यांच्याशी माझे काही आंतरिक नाते जुळले असेल.” (पृष्ठ 52) 

 

लालाजींना प्रकृतीचा त्रास मंडालेच्या तुरुंगात अनेक वेळा झाला, उपचार व्यवस्थित असे झालेच नाहीत, कधी झाले-कधी नाही. पण लालाजी त्यातून निभावले. त्यांनी त्यांचा दैनंदिन कार्यक्रम पुस्तकात लिहिला आहे. धर्मग्रंथांचे नियमितपणे वाचन हा त्याचा अविभाज्य भाग होता. धर्मग्रंथांत गीतेशिवाय तैत्तिरीय उपनिषद आणि वैदिक मंत्र यांचाही समावेश होता. मात्र ते केवळ धर्मग्रंथाच्या वाचनावर थांबले नव्हते. ते मनोरंजन किंवा कालक्रमण यासाठी अनेक कादंबऱ्या वाचल्या असे सांगून पुढे लिहितात, की त्याचबरोबर मी ब्रह्मदेश आणि त्या देशाची माणसे यांच्यासंबंधी अनेक पुस्तके वाचली; त्यांनी त्यापैकी दहा पुस्तकांची नावेच दिली आहेत. त्याशिवाय त्यांनी ब्रह्मी लोकांची जीवनपद्धत आणि चालीरीती यांचे वर्णन करणाऱ्या काही कथा वाचल्या. स्पेन्सरचे आत्मचरित्र, बायरनच्या कविता, थॉमस मूर याचे काव्य, ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास (दोन खंडात्मक), लॉर्ड रॉबर्ट याचे Fortyone Years In India ही त्यांनी वाचलेल्या इतर ग्रंथांपैकी काही महत्त्वाची शीर्षके.

          त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी वाचकाला चकित करेलच, पण त्याहून अधिक सुखद धक्का ते पुढे देतात. मी माझ्या त्या बंदिवासाच्या काळात काही वाङ्मयीन काम केले. मी जी पुस्तके वाचली त्यातून काढलेल्या टिपणांच्या आधारे ब्रह्मदेशावर एक पुस्तक उर्दू भाषेत लिहिले. त्यासाठी मला माझ्या ब्रह्मी सब इन्स्पेक्टरबरोबर झालेल्या संभाषणांची मदतही झाली. मी एक उर्दू कादंबरी लिहिण्यास घेतली – सुमारे दीडशे पूर्ण पाने लिहिली, पण ती पुरी होऊ शकली नाही. चालू घडामोडींवर उर्दू भाषेत एक लहान निबंध लिहिला. गीतेचा संदेश सांगणारा एक लेख आणि समाज सुधारणांविषयक एक लेख इंग्रजी भाषेत लिहिला.

          लालाजी ब्रह्मी सब इन्स्पेक्टर आणि शिपाई यांच्याबद्दलची निरीक्षणेही मांडतात, ”ब्रह्मी लोक त्यांच्या आळशीपणासाठी (कु)प्रसिद्ध आहेत. त्यांना शिस्त लावणे फार कठीण काम आहे. ते आहार खूप घेतात, पण त्यांच्या आहाराचा दर्जा चांगला नसतो. ते अट्टल धूम्रपान करणारे आहेत आणि चहा दूध व साखर न घालता पितात. ते फार थोडक्या गोष्टींनी समाधान पावतात. त्यामुळे ते युरोपीयन सार्जंट्सनी केलेला अपमान अगदी मुकाट सहन करतात. — मला वाटते, ते त्यांच्या समकक्ष हिंदुस्थानी माणसांच्या तुलनेत बौद्धिक दृष्ट्या फार उणे असतात. — त्यांची नीतिमत्ता तकलादू असते. काही वेळा त्यांचे दारिद्र्य बघून मला त्यांची फार कीव आली. ते युरोपीय सार्जंटच्या शिल्लक राहिलेल्या अन्नावर कित्येक दिवस उपाशी असल्यासारखे तुटून पडतात.” (पृष्ठ 130). मात्र लालाजींना हे सारे लिहीत असताना, ब्रिटिशांच्या पिळवणूक करणाऱ्या धोरणाचा विसर पडला नव्हता. ते ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ब्रह्मी लोकांच्या शिक्षणाचा दर्जा आणि विस्तार करण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत असे मत काही ब्रिटिश उदारमतवादी लोकांनीच व्यक्त केले आहे हे स्पष्ट सांगतात. ते पुढे जाऊन ब्रिटिशांनी केवळ आर्थिक पिळवणूक केली नाही तर ब्रह्मी लोकांची नैतिकताही संपुष्टात आणली असा आरोप करतात.

          “ब्रह्मी लोक लैंगिक संबंधांच्या बाबतीत फारसे निर्बंध पाळणारे कधीच नव्हते, परंतु परदेशी लोक मोठ्या संख्येने ब्रह्मदेशात येऊ लागल्यानंतर, हे (लैंगिक) संबंध अधिकच अनिर्वचनीय रीतीने खराब होऊ लागले आहेत. एकदा एका युरोपीयन सार्जंटने मला सांगितले, की त्याने एक ब्रह्मी मुलगी नोकराणी – कम -रखेली या रूपात दहा महिने महिना वीस रुपये या रकमेत ठेवली आणि बदली झाल्यावर तिला काढून टाकली. अशा अनेक कथा ऐकू येतात. —- युरोपीयन ब्रह्मदेशांत येण्यापूर्वी त्या दुर्दैवी देशाचे लोक एकाच वंशाचे, एकाच धर्माचे आणि एकच भाषा बोलणारे आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत एकाच प्रकारचे जीवन जगणारे होते. पण परिस्थिती फार बदलली आहे. विशुद्ध ब्रह्मी रक्ताचा माणूस मागे रेटत रेटत जाऊन त्याची पाठ भिंतीशी टेकली आहे. सर्व प्रकारची देशी उद्योगशीलता संपली आहे. सर्व व्यापार विदेशी लोकांच्या हातात आहे. रक्ताचे मिश्रण फार झपाट्याने वाढत आहे. धर्म खुले आम पायाखाली तुडवला जात आहे. एकोणिसाव्या शतकातील ब्रह्मदेश काही दशकांत दिसेनासा होईल. देशातील जमिनीअंतर्गत संपत्ती परकीयांच्या मालकीची आहे. रेल्वे, तारायंत्रे, रस्ते या साऱ्यांची गत तीच आहे.” (पृष्ठ 141142)

 

वरील तपशिलांवरून असा समज होण्याचा संभव आहे, की लालाजींना बंदिवासात फार त्रास असा काही झाला नाही. तर ते अर्थात खरे नाही. त्यांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते. त्यांना नावाने ओळखणारे, त्यांच्याबद्दल आदर बाळगणारे पंजाबी आणि मुस्लिमही त्या वेळेस ब्रह्मदेशात होते. त्या सर्वाना लालाजींच्या सकाळच्या चालण्याच्या रस्त्यावर फिरकू दिले जात नसे. कोणी त्यांना सलाम केला तर तो खपवून घेतला जात नसे. पहाऱ्यावरील हिंदुस्थानी सैनिकांना वेचून बाहेर हाकलले गेले. त्यांना जेवणात भाज्या आणि फळे दिली गेली नाहीत. हवी असतील तर त्यांनी ती त्यांच्या पैशाने आणावी असा दंडक होता. त्यांना डोळ्यांचा त्रास होऊ लागला तेव्हा तपासणीसाठी डॉक्टरकडे नेले गेले. त्याने दीड तास तपासून नंबर बदलला आहे असे सांगितले; पण दोन दिवसांनी पुन्हा तपासणीत त्यांना केस गुंतागुंतीची आहे असे सांगून चष्मा दिलाच नाही!अनेकदा, ते आजाराचे ढोंग करत आहेत असा संशयही व्यक्त केला गेला. त्यांना आलेली पत्रे दिली गेली नाहीत आणि त्यांनी बाहेरच्या लोकांना लिहिलेली पत्रे पाठवलीच गेली नाहीत. त्यांना किती दिवस असे अज्ञातवासात राहायचे आहे ते माहीत नव्हते.

          तशा परिस्थितीत लालाजींनी त्यांचे मानसिक संतुलन कसे राखले असेल? त्यांनी त्याचे उत्तर सातव्या प्रकरणाच्या अखेरीस दिले आहे. सर्वात मोठा भारतीय गुरू भगवान श्रीकृष्ण व्यावहारिक सामंजस्याबद्दल माझ्याशी संवाद करत होता. प्रसिद्ध कवी शिराझ माझ्याशी प्रेम आणि त्यातून जन्मणाऱ्या वेदना यांबाबत हितगुज करत असे. माझे हाल हे मी प्रेम (तत्त्व आणि देश यांच्यावर) केल्यामुळे ओढवले होते आणि त्यामुळे हफीझ याची आर्जवे आणि वेदना माझ्या हृदयाला थेट भिडल्या. माझ्या बंदिवासात हफीझ मला जेवढा प्रिय झाला तेवढा त्यापूर्वी कधीच झाला नव्हता.

रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी ‘बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना  काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले‘ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर‘ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ‘महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

———————————————————————————————————

About Post Author

Previous articleचौगाव आमचा पारच बदलला! (Changing Face of Chaugaon Village)
Next articleतुळशीचे लग्न (Tulsi Vivah)
मुकुंद वझे हे निवृत्तह बँक अधिकारी आहेत. त्यांाना प्रवासवर्णनांचा अभ्यारस करत असताना काही जुनी पुस्त के सापडली. त्यांतनी तशा पुस्तहकांचा परिचय लिहिण्यायस सुरुवात केली. तोच त्यांचा निवृत्तीकाळचा छंद झाला. वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्लो ज्ड सर्किट’ वगैरे चौदा पुस्त के प्रकाशित आहेत. त्यां नी लिहिलेल्या‘ कथा हंस, स्त्रीि, अनुष्टुाभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्याि आहेत. त्यां चे अन्य लेखन- परीक्षणे वगैरे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत.

1 COMMENT

  1. अभ्यासपूर्ण लेख.खुप चांगली माहिती वाचावयास मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here